स्री वंशवाढीची देवी Ankush Shingade द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्री वंशवाढीची देवी

*स्री वंशवाढीची देवी ; पुजा स्रीचीच, तरीही दुय्यम दर्जा*

         *आज आपल्याला दिसतंय की एक स्री आपल्या गर्भात बाळाला ठेवते. त्याच्या जन्मापुर्वी अनन्वीत यातना गर्भाशयात सहन करते व ती बाळाला जन्म देते. त्याच्या जन्मानंतरही त्याचं संगोपन करीत असतांना ती स्रीच त्रास सहन करते. मग ते लहान मुल स्रीगर्भ असो की पुरुष गर्भ. ती त्याचेबद्दल कधीच भेदभाव करीत नाही. मात्र तो पुरुषगर्भ जन्मानंतर मोठा झाला की तिच्यासोबत भेदभाव करतो. तो एकीकडे तिला देवी संबोधून तिची पुजा करतो आणि दुसरीकडे तिचा उपभोग्य वस्तू समजून तिचा वापर करतो. त्यातच बलात्कार. अन् तिला मुलं पैदा करण्याची मशीन समजणे. शिवाय तिच्यापासून होणाऱ्या अपत्यांना मेहनत न करता आयत्या बिळातील नागोब्यासारखा आपलंच आडनाव देतो. खरं तर ती स्री वंशवाढीची देवी असल्यानं तिच्याच माहेरचं आडनाव तिच्यापासून होणाऱ्या अपत्यांना मिळायला हवं. परंतु.......*
         वंश. वंशाची सुरुवातच स्रिपासून होते व खरा वंश स्रीच चालवते, अनादीकाळापासून तर आजतागायत अन् आजही. तरीही तिच्या भाग्यात आज दुय्यमपणाच लिहिलेला आहे. काहीजण तिला उपभोग्य वस्तू मानून तिच्यावर बलात्कार करीत असतात तर काहीजण तिला मुलं पैदा करण्याची मशीन समजून तिच्या उदरातून तिला त्रास होत असतांनाही पाहिजे तेवढी मुलं निर्माण करुन घेतात अन् तिही जीव धोक्यात घालून आपल्या उदरात मुल ठेवते. ती जेव्हा बाळाला जन्म देते, तेव्हा त्यावेळेस बऱ्याचशा स्रिया दगावतातही. परंतु त्या दगावल्या तरी त्यांनी जन्माला घातलेला बाळ तिचं नाही तर त्याचा वंश चालवत असते. हे आडनावावरुन लक्षात येतं. 
          खरा वंश स्रीच चालवते असे म्हटल्यावर आतिशयोक्ती होणार नाही. कारण कालच्याही स्रिया बाळांना आपल्या पोटात ठेवत असत. तेही तब्बल नऊ महिने. पोटात होणाऱ्या अतिशय वेदना गिळंकृत करुन. त्या काळात स्रियांना अतिशय त्रास होत असायचा. 
         बाळ गर्भात राहण्याचा काळ हा अतिशय नाजूक काळ असून त्या काळात स्रिला पुरेसं जेवन धकत नाही. चक्कं त्या काळात त्या उपाशीच असतात. जेही काही त्या काळात त्या खातात. ते पचत नाही व ताबडतोब ओकारी होते. त्यानंतर थोडासा काळ गेलाच तर कधीकधी पोटात दुखणं खुपणं दिसून येतं. त्यानंतर बाळाच्या विकसनाच्या काळात बाळ तिला चक्कं रात्रभर झोपूच देत नाही. ते चक्कं तिच्या गर्भाशयात पाय मारत असतं. कधीकधी ओटीपोटीला एवढी खाज सुटते की तिला चांगलं खाजवावंसं वाटतं. तरीही ती खाजवत नाही. कारण तिला वाटत असतं की मी त्या भागात खाजवल्यानं गर्भाशयातील बाळाला धक्का लागून बाळाचा एखादा अवयव निकामी होईल तर कधी त्या बाळाच्या गर्भाशय क्रिडेनं पोटात गुदगुल्याही होतात. त्यातच एखाद्या स्रिला बाळ व्हायच्या पुर्वी काही काळ पोटात असह्य असं दुखत असतं, वेदना होत असतात. त्यातच बाळ जेव्हा गर्भाशयात असतं, तेव्हा त्या स्रिया पालथं वा उताणं झोपता येणं शक्य होत नाही. तिला एका कडवरच झोपावं लागतं. 
          बाळ जन्माच्या शेवटच्या काळात म्हणजे प्रसुतीच्या काळात स्रियांच्या पोटात तीव्र दुखत असतं. वाटत असतं की असे बाळ कधीच जन्माला घालू नयेत. कारण त्या वेदना त्याही काळात सहन होत नाही. तसा तो नवा जन्मच असतो. त्यातच त्या स्रिचं सीझर झालं तर तिला सहा महिने त्रासच असतो. कारण तिची बाळ गर्भातून बाहेर काढतांना पोटावर झालेली जखम सारखी दुखत असते सहा महिनेपर्यंत. अन् तीच जखम साधली नाही वा शिवण्यात बरोबर आली नाही तर मग तिला त्या जखमेचा जीवनभरच त्रासच होत असतो. 
