कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३७
प्रदीप दवाखान्यात आल्यावर प्राची त्याला डाॅक्टर काय म्हणाले ते सांगते.
"आता काळजी करू नकोस.आणि काकूंना खूप दवाखान्यात ये जा करू देऊ नकोस. त्यांनाही जपायला हवं. मी आता निघते." प्राची म्हणाली.
" हो ताई तुम्ही निघालात तरी चालेल. तुम्ही दवाखान्यात होता म्हणून मी आईकडे बघू शकलो. तुमचे किती धन्यवाद मानू."
बोलताना प्रदीपचा आवाज गहिवरला.
"अरे धन्यवाद कसलेदेतोस. आपले खूप जुने संबंध आहेत. आईसमोर तू धीर सोडू नको.ठीक चल निघते."
" ताई गाडीच्या चाव्या."
"अरे हो.दे"
प्राची गाडीच्या किल्ल्या घेऊन दवाखान्यातून निघते.
***
गाडी चालवताना पुन्हा तिच्या डोक्यात दुपारसारखेच काही बाही विचार पिंगा घालू लागले. प्राची गाडी यंत्रवत चालवत होती. तिच्या डोक्यात चाललेले विचार तिच्या गाडी चालवण्यात काही बाधा आणत नव्हते. तरी लाल सिग्नल लागला आहे हे तिच्या लक्षात आलं नाही आणि तिला करकचून ब्रेक दाबावा लागला तेव्हा नशीब तिची पुढच्या गाडीला धडक बसली नाही.
खरच देवा असा जगावेगळा संघर्ष का दिला माझ्या नशीबी? लग्नं झाल्यावर ज्या सुखाच्या हिंदोळ्यावर मुली झुलतात.जे मी ऐकलं होतं ते सुखाचे हिंदोळे माझ्या नशीबी का नाही दिलेस? आजच मला या गोष्टी बद्दल इतकं का वाटतंय? का इतका त्रास होतोय?
हेच प्राचीला कळत नव्हतं.
पण आज तिला खूप ढसढसा रडावसं वाटत होतं.इतकी वर्ष जो कोंडमारा ती सहन करत होती तो कुठेतरी संपवावा असं तिला वाटत होतं. पण कसा संपवणार? कुठे वाटच सापडत नव्हती. कोणाजवळ आपलं दुःख सांगणार? तिच्या डोळ्यासमोर एकही नाव येईन.
या सैरभैर अवस्थेत ती गाडी चालवत होती.एका सिग्नल वर ती थांबवु होती. सिग्नल सुटला तरी ती जागची हल्ली नाही. मागच्या गाड्यांचा हाॅर्न वाजवणं सुरू झालं तरी ती जागची हलेना तेव्हा एक ट्रॅफीक पोलिस तिच्या गाडीजवळ आला आणि त्याने काचेवर टकटक केली.त्या आवाजानी प्राची भानावर आली आणि तिने आवाजाच्या दिशेने बघीतलं.
तिनी काच उघडून त्याच्याकडे बघीतलं.पोलीसाला तिच्या गालावर ओघळणारे अश्रू दिसल्यावर तोही भांबावला.
"मॅडम काय झालं? सिग्नल सुटला आहे.मागे लोक खोळंबले आहेत. तुम्हाला बरं वाटत नाही का? "
"नाही असं काही नाही.साॅरी."
एवढं म्हणून तिनी गाडी पुढे घेतली.समोर जाऊ लागली. डोळ्यातून पाणी तर सतत वहात होतं. त्यामुळे तिला समोरचं सगळं धुसर दिसायला लागलं.
प्राचीला एका बाजूला पार्किंग दिसलं तिथे गाडी पार्क करून ती गाडीतच नुसती बसून राहिली. एवढ्या वर्षांचा संसारपट तिच्या समोर उलगडल्या गेला. आपण सासूबाईंकडे बघून आयुष्य जगलो. त्यांच्यासाठी फसवल्या जाऊनही पटवर्धनांच्या घरी राहिलो.
एकच ध्यास घेतला हर्षवर्धनला बरं करून त्या माऊलीला आनंद द्यायचा. हा ध्यास कितीही अडथळे आले तरी आपण सोडला नाही. पण देवांनी मला पूर्ण यश कुठे दिलं? एवढे प्रयत्न करूनही माझ्या जीवनसाथीला असंच अर्धमुर्ध व्यक्तीमत्व दिलं. का? माझीही इतर मुलींसारखी सुंदर सोहळे असलेलं आयुष्य जगण्याची इच्छा होती.
आता पर्यंत हे इतकं टोचलं नव्हतं. राधा बोलली आणि जबरदस्तीने आपल्या मनाला झालेली जखम जी आपण इतकी वर्ष बुजवून ठेवली होती ती मघापासून सळसळ वाहतेय. काय करू? यातुन बाहेर कसं पडू?
विश्वासनी आता जो गोंधळ घातलाय तो निस्तरतांना आपली कितीतरी शक्ती खर्च झाली. त्यात भर म्हणून भय्यासाहेबांच्या तब्येतीवरही परीणाम झाला. प्रत्येक वेळी सगळे प्राचीकडेच आशेनी बघतात.
"प्राचीला काय त्रास होतो हे कोणी बघत नाही."
हे ती स्वतःशीच बडबडली.
तन्मय समोर विश्वासनी गंजेडी हा शब्द वापरल्याने हर्षवर्धन अस्वस्थ झाला होता त्यामुळे तो पुन्हा कोषात गेला. इथे पुन्हा आपणच धावपळ करा. देवा किती वर्ष नव-याला लहान मुलासारखा जपू. प्राचीच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं..
एवढ्या वेळात तिला राधा, संदीप, यादव, तन्मय इतक्यांचे इतक्या वेळा फोन आले होते.पण एकदाही फोनची रिंग तिच्या कानात शिरली नव्हती.तिचं मन आणि बुद्धी बधीर झाल्यागत झाली होती.
आता सगळ्यांना खूप काळजी वाटायला लागली.गाडीत बसून प्राची ढसढसा रडत होती. इतक्या वर्षांचं ओझं तिच्या मनात तिनं दाबुन टाकलं होतं ते घळाघळा वाहत होतं.
***
प्राची घरी आली.गाडी पार्क करून ती घरात शिरली. घरातले सगळे तिच्याकडे अचंब्याने बघत होते. प्राची आजपर्यंत अशी कधीच वागली नव्हती. घरात शिरल्यावर तिनी कोणालाही काहीही स्पष्टीकरण दिलं नाही.तरी कामीनी बाईंनी विचारलं
" प्राची काय झालं? कुठे होतीस इतका वेळ?"
प्राची काहीही उत्तर न देता आपल्या खोलीत गेली.
कामीनी बाईंनी तन्मय आणि हर्षवर्धनला सांगीतलं की
"तिला अजीबात त्रास देऊ नका.शांत राहू दे तिला जरावेळ."
प्राचीची सैरभैर अवस्था बघून त्याही मनातून घाबरल्या. हिच्या मनाला काय दुखतय हे कसं कळून घ्यायचं त्यांना कळेना.
इतक्या वर्षात त्या दोघींमध्ये सासू सून या नात्यापेक्षा आई मुलगी हे नातं तयार झालं होतं. या नात्यात दोन्ही बाजू एकमेकींना समजून घेणा-या होत्या.त्यामुळे हे नातं टिकलं होतं पण आज काहीतरी वेगळं घडलं होतं.आज या नात्यातून काय हरवलं आहे हे त्यांना कळत नव्हतं.
दोघींच्या नात्यामध्ये एवढी शांतता कधी आली नव्हती. भविष्यात काय घडेल याविचाराने त्या धास्तावल्या.
***
दुस-या दिवशी सकाळी स्वयंपाकघरात काम करता करता कामीनी बाईंनी प्राचीची चाहुल घेतली. प्राची बहुदा उठली नसावी. अजूनही कालच्याच मनस्थितीत प्राची आहे का? असं असेल तर काय करावं हे काही कामीनी बाईंना कळत नव्हत थोड्यावेळाने हर्षवर्धनची चाहूल कामिनी बाईना लागली. त्यांनी विचारलं हर्षवर्धनला
"का रे प्राची उठली का?" त्यावर
"मला माहित नाही"
असं त्यानी उत्तर दिलं त्याचे उत्तर ऐकून कामिनी बाईंना खूप चिडल्या आणि त्याला म्हणाल्या,
"तुझी बायको अस्वस्थ आहे आणि तुला माहिती नाही ती झोपली आहे का उठली आहे?"
