हम साथ साथ है - भाग ८ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हम साथ साथ है - भाग ८

हम साथ साथ है भाग ८

वामागील भागावरून पुढे…

त्या दिवशी रात्री जेवणाच्या वेळी सगळे टेबलावर जमले होते. सासऱ्यांची नेहमीप्रमाणे अलिप्त राष्ट्राची भूमिका होती. सासूबाई कायम माईकसमोर भाषण देण्यासाठी उभ्या राहिल्या सारख्या बोलायच्या. त्यांच्या बोलण्याला लक्षात येईल तेथे सासरे "ह.हूं" करायचे बाकी त्यांचे लक्ष जेवणाकडे अधिक असायचे. दीपकही निम्मावेळ श्रोताच असायचा. त्यादिवशी जेवता जेवता अचानक सासूबाई

म्हणाल्या, "अरे दीपक मघाशी सुरेशचा फोन येऊन गेला."

"काय म्हणत होता?"

दीपकने विचारलं पण त्याचं अर्धे लक्ष भरल्या वांग्याच्या भाजीत होते तर अर्धे लक्ष आईच्या बोलण्याकडे. सासऱ्यांचे तर पूर्ण लक्षच भरल्या वांग्याच्या भाजीत होतं. ते म्हणाले,

"सुलू तू कशी  भरली वांगी करतेस गं?या बाईला सांग तशी करायला"

हे विचारण्यात होते. सासऱ्याचा पिंड काही पदार्थांची रेसीपी विचारण्याचा नव्हता पण बायकोची रटाळ एल. पी. रेकॉर्ड न ऐकण्याचा मात्र नक्की होता.

""अरे परवा म्हणजे या रविवारी सुरेश मंजू इकडेच येणार आहेत." सासूबाई म्हणाल्या.

"येऊ दे ग! त्यात काय."दीपक ऊत्तरला.

“तसे नाही रे.... पुढचे वाक्य बोलण्यापूर्वी त्यांनी सुलभाकडे बघितले. सुलभाला त्यांच्या बघण्याचा अर्थ कळाला नाही. ती काही न उमजून पुढला घास घेणार तोच तिच्या कानावर शब्द पडले.

"सुरेश म्हणत होता मंजूला दिवस गेले आहेत"

हे ऐकताच दीपक आणि सुलभाच्या हातातील घास हातातच राहिला.

सासूबाई उत्साहाने मंजूच्या तब्येतीबद्दल सांगत होत्या. दीपक आणि सुलभाला मात्र यापुढील जेवणात रस उरला नव्हता. कसेबसे जेवण आटोपून

"हो... का" असे मधून मधून म्हणत दीपक उठला. जाता जाता सुलभाकडे आश्वासक नजरेने बघायला मात्र विसरला नाही.

"फार म्हणजे फार मंजूला डोहाळ्यांचा त्रास होतोय.”

आपले कुणी ऐकते आहे का? असा साधासा प्रश्नही सासूबाईंच्या डोक्यात आला नाही. दीपक पाठोपाठ सासरे उठून गेले. सासूबाईचे जेवण तर काही संपेना आपण उठावे की न उठावे या संभ्रमात त्यांची कानाला असहा वाटणारी बडबड ऐकत सुलभा कशी बशी बसली होती.

"सुलभा जरा इकडे ये गं."

पाणी पिता पिता दीपकची हाक येताच सुलभाला ब्रह्मसंकटातून सुटल्यासारखे वाटले. ती धावत पळत हात धुवायला गेली. तिचं तसं जाणपण सासूबाईंच्या गावी नव्हतं. त्या आपल्या मंजू आणि तिच्या होणाऱ्या बाळातच  गुंतल्या होत्या.

बेडरूममध्ये शिरताच

"काय रे.. कशाला हाक मारलीस?" सुलूने विचारले.

"छे.  काम काही नव्हतं. तुझी तिथून लवकर सुटका व्हावी म्हणून मी हाक मारली." दीपक म्हणाला.

सुलूला आपल्या नवऱ्याचं फार कौतूक वाटलं. त्याचीही नजर फार कनवाळू झाली होती.

मूल हा विषय निघाल्यावर सुलू मनाने किती रक्तबंबाळ होत असेल याची पूर्ण कल्पना दीपकला होती. तो शक्यतोवर दोघांमध्ये हा विषय बोलला जाणार नाही याची काळजी घ्यायचा.

सुलूच्या मनात यायचे दीपक आपल्याशी कसा कनवाळूपणे वागतो तश्याच सासूबाईपण का वागत नाही? या प्रश्नावर डोकेफोड करूनसुद्धा उत्तर मिळणार नाही हे सुलभा जाणून होती

मंजूला दिवस गेले आहेत कळल्यावर सुलभाचा मूड तसा गेलाच होता. त्यात मंजूचे होणारे बाळ कसे असेल? ढेरपोटी झाल्यावर मंजू कशी दिसेल? यासारख्या अनेक आणि वेगळ्याच प्रकारचे प्रश्न तिच्या डोक्यात घोळू लागले. त्यामुळे सुलूच्या झोपेचे पार खोबरे झाले. मध्येच वाचता वाचता दीपकने दटावले.

"सुलू उद्या तुझे ऑफिस आहे. झोपण्याचा प्रयत्न कर."

सुलू मुलाचा विषय निघाला की मनातून पार कोलमडून जायची. नंतर चार पाच दिवस तरी तिचा मूड वाईटच असायचा.हे दीपकला माहिती असल्याने त्याने हातातलं पुस्तक बाजूला ठेवून तिच्या बाजूला कुशीवर वळला आणि हळूवारपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला थोपटत राहिला.

सुलूच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. तिला जाणवलं दीपक आपल्या मनाला किती जपतो.म्हणून आपण एवढे तग धरून आहोत. ती झटकन मागे वळून दीपकच्या कुशीत शिरली आणि रडू लागली. दीपक हळुवारपणे तिला थोपटू लागला आणि तिला मनसोक्त रडू दिलं.


त्याला ठाऊक होते दोन दिवस ती अस्वस्थ राहणार.थोड्या वेळाने  दीपकने हळूच तिला दटावल्याने ती कशीबशी प्रयत्न करून झोपेच्या आधीन झाली.

***________________________पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात