पुरस्कार Ankush Shingade द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुरस्कार

पुरस्कार

काही काही विद्यार्थी असे असतात की शिक्षक कितीही रागात असला तरी त्या विद्यार्थ्यांना शिकवावसं वाटतंच. तसा राग प्रत्येकाला येतच असतो. तसा तो राग शिक्षकांनाही येतोच. अशीच ती एक शाळा.
शाळा चांगली होती. विद्यार्थीही चांगलेच होते. मात्र ते गरीब होते व त्या शाळेत शिकविणारा शिक्षक मुकुंद हा मायाळू होता.
मुकुंद गरीब परीवारातील होता व तो गरीब परिस्थितीतून शिकला होता. तो जेव्हा शिकत होता. तेव्हा त्याचेजवळ पैसे असायचे नाहीत. त्यावेळेस शाळेत पेपरशुल्क भरावं लागायचं. तसं त्यानं पेपरशुल्क भरलं नाही की त्याच्या शाळेतील शिक्षक त्याच्यामागं तकादा लावायचे. तसं पाहिल्यास त्याच्या घरी त्याच्या वडीलांनी चार जणं व तो एक पाच असे पाच भाऊबहीण जन्मास घातले होते. शिवाय त्याचे वडील व आई, असा सात जणांचा परिवार होता. मग त्यांना जगवतांना कोणाला अंगरखा मिळायचा. तर कोणाला हॉपपँट. अशातच पोटाचेही प्रश्न निर्माण व्हायचे. शिक्षण तर दूरच. अशावेळेस मुकुंद शाळेत जात होता. कारण त्याला शिक्षणात गोडी होती. त्यातच मुकुंद हा अगदी लहान. ज्याच्यासाठी नवश धवस बोलल्या गेले.
मुकुंद जन्मास आला तो नवश बोलूनच. त्याच्यापुर्वी त्याला चार बहिणी होत्या. परंतु ती एक अंधश्रद्धाच की मुलगा हा वंशाचा वारस. तोच खरा न्याय देतो. वंश वाढवतो. याच इच्छेनं मुकुंदाच्या वडीलांनी चार चार मुली जन्मास घातल्या.
मुकुंदला शिक्षणाची आवड होती व तो शिकत होता. परंतु त्या शाळेतील शिक्षण जरी निःशुल्क असलं तरी परीक्षा शुल्क मागीतला जात असे. ते नाममात्र राहायचं. परंतु ते जर भरल्या गेलं नाही तर त्या शाळेतील शिक्षक त्या विद्यार्थ्याला परीक्षेलाच बसू देत नसत. तरीही मुकुंद शिकला, ते सर्व शुल्क भरुन. तेही वडीलांना न सांगता. ते शुल्क गोळा करतांना त्याला कसरतच करावी लागली.
मुकुंदाला शिक्षण तर शिकायचंच होतं. व्यतिरीक्त त्याला आपल्या शाळेतील पोशाखासाठीही पैसे गोळा करायचे होते. ते गोवा करण्यासाठी तो फावल्या वेळात कचरा गोळा करु लागला. तो कचरा दुकानावर जावून विकू लागला. ज्यातून त्याला पैसे मिळत असे. ज्या पैशातून त्याचा शाळेचा खर्च भागत होता.
मुकुंद कचरा गोळा करुन विकायचा. तसा तो शाळेची वेळ झाली की घरी यायचा. दररोज तो शाळेला जायचा. नियमीत अभ्यास करायचा. शिक्षकांनी सांगीतलेला गृहपाठ करायचा.
मुकुंद आज शिक्षक बनला होता. आज तो भरपूर पुढे गेला होता व आपल्याच पायावर उभा राहिला होता. त्याला आज समाधान वाटत होतं. कारण कचरा गोळा करणं व तो विकणं ही त्याची रोजीरोटी होती नव्हे तर स्वाभीमान. ज्या स्वाभीमानानं आज त्याला शिक्षक बनवलं होतं.