हर्षवर्धननी काहीच उत्तर दिले नाही पण तो म्हणाला
"आई आज महत्त्वाची मीटिंग आहे प्राचीला तर आलंच पाहीजे."
कामिनी बाई म्हणाल्या,
"हे बघ हर्षवर्धन आज पूर्ण मीटिंग आणि पुढच्या टूरचं नियोजन तुम्ही करा."
यावर हर्षवर्धन घाबरला. तेवढ्यात तन्मय तिथे आला.
त्याने विचारलं,
"आजी काय करायचे काय झालं?"
कामिनी बाई म्हणाल्या
"अरे आजची मीटिंग आहे ते पुढच्या टूर्सचं नियोजन करण्यासाठी आहे ते तू आणि बाबा आज करा आज प्राचीला शांतपणे घरातच राहू द्या. खूप दमलीये ती.खूप अस्वस्थ झाली आहे. मी बघते तिला कसं वाटतय ते."
" मी?"
तन्मय ने गोंधळून विचारलं.
" हो तू जा बाबांबरोबर.पुढे तुलाच सांभाळायची आहे आपली कंपनी."
" तेव्हा जाईन मी" तन्मय म्हणाला.
" आज जा.बघ मिटींग मध्ये कसं वातावरण असतं.तुला काही निर्णय घ्यायचा नाही.तू ऐकण्याची आणि बघण्याचा काम कर."
कामीनी बाई तन्मयला म्हणाल्या.
यावर तन्मय म्हणाला,
" आजी मी काय करीन जेव्हा आमची मीटिंग सुरू होईल तेव्हा तुला फोन लावेन.तू हेडफोन लावून आमचं सगळं ऐक आणि जिथे तुला बोलावसं वाटेल तिथे तू आमच्याशी बोल. म्हणजे तुझाही सहभाग राहील."
कामिनी बाईंना तन्मयचं खूपच कौतुक वाटलं त्या म्हणाल्या
"अरे किती हुशार आहेस तू. आता तुमची पिढी सगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये रमणारी आणि हुशार.मला चालेल. कधी करणार आहेस तू मला फोन? त्याच्या आत मी सगळ आवरून ठेवते."
तन्मय लगेच तयार झाला पण हर्षवर्धन अजून तयार होत नव्हता त्यावर त्या म्हणाल्या
"हर्षवर्धन आज तू पन्नाशीच्या घरात पोचल्यास तरी अजून कुठलाही ठाम निर्णय घेण्याचे धाडस का दाखवत नाही? सगळं काही प्राची वर अवलंबून आहे. अरे ती यंत्र आहे का? ती सुद्धा एक माणूस आहे इतकी वर्ष सगळं तीच सांभाळतेय.आज तिला कुठेतरी मदत कर म्हणतेय तर तू मागे हटतोस?"
कामिनी बाई हर्षवर्धनला म्हणाल्या पण त्यांच्या डोक्यात किती शिरलं याची त्यांना खात्री नव्हती.
तन्मय आणि हर्षवर्धन थोडा नाश्ता करून निघून गेले.
त्यानंतर कामिनीला अचानक फोन येतो प्राचीच्या आईचा. त्या प्राचीच्या आईला कालपासूनच सगळं सांगतात आणि म्हणतात,
"प्राची कालपासून खूप अस्वस्थ आहे तुम्ही जरा येऊन भेटता का? तुम्ही भेटा बोला तिच्याशी तिलाही जरा बरं वाटेल."
यावर त्या म्हणाल्या,
"अहो आम्ही येतो. तसेही आम्हाला हर्षवर्धनच्या बाबांच्या तब्येतीची चौकशी करायला यायचंच होतं आम्ही येऊ आणि प्राचीशी पण बोलू."
"बरं "म्हणून कामिनी बाईंनी फोन ठेवला.
