संगीत करमणुकीचं साधन. पण? Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संगीत करमणुकीचं साधन. पण?

संगीत करमणूकीचं महत्वपुर्ण साधन, पण?

           संगीत हे करमणुकीचं साधन आहे. संगीत जर जीवनात नसेल तर घोळ निर्माण होवू शकतो. संगीत नसेल तर संपुर्ण आयुष्य कंटाळवाणं जात असते. आयुष्यात निरसता व मलिनता येत असते. त्यामुळंच जीवनात संगीत महत्वपुर्ण बाब आहे.
        पुर्वी जेव्हा माणसं माकडरुपात होती. तेव्हाही संगीत उपलब्धच होतं. ते माकड प्राणी विशिष्ट असा आवाज करुन आनंद मिळवत असत. त्याचं कारण होतं. त्यांना वाटणारी भीती. ज्यावेळेस त्यांना भीती वाटायची. त्यावेळेस ते विशिष्ट असा आवाज काढत असत. त्याला ध्वनी अर्थात स्वर म्हणून नाव मिळालं. ते त्या प्राण्यांसाठी एक प्रकारचं संगीतच होतं. पुढं त्यात तालबद्धता आली. वादन आलं व गायनही आलं. त्याच गोष्टीचा विकास होवून त्यात पुढीलकाळात नृत्याचाही समावेश झाला. याचाच अर्थ असा की नादयुक्त गायन, वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हटलं गेलं. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
         संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला चांगले मानसिक स्वास्थ प्रदान करते. संगीत या शब्दाचा अर्थ विग्रह करुन सांगीतल्यास सं म्हणजे स्वर, गी म्हणजे गीत आणि त म्हणजे ताल होय. तसंच संगीत कला ही सर्व कलामध्ये मोठी कला आहे. 
         संगीतचे फायदेही भरपूर आहेत. अलिकडे प्रयोगांती सिद्ध झाले आहे की झाडांना जर चांगलं संगीत ऐकवलं गेलं तर पिकांची जोमानं वाढ होते. निव्वळ वाढच होत नसून पीकेही जोरदार येत असतात. याचाच अर्थ असा की संगीताद्वारे आपलेच नाही तर झाडांचेही आरोग्य चांगले राहते. 
         संगीतमधून आपण आपल्या भावना व्यक्त करु शकतो. जेव्हा संगीतातील शब्द आपल्याला समजतो, तेव्हा आपण आनंदीत होतो. जर ते संगीत आनंदीपणाचं वाजत असेल तर. अन् जेव्हा आपण दुखात असतो, तेव्हा त्या संगीतातल्या शब्दाचा अर्थ समजतो. जेव्हा ते संगीत दुःखाचे असेल तर. यावरुन संगीताचे कितीही अर्थ असले तरी दोन सर्वसाधारण अर्थ काढता येतात. ते म्हणजे दुःखाच्या प्रसंगी सादर होणारे संगीत व आनंदाच्या समयी सादर होणारे संगीत. 
        संगीत हे ईश्वराने दिलेली एक देणगीच आहे. आपल्या मनातील भावना ह्या कदाचीत संगीतानेच व्यक्त होऊ शकतात. संगीताने आयुष्याला प्रेरणा मिळत असते. एकांतात स्वतःचं करमणूक करण्याचं महत्वपुर्ण साधन म्हणजे संगीत होय. संगीत ही माणसाची ओळख निर्माण करुन देते. म्हणजेच माणसाची ओळख निर्माण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत होय.
          म्हटलं जातं की संगीतकलेचा सामवेदात समावेश आहे. त्या वेदात संगीताचे महत्व वर्णित आहे. हे बरोबर असलं तरी मुळात संगीत कसं निर्माण झालं असेल, याबाबत अजुनही संभ्रम आणि गुढताच आहे. तसं पाहिल्यास माकड रुपात जेव्हा माणूस होता, तेव्हा तो झाडावरच राहायचा व झाडावर असतांना एखादा प्राणी त्याला जमीनीवर दिसल्यास तो आवाज करायचा. हेच त्याचं संगीत होतं. पुढं हाच माकड जमीनीवर आला व तो माणसाच्या रुपात वावरु लागला. त्यावेळेसही त्याला त्या भीतीदायक प्राण्यांनी सोडलं नाही. त्यावेळेस त्याला भीती वाटायची व तो त्या प्राण्यांना पळविण्यासाठी आता आवाज करीत नसे, तर तो काहीतरी वाजवायचा. यातूनच संगीतात वादनाचा जन्म झाला. जमीनीवर आलेल्या माणसानं सुरुवातीला असे प्राणी दिसताच दगडावर दगड आपटले. हेच त्याचं वाद्य. त्यानंतर त्यानं त्या वाद्यात संशोधन केलं. वाद्याचा विकासही केला. अर्थात झाडाच्या बासऱ्या, हाडाच्या बासऱ्या, पानाच्या सिट्या तयार केल्या व ते तो वाजवू लागला. तसे या बासऱ्यातून विशिष्ट प्रकारचे आवाज निघायचे. ज्यातून न ऐकलेले ते वेगळेच आवाज हिंस्र प्राण्यांनी ऐकले की मग ते पळून जायचे. त्यानंतर या बासऱ्यांचाही विकास केला व त्या बासऱ्या प्रगत होत जावून त्यात आज दिसतो