कामीनी ट्रॅव्हल - भाग ३२ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • अनुबंध बंधनाचे. - भाग 18

    अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्य...

  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३२

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३२

प्राची आज दिवसभर कामात होती.कारण यावेळी एकाच वेळी चार ठिकाणी कामीनी ट्रॅव्हल्सचे टूर निघणार होते. पहिल्यांदाच असे टूर काढणार असल्यामुळे त्यांचं योग्य नियोजन करणं आवश्यक होतं.

कामीनी ट्रॅव्हल्सच्या जाहीरातीत ज्या व्यक्ती आपले अनुभव सांगत त्या व्यक्ती कामीनी ट्रॅव्हल्स बरोबर प्रवास केलेल्या किंवा अजूनही करणा-या होत्या. त्यामुळे सामान्य व्यक्तींचा त्या जाहीराती बघून कामीनी ट्रॅव्हल्सवर विश्वास बसत असे.

या जाहीरातीत कोणाही सेलिब्रिटीना प्राचीनी घेतलं नव्हतं. तिच्या दृष्टीनी तिचे प्रवासी हेच तिच्यासाठी सेलिब्रिटी होते. ही तिची युक्ती जाहीरात प्रदर्शित झाल्यानंतर खूप उपयुक्त ठरल्याचं लक्षात आलं. या जाहीराती मुळे कामीनी ट्रॅव्हल्सकडे येणा-या प्रवाश्यांची संख्या वाढली होती. म्हणूनच यावेळी एका वेळी चार टूर चं नियोजन करावं लागणार होतं.

प्राचीच्या केबीनमध्ये सगळे हजर होते.मिटींगमध्ये प्रत्येक गोष्टीकडे काळजीपूर्वक बघीतल्या जात होत्या. त्यावर विस्तृतपणे चर्चा होत होती. या चर्चेतून एकेक मुद्दा पक्का ठरत होता.

नेहमीच्या आराखड्यानुसार यावेळचे टूर न करता काहीतरी नाविन्य असावं असं प्राचीला वाटत होतं.

प्राचीनी आपल्या मनात असणारे वेगळे विचार सगळ्यांसमोर मांडले.प्रत्येकजण काही न काही सुचवत होता. त्यातले योग्य गोष्टी प्राची टिपून घेत होती.

हर्षवर्धनने एक मुद्दा मांडला.

"टूर ज्यादिवशी संपेल त्यांच्या आदल्या रात्री समय सूचकता हा खेळ खेळू. दोन गट करू. आपल्यापैकी कोणाजवळ तरी डब्यात शब्दांच्या चिठ्ठ्या ठेऊ.एका गृप मधील एकाने एक चिठ्ठी उचलून गृप मध्ये दाखवायची. त्या शब्दाला सुसंगत असा आपल्या आयुष्यातील प्रसंग त्या गटाने सांगायचा.कोणीही सांगू शकतं.विचार करायला पाच मिनिटे वेळ देऊ.

त्यांनी सांगीतलेल्या प्रसंगातुन तो शब्द येतोय का बघायचं. सांगणा-याच्या चेह-यावरचे हावभाव प्रसंगाला साजेसे आहेत का?,प्रसंग पूर्ण मराठी भाषेत हवा.तोकुठे अडत असेल तर त्याला गृप मधील इतर मदत करू शकतात.पण परवानगी घेऊन.त्यानुसार गूण देऊ."

हर्षवर्धन बोलायचा थांबला सगळ्यांना ही कल्पना आवडली. प्राची आश्चर्याने हर्षवर्धनकडे बघत होती. हर्षवर्धनच्या मेंदूची सक्रीयता आता चांगलीच वाढल्याचं तिच्या लक्षात आलं आणि ती मनोमन आनंदली. ही गोष्ट कामीनी बाईंना आठवणींनी सांगायचं तिनी ठरवलं.

आज इतकी वर्ष हर्षवर्धनच्या मेंदूची सक्रियता हळूहळू वाढत होती. याचा प्राची आणि कामीनी बाईं यांनी वेळोवेळी नोंद घेतली होती. त्याच्या मेंदूची सक्रियता वाढवण्यासाठी त्याला वैचारिक स्वातंत्र्य दोघींनी दिलेलं होतं त्यामुळेच आज हर्षवर्धनला इतका वेगळा विचार सुचू शकला. प्राचीला आपण प्रत्येक पाऊल बरोबर टाकतो आहे याचा आनंद झाला.