कामीनी बाई हळूच वर प्राचीच्या खोलीत जाऊन बघतात. प्राची कुठेतरी आढ्याकडे नजर लावून बसलेली असते आणि तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहत असतं. त्यांना सुचत नाही काय करावं तरी त्या हळूच आत जातात आणि तिच्या बाजूला बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. तेवढ्यात तिची तंद्री भंग होते ती कामीनी बाईंकडे बघते आणि अचानक रडायला लागते.
" प्राची काय झालं? तुला एवढं दु:ख कशाचं झालं आहे? प्राची इतकी अस्वस्थ का आहेस?"
यावर प्राची म्हणाली
"मला बोलायची इच्छा काय मला जगायची सुद्धा इच्छा राहिली नाही."
कामीनी बाईं पटकन तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणतात,
" अशी अभद्र काय बोलतेस? अशी काहीबाही बडबड नाही करायची. नाही तू किती धीट आणि किती हुशार आहेस. किती समर्थपणे सगळ्या गोष्टी सांभाळते.आता रडू नको."
थोड्या वेळानं प्राचीचे हुंदके थांबल्यावर प्राची त्यांना म्हणते
"माझ्याच नशिबी का हो इतकी वर्ष हा संघर्ष लिहीला देवानं? मी खंबीर पणे वागले. सगळी सूत्रं सांभाळली. निर्णय घेतले. पण मलाही वाटत नाही का की माझा सुखी संसार असावा. माझ्याबरोबर माझ्या नव-याने खांद्याला खांदा लावून काम करावं पण आज पन्नाशीच्या घरात पोचला तरी हर्षवर्धन तसाच आहे.
अजून कुठलीही जबाबदारी स्वतःहून अंगावर घ्यायला तो तयारच नाही. मी पूर्ण आयुष्य असच काढू का? तन्मय अजून लहान आहे. त्याला माझ्याबरोबर मी जसं आणि जेव्हा जमेल तेव्हा मिटींगमध्ये सामील करून घेतेय. तरीसुद्धा सगळ्या गोष्टी एकदम त्याला समजत नाही. तसा लहान आहे. मी काय करू? म्हणूनच मला खूप टेन्शन आलं आहे."
प्राचीला पुन्हा हुंदके येणं सुरु झाले. कामीनीबाई तिला कुरवाळत होत्या.
अचानक प्राची कामीनी बाईंच्या मांडीवर झोपली.तिला असं झोपलेलं बघून कामीनी बाईंच्या डोळ्याला पण धारा लागल्या.
" प्राची खरच मी तुझी गुन्हेगार आहे.तुझ्या गळ्यात नशेच्या अधीन झालेल्या मुलाला बांधलं. मीच तेव्हा या लग्नाला विरोध करायला हवा होता. पण कसा करणार? कारण तुझ्या सहवासात हा धीटपणा आला माझ्या अंगात. आधी मला कुठे एवढी हिम्मत नव्हती."
प्राची त्यांचा हात कुरवाळत म्हणाली.
"आई हे लग्नं नसतं झालं तर तुमच्यासारखी मैत्रीण मला सासू म्हणून कशी लाभली असती? देव जेव्हा आपल्याला काही चांगलं देतो तेव्हा त्याचबरोबर वाईट काहीतरी देतो. आपण सुखाने उद्दाम होऊ नये म्हणून देव अशी चलाखी करतो आपल्याबरोबर. होनं! आजपर्यंत हेच मानत आले म्हणून खूप हिम्मत आली मला. पण आयुष्य निघून चाललं आहे आणि माझा जीवनसाथी मात्र अजूनही मला सापडला नाही."
प्राची एवढं बोलून गप्प बसली.
कामीनी बाईं मनातच म्हणतात.
" देवा माझा नवरा मला परत मिळाला तो प्राचीच्या धाडसीपणाने पण देवा हिचा नवरा तिला अजून परत मिळालेला नाही. देवा काय करतोयस तू? एकीच्या पदरात सुखाचे दाणे घातले अन् मग दुसरीची ओंजळ का बरं रिकामी ठेवलीस.नकोरे एवढा निष्ठूर होऊस."
