कामीनी ट्रॅव्हल - भाग १८ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग १८

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १८

आशूने हर्षवर्धनला टूरवर नेण्याची परवानगी दिल्यानंतर काय होईल बघू .

हर्षवर्धनला टूरवर नेता येऊ शकतं हे कळल्यावर प्राचीला फार आनंद झाला.आता हर्षवर्धन लवकर बरा होईल. एका वेगळ्या आनंदाने तिचं मन भरून आलं. हर्षवर्धन चांगला बरा झाल्यावच प्राची आणि हर्षवर्धन यांचं वैवाहिक जीवन सुरू होईल. यामुळे प्राचीला आनंद झाला. प्राची संयमी वृत्तीची असल्यामुळेच ती आपल्या संसाराची सुरुवात होण्यासाठी वाट बघू शकली.

आईंना ही बातमी सांगीतलीच पाहिजे. प्राचीने घरचा फोन नंबर फिरवला.आणि आनंदाने तिने ही गोष्ट कामीनी बाईंना सांगीतली. त्याही खूप खूष झाल्या.

***

ट्रॅव्हल्स कंपनीत सुरवातीला एक आचारी त्याचा असीस्टंट, एक टूर लीडर एवढेच होते. पेपरमध्ये टूर लिडर हवे म्हणून जाहीरात दिल्या गेली. त्याला प्रतीसाद छान मिळाला. त्या मुलाखती मधून चारजणं निवडल्या गेले.

या निवडीनंतर मंगेशभाई प्राचीला म्हणाले,

" प्राची मॅडम आपण जे टूलिडर निवडले आहेत ते एकदम फ्रेश आहेत. त्यामुळे त्यांना टूरलिडरच्या कामाबाबत ट्रेनिंग द्यावं लागेल. टूरलिडरचं काम काय असतं? प्रवासात प्रवाश्यांना काही अडचणी आल्या तर त्या कशा सोडवायच्या याचं ज्ञान त्यांना असायला हवं. थोडक्यात टूरलिडरना प्रसंगावधान असायला हवं."

यावर प्राची म्हणाली,

" तुम्ही जसं म्हणताय तसं करूया. तुम्हीच सांगा हे ट्रेनिंग द्यायला कोणाला बोलवायचं?"

"तुम्ही काळजी करू नका.माझ्या ओळखीचे एक जण आहेत त्यांच्याशी मी बोलतो. त्यांना कधी वेळ आहे ते बघू. त्याप्रमाणे आपण हे ट्रेनींग अरेन्ज करू."

" हो चालेल.मंगेश भाई त्यांची फी विचाराल.आपल्या बजेटमध्ये बसली पाहिजे."प्राची हसत म्हणाली.
तिच्या बोलण्याचा रोख समजून मंगेशभाईपण हसून म्हणाले,

" त्यांची काळजी करू नका."

"मंगेश भाई तुम्हाला माहिती नाही तुमची मला केवढी मदत होते आहे. टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रात मी पूर्णपणे अनभिज्ञ होते. तुमच्या सांगण्यामुळे मला या व्यवसायातील ब-याच गोष्टी कळल्या.या व्यवसायाची गणीतं कळली. त्यासाठी तुमचे खूप आभार मानते."

प्राचीने आभाराच्या गोष्टी केल्या त्याने मंगेशभाई संकोचले.

"अरे मॅडम माझे आभार कसले मानता? मी एका चांगल्या धडाडीच्या व्यक्तीला मदत करतोय याचं मला समाधान मिळतं. मॅडम टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रात स्त्रिया फारशा नाहीत. हेही एक कारण आहे तुम्हाला मदत करण्याचं. तुम्ही संकोच न बाळगता मला तुमच्या अडचणी विचारा. मी त्या सोडवण्यासाठी जे मार्ग सुचतील तसे सुचवीन."

