हम साथ साथ है - भाग ७ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हम साथ साथ है - भाग ७

हम साथ साथ है भाग ७

मागील भागावरून पुढे…

सुभाषराव पेपर वाचत होते त्याचवेळी निलू म्हणजे सुलभाच्या सासूबाई तिथे आल्या.  त्यांना बघताच सुभाषराव म्हणाले

" निलू थांब जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे."

"काय एवढं महत्वाचं बोलायचं आहे?"

"गेले आठ दिवस मी बघतोय तु़झी आणि रेवती ची रोज स्वयंपाकावरून किरकीर असते. यामागे काय कारण आहे?"

"कारण हेच मला त्या बाईच्या हातचा स्वयंपाक आवडत नाही."

"चांगला स्वयंपाक करते ती बाई. कशाला उगीचच रोज अन्नाला नावं ठेवतेस?"सुभाष राव

"जेवण आवडलं नाही तरी कौतुकच करायचं!" निलू

"तू जे वागतेय ते मुद्दाम केल्यासारखं वाटतंय. सुलभा ने स्वयंपाकीण ठेवली म्हणून विरोध करणं चालू आहेनं?" सुभाषराव

"असं वगैरे काही नाही.आम्हाला दोघींना तिचा स्वयंपाक आवडत नाही." निलू

"आम्हाला म्हणू नको. ती रेवती आहे बावळट ती तू सांगशील त्याला मम म्हणते. मी तुझ्याबद्दल बोलतोय." सुभाषराव

"त्या सुलभानी ठेवलेल्या स्वयंपाकीणीला आम्ही नाव ठेवली तर एवढा राग येतो!" निलू

"का नाही येणार ! अगं सुलभा ने तुला स्वयंपाक करायला लागू नये, तुझे गुडघे दुखू नये यासाठी स्वयंपाकीण ठेवली नं. " सुभाषराव

"गुडघे माझे खरच दुखतात. चेष्टा नका करू."निलू

"दुखतात नं तुझे गुडघे मग ते अजून दुखू नये म्हणून सुलभाने स्वयंपाकीण ठेवली. यासाठी सुनेला धन्यवाद द्यायचे का त्या स्वयंपाकीण बाईला सतत नावं ठेवायची?" सुभाषराव

"सुलभाला धन्यवाद कशाला द्यायचे. मी सासू आहे तिची तिने माझा विचार केलाच पाहिजे." निलू

"अगं ती तुझाच विचार करते तरी का तू तिला त्रास होईल असं वागते. आपली सून हुशार आहे. तिला प्रमोशन मिळालं आहे याचं कौतुक कर. " सुभाषराव

"हो.  सारखं सारखं काय करायचं कौतुक." निलू

"एरवी सगळं घरातील करून ती ऑफीसमध्ये जाते. यावेळी तिने स्वयंपाकीण ठेवली तर तिला मदत करायची का त्रास द्यायचा?" सुभाषराव

"मी काय त्रास देते?" निलू

"तुझ्या मुलीला अक्कल आहे नोकरी करण्याची?ती तर ढेप्यासारखी बसली असते.आणि तू  तिचं कौतुक करते तिला रागावण्याऐवजी. सासू म्हणून तुला जितका सुलभाला त्रास देता येईल तेवढा देते." सुभाषराव

"पुरे झालं तुमचं सुलभा पुराण मी चालले." निलू

"जाण्यापूर्वी ऐकून जा  मला आजपासुन त्या स्वयंपाकीणीबद्दल काहीही ऐकून घ्यायचं नाही. जर जेवताना कटकट केली तुम्ही दोघींनी तर उद्यापासून तुमचा स्वयंपाक तुम्ही करा. लक्षात ठेव निलू ही वाॅर्निंग आहे." सुभाषराव

" हो"  रागाने नाक फेंदारून निलू तिकडून निघून जाते.

***

निलूला सुभाषराव रागवत असतानाच बॅंकेच्या  कामाने बाहेर गेलेला दिपकने घरात येताना हे सगळं ऐकलं. आज दिपकने रजा घेतली असते म्हणून तो घरी असतो आणि बॅंकेचं काम झाल्यावर घरी येताच त्याला हे संभाषण ऐकायला मिळालं. सुभाषराव निलूला स्पष्ट बोललेलं  ऐकून त्याला खूप बरं वाटलं.

सुलभा सगळं नीट करत असूनही आपली आई तिला सतत बोलत असते हे त्यालाही पटत नाही पण तो इतकं स्पष्ट बोलू शकला नाही. बरं झालं बाबांनीच आईला सुनावलं असं दिपकला वाटलं.

***

दिपक आत शिरला बघीतले तर सुभाषराव कसल्यातरी विचारात होते. त्यांना तसं बघून दिपक म्हणाला

"बाबा तुम्ही आत्ता आईला जे बोललात ते मी ऐकलं त्याबद्दल थॅंक्स" दिपक

" अरे थॅंक्स कसले देतोस. आठ दिवसांपासुन मी या दोघींचे रंगढंग बघतोय म्हणूनच आज निलूला  सुनावलं. सुलभाचं कधी कौतुक केलंय निलूने असं मला गेल्या सात वर्षांत आठवत नाही." सुभाषराव

" हो बाबा खरय. हेच तर सुलभाला बोचतं. अजून काय करायला हवं मी  असं ती मला सारखी विचारत असते." दिपक

"तुझ्या आई साठी कितीही केलं तरी ते कमीच असेल. ती कशानेच सुखी राहणारी बाई नाही. सुलभाला म्हणावं फार विचार करू नकोस.ती जेवढं करते तेवढं पुष्कळ आहे." सुभाषराव

" हं" दिपक म्हणतो.

" झालं का तुझं बॅंकेचं काम?" सुभाषराव

" हो झालं. गर्दी असल्याने जरा थांबावं लागलं." दिपक.

" हातपाय धुवून घे.मग जेवायला बसू." सुभाषराव

" हो." दिपक.

दिपक हातपाय धुवायला गेला.___________________________क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात.लेखिका…मीनाक्षी वैद्य.