कामीनी ट्रॅव्हल - भाग ३३ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३३

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३३

संध्याकाळी प्राची घरी आली तेव्हा ती थकल्यासारखी दिसत होती कारण तिची आज खूप धावपळ झालेली असते. तिला भय्यासाहेब म्हणाले,

" आजच तू टूरवर गेलीस आणि लगेच परत यावं लागलं नं त्या विश्वास मुळे? मला कामीनीने सांगितलं या विश्वास आणि दिनूचा आता कायमचा बंदोबस्त करावाच लागणार."

भय्यासाहेबांना प्राची सोफ्यावर बसत सांगू लागली.

"भय्यासाहेब आज विश्वास आपल्या गुंड मित्राला घेऊन ऑफीसमध्ये आला होता. मी जाण्यापूर्वी यादव आणि संदीपला सांगून गेले होते की काही झालं तर लगेच मला कळवा.मला मनातून वाटतच होतं की हा विश्वास नक्की काहीतरी गोंधळ करणार आहे."

थोडं थांबून प्राचीने पुढे म्हणाली,

"यादव मला फोन करणार तर त्याच्या थोबाडीत मारली विश्वासनी. म्हणून संदीपनी मला फोन लावला पण तो काही न बोलता फोन हातात घेऊन उभा होता.त्यामुळे मला ऑफीसमध्ये जो गोंधळ चालला होता. विश्वासची जी बडबड चालू होती ते सगळं ऐकू आलं म्हणून मी मिळेल ते विमान बुक केलं. पुण्याला उतरताच कॅब करून सरळ ऑफीसमध्ये गेले.पण तोपर्यंत विश्वास आणि तो गुंड मित्र निघून गेले होते."

" या विश्वासला आता चांगलंच धुतलं पाहिजे.मन मानेल तसा वागतोय."
भय्यासाहेब चांगलेच चिडले होते.

"हर्षवर्धनला मी मघाशीच घरी पाठवलं कारण विश्वास हर्षवर्धनला भर ऑफीसमध्ये सगळ्यांसमोर वाट्टेल तसं बोलला. त्याला गंजेडी म्हणाला.हे मला यादव आणि संदीपनी सांगितलं. हर्षवर्धन खूप बावरून गेलाआहे. आई हर्षवर्धन झोपला आहे का?"

प्राचीच्या स्वरात पण चीड होती.

" हो. तूच सांगीतलं म्हणून मी त्याला काहीच विचारलं नाही. अहो हा विश्वास त्याची पातळी विसरून वागतोय. त्याचा बंदोबस्त करायलाच हवा. मघाशी हर्षवर्धन आला तेव्हा त्याचा चेहरा बघून मला खूप वाईट वाटलं.आत्ता तर जरा तो सावरतोय."

कामीनी बाईं मनातलं भरभर बोलून मोकळ्या झाल्या.

"भय्यासाहेब आपण आता थोडी काळजी घ्यायला हवी. विश्वासचे जे मित्र आहेत ते ज्या गुंडांच्या हाताखाली काम करतात त्यांचा नंबर जावडेकरांकडून घेऊन मी त्या लखोबा तायडे नावाच्या गुंडांशी बोलले. त्याला विनंती केली की त्या रघू आणि चंदन नावाच्या माणसांना समज द्या. तसच विश्वासलाही समज द्या. हो तर म्हणाला आहे बघू."

"काय तू त्या गुंडाशी बोललीस?"

कामीनी बाईं च्या आवाजात भीती जाणवत होती.

"आई घाबरू नका. यांच्या वाटे आपण गेलो नाही तर ते आपल्याला त्रास देत नाहीत. त्यांचे चेले त्यांना न सांगता अशी कामं करतील तर. त्यांच्या नावाला धक्का लागेल नं. मी त्यांना सांगितलं.ते म्हणाले आता यापुढे तुम्हाला माझी माणसं त्रास देणार नाहीत. आता ती माणसं अजीबात विश्वास ला मदत करणार नाहीत.विश्वास त्यांच्याच जीवावर उड्या मारीत होता. त्याच्या स्वतः मध्ये एवढी धमक कुठे आहे?"

" तरीपण या विश्वास वर माझा विश्वास नाही.पुन्हा एकटाच घरी आला तर..?"

कामीनी बाईं अजून घाबरलेल्याच होत्या.

"आज मी त्या तायडेंना सांगीतलं आहे. काही दिवस वाट बघू. पुन्हा असं वागायची विश्वास नी हिम्मत केलीच तर जाऊ पोलीसात."

"मला तर भीती वाटतेय." कामीनी बाईं म्हणाल्या.

"नका घाबरू तुम्ही. आपण हातावर हात ठेवून तर नाही बसलेलो.थोड्या धिराने घ्यायला हवं. घाबरणं सोडून द्या.घाबरलं की आपल्या हातून आणखी चुका होतात."