सर्वानुमते हा खेळ घ्यावा हे मंजूर झालं. निघण्याच्या तारखा, प्रत्येक ठिकाणच्या हाॅटेलचं बुकींग,परतीचा प्रवास कसा असेल हे सगळं फायनल झालं होतं.

या चार टूर पैकी १५ नोव्हेंबरच्या टूरबरोबर प्राचीचं जाण्याचं ठरलं. हर्षवर्धनने सुचवलेला खेळ चारही टूरमध्ये घेतल्या जाणार होता. प्राची १५तारखेच्या टूरमध्ये मुद्दाम जाणार होती.

कारण त्या प्रवासात असलेली चार जोडपी जी वृद्ध होती पण कामीनी ट्रॅव्हल्सशी पहिल्या ट्रीपपासून जोडलेली होती. त्यातील एका जोडप्याचा या प्रवासात असताना लग्नवाढदिवस होता, एका आजोबा आणि आजींचा लग्नवाढदिवस आणि एका आजींचा वाढदिवस होता.

ते क्षण योग्य पद्धतीने साजरे करण्यासाठी प्राची जातीने लक्ष देणार होती. आयुष्याच्या शेवटी कामीनी ट्रॅव्हल्स तर्फे त्या जोडप्यांना आणि त्या आजी आजोबांना सुंदर क्षणांची भेट द्यायचं प्राचीनी ठरवलं होतं. त्या तिघांसाठी सुंदर भेट वस्तूसुद्धा तिनी आणलेली होती.

त्यांच्या वाढदिवशी ज्या हाॅटेलमध्ये कामीनी ट्रॅव्हल्स चे प्रवासी उतरणार होते त्या हाॅटेलमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने सुंदर सजावट, रांगोळी काढण्याची विनंती कामीनी ट्रॅव्हल्स तर्फे केली होती. त्या हाॅटेलनीही ती विनंती आनंदाने मान्य केली. कारण कामीनी ट्रॅव्हल्सशी त्यांचे जुने संबंध होते.

***

ठरलेल्या दिवशी प्राची टूरबरोबर निघाली.जाताना प्रदीपला घराकडे लक्ष द्यायला सांगितलं.

ऑफीसमध्ये तिने सगळ्यांना सूचना दिल्या. काही इमर्जन्सी आली तर ताबडतोब मला कळवा.हे सांगायला ती विसरली नाही. रोज सकाळी तिला अपडेट द्यायचे हे यादवला सांगीतलं. यादव अजून निवृत्त व्हायचा होता. संदीप आणि यादव दोघेही कामीनी ट्रॅव्हल्स बरोबर पहिल्यापासून जोडलेले होते.

प्राचीनी सगळ्या सूचना दिल्या असल्या तरी कुठे तरी तिच्या मनात हुरहूर लागून राहिली होती. ऐनवेळी तिला टूरबरोबर जाणं रहित करता येणार नव्हतं.आपल्याला आतून इतकी भीती का वाटतेय हे तिला कळत नव्हतं. दीर्घ श्वास घेऊन प्राचीनी मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला.

त्या दिवशी घरात जो तमाशा दिनू मामांनी केला त्यामुळे तिला जरा धाकधूक वाटत होती.जावडेकरांकडून अजून काही माहिती मिळाली नव्हती. त्यांचीही नेमकी तब्येत बिघडली त्यामुळे ते काम करू शकत नव्हते.या सगळ्या गोंधळात प्राचीचा टूरबरोबर जाण्याचा दिवस उजाडला.

शेवटी सगळं काही त्या परमेश्वरावर सोपवून प्राची निघाली. परमेश्वरावर सगळं सोपवण्यात पलीकडे प्राचीच्या हातात दुसरं काय होतं?

तिच्या अनुपस्थितीत दिनूमामाने पुन्हा त्रास दिला तर ते प्रकरण हर्षवर्धनला सांभाळता येणार नाही म्हणून प्राचीला चिंता वाटत होती.

***

प्राचीला टूरबरोबर जाऊन दोनच दिवस झाले होते आणि दिनू मामाचा मुलगा विश्वास आणि त्याचा गुंड मित्र ऑफीसमध्ये पोचले. विश्वास तिथे वाट्टेल ते गरळ ओकायला लागला. त्याला साथ होती त्या गुंड माणसाची. ऑफीसमध्ये सगळे घाबरलेले होते.