" तेतर मी करणारच आहे.या व्यवसायात स्थिरस्थावर होईपर्यंत तरी मला तुमची सतत गरज पडणार आहे. तेव्हा मी न संकोचता तुम्हाला मदत मागणार आहे."

हे वाक्य प्राचीने हसतहसत मंगेशभाईंना म्हटलं त्यावर मंगेशभाईपण हसले.

त्या चार जणांना टूर कसा न्यायचा?त्यातील प्रवाशांशी कसं बोलायचं? त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या कशा शांतपणे ऐकून घ्यायच्या? त्या सोडवायचा प्रयत्न कसा करायचा? याचं प्रशिक्षण दिल्या गेलं. हे प्रशिक्षण अर्थातच मंगेशभय्यांनीच आयोजीत करून दिलं होतं.

हे प्रशिक्षण देणारे वल्लभ पाटकर ही मोठ्या लेवलची व्यक्ती होती. सध्यातरी एवढ्या मोठ्या व्यक्तीला छोट्याश्या कामीनी ट्रॅव्हल्सला प्रशिक्षणासाठी बोलावण्याची कुवत नव्हती. मंगेशभाईंनी ती अडचण सोडवली.

मंगेशभाई कामीनी ट्रॅव्हल्सच्या म्हणजेच हर्षवर्धन आणि प्राचीच्या मागे खंबीरपणे उभे होते.

***

टूरमध्ये वेगळेपण आणण्यासाठी क्रियेटीव्ह माईंड असलेली व्यक्ती प्राचीला हवी होती. त्यासाठी पेपरमध्ये मुलाखतीची जाहीरात देण्यात आली. प्राची ग्राफिक डिझायनर असल्याने क्रिएटीव्हीटीला तिच्या दृष्टीनी महत्व होतं.

प्रवासाची रूपरेषा जेव्हा नाविन्यतेची कास धरून आखली जाते तेव्हा त्या प्रवासातील गंम्मत आणखी वाढते. ही गोष्ट प्राचीने लक्षात ठेऊन तशाच प्रकारचे प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले. त्यात दहा उमेदवारांपैकी दोघं तिघांकडे कल्पकता होती. त्यांना तिने निवडलच पण त्यांच्यावरच्या पदासाठी प्रिया हणमंते हिची निवड प्राचीने केली.

प्रिया आऊट ऑफ द बाॅक्स जाऊन विचार करणारी होती. हा तिचा गूण प्राचीला आवडला. मुलाखतीद्वारे प्रिया हणमंते हिची निवड प्राचीने केली. तिच्या भन्नाट कल्पना प्राचीला फार आवडल्या.

प्राचीने इतर तिघांना तिच्या हाताखाली काम करण्यास सांगीतलं. त्या तिघांवर कोणती आणि कशी जबाबदारी सोपवायची हे प्रियाने प्राचीशी चर्चा करून ठरवायचे हे प्राचीने निश्चीत केले.

प्रियाला वेगवेगळ्या कल्पना सुचाव्या म्हणून प्राचीनी तिला पूर्ण वैचारीक स्वातंत्र्य दिलं. तिच्या कल्पना अमलात आणायच्या की नाही यावर मात्र प्राचीच अंतिम निर्णय घेणार होती.

प्रियाच्या कल्पना वेगळ्या असल्या तरी त्यावर प्राचीलाच विचार करावा लागणार होता. कामीनी ट्रॅव्हल्सची प्रतिमा खूप उंच न्यायची होती पण हे करत असतांना भावनेच्या किंवा उत्साहाच्या भरात चुकीचा निर्णय घेतला जाऊ नये म्हणून प्राची सावध होती.

प्रियाकडून आलेल्या कल्पनेवर प्राची राधा आणि शशांकशी चर्चा करत असे. काही वेळेस कागदावर असलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवणं कठीण असतं तर कधी कधी अशक्यच असतं. हे लक्षात घेऊन प्राची त्या कल्पनांवर खोलवर विचार करत असे.

