कामीनी ट्रॅव्हल - भाग ३९ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग ३९

कामीनी ट्रॅव्हल्स पर्व भाग३९

वासंती आणि अशोक हे दोघेही भैया साहेबांची तब्येत बघायला प्राचीच्या घरी आले. दोघांनाही भैय्यासाहेबांना बघून शॉक बसतो. भैय्यासाहेब खूप थकलेले दिसतात.

अशोक विचारतो

"आता कसं वाटतंय?"

भैय्यासाहेब म्हणाले,

"थोडावेळ बसलो,चाललो तर थकायला होतं."

यावर अशोक म्हणतो
" फार तडतड करू नका.काही दिवस फक्त आराम करा. हळुहळू तब्येत ठीक होईल."

यावर भय्यासाहेब स्मीत करतात.

अशोक आणि वासंती समोरच्या खोलीत येतात.तिथे कामिनी बाई आणि त्यांच्या गप्पा चालू होतात. कामिनी बाई म्हणाल्या,

"माहिती नाही काय झालं असं अचानक प्राचीला. पण ती परवापासून अस्वस्थ आहे. तिला ऑफिस मध्ये जायची इच्छा होत नाही. जेवायची इच्छा होत नाही. ती नेहमीसारखी बोलत सुद्धा नाही. काय तिच्या मनात असतं हे कळत नाहीये मला. तुम्ही तिला भेटा बघा बोलून.तिच्या मनातील सल काय आहे ते कळायला हवं."

वासंती म्हणाली,
"तुम्ही काळजी करु नका आमची प्राची तशी सहनशील आहे. तिच्या मनात काय आहे विचारते तिला."

यावर कामीनी बाई म्हणाल्या,

"मी तुम्हाला तिच्या वागण्याबद्दल सांगीतलं हे तिला कळून देऊ नका."

" नाही सांगणार."

" वासंती ताई मला आता तुमचाच आधार आहे.यांची तब्येत नाजूक आहे, हर्षवर्धन अजूनही गोंधळलेलाच आहे आणि प्राचीने ही शस्त्र टाकलीत.मी काय करावं तेच कळत नाही."

बोलताना कामीनी बाईंचा चेहरा विदीर्ण झाला. कामीनी बाईंचा हात हातात घेऊन वासंती म्हणाली,

" तुम्ही काळजी करू नका.कदाचीत हे अडचणीचं मळभ लवकर दूर होईल.मी बोलते प्राचीशी.तुम्ही चेहरा आणि मन शांत ठेवा.तुमचा आत्ताचा चेहरा बघून भय्यासाहेबांनी काही विचारलं तर… उगीच त्यांना आता कुठला ताण नको यायला."

" हो.तुम्ही बरोबर बोललात.मी चेहरा नीट ठेवते."
एवढं बोलून कामीनी बाईंनी आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवला,केस सारखे केले.ऊसनं हसू आणून हसल्या.त्यांच्याकडे बघत हलकसं स्मितहास्य करत वासंती उठली.

वासंती आणि अशोक दोघंही प्राचीच्या खोलीत गेले.

त्यांना प्राची डोळे मिटून पडलेली दिसली.

" प्राची.."

आईचा आवाज ऐकून प्राची एकदम दचकून जागे झाली. समोर तिला अशोक आणि वासंती उभे असलेले दिसले. तिने आईला विचारलं

"तुम्ही कधी आलात?"
यावर वासंती म्हणते

"आम्ही मगाशीच आलो. भैय्यासाहेबांची तब्येत बघायला. नंतर मला कामीनी बाईंनी सांगितलं की तू जरा सध्या ऑफिसमध्ये जात नाहीये तुला बरं वाटत नाहीये. का बेटा काय झालं?"

यावर प्राची काही एक शब्दही बोलत नाही. डोळे मिटून पडलेली असते ती फक्त उठून बसते. अशोकनेही तिला विचारलं,

"प्राची काय झालं सांग तुझ्या मनात काय चालू आहे?अचानक एवढे उद्विग्न का झालीस? इतक्या मेहनतीने तू कामीनी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय वाढवला आणि आता तिथे जाणंच बंद केलंस असं काय झालं?"

प्राची यावरही काही बोलत नाही.

"प्राची तू काहीच बोलली नाहीस तर आम्हाला कळेल कसं की तुझ्या मनात काय आहे? तुला काय त्रास होतोय? तुला मानसिक ताण आहे का? की शारीरिक त्रास होतोय? हे तू जेव्हा सांगशील तेव्हाच कळेल ना?"

