कामीनी ट्रॅव्हल - भाग २८ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग २८

कामीनी ट्रॅव्हलक्ष भाग २८

पाटकर विद्यूतची माहिती देतो. त्याला प्राची केबीनमध्ये बोलावून चांगलीच झापते.

विद्युत प्रथम आपला गुन्हा कबूल करत नाही.पाटकर समोरून त्याला सगळे फोटो दाखवतात.ते बघीतल्यावर त्याची बोलती बंद होते.

"विद्युत... फोटोवरून आणि पाटकरांनी जी माहिती दिली त्यावरून आम्हाला कळलय तू कोणासाठी काम करतोस.पण तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. पटकन बोललास तर ठीक नाहीतर मला पोलीसांनी मदत घ्यावी लागेल.तुला काय आवडेल?"

प्राचीचा कडक स्वर ऐकून विद्युत मनातून घाबरला.

" मॅम मी तोंडलकर गृपसाठी काम करतो. मी तिथेच काम करतो पण जास्तीच्या पैशासाठी मी हे काम करायला तयार झालो. मॅम मला माफ करा.मला काढू नका."

" तुझं इथे काम काय आहे. तू देणार मला तोंडलकर गृपची माहिती?"

"हो मॅम सगळं सांगीन."

"का सांगशील मला तू त्यांची माहिती? तू त्यांच्याशी गद्दारी करू शकतो तर ऊद्या माझ्याशी पण करशील. किती वर्ष झाली तुला त्यांच्याकडे?"

" दहा वर्ष." विद्युत चाचरत म्हणाला.

" दहा वर्ष त्यांचं मीठ खाऊनसुद्धा तू त्यांच्याशी दगाबाजी करायला तयार आहेस. एवढी तुझी स्वामीनिष्ठा आहे. मला परवडणार नाही तुझी ही स्वामीनिष्ठा. तुला माझ्या कंपनीमध्ये का राह्यचय. एक पटणारं कारण सांग?"

" मॅम तुमच्या कंपनीत जे हसत खेळत वातावरण आहे ते तिकडे नाही. जेव्हा मला इथलं वातावरण आवडायला लागलं तेव्हा त्यांना तुमची माहिती देताना मला फार लाज वाटायची." तो रडायलाच लागला.

"तू कितीही रड. आमच्या कंपनीमध्ये दगाबाजीला शरणागती नाही. तुला आजपासूनच नोकरीवरून कमी केलंय. संदीप अकाऊंट सेक्शन ला सांगून याचा हिशोब चुकता कर. याच्याकडून लिहून घे की हा आपल्या कडील अजून माहिती तोंडलकरना देणार नाही. आजपासून आमच्या स्टाफ पैकी कुणाशीही मैत्रीखातर बोलून माहिती काढायचा प्रयत्न करणार नाही. हे सगळं यांच्याकडून लिहून त्यावर याची सही घे. आणि संदीप आपल्या स्टाफला सांग याच्याशी कोणी मैत्री ठेवली तर त्यांना कामावरून कमी करण्यात येईल. मला हे विषारी बी आपल्या कंपनीत रूजू द्यायचं नाही. गेट लाॅस्ट"

प्राचीचा आजचा रूद्रावतार संदीपला नवीन होता. पाटकरांनी तर पहिल्यांदाच बघीतलं.विद्युतची चांगलीच टरकली.

"मॅम तुम्ही मला काढलंय तर तेही मला काढतील."

"बरोबर मी तुला नोकरीवरून काढलं की तू त्यांच्या कामाचा उरणार नाहीस मग कशाला ठेवतील तुला? यालाच म्हणतात धोबी का कुत्ता न घरका न घाटका. संदीप घेऊन जा याला. पाटकर साहेब खूप धन्यवाद.तुमचे उरलेले पैसे. लगेच देते. संदीप चेकबुक आण."

" हो मॅम"संदीप चेकबुक आणायला गेला.

विद्युत खूप गयावया करत म्हणाला,
" मॅडम मी तुमच्याशी गद्दआरई नाही करणार.मला नोकरीवरून नका काढू. माझ्या घरी माझे म्हणाले आई वडील आहेत."

" विद्युत ब-याच जणांकडे त्यांचे म्हातारे आईवडील असतात पण म्हणून ते तुझ्यासारखे वागत नाहीत.तू माझ्या कंपनीत राहून आमच्याशी गद्दआरई केलीस. हे तू का केलंस हे एकवेळ मान्य केलं तरी तुझ्या पेक्षा जास्त प्रामाणिक आणि स्वामीनिष्ठ लोक आमच्या कंपनीत आहेत. त्यामुळे तुझ्या वागणुकीचा त्यांना संशय आला.तुला वाटलं तू चार महिने करत असलेली हेरगिरी पोचली आहे तर यापुढेही तसंच होईल.पण माझ्या प्रामाणिक लोकांमुळे तुझं पितळ उघडं पडलं."