हर्षवर्धनला बघून

"ए गंजीड्या बायको कुठे आहे तुझी? लपवून ठेवली का?"

विश्वास बरळू लागला. हर्षवर्धन गोंधळला.त्याची ती अवस्था बघून विश्वास आणि त्याचा मित्र खो खो हसायला लागले.

ऑफीसमध्ये सगळे घाबरले.हे गुंड इथे काय करताहेत त्यांना समजेना. यादवांनी फोन करायला घेतला तेवढ्यात विश्वासनी फाडकन त्यांच्या गालात मारली. संदीपनी मात्र चतुरपणे प्राचीला फोन लावला आणि ऑफीसमधला गोंधळ तिच्या कानी पडला.ती संदीपला काहीतरी विचारत होती तोच संदीप विश्वासला बोलला.

"तुम्ही कोण आम्हाला माहीत नाही पण मॅडमना आम्ही सांगणार नाही काही. तुम्हाला काय हवं?"

संदीपचं बोलणं ऐकून प्राची समजली या विश्वासनी या लोकांना वेठीस धरलय. तेवढ्यात विश्वासचा आवाज कानी पडला

"एक गंजीड्या सांग कुठे गेली तुझी बायको? ताटाखालचं मांजर तू आम्हाला पैसे द्यायला नाही म्हणतो."

हर्षवर्धनला आता भीतीनी कापरं सुटलं. हर्षवर्धनला हा माणूस गंजीड्या का म्हणतोय हे ऑफीसमध्ये कोणालाच कळेना.

प्राचीनी तिथला गोंधळ ऐकता ऐकताच लॅपटाॅपवरून मिळेल त्या विमिनाचं तिकीट काढलं आणि ती ज्या टूरबरोबर होती त्यातल्या टूर लिडर आणि बाकीच्या लोकांना योग्य त्या सूचना देऊन ती तडक विमानतळावर निघाली.

प्राचीला ऑफीस स्टाफची, हर्षवर्धनची काळजी होती. तिचं कशात लक्ष लागेना.

प्राची पुण्याला विमानतळावर उतरली आणि सरळ कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये गेली. ती पोचली तोपर्यंत विश्वास आणि त्याचा मित्र निघून गेले होते. ऑफीसमध्ये मात्र सगळे ताणाखाली होते. चिडीचूप शांतता पसरली होती. प्राची ऑफीसमध्ये आली तरी कोणाच्या लक्षात आलं नाही. इतके सगळे भीतीच्या छायेखाली होते.प्राची बोलू लागली तेव्हा कुठे सगळे भानावर आले.

"हे बघा तुम्ही घाबरू नका.हे असं होऊ शकतं याचा मला अंदाज होता म्हणून तुम्हाला सांगून गेले होते की काही झालं तरी मला कळवा. संदीप तू फार हुशारीनी वागलास .तुझा फोन आला नसता आणि ऑफीसमधला गोंधळ माझ्या कानी पडला नसता तर मी इतक्या तातडीने येऊ शकले नसते. त्यातही नशीब आपल्या बाजूने असल्याने मला लगेच विमानही मिळालं. सगळे शांत रहा.शांतपणे काम करा."

प्राची आल्यामुळे सगळ्यांना धीर आला.सगळे शांतपणे कामात लक्ष देण्याचा प्रयत्न करू लागले.प्राची हर्षवर्धनला आपल्या केबिनमध्ये घेऊन गेली. त्याला खुर्चीवर बसवलं. प्यायला पाणी दिलं. बाजूची खुर्ची ओढून तीही त्यावर बसली.

" हर्षवर्धन कसं वाटतंय आता?"

हर्षवर्धन काहीच बोलत नाही पण त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं.ते हलकेच पुसत प्राची त्याला म्हणते

"तू घरी जातोस का? घरी जाऊन आराम कर.मी येते थोड्यावेळाने."

हर्षवर्धनने मान होकारार्थी हलवली.प्राचीने त्याला घरी पाठवलं. तो खूप घाबरलेला होता. हर्षवर्धन निघाल्यावर प्राचीनी कामीनी बाईंना फोन केला.

" हॅलो कसा चाललाय टूर?"" कामीनी बाईंनी हसतच विचारलं.

