निदान आपल्या मुलांसाठी Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निदान आपल्या मुलांसाठी

निदान आपल्या मुलांसाठी तरी......

*आजच्या काळात पती पत्नीतील भांडणं वाढतच चाललेली दिसून येतात. त्याचं कारण म्हणजे कायद्यानं पत्नी वर्गांना दिलेली सुट. कलम ४९८ व कलम २५ अ ह्या पत्नी वर्गासाठी हक्काच्या कलमा. त्यातच आता नवीनच कायदा असा आलाय की कुटूंबात जर अत्याचार होत असेल, तर कायद्यानुसार महिलांना अधिकार प्राप्त आहेत. शिवाय महिलांच्या सक्षमीकरणासाठी तिला तेहतीस प्रतिशत जे आरक्षण होतं. त्यातही वाढ झालेली आहे. त्यातच आजच्या काळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी योग्य पाऊल उचलत सरकारनं मालमत्ता, बँकेचं खातं, राशनकार्ड ह्या सर्व गोष्टीवर महिलांना प्रमुख बनवून टाकलं आहे. शाळेतही महिला असलेल्या आईचं नाव मुलांच्या नावासोबत आहे. आता कुटूंबातील नवीन बँक खातं हे महिलांच्या नावावर, राशनकार्डाची प्रमुख महिला, तशीच एखादी मालमत्ताही घ्यायची असेल तर तिथंही महिला. एवढंच नाही तर गॅस कनेक्शनातही महिलाच. एवढे सर्व अधिकार. शिवाय नवीनच आलेली योजना म्हणजे महिलांना लाडकी बहिण अंतर्गत मुख्यमंत्री लाडली बहिण योजना. ही देखील महिलांच्या नावाने आहे.*
लाडली बहिण योजना. म्हणतात की माणसांना दिली असती ती योजना. परंतु माणसं दारु पितात. मग महिला दारु पीत नाहीत काय? महिलाही दारु पीत असतात. हे जर पाहायचं असेल तर उच्चश्रेणीच्या बारमध्ये जावं लागेल किंवा एखाद्या वेळेस गोव्याला जावं लागेल. महिलाही दारु पितात. परंतु ते सगळं लपून असतं.
महिला सक्षमीकरणासंदर्भात असलेली लाडली बहिण योजना. तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी योजना आहे. ती योजना ज्या महिला सक्षम नाहीत. त्यांचेसाठी आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
महिला सक्षमीकरणाचा हा विचार. हा विचार पती पत्नीच्या नात्यातही लागू पडतो. कारण महिलांना समाजात प्रतिष्ठेचं स्थान नाही. असे मानणारा समाज. आज ती आपल्या स्व घरीही सक्षम नाही. असंही मानायला लागल्यानं तिला जुई स्थळी पाताळीही सक्षम करण्यासाठी पाऊल उचलण्याचं काम करु पाहात आहे. नव्हे तर तोच समाज सरकारच्या माध्यमातून पावले टाकत आहे. परंतु महत्वपुर्ण बाब ही की आजच्या काळात महिला कमजोर नसून पुरुषच कमजोर वाटायला लागला आहे. ही वास्तविकता आहे.हे लपवून चालत नाही. समाजातील या पती पत्नीच्या नात्याबद्दल सांगायचं झाल्यास आज ते नातं अतिशय नाजूक बनलेलं आहे. केव्हा तुटेल याचा भरवसा देता येत नाही. मात्र ते तुटत असतांना चूक जरी पत्नीची असे तरी दोष पतीवरच लावला जातो. कारण त्याची पत्नी एक महिला असल्यानं तिला कमजोरच समजलं जातं. कधीकधी हा पत्नीवर्ग मुलं सोडून देवून एखाद्या परपुरुषांसोबत पळून जातो. कारण असतं महिला सक्षमीकरण आणि महिलांना असलेलं अमर्याद स्वातंत्र्य. यात महत्वाचं सांगायचं म्हणजे असं जर पळून जायचं असेल तर मुलं जन्मासच का घालावीत? शिवाय असं पळून गेल्यावर त्यावेळेस मुलांच्या अभ्यासाचं, त्यांच्या करीअरचं अतोनात नुकसान होत असतं. समजा तो मुलगा बारावी झाला असेल आणि त्याला डॉक्टर, इंजिनिअर बनायचं असेल व प्रवेश घेतला असेल तर अभ्यासात मन लागत नाही व ते शिक्षण तो मुलगा हुशार असूनही सोडून देतो किंवा तो मुलगा जे ई ई तसेच नीटची परीक्षा देणार असेल, तेव्हाही अशा पळून जाण्यानं ताल बिघडून मुलं नापास होतात. कधीकधी तर अशा महिला मुलं प्राथमिक अवस्थेत शाळा शिकत असतांना आपल्या पतींना सोडून जातात.
हे झालं महिलांच्या पतीला सोडून जाण्यानं उद्भवलेले प्रश्न. कधीकधी विनाकारण कुटूंबात नेहमीच पतीपत्नींचे वाद होत असतात. त्याचाही परिणाम मुलांवर होतो. कारण त्या मुलांनाही भावभावना असतातच. अन् समजा या दोनपैकी एखादा घरातून निघून गेल्यावर. मग तर अतोनात नुकसान होत असते मुलांच्या करीअरचं. त्यांचं भवितव्य बिघडत असते.