" मॅडम माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी माझं सगळं आयुष्य तुमच्या कंपनीसाठी प्रामाणिकपणे देईन यावर विश्वास ठेवा."

विद्युत काकुळतीला येऊन म्हणाला.

" विद्युत ती वेळ गेली. तू कितीही प्रामाणिक राहिलास तरी आम्हाला तुझ्यावर विश्वास निर्माण होणार नाही.तू आता माझा वेळ घेऊ नकोस. निघ इथून. संदीप घेऊन जा याला."

प्राचीने म्हटलं.

संदीप विद्युतला केबीनबाहेर घेऊन गेला.

केबीनबाहेर पडल्यावर विद्युत संदीपला म्हणाला,

" संदीप काहीतरी कर माझ्यासाठी.माझ्याकडून खूप मोठी चूक झाली.मला कामीनी ट्रॅव्हल्स सोडून जावं वाटत नाही."

"याचा आधी विचार करायचा.आमच्या प्राची मॅडम जेवढ्या चांगल्या आहेत तेवढ्याच त्या कडक आणि शिस्तीच्या आहेत. तू जे काम केलंय ते त्यांना पटणारं नाही. कामीनी ट्रॅव्हल्स ही कंपनी म्हणजे त्यांचा श्वास आहे.तिच्याशी दगाबाजी कोणी केलेली त्यांना चालणारच नाही.त्यामुळे तू आता या कंपनीला विसर. चल निघ आता .हा घे तुझ्या पगाराचा चेक."

संदीपने विद्युत घ्या हातात चेक ठेवला आणि त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.

****

प्राचीला हर्षवर्धनमध्ये आणखी प्रगती जाणवू लागली. हर्षवर्धन आता स्वतःहून रोमान्समध्ये पुढाकार घेऊ लागलेला बघून प्राची मनोमन सुखावली.

हर्षवर्धनला अजूनही त्याला वडलांविषयी आत्मीयता वाटत नसते .पण जे परीवर्तन हर्षवर्धनमध्ये प्राचीला दिसत होतं ते त्यांच्या संसारासाठी महत्वाचं होतं.

भय्यासाहेब आता कामीनी बाईंशी प्रेमानी बोलू लागतात. जयंत जवळपास रोजच येत असतो.त्याला भय्यासाहेब आणि कामीनी बाईंचा चेहरा बघून दोघांमध्ये होणारा बदल कळत असतो.

जयंत हा बदल बघून प्राचीला कळवत असतो.त्यामुळे प्राचीला कामीनी बाईंना त्यांचं सूख सापडलं यांचा आनंद होतो.

***

कांहीं दिवस उलटतात भय्यासाहेब आणि कामीनी बाई यांच्यात सामान्य नवरा बायकोसारखे नाते निर्माण होऊ लागले. हा सुखावह बदल घडवून आणल्याबद्दल कामीनी बाई देवाचे शतशः आभार मानतात.

एक दिवस भय्यासाहेब आणि कामीनी बाई गप्पा मारत असतात.कामीनी बाई म्हणतात.

"प्राची खूप छान ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सांभाळते. हर्षवर्धन आता लोकांमध्ये छान मिसळायला लागला आहे. प्राचीचं कौतुक यासाठी की आपल्या ट्रॅव्हल कंपनीला तिस-यांदा पुरस्कार मिळाला. "

"हो तो सोहळा मी टिव्हीवर बघीतला.पण ते बघून मला खूप आनंद झाला नव्हता कारण तेव्हा माझं मन विकृत होतं. मला अहंकारपण होता. त्यामुळे तो कार्यक्रम बघतांना माझी चीडचीड होत होती."
भय्यासाहेब एकदम बोलायचे थांबले.

"कळतंय मला सगळं.पण आता आपण मागचं विसरून पुढे जाणार आहोत असं ठरलय नं. मग नका त्यावर एवढा विचार करू. हर्षवर्धनला अजुन खूप सुधरायचं आहे. प्राचीचा तसाच प्रयत्न चालू असतो. व्यवसायाचे सगळे निर्णय हर्षवर्धन अजून ठामपणे घेऊ शकत नाही.पण काही वेळेला तो काही सुचवतो ते योग्य ठरतं."