मुकुंद शाळेत शिक्षक बनला. त्यालाही कधीकधी विद्यार्थ्यांचा राग येत असे. परंतु क्षणातच त्याचा तो राग मावळत असे. कारण त्याला त्याचे पुर्वीचे दिवस आठवायचे. त्यानंतर तो आपल्या विद्यार्थ्यांना चांगलंच शिकवायचा. त्यांचेवर मायाही करायचा.
एकदा मुकुंदानं पाहिलं की त्याच्याच शाळेतील एक विद्यार्थी भिक्षा मागत आहे. तो कशासाठी मागत होता. हे त्याला काही समजलं नाही. जो विद्यार्थी शाळेत नियमीत यायचा. हे त्याचं दुरुन पाहिलं होतं. तसे त्याला त्याच्या पुर्वाश्रमीचे दिवस आठवले. तसा तो त्या मुलाजवळ गेला. म्हणाला,
"बाळ, भीक कशाला माखतोस? असा कोणता प्रसंग आहे तुझ्यावर की तू भीक मागतोय? भीक मागणे बरोबर नाही बाळ?"
मुकुंद त्याला बोलला खरा. कारण त्याची परिस्थिती मुकुंदला माहीत नव्हती. तेव्हा तो मुलगाच म्हणाला,
"काय करु सर. माझ्या घरी माझे आईबाबा जीवंत नाहीत. ते कोरोनानं मरण पावलेत. मी आणि माझी एक मोठी बहीण आहे. जी जास्त मोठी नाही. तीच भीक मागून मला पोषते. म्हणते की चांगला शिक. खुप मोठा हो. आज तीच आजारी आहे बऱ्याच दिवसांपासून. म्हणूनच मीच मागतोय भीक आणि तिलाही पोषतोय आणि मिही खातोय त्या पैशातून. मी शाळेत आलेही नसतो. परंतु माझी बहीणच मला म्हणते की तू जर शाळेत गेला नाहीस, तर मी मरुन जाईल."
मुकुंदाच्या शाळेत असलेला तो मुलगा. आज तो मुलगा पाचवीत होता व तो मुलगा सत्य बोलताय होता. त्या मुलाने सत्य वदलं होतं. कारण कोरोनानं अशा बर्‍याच घरचे संसारचे संसार उध्वस्त केले होते. तसं त्या मुलाचं बोलणं पुर्ण होताच मुकुंद त्या मुलाच्या घरी गेला. त्यानं पाहिलं की त्याचं घर एक लहानसं झोपडी असून त्याची बहीण आतमध्ये तापाने फणफणत आहे. तिला कुठल्या तरी रोगानं छळलं आहे.
मुकुंदानं जसं त्या विद्यार्थ्याच्या बहिणीला पाहिलं. त्याला गतकाळातील त्याचे जीवन पुन्हा आठवायला लागले. अश्रू नकळतच डोळ्यातून झरु लागले. द्या ओसंडून वाहू लागली व तो त्या मुलीला म्हणाला,
"तुम्ही दोघंही माझ्या घरी चला. तुमच्या संपुर्ण जगण्याची जबाबदारी आजपासून माझ्यावर."
मुलीनं ते ऐकलं. त्यावर ती म्हणाली,
"सर, तुमचा विवाह झालाय?"
मुकुंदाला त्या मुलीनं तसा प्रश्न विचारला. तसा प्रश्न विचारताच मुकुंदला आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटलं की ती मुलगी असा कोणता विचित्र प्रश्न विचारत आहे. तसा काही वेळानंतर सत्य उत्तर देत तो म्हणाला,
"होय, का बरं?"
"सर, राग नका मानू. परंतु ती माझी एक शंकाच. शंकाच म्हणता येईल. मी यासाठी प्रश्न केलाय की मी एक मुलगी आहे. जर तुमचा विवाह झाला नाही असं जरी तुम्ही सांगीतलं असतं. तरीही मी आली नसती. अन् आता विवाह झाला असं जरी तुम्ही सांगीतलं, तरीही मी येणार नाही. कारण अलिकडील काळात फार मोठे हादसे होत आहेत. काही लोकं मुलींना छळत आहेत. ते वयही पाहात नाही. अहो शाळेतील शिक्षकही यात मागे राहिलेले नाहीत. त्यांचेपासून तर समाज सुधारण्याची अपेक्षा आहे. परंतु तेच रसातळाला जात आहेत. मात्र मी त्यातील नाही. म्हणूनच माफ करा."