प्रियाच्या काही कल्पना प्रत्यक्षात उतरवणं शक्य नसेल तर प्राची आणि प्रिया चर्चा करून त्यातला सुवर्णमध्य काढायचा प्रयत्न करायच्या.

बाॅस म्हणून न पटलेल्या कल्पना प्राची एकदम झीडकारत नसे. कारण अश्या कल्पना डोक्यात येणं ही दैवी देणगी असते हे प्राचीला मान्य होतं. म्हणून ती सुवर्णमध्य काढत असे. प्राचीच्या याचं वागणुकीमुळे प्रियालाही नवीन कल्पना शोधायला, त्या प्राची समोर मांडायचा उत्साह असायचा.

***

कामीनी ट्रॅव्हल्स मधील कर्मचा-यांची संख्या आता वाढत चालली होती. प्रिया प्रत्येक प्रवासात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करायची. त्यासाठी तिला त्यांचा टूर जिथे जाणार असेल तिथली सगळी माहिती म्हणजे भोगोलिक, ऐतीहासिक, परंपरेने येणा-या चालीरीती हे जाणून घ्यावं लागायचं.

त्यानुषंगाने ती काही खेळ घ्यायची. प्रश्नमंजुषा सारखे खेळ पण घ्यायची. जेणेकरून जिथे टूर गेला आहे तिथली सगळी माहिती प्रवाशांना मिळाली पाहिजे. हे ज्ञान त्यांच्याजवळ नेहमीसाठी राहीलं तर प्रवाश्यांना प्रवास केल्याचा आनंद मिळेल. असं प्रियाला वाटतं असे. काहीअंशी ते खरंही होतं.

प्राची नेहमी आपल्या टूर लीडरला सांगत असे की,

"आपल्याबरोबर प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी हा नेहमीसाठी आपल्या ट्रॅव्हल कंपनी बरोबर कुठल्याही आकर्षणाशिवाय कायमचा जोडला गेला पाहिजे. हे तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा. यासाठी त्यांच्याशी प्रेमानी बोला. त्यांच्या प्रश्नांनी कंटाळून जाऊ नका. विशेषत: वृद्ध प्रवाश्यांनी कितीदाही प्रश्न विचारले तरी हसत मुखाने उत्तर द्या. कारण एका वयानंतर एकच प्रश्न सतत विचारण्याची सवयच लागते. वृद्ध प्रवाशांनी सतत एकच गोष्ट विचारली म्हणून कंटाळून त्यांना वेडीवाकडी उत्तरं देऊन त्यांचा अपमान करण्याची तुम्ही हिम्मत करून नका. त्यांना आपल्या बरोबर सुरक्षीत वाटतंय म्हणून ते आपल्याला एवढे प्रश्न विचारतात हे लक्षात घ्या."

टूरलिडरच्या चेह-यावरचे भाव बघून प्राची पुढे म्हणाली,

"तुमची प्रवाशांबरोबर असणारी वागणूक आपल्या कंपनीचं भविष्य ठरवणार आहे. प्रवासी आपली जमा केलेली पूंजी आपल्याला देऊन एक सुखद आणि आनंददायी यात्रेचा अनुभव घ्यायला आलेले असतात. त्यांना आपण निराश करायचे नाही.

ऐनवेळी आलेली आपत्ती ही त्यांना सुद्धा कळते. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या प्रयत्नांमध्ये तेही सामील होतात. प्रवासी आहोत आम्ही काय करणार म्हणून ढिम्म बसत नाहीत. तेव्हा त्यांच्याशी आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवायचं. कामीनी ट्रॅव्हल्सचे जे नियम आहेत ते हवं तसं आपल्या सोयीसाठी दाखवायचे नाहीत. प्रसंगाचं गांभीर्य बघून ठरवायचं. कळलं?"

" हो मॅडम." सगळे म्हणाले.

प्राचीच्या या सांगण्यामुळे तिचे टूरलिडर खूप सौजन्याने प्रवाशांशी वागायचे.