प्राचीनी कामीनी बाईंच्या हातावर थोपटत त्यांना समजावलं. तरी त्यांच्या चेहेऱ्यावर भीती दिसत होती.

" कामीनी प्राची म्हणतेय ते बरोबर आहे.तू जरा धीट हो. या विश्वासचा बंदोबस्त आपण करणारच आहोत.त्याला असं सोडणार नाही. त्याला आपण घाबरलोय हे जर त्याला कळलं तर तो आणखी डोक्यावर बसेल आणि हवं ते आपल्याकडून घ्यायचा प्रयत्न करेल.कळलं का तुला मी काय म्हणतोय ते?"

" हो.तरी मनात कुठेतरी भीती वाटतेच हो. त्या दिवशी सारखी मी घरी एकटीच असताना तो पुन्हा आला तर?"

"प्राची उद्याच आपण जयंताला बरोबर घेऊन एसीपी महालेंना भेटू."

कामीनी बाईंना घाबरलेले बघून भय्यासाहेब म्हणाले.

"ठीक आहे. तुम्ही जयंतकाकांशी बोलून त्यांची वेळ घ्यायला सांगा.आपण त्यावेळेला जाऊ."

" मी आत्ताच फोन करतो.म्हणजे जयंत आजच बोलेल. आता फार वेळ नको घालवायला."

भय्यासाहेब लगेच आपल्या मित्राला म्हणजेच जयंत सरदेसाईला फोन लावला.

" हां जयंता,भय्या बोलतोय"

" अरे वा! आज कसा काय फोन केला?"
"सांगतो."

भय्यासाहेबांनी जयंताला सगळं सांगीतलं..त्याना एसीपी साहेबांना भेटायला जायचं आहे तर त्यांची वेळ घे असं सांगितलं.

" अरे बापरे! हे फारच विचीत्र झालंय सगळं.अरे भय्या इतकी वर्ष हा दिनू आणि त्याचा मुलगा कुठे होते? आत्ता इतक्या वर्षांनंतर तुम्हाला छळायचं काय खूळ घेतलंय त्याने डोक्यात?"

" अरे मधल्या काळात कोणी सावज पकडलं असेल म्हणून आमच्याकडे फिरकले नाहीत.अरे त्या दिनूला मी केव्हाच पैसे देणं बंद केलं आहे.अरे कामीनीचे सावत्र भाऊ ते जेवढं शिकले तेवढ्यावर नोकरी पकडून शांत बसले आहेत. हा दिनू म्हातारपणी ही गुंडगिरी करायला लागला आहे. कधी कधी कामीनी एकटीच घरी असते.तिला खूप भीती वाटते आहे म्हणून पोलीस संरक्षण हवंय. आजच फोन कर तू महालेंना."

" हो आज नाही आत्ताच करतो. लगेच तुला कळवतो. ठेऊ फोन?"
जयंताने फोन ठेवला.

"हो ठेव.कामीनी जयंता आता त्यांना फोन करून वेळ विचारतो आहे मग करेल मला फोन. आता घाबरू नकोस." भय्यासाहेबांनी समजावणीच्या स्वरात कामीनी बाईंना म्हटलं.

कामीनी बाईंनी यांत्रिक पणे मान डोलावली.मनातून त्या घाबरलेल्याच होत्या. त्यांचं घाबरणं स्वतःपेक्षा घरातील इतरांसाठी जास्त होतं.भय्यासाहेब कणखर होते पण आता त्यांचं वय झालंय, हर्षवर्धन अजूनही तेवढा खंबीर नाही, तन्मय तर लहानच आहे, एकटी प्राची किती आघाड्यांवर लढणार आहे. अश्या विचारात त्या असतानाच प्राचीने त्यांच्यापुढे चहाचा कप धरला.

"आई चहा घ्या..चहा घेतला की जरा बरं वाटेल."

कामीनी बाईंनी यांत्रिक पणे मान डोलावून चहाचा कप हातात घेतला.

थोड्यावेळाने जयंत सरदेसाईंचा भय्यासाहेबांना फोन आला. दोन दिवसांनी ते भेटू शकतात आणि वेळ
दुपारी १ वाजताची ठरली असं सांगितलं.
भय्यासाहेब यावर ठीक आहे म्हणाले.कामीनी बाईंना उगीच दडपण आलं त्या भय्यासाहेबांना म्हणाल्या

" उद्याच भेटता आलं असतं तर किती बरं झालं असतं."

" अगं जयंतानी आधी उद्याची विचारलं.त्यांना वेळ नाही. खूप कामं असतात या लोकांच्या मागे."

" याच दोन दिवसांत विश्वास पुन्हा आला तर?"