तसा हळूहळू बदल झाला. हा झाला बासरी वादनाचा इतिहास. चर्मवाद्याचंही तसंच आहे. माणसानं जशी बासरी बनवली. तसंच चर्मवाद्यही. माणसानं सुरुवातीला चामड्याचा वापर केला. त्यावेळेस काठीवर सुकत असलेलं चामडं पाहिलं. ते हवेनं हालायचं व त्यात चामड्याचे घर्षण व्हायचे व हलकासा आवाज यायचा. त्यानंतर त्यानं ते चामडं खाली काढून त्याला काठीनं वाजवून पाहिलं. त्याला त्यातून वेगळाच आवाज ऐकायला मिळाला. तेच पहिलं चर्मवाद्य. त्यात तद्नंतर बराच बदल झाला व त्या चर्मवाद्याचे बरेच प्रकार अस्तित्वात आलेत. आज त्या प्रकारात ढोलक, डफली, डमरु, पेटी, तबला, ढोल, खंजीरी, ड्रम असे बरेच प्रकार अस्तित्त्वात आहेत. 
          स्वराबाबत सांगायचं झाल्यास आधी प्राण्यांची जी भीती वाटायची व त्या प्राण्यांना पळविण्यासाठी भीतीतून जो प्राण्यांनी आवाज काढणे सुरु केले होते. त्यातून स्वर जन्मास आला. पुढं त्यातही संशोधन झालं व त्या स्वराला गती मिळाली. अशी गती देण्यासाठी, ती गती कोणाला द्यावी याचा विचार झाला व शब्द अस्तित्वात आले. ते शब्द म्हणजेच कविता होय. सुरुवातीला कविता ह्या गद्यातच असायच्या. त्या कवितांचे शब्द हे अलंकारीक नव्हतेच. त्यात यमक, रुपक, इत्यादी अलंकार वापरलेले नसायचे. त्यात नंतर संशोधन झालं व त्यामध्ये अलंकारीक शब्द शिरवले गेले. आज त्याच कवितेत अनेक प्रकार आलेले असून गजल, अष्टाक्षरी, षडोक्षरी असे अनेक प्रकार आले आहेत. नृत्याबाबत सांगायचं झाल्यास पुर्वी ज्या स्वरानं गाणं निर्माण झालं. त्यात वाद्य शिरवली गेली व त्यातच त्या माणसानं आपले हातपाय हालविण्यास सुरुवात केली. ते त्यावेळचं पहिलं नृत्य. आज नृत्यातही बरेच प्रकार आले आहेत.
         महत्वाचं सांगायचं झाल्यास कालच्या घडीला ज्या संगीताचा जन्म झाला. त्यात स्वर, वाद्य, शब्द व नृत्य यांचा समावेश होता व तो स्वर, ते वाद्य, ते शब्द व ते नृत्य अतिशय चांगले असायचे. त्यात बिभत्सपणा नसायचाच. त्या लोकांनी संगीताला विशेष स्थान दिलं होतं. परंतु आताच्या काळात संगीतात हे बिभत्सपणा शिरला आहे. ज्यातून आज शब्द वेडेवाकडे लिहिले जात आहेत. नृत्यही अगदी अंगप्रदर्शन करुन अर्थात तोकडे कपडे घालून केले जात आहेत. वाद्यही व्यवस्थीत वाजवले जात नाहीत. अन् स्वरही ऐकावासा वाटत नाही असाच ऐकावा लागत आहे. एकदंरीत सांगायचं झाल्यास काल मनोरंजन व भीती नष्ट करण्यासाठी निर्माण झालेलं संगीत, आज तेच संगीत ऐकतांना मनोरंजन व भीती पळविणे यासाठी वापरलं जात नाही. तर त्यातून लोकांना त्रास कसा होईल यासाठी वापरलं जात आहे. आजच्या संगीताचा आवाज कितीतरी प्रमाणात कानाला कानठिळ्या बसाव्यात असा आहे. शिवाय स्थळ काय वेळ अशीही पद्धत आज पाळली जात नाही. गणेशोत्सवात बिभत्स गाणी लावली जात आहेत. भक्तीगीतं दूर गेली आहेत कितीतरी. त्यातच गणपतीजवळ अंगप्रदर्शनाचे नृत्य सादर होतात. ज्यातून ते हिंस्र प्राणी दूर पळालेत आणि आपलेच मानवप्राणी आपले लचके तोडायला लागलेत. जे प्राणी असल्या आपल्या तोकड्या कपड्यातून उत्सवप्रसंगी नृत्य केल्यानं आपल्यावर मोहीत होतात व आपल्यावरच बलात्कार करतात. हे वास्तविक चित्र आहे. ज्याची कल्पनाही करता येत नाही.
         विशेष म्हणजे कशाला हवं असं संगीत की ज्यातून आपलाच जीव जाईल? कशाला करायला हवं असलं नृत्य की ज्यातून आपल्यावरच बलात्कार होईल. अन् कशाला हवा तो मोठा संगीताचा आवाज की ज्यातून म्हाताऱ्या आपल्याच मातापित्यांना ह्रृदयाचा झटका येईल व ते मरण पावतील? परंतु ही शोकांतिकाच आहे व आपल्याला त्रास देण्याचा खेळ आहे. अर्थातच असलं संगीत बंदच व्हायला हवं. 
         महत्वपुर्ण बाब ही की काल ज्या दृष्टीकोनातून संगीत निर्माण झालं. त्या दृष्टीकोनातून संगीताला जपायला हवं. त्याचा वापर चांगल्यापद्धतीनं करायला हवा. जेणेकरुन संगीताचे महत्व वाढेल व संगीत सर्वांना हवेहवेसे वाटेल हे तेवढंच खरं.

               अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०