मुलांच्या बाबतीतही किस्से मजेशीर आहेत. आजच्या महिला त्यांचा पती असतांनाही पतीची नजर चुकवून फेसबुकवर बोलतात. त्यातच एखाद्यानं भूल दिलीच तर त्याचेवर भाळतात. हे सर्व वासना तृप्तीसाठी घडलं. त्यावेळेस त्या विचारच करीत नाहीत की तो नवीन तरुण तिच्या शरीराचा फक्त वापर करेल, त्यानंतर त्याला कंटाळा आला की तो सोडून जाईल. शिवाय यातून तिच्या मुलाचं अतोनात नुकसान होईल. त्याच्या अभ्यासाचं, शाळेचं नव्हे तर भवितव्याचंही नुकसान होईल. परंतु ती बाब विचारात न घेता पत्नी बनलेल्या मुली अशारितीनं पलायन करतात आणि आपलं स्वतःचं, आपल्या मुलांचं त्यातच आपल्या पतीचंही नुकसान करीत असतात. शेवटी असा नवीन मिळालेला व भाळवणारा पुरुष, त्यानं विश्वासघात केल्यास त्याची पलियंती पश्चातापात होते. मुलं, पती दूर गेलेला असतो. मग जगावंसं वाटत नाही व आत्महत्या घडतात. शेवटी काय मिळते? काहीच नाही. त्यावेळी अशा महिलांची स्थिती 'तेल गेलं, तूप गेलं हाती धुपारणं आलं' अशी होते.
भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यातच महिला सबलीकरण करण्याचा प्रयत्न केल्या गेला. त्यावेळेस विचार केल्या गेला की स्वातंत्र्य हे केवळ पुरुषांनाच मिळालं नाही तर ते महिलांनाही मिळालं. त्यानुसार महिला सक्षमीकरण झालं. त्यासाठी कायदे केले गेले. ते कायदे कठोर स्वरुपाचे होते. ज्याची पायमल्ली झाल्यास कठोरात कठोर शिक्षा होत होती. परंतु त्या महिला सक्षमीकरणाचा काही ठिकाणी अतिरेकही दिसून येत आहे. आजची पत्नी सीतेसारखी नाही. सीता अयोध्येतून एकटीच वनात गेली. ज्याचं कारण होतं आपला पती रामाची बदनामी होवू नये. शिवाय तिनं तीच अस्मिता आयुष्यभर जपलीही. परंतु आजची पत्नी सोडून जातांना पतीची बदनामी करीत सोडून जाते. जरी त्याचा दोष नसेल तरीही. हे सगळं महिला सक्षमीकरणानं घडतं. आजची पत्नी मुलांनाही सोडून जाते. त्याच्या करिअरचं नुकसान करीत. हेही महिला सक्षमीकरणानं घडतं. एवढंच नाही तर आजची वास्तविकता अशी आहे की आजच्या काही पुरुषांना घरी भांडे, कपडे, झाडू व फरशी पुसणे या सर्व गोष्टी स्वतःच कराव्या लागतात व कार्यालयातही जावे लागते आणि महिला घरात केवळ मोबाईलवर चॅटींग करीत बसलेल्या असतात. तरीही तिला काही म्हणता येत नाही. आजची सासू नावाची जात स्वतःच घरात राबत असते. कारण तिला भीती असते की जर तिनं थोडासा जरी नकार दिला कामं करायला की कौटूंबीक अत्याचाराच्या खटल्यात तिला तुरुंगात जावं लागेल, नाहीतर वृद्धाश्रमात तरी. आजच्या काळात कित्येक पती कामानिमित्त बाहेर पडताच त्याच्या वृद्ध मायबापांवर अत्याचार करणारी सुन एक महिलाच असते. कारण आहे, महिला सक्षमीकरण.
महत्वपुर्ण बाब ही की महिला सक्षमीकरण यासाठीच केल्या गेलंय का की एक महिला, तिच्या पतीवर, मुलांवर व सासू सासऱ्यावर अत्याचार करेल. आजच्या कित्येक महिला अशा आहेत की त्या स्वतःच आपल्यापेक्षा धिप्पाड असलेल्या आपल्या पतींनाही मारतात आणि स्वतःच पोलीस स्टेशनला जावून तक्रारही करतात. शिवाय पोलीस स्टेशनला संबंधीत प्रकरणाची शहानिशा न करता उलट त्या धिप्पाड असलेल्या पतींनाच दोष दिला जातो व दोषी ठरवलं जातं. तसंच आजच्या सुनांनी आपल्या सासूसासऱ्यांनाही मारावं आणि त्यांनीच अत्याचार केला असंही सांगावं. यात वास्तवता पाहून विचार केल्यास तशी सुनेला मारण्याची रग म्हातारपणात सासुसासऱ्यात नसतेच. तरीही पोलीस आणि संबधीत यंत्रणाच सासुसासऱ्यांनाच दोषी मानते.
