संविधान आहे म्हणून ठीक आहे Ankush Shingade द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संविधान आहे म्हणून ठीक आहे

संविधान आहे म्हणून ठीक आहे

           *बदलापूर बलात्कार कांडातील आरोपी अक्षय शिंदे. असाच की ज्यानं पोलिसांची बंधूक हिसकावून घेतली व ज्यात त्यानं पोलिसांवर बंधूक रोखली. ते पाहून पोलिसांनी प्रसंगावधान साधून त्याला इनकॉऊंटरमध्ये मारलं. तो मारला गेला. परंतु त्या घटनेनं संबंधीत बदलापूरच्या बलात्कार घटनेतील आरोपींना अभय मिळणार? ही शक्यता नाकारता येत नाही. शिवाय पोलिसांच्याही कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्हंच उभं राहिले त्या प्रकरणानं. जणू हेही प्रकरण सिद्ध करते की आज संविधान आहे. पण संविधानाला आम्ही मानत नाही. घाबरत नाही. कालचा बलात्कार याचंच उदाहरण आणि आजचं इन्कॉऊंटर याचंच उदाहरण. या प्रकरणाने जणू संविधान असण्यावर प्रश्नचिन्हंच निर्माण झाले असल्याचे दिसत आहे.*
          काल भयंकर विटाळ होता. विटाळाच्या कालचक्रात कित्येक बळी गेले होते. कोणाचा विहिरीला हात लावण्यावरुन तर कोणाचा मंदिरप्रवेशावरुन, कोणाचे गावात प्रवेश केला यावरुन तर कोणाचे आणखी इतर कारणाने. कारण मनुस्मृती नावाच्या विषारी विचार लिहिलेल्या ग्रंथातील नियमानं समाज वागत होता नव्हे तर तो त्याच ग्रंथातील नियमानुसार समाजाला वागवत होता. 
         मनुस्मृतीच्या ग्रंथात असे दळभद्री बरेच विचार लिहिलेले होते की ज्यानं अस्पृश्यांची आणि स्रियांचं थोडंसंही काही चुकलं तर त्यांची हत्या करता येईल. शिवाय त्यात असेही काही नियम होते की ज्यानं शुद्र आणि स्रिया स्वतःच मरण पावतील. सतीप्रथा आणि इतर तत्सम प्रथा ह्या शुद्रातिशुद्रांना व स्रियांना बाधक असून काही न करता आपल्या अंगावरील खाज मिटविणाऱ्या होत्या. शिवाय हे चक्र केवळ दोनचार वर्षापासून चालत आलेलं नव्हतं तर ते चक्र युगानुयुगे चालत आलेलं होतं. 
         आज जात सुधारली. कारण आज संविधान बनलं. संविधान बाबासाहेबांनी बनवलं. त्यात अशा अशा कलमा टाकल्या की इंग्रजांनी केलेल्या समाजसुधारणा टिकून राहतील. त्यालाही काही नेत्यांचा विरोध होताच. परंतु स्वतंत्र्य झालेल्या भारतात केवळ एकदोन नेत्यांचीच चलती नव्हती. संविधानसभेत इतरही बरेच नेते होते की जे सुधारणेच्या बाजूनं होते. त्यातच संसदेत जेव्हा भाषणं व्हायची. त्यात आवर्जून सुधारणेवर चांगल्या व वाईट प्रकारचं भाष्य व्हायचं. परंतु बाबासाहेब समजावून सांगायचे, ती सुधारणा किती प्रमाणात चांगली आहे व किती प्रमाणात योग्य आहे. ती सुधारणा केली नाही तर काय होवू शकते. मग त्या सुधारणेवर इतरही लोकं विश्वास करायचे व सुधारणाच्या कलमा तयार होवून संविधान बनलं. 
          संविधान निर्मिती जेव्हा सुरु होती. तेव्हा बाबासाहेब एखादा मुद्दा घरी लिहून घेत. जो मुद्दा समस्येचा मुद्दा असायचा. त्याबाबतीत ती समस्या कशी व त्यावर उपायही लिहून घेत. त्यानंतर तोच मुद्दा आपल्या पत्नीला सांगत. त्यावर घरी चर्चाही व्हायची. ज्यातून आपल्या पत्नीचंही योग्य मत विचारात घेवून बाबासाहेब जेव्हा दुसर्‍या दिवशी संसदेत जात. तेव्हा तोच मुद्दा पर्यायानं संसदेत चर्चेसाठी मांडत. त्यावर दिवसभर चर्चा व्हायच्या. शेवटी निर्णय निघायचा की बाबासाहेब जे म्हणतात. ते