विद्यार्थी शिकतीलच, जर........ Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विद्यार्थी शिकतीलच, जर........

विद्यार्थी शिकतीलच. जर.....

*अलिकडील काळ असाच आहे की या काळात विद्यार्थ्यांना शिकायला शिक्षकांची गरज नाही. ते स्वतःच शिकत असतात. जसा मोबाईल. मोबाईल प्रसंगी एखाद्या शिक्षकाला हाताळता येत नाही. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला हाताळता येतो. यात त्यांना मोबाईल कोणी शिकवला? असा जर विचार केला तर तो मोबाईल त्यांना कोणीच शिकविलेला नसतो. ती मुलं स्वतःच शिकलेली असतात, त्याचं कारण म्हणजे स्वयंप्रेरणा होय.*
मुलं शिकवणं ही एक कसरतच आहे. मोठ्या मुलांना शिकवणं तेवढी कसरत नाही. त्यांना फक्त कन्ट्रोल करावं लागतं. ते ज्याला जमलं. त्याला शिकवणं जमलं. कारण ती मुलं कन्ट्रोल झालीत की ते त्यानंतर चूप बसतात. मग त्यांना फक्त मार्गदर्शनच करावं लागतं. त्यातच जो शिक्षक चांगला शिकविणारा असेल, त्या शिक्षकांच्या तासिकेला ही मोठी झालेली मुलं अगदी चूप बसतात. कारण त्यांना माहीत असतं की आपण का गोंधळ केला तर या शिक्षकांना त्रास होईल व ते शिकविणार नाहीत. ज्यातून आपलंच नुकसान होईल. ही भावना त्यांच्यात आलेली असते. परंतु लहान मुलं व त्यांना शिकविणं अवघड असतं.
लहान मुलं. त्या मुलांना शिकविणं म्हटलं तर कसरतच आहे. परंतु तेवढंच आनंददायीही. त्या मुलांजवळ राग नसतो असं नाही. तिही मुलं राग, द्वेष, लोभ, मद व मत्सराच्या आहारी गेलेले असतात. बाई रागावली किंवा एखादा गुरुजी रागावला की त्यांना त्यांचा राग येतो. परंतु तो राग ते क्षणात विसरुन जातात व पुन्हा जवळ येतात. जे शिक्षक त्यांच्यावर माया करतात. ते शिक्षक त्यांना हवेहवेसे वाटतात. तेही मग आपल्या शिक्षकांवर प्रेम करु लागतात. शिक्षकांचं ऐकू लागतात. त्यासाठी शिक्षकही तेवढ्याच दर्जाचा शिकविणारा असला पाहिजे.
मोठी मुलं शिकवितांना शिक्षकाला अद्ययावत ज्ञान ठेवावंच लागतं. ज्याला सखोल असं ज्ञान असेल, तोच त्या ठिकाणी तरुन जातो. अन्यथा ज्याला ज्ञान नसेल, त्याची गोची झाल्याशिवाय राहात नाही. परंतु लहान मुलांसाठी जास्त अभ्यास करण्याची गरज नसते. फक्त संबंधीत शिक्षकाला शिकविण्याचं कसब येणं तेवढं गरजेचं आहे. शिवाय त्याला कथानक येणं, ते वेळेवर सुचणं गरजेचं आहे. त्यांना नक्कल येणं गरजेचं आहे. याबाबत महत्वाचं सांगायचं झाल्यास ज्याला किर्तन करता येतं किंवा किर्तन करण्याची कला येते, त्याला अगदी या लहान मुलांना शिकवणं जमतं असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
बरेचदा आपण पाहतो की पाचव्या इयत्तेपासून पिरेड पद्धती असते. फक्त अर्ध्या तासाचीच तासिका. ज्यात एकही विषय धड शिकविता येत नाही. शिवाय अशा तासिका यासाठी ठेवल्या जातात. कारण अनेक विषय अभ्यासाला आलेले असतात व त्या संपुर्ण विषयाचे ज्ञान शिक्षकांना नसते. म्हणूनच विषय पद्धत. परंतु ज्या शाळेत अशी तासिका पद्धत नाही. त्या शाळेतील शिकविणं ही तारेवरची कसरतच असते. त्यातही वेगळं नियोजन आणि तेवढंच कौशल्य शिक्षकात असणं गरजेचं. ते कौशल्य व नियोजन असेल तर काहीच फरक पडत नाही. याबाबतीत एक उदाहरण देतो.
एक शाळा व त्या शाळेतील शिकविणाऱ्या त्या शिक्षकाचं उदाहरण आहे. शाळा जिल्हा परिषद. ज्या शाळेत इयत्ता पाचवीला तासिका पद्धती नव्हती. त्या शाळेत सातवीपर्यंत वर्ग होते व एकेक वर्ग एका एका शिक्षकाला दिला होता. संबंधीत शिक्षक वर्ग पाचवीला शिकवीत होता व मुलं तल्लीन होवून पाहात होती. शिक्षकाचं ऐकत होती. अशातच मधल्या सुट्टीची घंटा वाजली व सुट्टी झाली. तेव्हा एक मुलगी म्हणाली,
"आज एवढ्या लवकर तासिका कशी संपली?"
तासिका दररोज तेवढ्याच वेळेची. त्यात कमीजास्तपणा नसतो. कधी ही तासिका एवढी मोठी होवून जाते की सतत कंटाळा येत असतो. वाटत असते की ही तासिका केव्हा केव्हा संपेल. त्यातच काही मुलं सतत लघवी वा पाणी पिण्यासाठी तकादा लावत असतात. ज्यातून वर्गात गोंधळ सुरु असतो. परंतु त्याच तासिकेत शिक्षक अगदी तल्लीन होवून किर्तन, नाटक, कथानक या सर्व प्रकाराचा वापर करीत शिकवीत असले की ती तासिका निव्वळ रंजकच होत नाही, तर अतिरंजक होते. ती तासिका केव्हा संपली याचं भानही नसते शिक्षकांना. ना विद्यार्थ्यांनाही. त्या वर्ग पाचवीला जे शिक्षक शिकवीत होते, त्या शिक्षकाच्या पाठ निरीक्षणादरम्यान आढळलं की सदर शिक्षक तो पाठ शिकवीत असतांना मधामधात विद्यार्थ्यांची गंमतही करीत होता. ज्याप्रमाणे एक किर्तनकार मधामधात लोकांची गंमत करीत असतो तसं त्या शिक्षकाचं शिकविणं होतं. ही अतिशय रंजक अशी पद्धती वाटत होती. त्यातच त्या वर्ग पाचवीला असलेला पाठ पर्यावरणाचे संतुलन शिकवीत असतांना मधातच त्या शिक्षकानं थॉमस अल्वा एडीसनची कथा सांगीतली आणि सांगीतलं की त्यानं विजेच्या दिव्याचा शोध लावतांना स्वयःच्याच घरची धानाची गंजी जाळली. आगगाडीत प्रयोग करतांना आगगाडीला आग लागली. ज्यातून त्याला घरातून व आगगाडीतून हाकलून दिले. कोणी त्या प्रकरणानंतर त्याला वेडाही म्हणू लागले. परंतु त्यानं जो विजेचा शोध लावला. तो आजही अगदी वाखाणण्याजोगाच आहे. तुम्हीही मोठे व्हा. जसे थॉमस स्वतः शिकले, तसे स्वतःच शिका व मोठे व्हा. नवनवीन शोध लावा. कोणत्याही वस्तुंचे निरीक्षण करीत त्याच्या नोंदी घेत जा थॉमससारख्या. एक दिवस तुम्ही नक्कीच थॉमस बनाल. ही कथानक पद्धती होती. परंतु ती कथा सांगून काय उपयोग होता त्या शिक्षकाला. परंतु ती कथा सांगण्यामागं उद्देश होता विद्यार्थ्यांचं आत्मबल वाढविणं. त्या मुलांना उद्या कोणी नाही शिकविलं तरी ती मुलं स्वतःच शिकावी याचं बाळकडू तो शिक्षक पाजत होता. त्यातच तो शिक्षक म्हणाला की तुमचे मायबाप कामं करतात. काबाडकष्ट करतात. कोणासाठी? तुमच्यासाठीच ना. मग तुम्ही महान बनलेच पाहिजे. तुम्ही जर मोठे बनले. उच्च शिकले तर एसीत राहाल. मग आज जे कृष्णधवल दिसत असाल तर उद्या एसीत कृष्णधवल दिसणार नाही. असं बोलताच वर्गात हशा पिकला. परंतु त्यातच विद्यार्थ्यांना आनंदही वाटला.
शिक्षकाचं शिकविणं. ते शिकविणं असंच असावं की ज्यात विद्यार्थी तल्लीन होवून जातील. त्यांना तो पाठ समजेल. परंतु तो समजून घेतांना वेळही समजणार नाही. असंच शिक्षकाचं शिकविणं असावं. ते शिकविणं विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण करणारं नक्कीच असावं. जेणेकरुन पुढील भविष्यात एखाद्या शिक्षकानं नाही शिकविलं तरी ते विद्यार्थी स्वतः अध्ययन करीत करीत स्वयंप्रेरणेनं शिकत जातील. मोठे होतील व स्वतःला सिद्ध करुन डॉक्टर, इंजिनिअर, शास्रज्ञ तर कधी एखादा नेता बनून देशाच्या विकासात योगदान देतील यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०