कामीनी ट्रॅव्हल - भाग ३० Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३०

कामीनी ट्रॅव्हल्स भाग३०

त्या दिवशी सकाळची थोडी कामं आटोपून कामीनी बाई समोरच्या खोलीत पेपर वाचत बसल्या होत्या. प्राची आणि हर्षवर्धन नाश्ता करून कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये गेले होते. भय्यासाहेब त्यांचे मित्र जयंत सरदेसाई यांच्याकडे गेले होते. तन्मय नेहमीप्रमाणे काॅलेजला गेला होता.

समोरच्या खोलीचं दार उघडंच होतं. कामीनीबाईंचा सावत्र मामेभाऊ आणि मामा तरातरा चालत घरात शिरले.

"बोलायला वेळ आहे का?"

कामीनी बाईंनी नजर वर करून आवाजाच्या दिशेनी बघीतलं. दिनूमामा आणि विश्वासला बघून त्यांना आश्चर्य वाटलं. कामीनी बाई त्यांना बसा म्हणाल्या तसा दिनू मामाच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.

"वा! हे छान आहे आपलं भलं झालं की इतरांना विसरायचं. माझ्यामुळे तू या श्रीमंत घरी पडली आहे आणि मला विसरली."

कामीनी बाईंना दिनू मामाच्या बोलण्याचा काही संदर्भच लागत नव्हता.

"काय बोलतोय दिनूमामा तू? मला कळत नाही."

यावर दीनूमामा त्यांच्याकडे बघून कुत्सीतपणे हसला.

दिनूमामा कामीनी बाईंच्या सावत्र आईचा लहान भाऊ. कामीनीबाईं पेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठा होता.आज तो आपल्या मुलाबरोबर का आला आहे हे त्यांना कळत नव्हतं.

" दिनूमामा जरा स्पष्ट बोलशील का?"

"काही समजलं नाही असं दाखवून नको.मी ताईला आणि तुझ्या वडलांना समजावलं म्हणून एवढ्या श्रीमंत माणसाशी तुझं लग्नं झालं. नाहीतर बसली असती अर्धपोटी राहून संसार करत." दिनूमामा तिरीमिरीने बोलला.

आता कामीनी बाईंच्या लक्षात आलं की या लोकांना पैसे हवे आहेत म्हणून इथे आले आहेत. तरी त्यांनी विचारलंच

"त्या गोष्टीचा माझ्या घरी येण्याशी काय संबंध आहे?"

"वा काय पण बिनडोक प्रश्न विचारला ताई तू." विश्वासच्या या बोलण्यावर कामीनी बाई चिडून म्हणाल्या

"विश्वास तोंड सांभाळून बोल. मी तुझ्या वयाची नाही तुझ्या पेक्षा मोठी आहे हे लक्षात ठेव."

" मोठी असून उपयोग काय? लहानसहान गोष्टी तुझ्या तर लक्षातच येत नाही."

विश्वास अजूनही चिडलेलाच होता.

"कोणत्या गोष्टी?"
काहीही न समजून कामीनी बाईंनी विचारलं.

"आम्हाला जगायला पैसे लागतात हे विसरली वाटतं तू" विश्वास रागानी म्हणाला.

"तुम्हाला जगण्यासाठी लागणारा पैसा तुम्ही कष्ट करून मिळवायला हवा.मला का मागता?"

कामीनी बाईंनी तेवढ्याच उंच आवाजात उत्तर दिलं.

" का मागता म्हणजे? आम्हाला पैसे देण्याची तुझी जबाबदारी नाही?"

"माझी कशी जबाबदारी होऊ शकते?"

"का आम्ही कोणीच नाही का तुझे? फक्त तुझ्या सख्ख्या भावा बहिणींनाच मदत करशील का?"

विश्वास ओरडून म्हणाला. तो ओरडायला आणि तन्मय घरी यायला एकच गाठ पडली. त्याला समजेना हा कोण माणूस आहे.

तन्मय कडे निरखून बघत विश्वासनी विचारलं

"हा हर्षवर्धनचा मुलगा का?"

