द्वेष
" तुझ्यात जरासा बदल झाल्यासारखा दिसतोय हल्ली. " रामदास म्हणत होता.
" अरे आपलं वय वाढीच आहे. बदल तर होणारच ना? " मी म्हणालो.
" नाही.. तू काहीतरी करतोयस. धडपड कसलीतरी.. वजन उतरल्यासारखं वाटतंय तुझं जरा. पण जे काही असेल चांगलं आहे." तो म्हणाला.
" सतत असं राहायचा कंटाळा आलाय मला आता. म्हणून चालू आहे थोडंफार, बाकी काही नाही. " मी म्हणालो. मला माझं
" भारी रे. कर कर.. सगळीकडून सुधारणा करत आहेस हे मस्तच. " तो म्हणाला.
असं संभाषण मला रामदास कडून मिळालं.
पल्लवी पण म्हणाली. "जरा रोडावलायस. आजारी होतास की काय? "
आणखी एक दोन जणं सुद्धा बोलले. म्हणजे बदल घडत होता. प्रयत्न दिसू लागले होते. सुनी ने अजून काही निरीक्षण नोंदवलं नव्हतं. हल्ली हल्ली जरा भेटी कमी झाल्या होत्या आमच्या. सचिन जरा जास्त वेळ घेत होता तिचा. म्हणजे शाळेत, घरी आणि ट्युशनला मिळून गेल्या दोन महिन्यात सात आठ वेळाच बोललो असू आम्ही. त्यात ती बऱ्यापैकी तिच्या आणि सचिनबद्दलच बोलली होती. मला आता एवढं काही वाईट वाटत नव्हतं.
स्थिर मानसिकता मिळवण्यासाठी संयम हीच खरी कसोटी असते. त्यात सुनीचं मन माझ्याकडून राखलं जाईल अशीच माझी ईच्छा होती. मी माझ्यात मशगुल झालो होतो आणि ती तिच्यात. पण तिचं लक्ष मला जाणवायचं माझ्यावर हेही तितकंच खरं. मी हेतूपूरस्कर तिच्याकडे जात नसलो तरी ती फार काळ स्वतःला रोखू शकणार नाही हे पण मला माहित होतं.
रविवारी संध्याकाळी आलीच ती.
" जाडू चल!! बॅडमिंटन आज. " म्हणाली.
मी तिच्यासोबत घराबाहेर आलो. आमच्या अंगणात येताच मी मुद्दाम इकडे तिकडे बघितले.
" काय बघतोय रे? " तीने विचारले.
" दोघेच खेळणार आपण? " मी म्हणालो.
" हो आणि कोणी दिसतंय का इथे? " माझ्या हातात एक रॅकेट देत ती म्हणाली.
" मला वाटलं सचिन पण असेल. " मी जरासा उपरोधाने म्हणालो.
" तो कशाला सारखा सारखा येईल रे? त्याला काही त्याचा काम धंदा नाहीये का? " ती म्हणाली.
" अच्छा त्याला काम धंदा आहे तर आज. " मी परत तसंच बोललो. कोण जाने का पण आज थोडं टोचावं वाटत होतं तीला.
" असं का बोलतोयस रे? " ती म्हणाली.
" अगं.. म्हणजे त्याच्यातून वेळ मिळाला तूला माझ्यासाठी असं म्हणायचं होतं मला.. असो. चल खेळू. " मी सर्व्हिस चा पवित्रा घेत म्हणालो.
" त्याच्यातून वेळ मिळाला म्हणजे? तूला काय झालंय रे आज? आणि मी पाहतीये काही दिवस झाले. तू मला टाळत पण आहेस. किती दिवस झाले घरी नाही आलास. शाळेत पण लांब लांब राहतोयस. तुझं काय चाललंय? " तिने एकदम मुद्द्यावर भडीमार केला.
" तेच मला पण विचारायचं होतं? मी नाही आलो तर तू इतके दिवस लावलेस विचारायला यायला? " मी म्हणालो.
" तसं नाही रे.. मी येणारच होते. पण... "
" पण काय नव्या मित्रांमधून वेळ नाही मिळाला. हो ना?? मी काय करतोय हल्ली? माझं कसं चाललंय? अभ्यास करतोय की नाही? हे नं मला कोणीतरी सतत विचारायचं. मला त्याची सवय आहे. ती सवय सध्या तुटत चाललीये असं वाटतंय मला. " मी तीला मधेच तोडत म्हणालो.
" अरे!! तू काय बोलतोयस जाडू.. मला खरंच नाही वेळ मिळाला.. आणि नवीन मित्र काय.. ते येतात जातात. तूना ते काय म्हणतात बीजगणितात..? तू constant आहेस.. बाकीचे variables.. पण माझं सतत लक्ष असतं तुझ्यावर. मला माहिते तूला माझी सवय आहे आणि मला पण. पण कधीकधी होतं ना रे असं.. बरं ठीके इथून पुढे नाही असं होणारं.. प्रॉमिस..!! आणि मला पण ते जाणवलं म्हणून मी आले ना रे? " ती म्हणाली.
तिचं माझ्याकडे लक्ष असतं हे खरं होतं. तरी पण, माझी तक्रार मी का मागे घेऊ??