अगदी योग्य असून ह्या मुद्द्याचा समावेश संविधानात करायला हवा. तो मुद्दा संविधानाच्या कलमात दाखल होत असे. परंतु लागलीच ज्या मुद्द्यावर संसदेत चर्चा व्हायची व लोकलाजेस्तव तो मुद्दा जरी संविधानात घेतल्या गेला तरी त्यावर गुप्त स्वरुपाच्या इतर लोकांच्या सभा होत. ज्यात बाबासाहेबांनी अमूक केलं. बाबासाहेबांनी तमूक केलं. आता कसं करायचं. अशा प्रकारचे ताशेरे ओढले जात. ज्यातून निर्णय निघत असे की जरी संविधानात कलमं टाकली गेली आणि संविधान बनवलं गेलं तरी त्या संविधानाचं पालन करणं आपल्या हातात आहे. आपण पालन करु तेव्हा ना. अन् कितीही संविधान बनलं व ते लागू झालं तरी लोकांच्या मनातील विचार व मानसिकता ते संविधान बदलवू शकत नाही. 
        हाच तो निर्णय. संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ला बनलं व २६ जानेवारी १९५० ला ते लागू झालं. परंतु त्या संविधानाच्या अनुषंगानं पालन करणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. जरी कायद्याचा धाक होता तरी. त्याचं महत्व इतर वर्गांना वाटत नव्हतं. विशेषतः या देशात बहुसंख्य संख्येनं अधिवास करणाऱ्या लोकांना. मात्र संविधानाला उचलून धरलं ते अल्पसंख्याक समुदायानं व धर्मानं. कारण त्यांच्यासमोर संविधानाला उचलून धरण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यांना माहीत होतं की जर संविधानाला आपण उचलून धरलं नाही तर कदाचीत आपल्यालाच येथून बहुसंख्य असलेला समाज हाकलून लावेल. त्यातच सन १९५२ ची निवडणूक आली.
            सन १९५२ ची निवडणूक. त्या निवडणुकीत मुंबई प्रांतातून बाबासाहेब अनुसूचित जाती फेडरेशन तर्फे मुंबई उत्तर मध्य प्रांतातून उभे राहिले. परंतु त्यांना जाणूनबुजून कॉंग्रेसने पाडले. जरी त्यांनी संविधान लिहिलं होतं तरी. त्याचं कारण होतं संविधानाला बढती न देणं. त्यात कॉंग्रेसच्या नारायण काजरोळकर यांनी १४३७४ मतांनी बाबासाहेबांचा पराभव केला होता. पुढं भंडारा मतदार संघात पोटनिवडणूक झाली व तेथेही बाबासाहेबांना पाडण्यात आलं व छुप्या स्वरुपात जाहीर करण्यात आलं की आम्ही संविधानाच्या विरोधात असून संविधानानुसार वागणार नाही. जे तुम्ही बनवलंय. 
        आजही तीच परिस्थिती दिसत आहे. संविधान तर आहे. परंतु ते राबविणारे घटक त्या संविधानाला बरोबर राबवत नसल्याचे चिन्हं दिसत आहेत. जणू आम्ही संविधान असलं तरी संविधानाला घाबरणार नाही. अशीच जणू प्रतिज्ञा केल्यागत आज गुन्हे घडत आहेत. गुन्ह्यांचा आलेख पाहता तो वाढतच आहे. मुख्य आरोपी हे बाहेर मोकाट हिंडतांना दिसत आहेत आणि जे संशयीत आरोपी आहेत. त्यांनाच फाशीच्या शिक्षा होत आहेत. असंच जर सुरु राहिलं तर उद्या तो दिवस दूर नाही की ज्या वेळेस संविधान असेल, परंतु ते मानणारे कोणीही नसतील वा त्याला घाबरणारेही कोणीही नसतील. अशीच आज संविधानाची अवस्था करुन टाकलेली आहे. 
         विशेष सांगायचं म्हणजे आज संविधान आहे. म्हणूनच देश जागेवर तरी आहे. तरीही गुन्ह्याच्या संख्येत वाढ होत आहे. उद्या जर संविधान नसेल तर देश रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. गुन्हे वाढतील. बलात्कार वाढतील नव्हे तर देश तेवढाच अधोगतीला जाईल. यात शंका नाही.

         अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०