कामीनी बाईंनी मानेनेच हो म्हटलं. विश्वास जोर जोरात हसायला लागला.कामीनी बाई आणि तन्मय दोघांना कळेना यात होण्यासारखं काय आहे!

" त्या गंजीड्याचा पोरं मात्र भारीच स्मार्ट दिसतोय."

" विश्वास तोंड आवर.माझा नातू आहे तो."

"अगं सगळ्या जगाला माहिती आहे.तुझं पोरगं आणि या मुलाचा बाप हर्षवर्धन गंजेडी होता म्हणून. पोरगं तर हर्षवर्धन नावाच्या गंजेडीचाच आहे नं. तुला माहिती आहे कारे तुझा बाप नशा करायचा?पार वाया गेला होता."

एवढं बोलून विश्वास रडवेल्या आवाजात

"चॅक..चॅक "करू लागला.

तन्मय घाबरला.त्याला हे सगळं नवीन होतं. कामीनीबाईंचा आता पारा चढला.त्या ओरडल्या

" विश्वास वाट्टेल ते बोलू नको.आपल्या परीघात रहा."

कामीनी बाईंचं अंग थरथरत होतं. तन्मय घाबरून आत गेला.जाता जाता त्यांच्या कानावर त्या म्हा-याचं बोलणं पडलं.

"आमची औकाद नको सांगू. मी तुझ्या बापाला पटवलं म्हणून तुझं भय्यासाहेबांसारख्या श्रीमंत माणसाशी लग्न झालं. नाहीतर बसली असती अर्धपोटी आणि केला असता गरीबीत संसार. तुझं भलं केलंय मी म्हणून माझा हक्क आहे तुमच्या पैशावर"

दिनूमामा ओरडला.

हे ऐकताच तन्मयनी पटकन भय्यासाहेबांना फोन लावला आणि सगळं सांगितलं. हे ऐकताच भय्यासाहेबांचा पारा चांगलाच चढला. ते तन्मयला म्हणाले

" मी लगेच येतो. त्यांना फक्त सांगू नको .करतो एकेकाला सरळ‌"

" आजोबा लवकर या मला भीती वाटतेय."

तन्मय घाबरत बोलला.

"नको घाबरु. मी गाडीत बसलोसुद्धा. पंधरा मिनीटात पोहचतो."

आजोबा येताहेत म्हटल्यावर तन्मयला धीर आला.

कामीनी बाईंना आता खरं सुचत नव्हत़ काय बोलावं कारण दोघंही निर्ढावलेपणानी बोलत होते.

"वा काय पण बहिण आहे बाबा. तुम्हाला उगीचच पुळका येतो होता की कामीनी खूप साधी आहे. छॅ खोटं बोलता तुम्ही"

"तुला पैसे देत नाही म्हटलं म्हणून मी वाईट का? आणि तुम्ही माझ्या घरी येऊन तमाशे करता तरी तुम्ही चांगले?"
कामीनी बाई चिडून बोलल्या.

"ओं कामीनी फार बोलू नको. तुझ्याजवळ जे असेल ते दे.चुपचाप." विश्वास गुर्मीत बोलला.

" वा! हे तर दरोडेखोराचच बोलणं झालं."

कामीनी बाईं ऊसनं अवसान आणून बोलत होत्या.

" ऐ गप्प. मुकाट्यानी सगळं दे.ते संपलं की पुन्हा येईन."

हे म्हणताना विश्वासनी कामीनी बाईंचा हात घट्ट पकडला होता.

तेवढ्यात भय्यासाहेब घरी पोचले.त्यांना बघताच कामीनी बाईंना धीर आला. भय्यासाहेबांनी घरात शिरल्या शिरल्याच विश्वासच्या कानफटात लावली.हे इतकं अनपेक्षीत घडलं की विश्वासाला समजायला वेळ लागला. त्याच्या हातातून कामीनी बाईंनी आपला हात सोडवून घेतला.

"लाज वाटत नाही माझ्या घरात येऊन राडा करायला?" दिनू मामा जरा लवकर सावरला त्यामुळे तो बोलला. विश्वास तर अजूनही गाल चोळत बसला होता.