"हर्षवर्धनला नशेच्या विळख्यातून खरंतर मीच बाहेर काढायला हवं होतं. पुर्वीच केलं असतं तर आज तो खूप छान झाला असता." भय्यासाहेबांना पश्चात्ताप झाल्याचं कामीनी बाईंच्या लक्षात आलं.

"आताही हर्षवर्धनमध्ये बदल होईल. तसा बराच बदल झाला आहे. प्राचीनी त्यासाठी खूप मेहनत घेतली. माझ्या मनात होतं. आठ दिवसानंतर तुमचं चेकअप झालं की प्राची आणि हर्षवर्धनला पुन्हा टूरवर पाठवू. त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करायला."
कामीनी बाई म्हणाल्या..

" हो नक्की पाठवू. आत्तासुद्धा त्यांना जायला हरकत नाही.मी ठीक आहे."

" हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी कळवते प्राचीला. तुमचं चेकअप झाल्याशिवाय प्राची जायला तयार होणार नाही. मी तिला म्हटलं होतं की तुमच्या आयुष्याची सुरुवात करायला तुम्ही फिरायला गेला होता आणि यांच्या आजारपणामुळे तुम्हाला मध्येच यावं लागलं.तर ती काय म्हणाली माहिती आहे? प्राची म्हणाली आई आपण कितीतरी जणांसाठी आयुष्यात तडजोड करत असतो.भय्यासाहेब तर आपले आहेत.आपल्या घरचे मोठे आहेत.त्यांच्या तब्येतीबद्दल आम्ही परत आलो ही तडजोड नाही.हहे आम्ही करायलाच हवं होतं.त्यांची तब्येत ठीक झाली की आम्ही जाउ."

" असं म्हणाली?"

भय्यासाहेबांनी आश्चर्याने विचारलं.

" हो.खूप समजूतदार आहे प्राची."

"मीच करंटा एवढ्या चांगल्या मुलीला ओळखलं नाही.तिच्याबद्दल विकृत विचार मनात बाळगले."

हे बोलताना भय्यासासेबांच्या आवाजात खंत जाणवली.

" आता यावर फार विचार करू नका."
कामीनी बाईंनी म्हटलं.

हे दोघं बोलत असतानाच. जयंत आला.

""अरेवा! रामसीतेची जोडी छान दिसतेय."
जयंत आनंदाने म्हणाला.

जयंताच्या या बोलण्यानी कामीनी बाई लाजतात.

"ये जयंता. बस."

"बसतो.मी बघायलच आलो आहे की काय चाललंय. सगळं ठीक आहे नं."

"जयंता तुझे किती आभार मानू कळत नाही. तू माझी कानउघाडणी केली नसती तर आज मी एवढा बदललो नसतो.तुझे आभार कसे मानू कळतं नाही."

" ऐ आभार कसले मानतो. मित्र आहे मी तुझा. मी माझं कर्तव्य केलं. तू ऐकलंच नसतं तर मी काय केलं असतं? आजपर्यंत तू तेच केलं. पण यावेळी तू ऐकलं हे फार छान झालं. मग आता पुढं काय? वहिनी आणि तू फिरुन या तुला छान बरं वाटलं की."

" सध्यातरी आमचं ठरलय की प्राची आणि हर्षवर्धनला त्यांचा राहीलेला टूर पुर्ण करायला पाठवायचा."

भय्यासाहेब म्हणाले.

" गुड. हा निर्णय लगेचच अमलात आणा." जयंत म्हणाला.

" हो मी आजच प्राचीला सांगणार आहे."

कामीनी बाई म्हणाल्या.

यानंतर जयंता आणि भय्यासाहेब हलक्याफुलक्या गप्पा करू लागले. कामीनी बाई स्वयंपाकघरात नाश्ता तयार करायला गेल्या. आज त्यांना स्वयंपाकघरात वावरताना सगळ्या गोष्टींची नव्यानीच ओळख होत होती. इतकी वर्षात सगळं ओळखीचं होतं तो ओटा, तो गॅस, ताखटमीठाचा मिसळणाचा डबा पण त्याच गोष्टींना आता नवा अर्थ प्राप्त झाला होता.

कामीनी बाईंना त्यांचं आयुष्यच आता नव्यानी भेटलं होतं त्यामुळे सगळ्या गोष्टींना नवी झळाळी मिळाली होती. हे सगळं कधी घडेल असं कामीनी बाईंना स्वप्नातही वाटलं नव्हतं.

आता मिळालेल्या नव्या आयुष्यात त्यांना नववधू सारखं जगायचं होतं. गेलेली वर्ष गंगेला मिळाली.आता हाती आलेला अमृत घट त्यांना हातून निसटू द्यायचा नव्हता. आपल्याच विचारात गुंतलेल्या कामीनी बाईंच्या कानावर भय्यासाहेबांचा आवाज आला.