" सुने.. मित्र म्हणून मी कोणाशी बळेच जाऊन नाही जुळवून घेऊ शकत अगं. मला जमतच नाही ते. एक तर मी तुझ्याशी बोलतो नाही तर स्वतःशी. आणि सध्या जास्त करुन स्वतःशीच." मी जे आहे ते बोललो.
" सॉरी यार जाडू.. " ती म्हणाली.
" हे बघ!! माझ्या हक्काने मी जे आहे ते सांगितलं. परत तू नको म्हणायला. बरं तर बरं एवढं होतं तर बोलला का नाहीस. " मी तिची style मारत म्हणालो.
" सॉरी ना!! पण बरं केलंस!! असंच टोचत जा.. खरंच इथून पुढे नाही होणार असं.. आणि हो तू पण एवढा वेळ नको घेत जाऊ रे.. मला तू वर्गात ओरडलास तरी चालेल.. बरं ते सोड. तुझ्यात जरा बदल झालेला दिसतोय.. तू खराब का झालायस जरासा?" ती म्हणाली.
" आत्ता कळलं का? तुझ्या त्या पल्लीने विचारलं मला तब्येती बद्दल. आणि बघा माझी खडूस सख्खी मैत्रीण." मी कपाळावर आठी आणत म्हणालो.
" ईई!! तू वजन वैगरे कमी करतोय का? शी!! जाडू.. नको हा?? काहीपण करू नकोस.. कसं वाटेल ते बघायला? तू.. तू वाटणारच नाहीस.." ती म्हणाली.
" गप, काही कसतरी नाही वाटणारं.. मी स्वतःसाठी करतोय.. सगळं आहे तसंच ठेवलं तर मग माझ्यात बदल कसा घडणारं? आणि क्लासच्या टॉपरला अशी तब्येत सूट नाही करत. लक्शात ठेव हा, टॉपरची मैत्रीण आहेस तू. मीच आता टॉपरचा मित्र नाहीये. बिचारा मी. " मी तीला चिडवत म्हणालो.
" तुझ्यातर आता.. इतकी वर्ष होतास ना टॉपरचा मित्र.. त्या पल्लीने विचारावं म्हणून तब्येत उतरवतोय ना.. जाड्या!! थांब रोज चार लाडू खाऊ घालते तूला.. " अशी ओरडत बरळत ती माझ्या मागे रॅकेट घेऊन धावली. मी तिचा मार हुकवत पळू लागलो.
🍁🍁🍁🍁
14 फेब्रुवारीच फॅड हल्ली वाढू लागलं होतं. आम्हा लहानग्या जीवांना त्याची काहीही तोंडओळख नव्हती. पण कॉलेज मधला काहीतरी सण असतो असं कानावर आलेलं. मला त्याची जुजबी माहिती पेपर मधल्या एका लेखात मिळाली होती. असलं काही आपण करावं ह्याचा कसलाही विचार मनाला त्या काळी शिवला नव्हता. पण...
" जाडू!! Happy valentine day!!" सुनी म्हणाली.
" म्हणजे गं? " मी बळेच वेड्यागत बोललो.
" नाटकं करू नकोस. माहित नसल्यागत. " ती म्हणाली.
" खरंच नाय माहित. म्हणजे काय असतं गं?" मी परत सोंग पांघरत म्हणालो.
" अरे आज प्रिय व्यक्तीला प्रेमळ शुभेच्छा देतात. आणि जे मुलगा मुलगी एकमेकांना like करतात ते एकमेकांना गुलाब देतात." ती म्हणाली.
"अरे वाह!! कुठंय माझा गुलाब?? " मी तीला खिजवत म्हणालो.
" ईई जाडू..!! यड्या..!! मी नाही काही गुलाब वैगरे कोणाला देणार.. याक.." ती म्हणाली.
" आणि कोणी दिला तर? " मी हसत विचारलं.
" त्याचे दोन्ही हात मागे पाठीला काठीत अडकवून गुद्दे घालीन त्याच्या पाठीत!!" सुनी त्वेशाने म्हणाली.
शाळेत चाललो होतो. निम्म्यात आलोच होतो. तितक्यात माळवाडीच्या रस्त्यावर कॅनॉलपाशी सचिन सायकल घेऊन उभा असलेला दिसला.
" हा काय करतोय इथं? " मी सुनीला विचारले.
" माहित नाही." तिच्या स्वरात चलबिचल होती.
" नेत्रा!! थांब 2 मिनिट." तो म्हणाला.
ती थांबली. पण मी निघालो. त्याने तीला थांबवलं होतं. मला नाही. आणि ती थांबली म्हणजे तीला थांबायचं होतं.
शाळेत यायच्या आधी मी वीटभट्टीजवळ बॅग मधला पांढरा गुलाब आणि 5 स्टार च चोकोलेट फेकून दिलं. सुनीचं माहित नाही. पण सचिन आणि समर हसत एकमेकांना टाळ्या देताना मी वर्गात येताना पाहिले. सुनी मुळे पहिल्यांदाच माझे डोळे उष्ण झाले होते. स्वतःला आवरणं कठीण होतं पण तेच गरजेचं होतं.
🍁🍁🍁🍁
नदीसारखच तर माझंही जगणं आहे.
तिच्यात खोली आहे आणि खोल तर मी ही..
जगण्यातले खाच खळगे मी पण घेतोय..
म्हणूनच तिच्यागत कधी उथळ.. मी ही..
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