"ऐ... उगीच भलते सलते विचार करू नकोस. तू घाबरणं सोड. विश्वास त्या गुंडांच्या जोरावर उड्या मारत होता.प्राचीनी त्याचा तो मदतीचा मार्गच बंद केला.आता काय करेल?"

" तोच राग धरून यायचा पुन्हा घरी भांडायला."
अजूनही कामीनी बाई घाबरलेल्याच होत्या.

" आई चहा घ्या.थंड होतोय." प्राचीने पुन्हा त्यांना चहाची आठवण करून दिली.

कामीनी बाईंना भीती वाटणं सहाजिकच आहे हे तिला कळत होतं.

"आई मी मघाशी कॅप्टन अमोघ गुप्तेंच्या ऑफीसमध्ये फोन केला होता."

" कोण आहेत हे?"

भय्या साहेब आणि कामीनी बाईं दोघांनी एकदमच विचारलं.

"्" यांच्याकडे कमांडो असतात.पोलीस संरक्षण घेतलं तरी कमांडो आपल्या सगळ्यांना जास्त चांगलं संरक्षण देऊ शकतील.कारण या कमांडोंना तसंच ट्रेनिंग दिलेलं असतं. विश्वास एकदा घरी येऊन गेला. एकदा ऑफीसमध्ये आला. पुन्हा तो तसं करण्याचा प्रयत्न करणार नाही याची आपण खात्री देऊ शकत नाही. पोलीस घरी थांबतील पण तो कमांडो आपल्यापैकी कोणीही बाहेर गेलं तरी तो आपला बाॅडीगार्ड बनून आपल्याबरोबर सतत असेल."

" कधीपासून ते येणार?" भय्यासाहेबांनी विचारलं.

"आज त्यांचा फाॅर्म भरलाय.ऊद्या दुपारपर्यंत त्यांचा फोन येईल. पोलीस आणि कमांडो येण्याअगोदर कुणीही बेल वाजवली तरी पुर्वी सारखं दोघांनी पटकन दार उघडू नका. दार पुर्वी सारखं सतत ऊघडही ठेऊ नका. व्ह्यूफाईंडरमधून बघीतल्याशिवाय दार ऊघडू नका. बेल वाजवून जर तुम्हाला कोणी दिसलं नाही दार उघडू नका. विश्वास असू शकतो."

प्राचीने दोघांना सूचना दिल्या.

"आम्ही लक्षात ठेऊ."कामीनी बाईं म्हणाल्या.

"ऊद्या कुठेही अर्जंट काम असल्याशिवाय जाऊ नका. एकदा तो कमांडो आला की कुठेही जायचं असलं तरी त्याला घेऊन जायचं"प्राची म्हणाली.

"नाही जाणार उद्या.तू निश्चीत रहा. तू सांगतेस तसंच वागू."भय्यासाहेब म्हणाले.

प्राचीला पण हे विश्वास नावाचं दुखणं वाढायला नको होतं. घरातली शांती या माणसांमुळे धोक्यात आली होती. हर्षवर्धन पुन्हा खूप सगळ्याचा विचार करत बसला.आपलं जुनं आयुष्य वाईट होतं.अजूनही लोक त्याची आठवण करून देतात ही टोचणी त्याला लागतेय.

किती भयंकर आहे हे .या सगळ्यातून नाॅर्मल होण्याचा हर्षवर्धन केवढा प्रयत्न करत होता, हळुहळू नाॅर्मल होत होता आणि मध्येच हे विश्वास प्रकरण झालं. प्राची फार वैतागली या सगळ्याला. तिनी कितीही शांत राहण्याचा प्रयत्न केला तरी कधीकधी शक्य होत नाही. तिच्या अगदी जवळचा माणूस या आगीत होरपळतोय.तिला त्रास होणारच.

प्राची धीट आहे,विचारी आहे, कठीण काळातही पटकन योग्य निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आहे पण तीही एक माणूस आहे. घरातलं वातावरण भीतीच्या छायेखाली असू नये म्हणून तिचा अटोकाट प्रयत्न चालू असतो. पण कुठेतरी तीही थकत असेल. हे सगळं कामीनी बाई जाणून होत्या म्हणूनच त्यांना तिची काळजी वाटायची.

प्राची खोलीत आली तर हर्षवर्धन डोळ्यांवर आडवा हात ठेऊन झोपला होता.त्याच्याकडे प्राची बघत असताना तिच्या डोक्यात पुन्हा विचार आला.या माणसाने तरी किती काळ झगडण्याची शक्ती ठेवायची. तोही स्वतःच्या कमकुवत पणाला कधी कधी कंटाळतो पण तोही काहीच करू शकत नाही. एकदा का तुमचं मन ढासळला तर त्याला वर आणताना कठीण जातं हेच खरं.

***

रात्री जेवायला सगळे एकत्र आले तेव्हा प्राची तन्मयला सगळं सांगते.वरून त्याला बजावते

"प्रदीप शिवाय कुणाशी फार बोलायचं नाही.आणि उद्यापासून कमांडो येणार आहेत.ते आले की त्यांना घेऊनच बाहेर जायचं.एक कमांडो घरी असेल."

" आई सिनेमात कसं दाखवतात तसंच होणारं.मस्त थ्रिल वाटतंय." तन्मय हसत म्हणाला.

"तन्मय सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणे घेऊ नको. सिनेमाशी बरोबरी करू नको. हे आपलं आयुष्य आहे सिनेमा नाही." प्राची गंभीरपणे म्हणाली.तिचा आवाज थोडा कठोर झाला.तिला तन्मयचं हे बालीश वागणं आवडलं नाही.

" आई तू एवढी गंभीर का होतेस? मी सहज म्हणालो."

तन्मय जरा नाराज झाला पण प्राचीने त्यांच्या नाराज होण्याला फार महत्व दिलं नाही.

" तन्मय कधी गंम्मत करायची हे तुला आता कळायला हवं. आता तू लहान नाहीस. आपण थ्रील अनुभवायला म्हणून पोलीस संरक्षण आणि कमांडो बोलवत नाही. तेव्हा जे सांगते ते नीट ऐक."

प्राची जरी शांतपणे बोलली तरी तिला तन्मयचं बोलणं आवडलेलं नाही हे तिच्या बोलण्यातून कळत होतं.

"हो"अशी मान डोलावून तन्मय शांतपणे जेऊ लागला.

"तन्मय आई सांगते ते लक्षात ठेव.नुसतं हो अशी मान बोलावू नकोस."
कामीनी बाईं तन्मयला म्हणाल्या.

" हो आजी आई सांगतेय तसंच करीन."

आज सगळेच मुकाट्याने जेवत होते.सगळ्यांच्याच डोक्यात वेगवेगळे विचार फिरत होते. रोजच्या सारखं सगळे नीट जेवले नाही हे मात्र खरं.

***

दुस-या दिवशी सकाळी स्वयंपाकघरात कामीनी बाई चहा करत होत्या तेव्हाच प्राची आली.

"आई मी आज जरा लवकर निघते."प्राची म्हणाली.

"म्हणजे तू नाश्ता पण करणार नाहीस?"

कामीनी बाईंनी विचारलं.
"आजपासून आपल्या ऑफीसमध्ये काही ट्रेनी येणार आहेत. त्यांना महिन्याभराचा ट्रेनिंग द्यायचं आहे. त्यांच्याशी ओळख करून घेऊन त्यांच्याशी थोड्या गप्पा मारुन त्यांना थोडं रिलॅक्स करीन."

प्राची म्हणाली.

" हे यावर्षीच सुरू केलस का?"

"हो.कोहीनूर ट्रॅव्हल टुरिझमच्या काॅलेजमधून मागच्या आठवड्यात विचारणा झाली तेव्हा मी विचार केला काय हरकत आहे. या विश्वास प्रकरणामुळे तुम्हाला सांगायचं राहिलं."

"असू दे.होतं असं कधी कधी. तू किती गोष्टी लक्षात ठेवणार?"
प्राचीच्या गालावर हलकेच थोपटत कामीनी बाईं म्हणाल्या.

" हं.हे असं ट्रेनिंग देतांना त्या मुलांना काय अडचणी येऊ शकतात हे कळेल. पुढे जाऊन तन्मयपण आपल्याच इथे ट्रेनिंग घेऊन शकतो. हे ट्रेनींग या मुलांना घ्यावं लागतं. जिथे ट्रेनींग घेतलंय त्यांच्या रिमार्कवर त्यांना परीक्षेत तेवढे गूण मिळतात."

प्राचीनी सविस्तर कामीनी बाईंना सांगितलं.

" अगोबाई असं आहे हे सगळं! मग तर ट्रेनींग देच." कामीनी बाई म्हणाल्या.

"आज त्या मुलांचा पहिलाच दिवस आहे त्यामुळे आज लवकर जातेय. माझं सगळं आवरूनच खाली आलेय. नाश्ता मी ऑफीसमध्ये बोलावून घेईन. हर्षवर्धनला उठल्यावर ऑफीसमध्ये यावसं वाटलं तर येईल.त्याला जबरदस्ती करू नका."

" ठीक आहे.हर्षवर्धन स्वतः हून म्हणाला तर जाउ देईन ऑफिसला. वेळेवर नाश्ता कर."

कामीनी बाई म्हणाल्या.

" हो. नीघते मी"

एवढं म्हणत प्राची घराबाहेर पडली.
---------------------------------------------------------
क्रमशः लेखिका – मीनाक्षी वैद्य