ते त्या मुलीचं बोलणं. ती बोलून गेली मुकूंदाला ओबडधोबड. दुसरा जर व्यक्ती असता मुकुंदाच्या जागेवर तर त्याला अतिशय राग आला असता. परंतु मुकुंदाला राग आला नाही.
मुलगी बोलून गेली होती. त्याचं कारणही तसंच होतं. अलिकडील काळात तसेच हादसे होत होते व शाळेत जास्तच हादसे व्हायला लागले होते. मग ती मुलगी मुकुंदावर कशी विश्वास ठेवणार? प्रश्न होता.
ती मुलगी यावर्षी दहावी पास झाली होती. तिचीही शिकायची इच्छा होती. परंतु परिस्थितीतून तिचं शिक्षण सुटलं होतं नव्हे तर सोडावं लागलं होतं. मात्र ती आपल्या भावाला हिरीरीनं शिकवीत होती.
मुकुंद विचार करीत होता की ती मुलगी जे बोलली, त्यानुसार ती माझ्या घरी यायला तयार नाही. कारण तिचा माझ्यावर विश्वास नाही. अन् ती विश्वास ठेवणार तरी कशी? कारण आहे, अलिकडील काळ. परंतु ती या झोपडीत तरी सुरक्षीत राहू शकेल काय? इथे तर ती जरी मोठी असली तरी तिचा भाऊ तो लहान आहे. समजा एखाद्या नराधमाची कुदृष्टी जर हिला पाहून हिच्यावर पडली तर हिचं अख्खं जीवन उध्वस्त होईल. अन् हा लहान मुलगा त्याचं वय लहान असल्यानं तो तरी तिचं रक्षण करु शकेल काय? अशा एकट्या मुलीला सोडणं बरोबर नाही.
तो मुकुंदाचा विचार. त्यानं त्यानंतर बराच प्रयत्न केला. परंतु ती मुलगी काही ऐकली नाही. तिला तिथंच सुरक्षीत वाटत होतं. तसा तो म्हणाला,
"हे बघ, तू नाही ऐकत असशील तर ठीक आहे. तुला जिथून राहायचं तिथंच राहा. परंतु आजपासून तुम्ही दोघंही माझी मुलंच आहात. तुमचे आईबाबा जरी कोरोनात गेले असतील. तरी तुम्ही यानंतर मलाच आईबाबा समजा. आता तुम्हाला भीक मागायची काही गरज नाही. तुमच्या शिक्षणाची आणि सर्व प्रकारची जबाबदारी माझी. तेवढं तरी स्विकार कर. मी आजपासून तुम्हाला दत्तक घेत आहे."
ते मुकुंदाचं बोलणं. त्यावर ती मुलगी थोडीशी अवाक झाली. सुरुवातीला तिनं काही प्रमाणात आढेवेढे घेतले. नंतर ती तयार झाली. ती म्हणाली,
"ठीक आहे सर."