"कामीनी झाले का पोहे?"

त्यांच्या आवाजानी कामीनी बाई रोमांचीत झाल्या. इतकी वर्ष इतक्या प्रेमळ आवाजात भय्यासाहेबांनी कधीच हाक मारली नव्हती. त्यांच्या आवाजातील प्रेमळ दरवळ कधीच ऐकला नव्हता.

"हो आणते. झालेत पोहे."
कामीनी बाईंनी तेवढ्याच लाज-या आवाजात उत्तर दिलं.

पोह्याच्या प्लेट्स, ट्रे सगळ्यांचा स्पर्ष सुद्धा कामीनी बाईंना नवीन वाटला. काय जादू असते प्रेमात पडलं की. कामीनी बाई या विचारांनी स्वतःशीच हसल्या. चेहरा नीट करून आपली बावचळलेली अवस्था लपवत पोह्यांचा ट्रे घेऊन त्या बाहेर आल्या.

"वहिनी मला आता ऊद्यापासून यायची गरज नाही."

" का?"

भय्यासाहेब आणि कामीनी बाई दोघांनी एकाच वेळी विचारली.

"तुमची एकवाक्यता झाली आहे आता मला चिंता नाही. तुम्ही आता मस्त रहा.गप्पा मारा केवढा बॅकलाॅग भरुन काढायचा आहे तुम्हाला! आता यात तिसरं कोणी यायला नको. म्हणून आता कधीतरी भेटायला येईन. दोघांना माझ्या खूप शुभेच्छा." एवढं बोलून जयंता मोठ्याने हसला.

जयंतच्या बोलण्याने कामीनी बाईं पुन्हा लाजल्या.
पोहे खातांना जयंत गमतीने म्हणाला,

" वहिनी आज पोहे एकदम स्पेशल झाले आहेत.काही म्हण भय्या तुला वहिनींसारखी सहचरी मिळाली हे तुझं भाग्य समज.आता उरलेल्या आयुष्यात त्यांना जप. तुमच्यात नव्याने फुललेलं हे प्रेमाचं नातं बघून मला खरच खूप आनंद झाला.माझा भरकटलेला मित्र आता मार्गावर आला आहे याचा आनंद आहे. आता उतारवयात असेच हातात हात घालून जगा.तुम्हा दोघांना माझ्या शुभेच्छा.चल.निघतो."

भय्यासाहेबांचा हात हातात घेऊन थोपटत जयंत म्हणाला आणि निघाला.

कितीतरी वेळ दोघांपैकी कोणीच बोललं नाही. फोनच्या आवाजानी दोघांची तंद्री भंगली.

भय्यासाहेबांचा फोन वाजत असतो.

****

प्राची कालच्या भय्यासाहेबांच्या बोलण्यावर विचार करत असते. ती एकदम त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. त्यांच्यात खरच बदल झाला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण तरीही आपण जयंतकाकांना विचारायचं असं ती ठरवते.
सगळं आवरून ती ऑफीसला निघत असते. हर्षवर्धन पण तयार असतो. दोघं निघतात.

"प्राची आपण पुन्हा कधी जायचं?"

" कुठे ?"

प्राचीने विचारलं.

"आपण बंगलोरला गेलो होतो पण लगेच आलो.पुन्हा जायचं का?"

हर्षवर्धनची टूरवर जायची इच्छा आहे हे प्राचीला महत्वाचं वाटलं. पण या बाबतीत आईंशी विचारून ठरवावं असं ती हर्षवर्धनला म्हणते.

त्याच्या बोलण्यात वडिलांची काळजी दिसत नाही हे प्राचीच्या लक्षात आलं. तिला वाटलं टूरवर गेल्यावर याला आपण ब-यापैकी समजवू शकू. इथे राहून त्याला कळेल की नाही हे तिला कळत नाही. काही न बोलता दोघं ऑफीसमध्ये पोचले.

प्राची ऑफीसमध्ये पोचल्यावर दहाच मिनिटात राधा आली
. सगळ्यांना हाय, हॉलो करून ती प्राचीच्या केबीन मध्ये शिरली.

"हॅलो. गुडमाॅर्निंग. "

प्राचीने आवाज येताच वर बघितलं

"अरे तू कशी काय?" प्राचीने आश्चर्याने विचारलं.

"मी विचार केला आपणच जावं आणि भेटावं."

"आलीस ते छान झालं."

भय्यासाहेब काल प्राचीला काय म्हणाले ते तिनी राधाला सांगीतलं.