"आई मी इथून आपल्या पुण्याच्या ऑफीसमधून बोलतेय.ऑफीसमध्ये विश्वास आणि त्याच्या मित्राने गोंधळ घातला. हर्षवर्धन त्यामुळे खूप घाबरला आहे. त्याला मी घरी पाठवलं आहे. हर्षवर्धनला काही विचारु नका. भय्या साहेबांनापण सांगा.मी घरी आले की सगळं सांगते.ठेवते फोन.""

प्राचीच्या फोनमुळे कामीनी बाई पण अस्वस्थ झाल्या.हे प्रकरण इतक्या वर्षांनी का डोकं वर काढतय त्यांना कळत नव्हतं. आपले भाऊ इतकी वर्ष बरे होते आताच असं का वागू लागलेत याचा कामीनी बाईंना उलगडा होत नव्हता. त्या हर्षवर्धनची वाट बघू लागल्या. हर्षवर्धन आता पन्नाशीच्या घरात पोचला तरी त्या वयातील माणसासारखा खंबीरपणा हर्षवर्धनमध्ये अजून आलेला नाही.

असे काही प्रसंग आले की प्राचीलाच पुढे येऊन सगळं निस्तरावं लागतं. विश्वासला असं तर वाटत नसेल की प्राची बाई माणूस आहे ती काय करेल? पण बिचारीला तिच्या लग्नापासूनच स्वतःमधला हळुवारपणा सोडूनच द्यावा लागला होता. स्वत:मधील खंबीरपणा जागवून एखाद्या पुरूषाप्रमाणे लढावं लागलं.

कामीनी बाईंना आता हर्षवर्धनच्या बरोबर प्राचीची पण काळजी वाटू लागली. नव्याने उद्भवलेलं हे विश्वास रूपी संकट कधी दूर होणार आहे त्यांना कळत नव्हतं.

त्या विचारात गुंतलेल्या असतानाच हर्षवर्धन घरी आला. त्याचा चेहरा विदीर्ण झाला होता.‌कामीनी बाईंनी एक चकार शब्द त्याला विचारला नाही. हर्षवर्धन सरळ आपल्या खोलीत गेला.

भय्यासाहेब घरी आल्यावर त्यांनी कामीनी बाईंना विचारलं

"कामीनी आपली गाडी दिसली गेट पाशी. कशाकरता आला होता ड्रायव्हर?"

कामीनी बाईंनी भय्यासाहेबांना सविस्तर सगळं सांगितलं. भय्यासाहेबांच्या कपाळाची शीर रागानी ताडताड उडू लागली.

"कामीनी आता वेळ न घालवता त्या एसीपी.जगदीश महालेंकडे गेलंच पाहिजे."

"मला कळत नाही इतकी वर्ष हा दिनू मामा गप्प होता आत्ताच का त्रास देतोय?"

" कुठे तरी डल्ला मारला असेल तो पैसा पुरला असेल इतके दिवस.आता पैशाची अडचण आल्यावर आला तमाशे करायला.तू घाबरू नको.लवकरच करू याचा बंदोबस्त."

एवढं बोलून भय्यासाहेब अस्वस्थपणे खोलीत येरझाऱ्या घालू लागले.

***

प्राचीने जावेडकरांना फोन लावला.त्यांना विश्वासनी जो गोंधळ घातला तो जावडेकरांना सांगीतला. आणि माहिती कधी देता हे विचारलं.

"मॅडम तुमच्यासाठी गोळा केलेली माहिती आणि फोटो संगतवार लावतोय.ते घेऊन अर्ध्या तासात तुमच्या ऑफीसमध्ये पोहचतो."

" ठीक आहे.या.मी वाट बघते."

एवढं बोलून प्राचीने फोन ठेवला

या विश्वास आणि त्यांच्या मित्रांनी ऑफीसमध्ये जो गोंधळ घातला होता त्यामुळे कोणाचच कामाकडे लक्ष लागत नव्हतं.

***

अर्ध्या तासात जावडेकर कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये पोचले. प्राचीच्या केबीनवर नाॅक करून मग ते आत शिरले.

"बसा."

समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवून प्राची म्हणाली.

"थॅंक्यू"

बसता बसता जावडेकर म्हणाले.

"हे फोटो आणि ही माहिती."