"लाज कशाची? तुम्हीच कबूल केलं होतं लग्नाच्या वेळी.आता का मागे फिरता? तुम्हाला घरातलं काम करणारी कामवाली बाई हवी होती नं दिली नं तुम्हाला आम्ही. बाकीचे स्वतःचे लाड पुरवणारी हवी होती नं. तीही दिली. टू इन वन"
असं बोलून मामा हसू लागला.

कामीनी बाईंना हे ऐकून मेल्याहून मेल्यासारखं झालं.संतापानी त्यांचं डोकं ठणकू लागलं.

मामाचं बोलणं संपताच भय्यासाहेबांनी खाडकन मामाच्याही श्रीमुखात भडकावली. मामाच्या डोळ्यासमोर तर अंधारीच आली. मामा हेलपाटत कसाबसा खुर्चीवर बसला.

तन्मय तर भय्यासाहेबांचा राग आणि त्यांचं मारणं बघून चकीत झाला. त्याला आपले आजोबा एकदम हिरो वाटायला लागले आणि आलेली ती दोन माणसं व्हिलन.

"मामा मिळाली परतफेड. तुम्ही जे दिलं त्याची परतफेड केली. आता एक शब्द जरी तुम्ही कामीनी आणि हर्षवर्धन बद्दल बोलाल तर सरळ जेलमध्ये पाठवीन.एक पैसा आता तुम्हाला मिळणार नाही.या घोड्यावर किती पैसा खर्च केला मी काही उपयोग झाला का?"

विश्वास कडे बोट दाखवून भय्यासाहेब म्हणाले.

विश्वास आणि दिनूमामा दोघांची चांगलीच टरकली होती. भय्यासाहेब अशी झापड मारतील त्यांना अपेक्षित नव्हतं. कामीनी घरात एकटीच असताना मुद्दाम दोघं आले होते. कामीनीला घाबरवणं त्यांना सोपं होतं. मध्येच भय्यासाहेब कुठून आले त्यांना कळेना.

"शिक्षण तर या घोड्यानी सोडलं आणि आता काय करतो ऊनाडक्या? आता याच्या मुलांसाठी मी पैसा खर्च करू?मी काय धर्मदाय संस्था उघडली आहे? चालते व्हा. पुन्हा माझ्या घराकडे वळलात तर बघा.वाॅचमन…ऐ शंकर यांना बखोटीला धरून बाहेर काढा."

दोघंही आत आले.तसे मघापासून ते या लोकांचं बोलणं ऐकत होते. मदत लागलीच भय्यासाहेबांना तर चटकन आत जाता यावं म्हणून दोघंही दाराशीच उभे होते. विश्वास आणि मामाची लोभामुळे चाललेली बडबड ऐकून दोघांची टाळकी सरकली होती.

शंकर आणि वाॅचमननी दोघांच्या बखोटीला धरुन बाहेर काढलं. एवढा मार खाऊनही जाता जाता दोघं बोललेच

"आत्ता जातोय.बघून घेतो नंतर"

विश्वासच्या या बोलण्याला भय्यासाहेबांनी काडीची किंमत दिली नाही.

भय्यासाहेब आत येऊन बसले. कामीनी बाईं अजून घाबरल्याच होत्या.

" बऱ झालं तुम्ही वेळेवर आलात.मला तर काही सुचत नव्हतं."
यावर हलकसं हसत भय्यासाहेब म्हणाले

"अगं तन्मयनी मला लगेच फोन केला म्हणून मी वेळेवर पोचलो. आपला नातू हुशार आहे बरं."

"तन्मयला बरं सुचलं." कामीनी बाईं म्हणाल्या. तेवढ्यात तन्मय धावतच तिथे आला.

"आजोबा तुम्ही हिरो सारखी मस्त फाईट केली."

त्याच्या या बोलण्यावर भय्यासाहेब आणि कामीनी बाईं दोघांना हसू आलं.