वासंती तिचा हात हातात घेऊन हळुवारपणे कुरवाळत म्हणाली. पण तरीही प्राची आपलं तोंड उघडत नव्हती. आता अशोक आणि वासंती या दोघांनाही कळत नाही काय करावं?

"हे बघ प्राची तुझ्या मनात काय आहे ते सांगितलं तर आम्ही तुला मदत करू शकतो. तुला जे प्रश्न पडले असतील त्याच्यावर उपाय शोधू शकतो. पण तू जर काहीच बोलली नाहीस आणि अशीच शांत राहिलीस तर आम्हाला कळणार कसं? आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधणार तरी कसं? प्राची मनावर खूप ताण घेऊ नकोस. अग आम्ही आई बाबा आहोत तुझे. तू आमच्यापासून जर सगळं लपवून ठेवलस तर तुझ्या मनात काय आहे ते आम्हाला कळणार नाही. तू काहीच बोलली नाहीस तर कसा आपण मार्ग शोधणारं?"

प्राची बोलत नव्हती पण तिच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं. ते पाणी हळूच वासंतीने आपल्या हातानी पुसलं आणि तिला जवळ घेतलं,थोपटलं. तरीही ती काहीच बोलली नाही. तिचं हुंदके देणं चालूच होतं.आता अशोक आणि वासंती हवालदिल झाले. त्यांना काही कळेना.अशोक म्हणाला

"प्राची नेमकं कशाने अस्वस्थ झालीस तू?"

बराच वेळ दोघेही शांत बसले होते. प्राचीही काही न बोलता शांत बसली होती. या सगळ्या गोष्टींवर कसा उपाय शोधावा हे मात्र दोघांनाही कळत नव्हतं. बराच वेळानी वासंती प्राचीला म्हणाली,

"प्राची तुझ्या ऑफिस मध्ये काही झालं आहे का? त्याचा तुला त्रास होतोय का? कोणी तुला वाईट साईट बोललय का? काय झालं हे कळल्याशिवाय आपण त्यातून मार्ग कसे काढणार?"

प्राचीनी जे मौनव्रत घेतलं होतं त्यामुळे अजूनच सगळं किचकट झालं होतं. प्रश्नच मुळात काय आहे हेच अशोक आणि वासंतीलाच काय कामीनी बाईंनाही कळला नव्हता. मग त्यावर उत्तर शोधणार कसं?

भय्यासाहेबांना यातलं कामीनी बाईंनी काही सांगीतलं नव्हतं. कारण सध्या त्यांचीही तब्येत नाजूक होती.

अशोकनी शेवटचा प्रश्न विचारला

" प्राची तुझं आणि हर्षवर्धनचं काही बिनसलं आहे का? बिनसलं असेल तर कोणत्या कारणावरून बिनसलं? नवरा बायकोच्या कुरबुरी या घरोघरी असतात. क्षुल्लक कारणावरून काही मतभेद झाले असतील तर ते एवढे ताणू नकोस."

प्राचीनी हे ऐकल्यावर शांतपणे म्हणाली,

"असं काही झालं नाही बाबा. मला काय होतंय हे मला सांगता येत नाही."

प्राची हे म्हणाली पण ते सपशेल खोटं होतं. प्राची आपल्या मनाला लागलेली टोचणी आई-बाबांना सांगू शकत नव्हती. ते तिची अस्वस्थता कितपत समजून घेऊ शकतील याची तिला शंका होती.

"प्राची आज तू आम्हाला काहीच सांगत नाहीस. पण बेटा खुप वेळ मनावर ओझं लादू नये. रबर तुटेस्तोवर ताणू नये तसंच मनालाही इतकं ताणू नाही .तुला आज सांगावंस वाटतं नसेल तर नको सांगूस. पण लवकर मनातलं सांगून मोकळी हो."
वासंती म्हणाली.

"तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. आमचा आनंद तुझ्या सुखात सामावलेला आहे. तूच जर दु:खी असशील तर आम्ही कसे सुखी राहू शकतो. म्हणून बोल प्राची बेटा. आपण या समस्येतून मार्ग काढू. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तू बोलशील. आम्हाला सांगशील."

एवढं बोलतानाही अशोकचा स्वर गहिवरला होता.