         बाळ झाल्यानंतरही स्रिला त्रासच असतो. ते बाळ लहान असतांना दिवसभर झोपतं अन् रात्रभर जागं असतं. ते बाळ कधी झोपेल व कधी जागं असेल हे काही सांगता येत नाही. शिवाय त्याच काळात स्रियांना घरची कामंही असतात. ती कामं व ते बाळ सांभाळतांना व त्यातच झोप सांभाळतांना स्रिला नाकीनव येतं. त्याच काळात माणूस दिवसभर कामाला जात असतो. तो घरी आल्यावर त्या स्रिला कामात मदत करत नाही. काही अपवादही असतात. तो कामावरुन आला की झोपतो. कारण तो फारच थकून आल्याचा आव आणत असतो. अशा काळात अशा स्रियांना आपली झोप मोडूनच घरासाठी काम करावं लागतं. लेकरं पैदा करावी लागतात. त्यानंतर नामकरण केलं जातं व नामकरणात त्या बाळाला नाव मिळतं व त्याच्यासमोर नाव लागतं, अमूक अमूक वंशाचा वारस. बिळातील आयत्या नागोबासारखा काही न करता तिचा पतीदेव तिच्या लेकराला तिचं नाव न देता आपलं नाव देत असतो. 
            ही पुरुषप्रधान संस्कृती. सगळं स्रियांनी करावं. बाळ जन्माला घालतांना तिनंच मेहनत करावी. गर्भातील अनन्वीत यातना भोगाव्यात. अन् पुरुषांनी काहीही न करता त्या बाळाला चक्कं नाव द्यावं. स्रियांनी मुलं पैदा करण्याच्या मशीनीगत पाच सहा व त्यावरही मुलं जन्माला घालावी. त्यासाठी मरण पत्करावं व पुरुषांनी मजा मारावी. माझा मुलगा म्हणून समाजात मिरवावं. पुढं मुलगी असेल आणि ती सासरला गेल्यावर तिचं काही चुकल्यास दोष देतांना तिच्या आईचाच उद्धार व्हावा असं आपलं वागणं. ह्या सर्व गोष्टी त्या स्रिचा दुय्यमपणा दर्शवितात. आज स्रिला पुजलं जात आहे. कुठं दुर्गा म्हणून तर कुठं काली म्हणून, कधी कुठं तिला लक्ष्मी तर कुठं तिला सरस्वती म्हणूनही पुजलं जातं. त्यातच तिला सर्वशक्तीमान मानलं जातं तर दुसरीकडं तिची हेळसांड केली जाते. तिला अपमानीत केले जाते. बलात्कार तर रोजचेच सुरु असतात. 
          कालही तिच्यावर अत्याचार होतच होते. कधी तिला सती म्हणून रोजच जाळत असत. कधी प्रथांच्या अनुषंगानं, नगरवधू म्हणून तिला तिला अपमानीत केलं जात असे. तसंच तिच्यावर नगरवधू व देवदासी म्हणून रोजच बलात्कार केला जात असे. तिच्यासाठी कन्यावध, गंगाप्रवाह ह्या प्रथा काही नवीन नव्हत्या. कालचा समाजही तिला कधी सीता, पार्वती, सरस्वती लक्ष्मी आणि वेगवेगळ्या देवीच्या नावानं पुजत होता आणि आजही तो त्याच नावानं पुजतो. तशीच तीच स्री आपल्या वंशाच्या दिव्याला जन्म देते. त्यासाठी कितीतरी वेदना सहन करते. असे असतांना आपण तिला दुय्यम दर्जा का द्यावा? तिचा आज फक्त वंशवाढीसाठी वापर का करावा? समाजसुधारणा झालेली असतांना आजही तिच्यावर अत्याचार का करावा? शिवाय जी स्री आपला वंश वाढावा म्हणून जोखीम पत्करुन बाळाला जन्माला घालते. त्या स्रीपासून होणाऱ्या संततीला पुरुषांनी काही न करता आपलेच नाव का द्यावे? तिच्या माहेरचे आडनाव ती जन्माला घालायची मेहनत करीत असल्यानं व अतिशय वेदना सहन करीत असल्यानं का देवू नये? ह्या सर्व गोष्टी अनाकलनीय आहेत. विशेषता ही की काल आणि आजही जो समाज तिला एक देवी म्हणून पुजतो. सर्वशक्तीमान समजतो. तिला देवीचा दर्जा देतो. तिचा वंशवाढीसाठी विचार करतो. तरीही तिला दुय्यम दर्जा? ह्या सर्व गोष्टी निदान आजच्या काळात तरी बऱ्या नाहीत. त्या गोष्टी तिच्यासोबत आजतरी करु नये. खरा विचार केल्यास तीच वेदना पत्करुन बाळाला जन्म देत असल्यानं व त्यावरुन तीच वंशवाढीची देवी ठरत असल्यानं आजच्या पुरुषसत्ताक संस्कृतीत तिच्याच माहेरचं आडनाव तिच्यापासून होणाऱ्या अपत्याला द्यावं. जेणेकरुन तिचा यथोचित सन्मान होईल व तिला खऱ्या देवीचं स्वरुप प्राप्त होईल यात शंका नाही. तसं जर आजची पुरुषप्रधान संस्कृती करीत नसेल तर त्याच पुरुषप्रधान आजच्या संस्कृतीला आजच्या काळात कोणत्याही स्वरुपाची देवी म्हणून पुजण्याचा अधिकार नाही. तो दुतोंडीपणाच दिसतो. हे तेवढंच खरं. 

            अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०