"आजोबा ही माणसं कोण होती? आजीला कसे वाट्टेल तसं बोलत होते. बाबांना गंजेडी म्हणत होते."

हे ऐकताच भय्यासाहेबांनी स्वतःला सावरत त्याला आपल्याजवळ बसवत म्हटलं.

" तन्मय ही माणसं कोण होती याकडे नको लक्ष देऊ. अशी माणसं जगात पुष्कळदा भेटतात आपल्याला. ते आपल्या मनाला टोचेल असं घाणेरडं बोलतात. त्यानी आपण अस्वस्थ व्हायचं नाही. कारण त्यांच्यावर असं घाणेरडं बोलण्याचेच संस्कार झालेले असतात."

कामीनी बाईंना भय्यासाहेब किती बदलले आहेत याचा रोज नव्याने साक्षात्कार होत होता.

"आजोबा पण ही माणसं आलीच कशी आपल्या घरी?आजी इतकी घाबरली होती म्हणून मी तुम्हाला फोन केला.मीपण खूप घाबरलो होतो."

तन्मय म्हणाला.

"तन्मय तू खूप समयसूचकता दाखविलीस.आजी घाबरली तर मी काय करू? असं न करता प्रसंगाचं गांभीर्य बघून मला फोन केला. बाळा नेहमी डोळसपणे आपल्या आजूबाजूला बघीतलं पाहिजे.कुठे कोणावर अनर्थ ओढवताना दिसला तर त्यांना मदत करायची."

" हो आजोबा मी नेहमीच तसं करतो.तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वी आमच्या शाळेतील एका मुलाच्या पोटात खूप दुखत होतं.तो एका जागी बसून रडत होता. सगळी मुलं येतात जाता त्याला बघत होती पण कुणीच त्याला विचारलं नाही का रडतोस म्हणून. मी विचारलं तर तो म्हणाला पोटात दुखतय. आजोबा मग मी काय केलं माहिती आहे ?"

"काय केलस?" भय्यासाहेबांनी ऊत्सुकतेनी विचारलं.

"आजोबा मी लागेच आमच्या व्हाइस प्रिन्सीपल कडे गेलो त्या मुलाला घेऊन.मॅडमना सगळं सांगीतलं. मॅडमनी लगेच त्या मुलाला शाळेच्या विनोद नावाच्या प्यून बरोबर दवाखान्यात पाठवलं.मला मॅडमनी शाबासकी दिली म्हणाल्या खूप छान काम केलंस अशीच अडचणीत सापडलेल्यांना मदत करत जा. आजोबा एवढं भारी वाटलं नं मला." तन्मयचे डोळे वेगळ्याच आनंदानी चमकत होते.

भय्यासाहेबांनी त्यांच्या पाठीवर थोपटून म्हटलं

" आत्ता हे तूझ्या तोंडून ऐकल्यावर आम्हाला पण भारी वाटलं."

तन्मय लगेच भय्यासाहेबांच्या कुशीत शिरला.
कामीनी बाई हे बघून मनोमन देवाची प्रार्थना करीत होत्या ,

"देवा हे सूख माझ्या घरी कायम राहू दे. कोणाचे शाप नको लागू देऊ."

"तन्मय सापशिडी आण. काल आजीच जिंकत होती आज आपण हरवलं पाहिजे तिला."
भय्यासाहेबांनी हे म्हणताच

"आत्ता आणतो. आजी कोणतंही काम नाही काढायचं."

" नाही काढत.आण तू सापशिडी." तन्मय उड्या मारत गेला.

तो जाताच भय्यासाहेब म्हणाले,

"आत्ता जे घडलं त्यावर पुन्हा चर्चा नको म्हणून त्याला सापशिडी आणायला सांगितली"

" बरं केलं.खेळ खेळायचा म्हणून किती आनंद झाला बघा त्याला."

" या दिनूच्या प्रकरणाचं काहीतरी केलं पाहिजे."

"जाऊ द्या. आज तुम्ही चांगली कान उघाडणी केली आहे.आता मला नाही वाटत की तो पुन्हा इथे येईल."

" अगं तो विचीत्र डोक्याचा माणूस आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बघतो काय करता येईल ते."