" वा!ऊपरती झाली वाटतं."

" हो दिसतय असं. मी आधी जयंता काकांना विचारते. त्यावरच ठरेल भय्यासाहेबांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा की नाही. हर्षवर्धन आत्ता मला म्हणाला आपण टूरवर कधी जायचं? ही माझ्या दृष्टीनी प्लस साईन आहे. म्हणूनच आईंशी आधी बोलेन आज आणि तसं ठरवेन."

" खरच जायला हव तुम्ही. तेव्हा गेलात तेव्हाच अगदी भय्यासाहेबांना अटॅक यायचा होता."

"ठीक आहे. तेव्हा आम्ही इथे येणं आवश्यक होतं. आता करते प्लॅन. फिरायला गेल्यावर मला हर्षवर्धनच्या मनात त्याच्या वडलांबद्दल प्रेम आत्मीयता निर्माण करायला हवी. अजूनही त्याच्या मनात स्वतःच्या वडलांविषयी काळजी जाणवत नाही."

"कशी असेल? भय्यासाहेबांनी त्याला कधी वडिलांचं प्रेम दिलं का?त्याला भय्यासाहेब सतत झिडकारत राहिले. यामुळेच तो ड्रग्जच्या आहारी गेला.अजुनही तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे."

" हो ते तर आहेच. एवढी सुधारणा झाली आहे आता थोडी राहीली आहे. मी प्रयत्न करतच राहणार. चहा काॅफी काय घेतेस?"

"काॅफी.." प्राची बेल वाजवते. तुकाराम आत येतो.

" तुकाराम दोन काॅफी आण."

प्राची जयंतकाकांना फोन लावते.

" हॅलो."

" काका मी प्राची बोलते आहे."

भय्यासाहेब तिला काय म्हणाले हे ती त्यांना सांगते.आणि विचारते की हे खरंच बदलले आहेत का? त्यावर जयंत म्हणतो.

" हो भय्या स्वभावानी बदलला आहे.मी त्याला चांगला ओळखतो. तो खरच बदलला आहे."

" हं.. मला तुम्हाला विचारून खात्री करुन घ्यायची होती. मी आणि हर्षवर्धन पुन्हा टूरवर जायचा विचार करतोय."

"भय्या मला म्हणाला माझ्या तब्येतीमुळे त्यांचा प्रवास अर्धवट राहिला. त्यांना पुन्हा जा सांगणार आहे. मला कामीनी कडून हे कळलं असं म्हणाला.वर हे ही म्हणाला की त्यांच्या आयुष्याची सुरवात व्हायला हवी म्हणून त्यांनी जायला हवं. तुम्ही दोघं आता निश्चींतपणे जा.भय्याला आणि वहिनींनाही नव्याने आयुष्य सुरू करायचं आहे. त्यांनाही मोकळीक मिळेल. तुम्ही ठरवा प्रवासाचं."

" ठीक आहे काका. आम्ही इथे नसतांना तुम्ही घरी जात जा किंवा फोन करत जा."

" तू काळजी करू नको. माझं लक्ष राहील."

प्राचीने फोन ठेवला.प्राचीला मनातून आनंद झाला. ती हे हर्षवर्धनला सांगते. आणि पुन्हा नव्या ऊत्साहानी टूरची आखणी करायला लगेचच प्रियाला सांगते.

प्राची मनातच पुढच्या आयुष्याची स्वप्नं रंगवू लागली.हर्षवर्धन स्वप्नात दंग झालेला प्राचीचा चेहरा निरखत असतो. त्याला प्राचीन फार कौतुक वाटतं. त्याच्या मनात आलं,

"किती सहज सगळ्या गोष्टी सांभाळते. आपल्यालाही असंच हिच्या सारखं व्हायचं आहे. प्राची खूप प्रेम करते माझ्यावर. ती मला सगळं शिकवेल. मीपण तिला कधीच दु:ख देणार नाही."

हर्षवर्धन तिच्याकडे बघत असतो आणि तेव्हाच प्राचीचं त्यांच्याकडे लक्षं जातं. तिला त्यांच्या बघण्याने मोहरून जायला होतं.ती हसली अणि तिने हर्षवर्धनचा हात घट्ट पकडला.

दोघांच्या नजरेच्या खेळातुनच कळतं आता दोघांचं आयुष्यात आनंदी क्षण आलेत. प्राची तिच्या धेय्या पर्यंत पोचत आली आहे.
प्राची आपलं ध्येय लवकरच गाठेल असा विश्वास आपणही ठेऊ.

--------------------------------------------------------------
समाप्त
लेखिका... मीनाक्षी वैद्य.