फोटो आणि माहिती लिहीलेले कागद जावडेकरांनी प्राची समोर ठेवले.

प्राची एकेक फोटो बारकाईनी बघत होती.त्या फोटोंमध्ये विश्वास आणि त्यांचे एक-दोन मित्र दिसत होते.

"हे दोघं विश्वास चे खास मित्र वाटताहेत."

" हो मॅडम. दोघंही चांगलेच गुंड आहेत. भरपूर काळे धंदे करणारे आहेत. विश्वासचे हे मित्र रघू आणि चंदन ज्याच्या हाताखाली काम करतात त्याने जर या लोकांना तंबी दिली तरच ते पुन्हा असा राडा घालायची हिम्मत करणार नाही."

"हं…. यांचा कोण मालक आहे? तुम्हाला माहिती आहे?""प्राचीनी जावडेकरांना विचारलं.

"हो."जावडेकर उत्तरले.

" मला त्यांचा नंबर असेल तर द्या.मी बघते बोलून."

प्राची हे म्हणाल्यावर जावडेकर चकीत झाले.

" तुम्ही बोलणार?"

"हो काय झालं? तीही माणसंच आहेत.त्यांच्या लफड्यामध्ये न पडता आपलं काम सांगीतलं तर मला नाही वाटत तो माणूस माझ्याशी भांडेल.द्या मला नंबर."

जावडेकर संभ्रमीत झाले होते.त्यांनी नंबर दिल्यावर प्राची तो नंबर लॅंडलाईनवरून लावते.

" नाव काय म्हणालात यांचं?"

" लखोबा तायडे" तेवढ्यात पलीकडून फोन उचलल्या गेला.

"हॅलो…"

" हॅलो मला लखोबा तायडेंशी बोलायचं आहे.ते आहेत का?"

" थांबा.."
थोड्यावेळाने दुसरी व्यक्ती फोन घेते.

" हॅलो.काय काम आहे?""

"नमस्कार मी कामीनी ट्रॅव्हल्स मधून प्राची पटवर्धन बोलतेय.तुमच्याकडे रंघू आणि चंदन नावाची माणसं आहेत नं त्यांच्याविषयी मला बोलायच होत.""

" काय केलं माझ्या माणसांनी?"

प्राची त्या लखोबा तायडेंना सविस्तरपणे झाला प्रसंग सांगते. त्यावर ते म्हणाले,

"तुम्ही काळजी करू नका. मी बघतो.यापुढे माझी माणसं तुमच्या ऑफीसमध्ये येऊन तुम्हाला त्रास देणार नाही."

"त्यासाठी धन्यवाद तुम्हाला.त्या विश्वासला सुद्धा तुम्ही समज दिली तर बरं होईल. तो आमच्या दूरच्या नात्यातला आहे पण स्वतःकाही काम न करता आम्हाला धमकावून आमच्याकडून पैसे उकळायला बघतो."

" त्यालाही समज देतो. तुम्ही काळजी करू नका."

" धन्यवाद.तुम्हाला थोडा त्रास दिला त्यासाठी साॅरी."

प्राची फोनवर खूप शांतपणे बोलत होती.जावडेकरांना मात्र चांगलाच घाम फुटला होता.

" जावडेकर धन्यवाद.तुम्ही नंबर दिल्या मुळे काम झालं. मला नाही वाटत आता त्या विश्वासाची हिम्मत होईल पुन्हा ऑफीसमध्ये किंवा घरी येऊन त्रास द्यायची. विश्वास ही दादागिरी या गुंडांच्या भरवशावर करत होता. तो भरवसाच तोडला आपण."एवढं बोलून प्राची गालातच हलकसं हसली.

एवढ्या मोठ्या गुंडांशी बोलून ही बाई हसते याचं जावडेकरांना नवल वाटलं.

जावडेकर प्राचीची हिम्मत बघूनच गार झाले होते. लखोबा तायडे सारख्या गुंडांशी ही बाई किती शांतपणे बोलत होती हा त्यांना धक्काच होता. तिचा आवाज जराही कापत नव्हता.प्राचीच्या हिमतीची जावडेकरांनी मनोमन दाद दिली.
तिचा निरोप घेऊन जावडेकर कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमधून बाहेर पडले.
-------------------------- -----------------------------------
क्रमशः कामीनी ट्रॅव्हल्स
लेखिका – मीनाक्षी वैद्य