त्या मुलीचं नाव सायली होतं. सायलीनं दिलेला होकार. त्यानंतर मुकुंदानं तिला दत्तक घेत तिला केलेली वेळोवेळची मदत तिचं जीवन बनविणारं ठरलं. आज ती अंतराळ संशोधन केंद्रात मोठ्या पदावर लागली होती. तसं पाहिल्यास ज्यावेळेस सायली आपल्या पायावर उभी झाली होती. त्यानंतर तिनं मुकुंदाची मदत घेणं टाकलं होतं. म्हणाली होती की सर, आता मी माझ्या पायावर उभी झाली आहे व आता मी माझ्या भावाला शिकविण्यास सक्षम आहे. तेव्हा तिनं मुकुंदाचे आभारच मानले होते. तेव्हा तर त्याला धन्यधन्य वाटलं होतं. परंतु त्यापेक्षाही आनंद त्याला तेव्हा झाला होता. जेव्हा शालेय प्रशासनानं तो शाळेत देण देत नाही म्हणून त्याचं वेतन बंद केलं होतं. त्याची परिस्थिती विपरीत होती. त्याच काळात त्यानं दत्तक घेतलेला तो मुलगा त्याच्थाच शाळेत बारावीतून मेरीटनं पास झाला होता व त्याचा मुकुंद शिकवीत असलेल्या शाळेत सत्कार होत होता. तेव्हा तो मुलगा मनोगतात म्हणाला होता की त्याचं जीवन बदलून टाकणारे मुकुंद सर होय की जे ग्रेट आहेत. मुकुंद सरमुळंच त्याला मेरीट येता आलं. त्यावर अख्खं शालेय प्रशासन अवाक् झालं होतं. एक तर मॅडम म्हणाली होती मूकुंदाला की सर, मी त्याला चवथीपर्यंत शिकविलं तरी त्यानं माझं नाव मनोगतात घेतलं नाही आणि तुमचंच कसं काय नाव घेतलं असावं मनोगतात. परंतु जे मुकुंदानं त्या मुलासाठी केलं होतं. त्याची कल्पना त्या शिक्षिकेला नव्हती. ना शालेय प्रशासनालाही.
तो मुलगा शिकत गेला. ज्ञानाची एक एक सिडी चढत गेला होता तो. अज्ञानाचे एकेक अडथडे पार करीत करीत संकटं शोषून शिकत गेला होता तो. तो आज एक मोठा अधिकारी बनला होता. जर त्याला मुकुंदसारखे शिक्षक मिळाले नसते तर कदाचीत चित्र वेगळेच राहिले असते.
आज सायली आणि मुकुंदाचं पारीवारीक नातं निर्माण झालं होतं. सायली मुकुंदाच्या घरी येत असे दर दिवाळीला. मुकुंद जात असे सायलीच्या घरी. दोन दोन महिने राहात असे व अगदी कृतार्थ होवून येत असे. त्याचं कारण होतं त्याची मानसिकता. त्यानं सायलीच्या घरी जावून तिच्या मजबुरीचा गैरफायदा न घेता तिला दत्तक घेतलं होतं. तसंच शाळेतही असतांना मुलामुलींशी व्यवहार करतांना मुलींचाही गैरफायदा न घेत चांगलेच धडे दिले होते. जणू आपलीच स्वतःची मुलं असल्यागत. म्हणूनच मुलं घडली होती व प्रत्येक मुकुंदचा विद्यार्थी आपल्या मनोगतात त्याचाच उदोउदो करायची निस्वार्थ भावनेनं.
मुकुंदसारखे असे बरेच शिक्षक होते की जे आपल्या विद्यार्थ्यांनी पुढं जावं म्हणून प्रयत्न करीत होते. ते पुरस्कारासाठी हपापले नव्हते ना ही त्यांना पुरस्कार हवा होता ना ही त्यांना पुरस्कार मिळत होते. ते पुरस्कारासाठी अर्ज करीत नव्हते. त्यांना वाटत होतं की शासनानं प्रस्ताव मागविण्याऐवजी होतकरु शिक्षकांचा शोध घेवून त्यांना पुरस्कार द्यावा. कारण बरेच शिक्षक तसे प्रस्तावच पाठवत नव्हते आणि जे कोणतेच कर्म करीत नव्हते. ते पुरस्कारासाठी हपापल्यागत आवर्जून प्रस्ताव पाठवीत होते व पुरस्कार मिळवीत होते. मात्र मुकुंदासारख्या इतरही शिक्षकांचा पुरस्कार तोच होता. जो विद्यार्थी आपल्या मनोगतात चार लोकांसमोर त्या शिक्षकांचं नाव घेत असेल आणि म्हणत असेल की मी अमुक अमुक शिक्षकांमुळं घडलोय. तोच पुरस्कार मोठा आणि महत्वाचा होता, मुकुंदसारख्या इतरही शिक्षकांसाठी. तोच पुरस्कार भारतरत्न पुरस्कारापेक्षाही मोठा होता.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०