मनातल्या प्रश्नांची आवर्तन थांबवत कामीनी बाई प्राचीला म्हणाल्या,
"प्राची थोडी शांत हो. तू झोपली की तुझं मन शांत होईल. जोपर्यंत तुझं मन शांत नाही तोपर्यंत तू ऑफिसमध्ये जाऊ नको. घेऊ दे हर्षवर्धनला मीटिंग आजच मी त्याला म्हटले की आता आजची मीटिंग तुम्ही दोघांनी करायची. हर्षवर्धनवर आपण आत्तापर्यंत जबाबदारी टाकलीच नाही. आता या निमीत्ताने त्यांच्यावर सोडू. थोड्यावेळानी मिटिंग सुरू झाली की तन्मय मला फोन करणार आहे. सगळी चर्चा मी ऐकणार आहे. गरज पडली तर बोलेन. बघूया यामुळे तरी हर्षवर्धन तयार होईल. तू आता फक्त आराम कर.फोन दे माझ्याजवळ."
प्राची निमुटपणे कामीनी बाईंना आपला फोन देते.
****
कामीनी बाईं तिचा फोन घेऊन तिच्या खोलीचं दार हळूच लोटून घेतात आणि खोलीबाहेर पडतात.
सध्या पटवर्धनांच्या घरी ताणापेक्षा वेगळं काही दिसत नव्हतं.
कामीनी बाईंना आता प्राचीला खूप सांभाळून घ्यावं लागणार होतं. तिच्या दु:खाला तिच्या मनातून हळूहळू दूर करायला हवं होतं.
कामीनी बाईं प्राचीला अश्या अवस्थेत बघून खूप गोंधळलेल्या होत्या तशाच घाबरल्या पण होत्या. यावर उपाय काय आणि कसा काढावा यावर त्या विचारात पडल्या होत्या.
या विषयावर चर्चा तरी कोणाशी करावी? प्राचीच्या आई-बाबांना म्हणावं तर प्राचीला हे पटेल का? नाही पटलं तर…?
पुढचं सगळं अवघड होऊन बसेल. त्या या विचारात असतानाच त्यांना तन्मयचा फोन आला.
" आजी तुझं आवरलं का? आमची मिटींग सुरू झाली आहे."
" हो सगळं आवरलय. करा सुरुवात मिटींगला."
मिटींग सुरू होते.तन्मयने फोन चालू ठेवलेला असतो. सगळ्यांचे विचार कामीनी बाई लक्ष देऊन ऐकत होत्या.
सगळ्यात शेवटी तन्मय विचारतो,
" आजी तुझं काय म्हणणं आहे यावर?"
"तुमची मी चर्चा ऐकली. टूरमध्ये प्रत्येक वृद्ध लोकांबरोबर मध्यम वयातील लोकांकडे जातीनं लक्ष द्या. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की कामीनी ट्रॅव्हल्सचे लोक आपल्या कडे खास लक्ष देतात.
सगळे आपल्या रोजच्या विवंचना बाजूला ठेवून खूप मोठी एनर्जी घ्यायला टूरवर आलेले असतात. खूप आनंद घेऊन ते आपापल्या घरी परतणार असतात. त्यांना आनंदानी घरी परतलेलं बघून त्यांच्या घरचे किती आनंदीत होतील. तो आनंद आपण बघायचा. तेव्हा प्रत्येकांनी लक्षात ठेवा आपली जबाबदारी आणि नियोजनाप्रमाणे कामाला लागा.सगळ्यांना शुभेच्छा."
"ठीक आहे आजी.तू सांगीतलेलं आम्ही सगळे लक्षात ठेऊ. या प्रवासात एका कुटुंबाच्या दहा वर्षांच्या मुलीचा वाढदिवस आहे. तो आपण आपल्या कामीनी ट्रॅव्हल्सला साजेल अश्याच पद्धतींनी करणार आहोत. त्यांच्यासाठी गिफ्ट पण घेणार आहोत."
" शाब्बास.तन्मय छान पद्धतींनी तुम्ही टूरचं नियोजन केले आहे."
एवढं बोलून कामीनी बाईं फोन ठेवतात.
फोन ठेवल्यावर त्यांना तन्मयचं वागणं बघुन खूप आनंदीत होतात.
_________________________
क्रमशः
लेखिका --- मीनाक्षी वैद्य