ते पाळणाघर Ankush Shingade द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ते पाळणाघर

ते पाळणाघर
गुरुदासपूर नावाचं ते गाव होतं. त्या शाळेला एक शिक्षक शिकवीत होते. ज्यांचं नाव होतं मकरंद.
मकरंद नुकताच त्या शाळेत रुजू झाला होता. त्यानं पाहिलं की त्या शाळेत दोनचारच मुलं आहेत. जे शिकण्याची आस ठेवतात. बाकीची मुलं ही शाळेत येत नाही. ती का,येत नाही. याचा थांगपत्ता त्याला नव्हता. तसा तो रुजू होताच त्या शाळेत जे दोन तीन जणं आले होते. त्यांना कारणं विचारलीत. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की ते शेतावर जातात आपल्या आईवडीलांबरोबर. काही जणांनी सांगीतलं की ते आपल्या लहान भावा बहिणीला सांभाळायला घरी राहतात. काहींनी सांगीतलं की शाळा कंटाळवाणी वाटते म्हणून ते घरी राहतात.
ती त्या मुलांची उत्तरं. प्रश्न मोठा गंभीर होता. कारण त्याआधी शाळेत एक शिक्षक अस्तित्वात होते. त्यांनाच सोबती म्हणून मकरंदची नियुक्ती त्या शाळेवर झाली होती. ज्या शाळेत आता दोन शिक्षक व तीनच मुलं अशी शाळेची गत होती. तसं पाहिल्यास त्या शाळेतील शिक्षकांच्या वेतनावर सरकारचा बराचसा पैसा खर्च होत असे.
मकरंदनं पाहिलं की आमचा पगार भरपूर आहे. त्यामानानं शिक्षणासाठी मुलं नाहीत. तसं पाहताच त्यानं विचार केला. आपण विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवायची. मग त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल.
मकरंदनं तसा विचार करुन तो कारणांचा शोध घेवू लागला. अल्पावधीतच त्यानं कारणं शोधली व सर्वात आधी त्यानं शाळेत पाळणाघराची निर्मीती केली. त्यासाठी स्वतःला मिळणाऱ्या वेतनातून खिशाला कात्री लावत पैसा खर्च केला. ज्यातून फक्त दोन महिला शाळेत आल्या. त्यातील एक महिला म्हणाली,
"गुरुजी, आपण आमच्या लेकराले सांभाळान काजी?"
"होय, आमची नियुक्ती आपली सेवाच करण्यासाठी आहे. आम्ही आपली लेकरं सांभाळू. ठेवून देत चला अगदी निश्चींत होवून."
"हो जी. कारण आम्ही आमच्या लेकराले शेतात नेतो तं तेथंबी वाघा, सिंहासारख्या प्राण्याईचीबी भीती असते."
"मी सांभाळीन तुमच्या मुलांना." मकरंदनं आश्वासन दिलं.
मकरंदनं केवळ आश्वासनच दिलं नाही तर त्यानं त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक मुलाची काळजी घेतली. तसं करतांना त्याला फारच त्रास होत असे. परंतु त्याची तमा त्यानं बाळगली नाही. कधीकधी त्याला वैषम्यता वाटायची की आपण एवढे शिकलेलो आणि ही लहानशी मुलं सांभाळायची. परंतु त्याची त्यानं काळजी केली नाही. फक्त तो आपले कार्य करीत होता.
आज त्याच्या पाळणाघराची किर्ती फारच वाढली होती. तसं त्या पाळणाघरात बरीचशी मुलं होती. त्याचबरोबर त्या पाळणाघरात असणाऱ्या मुलांची भावंडंही. ज्यानं वर्गातील पटसंख्या वाढली होती. मकरंद त्या पाळणाघरातील मुलांसह इतरही शाळेतील मुलांची काळजी घेवू लागला होता.
आज गुरुदासपूरची शाळा नावाजत होती त्या पाळणाघरानं. तशी लोकांना ती शाळा आवडत असे. त्यातच आता तो शाळेत काही उद्बोधन वर्गही आयोजीत करायचा. ज्यातून तो कुटुंबनियोजन मुद्दा मांडायचा. शिवाय इतरही काही दैनिक प्रश्न. शिक्षण किती आणि कसं चांगलं आहे हेही समजावून सांगायचा तो.
मकरंदच्या शाळेची पटसंख्या साहजीकच वाढली होती पाळणाघराचा उपक्रम राबवून. ज्यात त्याला फार त्रास झाला होता. परंतु त्यात यशही तेवढंच मिळालं होतं. आता शेतकरी वा शेतमजूरांची मुलं या पाळणाघरात यायची. सोबतच ती थोडी मोठी झाली की शाळेत यायला लागायची. त्यातच मकरंदच्याही मनात त्या मुलांबाबत प्रेम निर्माण झाले होते व त्याचा आज प्रत्येक दिवस आनंदात जात होता. अशातच शासनानं त्याची बदली केली.
आज त्याची बदली झाली होती. तशी ती गोष्ट गावकऱ्यांना माहीत झाली. तेव्हा गावकऱ्यांनी त्याची बदली थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती थांबली नाही. तसा निरोपाचा दिवस उजळला.
मकरंदचा निरोप समारंभ अख्ख्या गावानं आयोजीत केला. ज्यातून तो निरोप घेवून जावू लागला होता आणि ते गाव रडू लागलं होतं. असं वाटत होतं की कोणीतरी आपल्याला परकं करुन जात आहे. दूर आणि कितीतरी दूर. पुन्हा कधीच परत न येण्यासाठी.
गावाला वाटत होतं की मकरंदनं जे ऋणानुबंध निर्माण केले होते. त्याच ऋणानुबंधानं गाव रडत होतं. मकरंदसारखे शिक्षक जर प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाले वा गावाला वा देशाला मिळाले तर नक्कीच गावंची गावं सुधारतील. शहरची शहरं सुधरतील नव्हे तर देशही सुधारेल. तसं पाहिल्यास ते खरंच होतं. कारण मकरंदनं त्या जंगलातील आदिवासी गावात पाळणाघराचा एक अभिनव प्रयोग करुन क्रांती केली होती. त्यानं शाळेची पटसंख्या तीन वरुन कितीतरी पुढं नेवून ठेवली होती. ज्यानं त्या जंगलातील आदिवासी शाळा भरभराटीस आली होती. जंगलात असूनही ती शाळा नावारुपाला आली होती.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०