तेवढ्यात तन्मय सापशिडी घेऊन येतो.

"आजोबा तुम्ही आजीशी प्रायव्हेट बोलत होता का आपण नंतर खेळू"

कामीनी बाईं लटक्या रागानी त्याला म्हणाल्या
" प्रायव्हेट म्हणजे काय असतं रे? लबाड मुलगा.चल सापशिडी खेळू."
यावर हसत हसत तन्मयनी टेबलवर सापशिडीचा खेळ मांडला.

भय्यासाहेब आजकाल तन्मय बरोबर खूप रमत. हर्षवर्धनला जे जे देऊ शकलो नाही ते ते सगळं भय्यासाहेब तन्मयला देण्याचा प्रयन करीत असत.अगदी सापशिडीचा खेळ सुद्धा.

हे सगळं कामीनी बाई जाणून होत्या. हर्षवर्धनला नाही पण नातवाला ते सगळं. प्रेम,माया देण्याचा प्रयत्न करतात आहे हे बघून त्यांना खूप बरं वाटत असे.

हर्षवर्धन आता बराच मोकळेपणाने भय्यासाहेबांशी बोलत असे. त्याच्या भवतीचा कोष हळुहळू वितळत होता. त्याच्यातला आत्मविश्वास वाढू लागला होता. पुर्वी भीतीपोटी नुसतंच भय्या साहेबांकडे बघत राहणारा हर्षवर्धन आता त्यांच्याशी थोडं का होईना बोलू लागला होता. याचं सगळं श्रेय प्राचीला द्यायला हवं हे कामीनी बाई जाणून होत्या.

हर्षवर्धनला या पातळीवर आणण्यासाठी प्राचीला खूप मेहनत घ्यावी लागली होती. तसच तिला खूप काळ स्वतःच्या मनावर संयमसुद्धा ठेवावा लागला होता. लग्नानंतरचे फुलपंखी दिवस किती उशीरा दोघांच्या आयुष्यात आले.

त्या दिवसांची प्राची किती आतुरतेने वाट बघत होती हे कामीनी बाईंना तिच्या डोळ्यांतून कळत होतं. तिची त्या सुखासाठी असलेली आतुरता स्वाभाविक होती. तरीसुद्धा कुठलाही आततायीपणा न करता प्राची हर्षवर्धन कोषातून बाहेर येण्याची वाट बघत होती.

या वाट बघण्याच्या काळातील तिचा मानसिक संघर्ष कामीनी बाईंनी जवळून बघीतला होता. दोघी पुष्कळदा एकमेकींशी स्पर्शातून बोलत. ऊदास असताना प्राची आईच्या कुशीत शिरावी तशी कामीनी बाईंच्या कुशीत शिरत असे. कामीनी बाई तिला नुसत्या हळुवारपणे गोंजारत. त्यावेळी शब्द काही कामाचे नसतं. त्या दोघींचा हा शब्देविण संवादू साधण्याचा प्रयत्न असे. कामीनी बाईंच्या स्पर्शाची भाषा प्राचीच्या मनावरचा ताण हळुहळू कमी करे. नंतर मात्र तिच्या डोळ्यांतून आसवांचा पूर वहात असे.

या पुराला थोपवण्याचा प्रयत्न प्राची करत नसे. तो वाहून गेलेलाच बरा असतो हे कामीनी बाईंचं म्हणणं तिला पटलं होतं.

कामीनी बाईं आणि प्राची यांच्यात हे वेगळंच आणि सुंदर नातं निर्माण झालं होतं. ते कुणाला सहजपणे समजेल असं नव्हतं. त्यासाठी खूप संवेदनशील असायला हवं तरच त्यांचं नातं तेवढ्याच हळुवार पणे कोणी समजू शकेल.
---------------------------------------------------------
क्रमश: दिनूमामा आणि विश्वास पुन्हा त्रास देतील की भय्यासासेबांनी दिलेली समज पुरेशी ठरेल.बघू पुढील भागात.
लेखिका – मीनाक्षी वैद्य.