हम साथ साथ है…भाग १ला
ऑफीस संपवून घरी परतणाऱ्या सुलभाला घरी जाण्याची इच्छाच नव्हती. आजकाल रोजच तिला असं वाटायचं. कारण घरी गेल्यावर नेहमीप्रमाणे सासूचा लांब चेहरा बघा आणि मधून मधून कुचकट बोलणी ऐका. तेही कमी पडले तर तोंडी लावणे म्हणून नणंदेचे रडगाणे असायचेच नणदेचं लग्न नावालाच झालेलं होतं. तिचे अर्धे दिवस माहेरीच जात.
आपलं डेस्क आवरता आवरता रोजच सुलभाच्या डोक्यात हे विचार येत. पर्स घेऊन सुलभा उठली तेव्हा तिला कालचा प्रसंग म्हणजे सासूबाई आणि रेवती तिची नणंद यांचा संवाद आठवला,
" रेवती तुझ्या नव-याला ठामपणे सांग मी बदलीच्या ठिकाणी चंद्रपूला येणार नाही."
" माझं कसलं ऐकतो तो. त्याला सगळं आपल्याच मनाचं करायचं असतं. म्हणतो कसा, मी नोकरी करतो रेवती. माझे लाड करायला माझे सासरे नाहीत तिथे साहेब म्हणून. चंद्रपूरला जायचं नसेल तर नोकरी सोडावी लागेल. चालत असेल तर सांग मी आत्ता कळवतो साहेबांना."
एवढं बोलून ती रडू लागली. सासूबाई लगेच रेवतीच्या पाठीवरून हात फिरवू लागल्या.
हे सगळं बघून सुलभाला हसू आलं.तिच्या मनात आलं 'कधी मोठी होणार रेवती! किती बालीशपणा करतात आहेत दोघी.' असं वाटूनही सुलभा काही बोलली नाही कारण त्याचा काही उपयोग होणार नव्हता उलट सुलभालाच चार गोष्टी ऐकाव्या लागल्या असत्या.
स्वयंपाकघरातलं आपलं काम आवरून सुलभा जेवणाची टेबलवर तयारी करू लागली.
" मी इतकी पेचात सापडले आहे पण आपल्या घरात कोणाला त्याबद्दल काही काळजी वाटत नाही."
हे वाक्य सुलभा साठी होतं ते कळूनही तिने ते कानाआड केलं.
" उगी उगी मी आहे नं! कोणाला नसली तरी मला काळजी आहे तुझी.नको रडू."
हा फॅमीली ड्रामा रोजच घरात चालायचा विषय फक्त बदलायचे. सगळी तयारी करून सुलभा आपल्या खोलीत चेहरा पाण्याने धुवायला आली. तेवढीच काही मिनीटे त्या फॅमिली ड्रामा मधून सुटका होईल म्हणून.
***
या सगळ्यात तिच्या सासऱ्यांची कशातच भूमिका नसायची ते प्रेक्षक म्हणूनही भूमिका करत नसतं. घरी गेल्या गेल्या सुलभाला वाटायचं सगळे उदास रंग तिला चहूबाजूंने घेरून घेताहेत. आनंदानं मन मोहरून यावं असे क्षणच त्यांच्या घरात येत नसतं.
तिच्या सासूबाईंनी आपल्या वागणुकीने "सुखाला या घरात मज्जाव आहे.” अशी पाटीच लावून दिली होती. मग काय बिशाद होती सुखाची त्यांच्या घरात येण्याची.
यात भर म्हणूनच सुलभाच्या लग्नाला पाच वर्षे झाली होती, अजून मूल नव्हते. हा विषय दिवस दिवस चर्चा करण्यास पुरेसा होता. दीपकचे बरे होते. सकाळी सात वाजता कंपनीच्या बसने जायचा तो त्याला परतायला रात्रीचे आठ व्हायचे. तो आल्यावर आईला प्रेमाचं भरतं यायचं.
दीपकला बाहेर राहून घरातील परिस्थितीची जाण होती. पण तेच नेहमीचेच बायकोकडून बोलावे की आईकडून. या कात्रीत सापडलेला नवरा मूग गिळून गप्प बसला तरच हिताचं असतं. दीपक हे जाणून होता. त्याच्या या डावपेचाचा सुलभाला राग येत असे. पण तिचाही इलाज नव्हता.
सुलभाला दीपकची कीव यायची.म्हणून ती गप्प बसायची. तिला माहिती होतं की दीपक बोलत नसला तरी मनातून सुलभा बद्दल वाईट वाटतं. त्याची आई सुलभाला सारखं बोलते हे त्यालाही आवडायचं नाही. दीपकचे डोळे सुलभावरचं प्रेम व्यक्त करायचे. सुलभापण शहाणी होती. बेडरूममध्ये ती सासूबाई हा विषय कधीच आणत नसे.
बेडरूममध्ये दीपक आणि सुलभा यांचं स्वत़ंत्र जग असायचं.दीपक आणि सुलभा खूप वेगवेगळ्या विषयांवर बोलत. एकमेकांची थट्टामस्करी करत. हे हलकंफुलकं वातावरण सुलभाला गढूळ करायला आवडायचं नाही म्हणून दोघांना आवडतील तेच विषय दोघांमध्ये बोलल्या जायचे.
दोघांमधील प्रेमळ संवाद हाच सुलभा साठी ऑक्सिजन असायचा.याच्या जोरावरच ती सासू आणि नणंदेच्या आघाडीवर लढत असे.
नणंद नावापुरती सासरी राहण्याची. ती आणि नवरा दोघच रहात असत. यांच्या फ्लॅटच्या वरचा फ्लॅट म्हणजे नणदेचं घर. मग काय नवरा ऑफीसमध्ये गेल्यावर बाईसाहेब खालीच असायची. नव-याला सकाळी डबा करून दिला म्हणून नणंद खूप थकून जायची. असं सुलभाच्या सासूला वाटायचं. मग दिवसभर नणंद माहेरीच. सकाळचं जेवण माहेरी रात्रीचं सुद्धा माहेरीच असायचं.
जावई हुशार तोही चांगलं जेवण मिळतंय म्हटल्यावर कशाला जळक्या पोळ्या खाईल. सुलभाने त्यांच्या हुशारीला शंभर टक्के गूण दिले.असं गेले दोन वर्ष चाललंय. सुलभा दुर्लक्ष करत असे.त्याशिवाय तिलाही पर्याय नव्हता.______________________________________