***

प्राचीने काही वर्षांतच आपल्या निरीक्षण शक्तींनी ब-याच गोष्टींचं ज्ञान करून घेतलं होतं. ती माणसं वाचायला शिकली होती. यामुळेच प्रवाश्यांची काळ्जी कशी घ्यायची आणि प्रवासाचा पूर्ण आनंद त्यांना कसा मिळेल हे ती बघत असे.

कामीनी बाई, हर्षवर्धन आणि कामीनी ट्रॅव्हल्स या तीन गोष्टी तिच्या मनाच्या खूप जवळ होत्या.

प्राची एक व्यावसायिक असली तरी त्याला एक भावनिक पदर होता. जो तिच्या कंपनीसाठी उपयोगी पडायचा. आर्थिक व्यवहारात ती सतर्क असायचीच. तिला माहिती होतं की प्रवाश्यांना वाटतं असतं पैसे भरलेत तर आपल्याला चांगली वागणूक मिळाली पाहिजे. आणि प्रवास केल्याचं मनाला समाधान मिळालं पाहिजे. ही प्रवाशांची इच्छा संयुक्तिक आहे हेही तिला कबूल होतं.

हे विचार कदाचित आधीच्या प्राचीत सापडले नसते पण हर्षवर्धनशी लग्नं केल्यावर त्याला यातून बाहेर काढताना तिची रिहॅब सेंटर कडून हीच अपेक्षा होती. हर्षवर्धनशी वागताना त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना सुरवातीला प्राची मेटाकुटीला येत असे. पण प्रत्येक वेळेला स्वतःला समजावून ती हसत मुखाने हर्षवर्धनच्या प्रश्नांना उत्तरं देत असे. हे करताना रिहॅबसेंटर तिच्या मदतीला धावत असे.

रिहॅबसेंटरचे पैसे भरल्यामुळे आपण काय त्यांच्या कडून अपेक्षित करत होतो हे प्राची नेहमीच लक्षात ठेवत असे. यामुळे तिला प्रवाशांच्या कामीनी ट्रॅव्हल्स मध्ये पैसे भरल्यानंतर काय अपेक्षा असू शकतील याचा अंदाज येत असे.

हीच सहनशक्ती कामीनी ट्रॅव्हल्सच्या टूर लीडरनी अंगी बाणवायला हवी असं तिला वाटायचं.

त्या दिवशी कामीनी बाईंनी प्राचीला म्हटलं

" तुला एक सुचवू का?"

"सुचवा नं." प्राची म्हणाली.

" तसं मला खूप महत्त्वाचं काही सुचवायचं नव्हतं. पण मनात आलं म्हणून सुचवावसं वाटलं."

कामीनी बाईं हाताची अस्वस्थ हालचाल करत बोलल्या.

" अहो आई बोला. एवढा का विचार करताय."

प्राची म्हणाली तशा कामीनी बाईं लगेच म्हणाल्या,

" नको असू दे.नंतर कधीतरी सांगते.इतकं महत्वाचं नाही ते."

" अहो बोला. महत्वाचं आहे की नाही ते नंतर बघू."

" नको ग असू दे. तू आवर तुझं.आत्ताच ऑफीसमधून आलीस.थकली असशील.चहा करू का? आलं घालून तुला आवडतो तसा."

" आई विषय का बदलतात? आणि एवढ्या बावचळता का? बोला नं?"

किती तरी वेळ कामीनीबाई बोलल्या नाहीत.त्यांच्या मनात कसली धाकधूक होती हे प्राचीला कळत नव्हतं.त्या का एवढ्या बावरल्या आहेत हेही तिला कळत नव्हतं.
काय बोलायचय कामीनीबाईंना?
_________________________________
क्रमशः कामीनीबाई बोलतील काय? आणि काय बोलतील? बघू पुढील भागात.
लेखिका.. मीनाक्षी वैद्य.