प्राची अजूनही शांतच बसली होती.शेवटी अशोक आणि वासंती उठले.
"आम्ही निघतो.तुला घरी चालायचं असेल तर चल थोडे दिवस. थोडा आराम कर. मन शांत झालं की मग ये इकडे." अशोक म्हणाला.

यावर प्राचीनी मानेनीच नाही म्हटल. शेवटी अशोक वासंती जड पावलांनी तिच्या खोलीतून बाहेर पडले.

ते बाहेर येताच कामीनी बाईंनी विचारलं

" काही बोलली का प्राची?"

"नाही नं हो. तोंड मिटून बसली आहे. तिच्या मनातलं कळल्याशिवाय आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तरी काढू शकणार?"
वासंतीनी कामीनी बाईंना सांगितलं.

"तिथंच तर घोडं पेंड खातय. प्राची माझ्याशी आत्तापर्यंत खूप सगळं मोकळेपणानी बोलायची.याच वेळी काय झालं कळत नाही. एवढ्या वर्षात तिला इतकं अस्वस्थ झालेलं मी बघीतलच नव्हत. त्यामुळे मला काही सुचत नाही."
कामीनी बाईं उदासीन स्वरात म्हणाल्या.

अशोक आणि वासंती प्राचीच्या घरातून निघाले.पण दोघंही खूप अस्वस्थ होते. प्राचीला एवढी निराश त्यांनी आजपर्यंत बघीतलं नव्हतं.

यातून मार्ग कसा काढायचा यावर तिघही विचार करू लागले होते.

***

हर्षवर्धन आज बळजबरीने ऑफीसमध्ये गेला होता. त्याला पूर्ण काम एकट्यानी सांभाळत नव्हतं तन्मय तसा लहान होता. प्राचीला व्यवसायातील सगळी गणीतं पाठ झाली होती. तिच्यावर सोपवून खूप सहज जमणारी कामं करण्याकडे हर्षवर्धनचा कल असे. तसा कल इतक्या वर्षात त्याचा बनला होता. तोही यासाठी पूर्ण पणे जबाबदार नव्हता.

त्यांला उपचार चालू असल्याने इतकी वर्ष प्राचीनीच त्याला एवढी अवघड कामं कधी दिली नव्हती त्यामुळे जबाबदारीनी कुठलंही काम सुरवातीपासून शेवटपर्यंत करण्याचा त्याला अनुभवच आला नव्हता.

आज पुढल्या टूरचं नियोजन आणि बाकी काम बघण्याचा ठरलं होत.

वेळेवारी मिटींग सुरू झाली आणि संपली. सगळं नीयोजन व्यवस्थित आखल्या गेलं. तन्मयला खूप आनंद झाला. आज ही गोष्ट आईला सांगीतली पाहिजे असं त्याला वाटलं.

हर्षवर्धनला थोडं बरं वाटलं. पूर्ण नियोजन त्यानी नाही केलं पण ब-यापैकी त्याचा हातभार लागला होता.

तन्मयनी मिटींग संपताच कामीनी बाईंना सगळं फोन करून सांगितलं. हर्षवर्धननी काय सांगीतलं,काय नवीन सुचवलं हे कमी प्रमाणात असलं तरी तन्मय आणि कामीनी बाईंच्या दृष्टीने महत्वाचं होतं.

आज कामीनी बाईंना पण मनातून जरा बरं वाटलं. त्या प्राचीच्या खोलीत डोकावल्या. प्राची अजून सूस्तच बसली होती. कामीनी बाई हळूच तिच्या जवळ बसल्या आणि तिला आजचं हर्षवर्धनचं ऑफीसमधलं वागणं रंगवून सांगू लागल्या.

प्राचीचा हात हातात घेऊन त्या म्हणतात.

" प्राची तुला एक गंम्मत सांगते"

असं म्हणून त्यांनी काहीतरी तिच्या कानात सांगीतलं.ते ऐकून प्राची चे डोळे चमकले.तिच्या चेह-यावर हसू उमटलं.

" मग...पक्कं नं. असंच करुया."

प्राची आणि कामीनी बाईं दोघींच्या चेह-यावर हसु आलं. कामीनीबाई आनंदानी गाणं गुणगुणत प्राचीच्या खोलीबाहेर पडतात.

प्राचीही विचारात असली तरी एक कसलातरी आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
---------------------------------------
क्रमशः
लेखिका -- मीनाक्षी वैद्य