विशेष सांगायचं झाल्यास महिला सक्षमीकरण ही काळाची गरज होती. जी आज पुर्ण झाली आहे. परंतु त्याचा अतिरेक कोणी करु नये. कारण त्यानं जे नुकसान होतं, ते नुकसान कधीच भरुन निघणारं नसतं. ते नुकसान म्हणजे त्यांनी जन्माला घातलेली पिढी ही गुन्हेगारीकडे वळते. ज्यातून देशाचंही नुकसान होत असते.
महत्वपुर्ण गोष्ट ही की आजच्या महिला सक्षमच आहेत. अगदी खेड्यातील महिलाही. त्या कमजोर नाहीत आणि त्यांना कमजोर समजणं ही पुरुषांची भूल करु नये. काही ठिकाणी अत्याचार होतही असतील कदाचीत. तसे अत्याचार तर बऱ्याच ठिकाणी पुरुषांवरही होतात. आज महिला वर्ग नोकरीवरही लागला आहे. त्यातच बऱ्याचशा महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तो जेवढे पैसे कमवतो, तेवढीच कमाई त्याही करतात. त्यातच त्यांच्यासाठी सक्षम असे कायदेही बनलेले आहेत. त्याची जाणीव त्यांना आहेच. शिवाय त्या महिला अंतराळातही गेल्या आहेत आणि देशातील एकंदरीत परिस्थिती पाहिल्यास अनेक क्षेत्रात त्या आघाडीवर आहेत. यावरुन महिला सक्षम झालेल्या आहेत हे सिद्ध होते. त्या कमजोर नाहीत हेही सिद्ध होते. आजच्या महिला जड वाहनंही चालवतात. सैन्यातही आहेत. शिवाय ज्या मुलींवर आजच्या काळात अत्याचार होतो. तिनं दबून राहू नये. कायद्याचा वापर करावा. परंतु हे जरी खरं असलं तरी विनाकारण शुल्लक कारणासाठी कायदा हातात घेवू नये. पुरुष असलेल्या पतीवर, मुलांचे नुकसान करीत मुलांवर, सासूसासऱ्यांचं नुकसान करण्यासाठी सासुसासऱ्यांवर अत्याचार करु नये. एकंदरीत सांगायचं झाल्यास कोणत्याही महिलांनी महिला सक्षमीकरणाचा गैरफायदा घेवू नये. म्हणजे झालं.
आज सक्षमीकरणाची खरी गरज आहे पुरुषांना. कारण बऱ्याचशा घरी त्याला घरात असलेली वागणूक ही लाजवेल अशीच आहे. त्यांच्यावरही महिला अत्याचारच करतात आहे. परंतु ते चित्र दबून असते. त्याचं कारण म्हणजे लाज. कारण कोणाला सांगीतलं तर बरेच जण त्याला 'बायल्या' ची उपाधी देवून मोकळे होतात. ज्यातून मार्ग निघत नाही. परंतु घोर निराशा पदरी येते. हेच वास्तव चित्र आहे.
विशेष सांगायचं झाल्यास महिला सक्षमीकरणसंदर्भात लाडली बहिण योजना आणली. परंतु जिथं पुरुषच लाचार बनले. तिथं त्या योजना महिलांना देवून उपयोग काय? खरी वास्तविकता ही की आजच्या स्रिया कामाला लागल्या आहेत, जात आहेत आणि पुरुष घरी जेवण बनवीत आहे. भांडे घासत आहे. पर्यायानं सांगायचं झाल्यास घरची सर्व कामं करीत आहे व हे चित्र आज बऱ्याच घरी दिसत आहे. तो कामाला जात नाही तर घरातील सर्व कामे करतो आणि महिला घरची महाराणी असल्यागत कामावरुन घरी आल्यावर मोबाईल पाहात बसते. तिला तो पुरुष काहीही म्हणू शकत नाही. कारण त्याला ती सोडून जाण्याची धमकी देते. त्यातच तो विचार करीत असतो की ती त्याला सोडून गेल्यास त्याच्या मुलाचं काय होईल? त्यांना कसं पोषता येईल? त्यांचं शिक्षण होईल काय? याचं चिंतेनं त्याला ग्रासलेलं असतं. इथूनच भांडणं होत असतात. ज्याचा परिणाम मुलांवर होतो.
विशेष बाब ही की पतीपत्नींनी भांडण करावं. करु नये असं नाही. कारण भांडण होणारच नाही, ते पती पत्नी कसले. परंतु ते भांडण कोणाला अन् खास करुन मुलांना दाखविणारं नसावं. ते मुलं घरी नसतांनाचं असावं. जेणेकरुन मुलांवर कोणत्याही स्वरुपाचा परिणाम होणार नाही व त्यांचं आयुष्य आणि तेवढंच भविष्य चांगलं बनेल. कमीतकमी निदान मुलांच्या भवितव्यासाठी तरी कोणत्याही स्वरुपाचं भांडण पती पत्नीनं करु नये म्हणजे झालं. कारण त्याचा परिणाम मुलांच्या भवितव्याचं नुकसान होण्यात होतो. यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०