कोंदण पर्व एक - भाग 39 Shabdbhramar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोंदण पर्व एक - भाग 39

प्रकाश 


सचिनच्या त्या अवघड परिस्थिती मध्यें मी त्याला काय मदत करणार होते? याचा मला उलगडा होतं नव्हता. पण किमान त्याची हिंमत वाढवणं, त्याला अभ्यासात मदत करणं हे तरी मला शक्य होतं. त्यामुळं त्याचं ते नुकसान तरी होणार नाही असं मला वाटलं. त्याच्या घरातल्या माणसांना आपण काही सांगू शकतं नाही. पण मानसिक रित्या त्याची काळजी तरी घेऊ शकतो. बरं तर बरं मी त्याला शाळेत यायला तरी तयार केलं आहे. त्याला मोकळं व्हायला कुठंतरी वाव द्यायला हवा. जसा मला जाडूकडे आहे.


त्याने मला मदतीचा हात मागितला होता. भले माझा स्वभाव इतरांना मदत करणारा असला तरी जाडूचं मनं मोडून काही करणं म्हणजे...

जाडू खरच दारात सायकल लावून उभा आहे कि, मी आत्ता त्याचं नाव मनात घेतलं म्हणून तो दिसला? क्षणभर मला कळलंच नाही.. सचिनला भेटून निघाले आणि त्याच्याच विचारात मी घराजवळ येऊन ठेपले आणि समोर हा उभा.

"काही खरं नाही. जाडू काढतोय जाळ आता." असं मनात आलं. मी सायकल वरून उतरत हळूहळू चालत आले. माझी नजर अन मान शरमेने खाली जात होती. पण जाडू स्थिर होता.

" extra क्लास मधलं झालेलं लिहून आणलंय. ही वही घे. आजच्या तारखेचं उतरवून काढ. सायन्सचे महत्वाचे प्रश्न आहेत. करुन ठेव." एवढंच बोलून जाडुने वही ओट्यावर ठेवली आणि निघाला.

" जाडू!!" मी त्याला हाक मारली.

" हा!" तो थांबला.

" मला मदत कर. अगदी या ही परिस्थितीत, प्लिज. तू मला एकटीला नको सोडून जाऊ." असं म्हणत मी सरळ धावत जाऊन त्याच्या कवेत घुसले. 

आतला उमाळा मला थोपवताच येईना. मला खूप रडू आलं.
काय करणारं मी तरी? त्याचं सरळ, सालस वागणं माझ्या खोट्या वागण्याला दर वेळी असं चिरडून टाकायचं कि मला लाज वाटण्याखेरीज गत्यंतर नसायचं. माझ्यावर रागावणे आणि त्याच वेळी माझी काळजीही वाहणे हे काम एकतर माझे आईवडील करायचे नाहीतर जाडू. आणि मला आत्ता तो हवा होता.

"बस इथं!!" मला ओट्यावर बसवतं तो म्हणाला.

मी हुंदके देत होते. 

"जे करायचं होतं ते झालं ना करुन? आता नको फुंदत बसू. माझ्या हातात असणाऱ्या गोष्टी मी करत राहीन सुने. पण जिथं माझा काही कंट्रोलच नाही तिथं मी तरी काय करणारं?" तो म्हणाला.

"त्या सचिनला बरं नाही असं कळलं म्हणून गेले होते रे त्याच्या घरी. तिथं गेल्यावर मला कळलं कि तो खूपच अडचणीत आहे. त्याला मदतीची गरज आहे जाडू." मी म्हणत होते.

"मी एक वर्षच मागितलं आहे तुझ्याकडे. फार काहीही नाही. एवढं एकच वर्ष हे सगळं टाळ." तो म्हणाला.

"जाडू त्याला गरज आहे रे माझी. तू प्लिज नाही म्हणून अडथळा आणू नको." मी म्हणाले.

"सुने.. आत्ता सध्या तू तुझ्या स्वभावाला आळा घाल थोडा. जास्त वाहवत जाऊ नकोस. तुझ्या बाबांनी पण तूला मागे एकदा समजवलंय. त्याचा स्ट्रगल त्याला करू देत. त्याच्या यश किंवा अपयशाचा धनी तोच असेल. तू का तुझा वेळ घालवणारेस त्याच्यात?" जाडू खूप कडक होतं आहे असं वाटलं मला. मी इतकं सांगून पण त्याला काहीच फरक पडत नव्हता.

"अरे माझ्या मदतीची गरज आहे असं ती व्यक्ती तोंडाने सांगतीये, ते करणं मला अगदी अशक्यही नाही आणि तरीपण मी कोडग्यासारखं वागायचं हे मला मनापासून पटत नाहीये. मी काय करू??" मी आता जरा सरळच होत म्हणाले.

"अगं मी कुठे म्हणतोय नको करू मदत. पण आधी स्वतःची तेवढी क्षमता तरी कमव ना? आत्ता तूला स्वतःला काही घडवण्याची वेळ असताना तुझे प्रयत्न स्वतःसाठी न घालवता त्याच्यासाठी वाया घालवून तू त्याच्या अडचणीमध्ये involve होणार. तुझा वेळ जाणार, एकाग्रता, मानसिकता सगळं बिघडणार. आणि तरीही त्याच्या परिस्थितीत नाही झाली सुधारणा. तर काय मिळवशील? स्वतःचं पण नुकसान. " जाडू समजाऊ लागला.

"नाही असं होणार. मी करते बॅलन्स सगळं. नको काळजी करू. मी माझा अभ्यास सांभाळून त्याला मदत करेन. तू फक्त माझ्याकडे दुर्लक्ष कर थोडं." मी जरा हेक्याने म्हणाले.

"जे मला जमणार नाही ते करायला सांगू नकोस सुने. " जाडू म्हणाला.

"मग तू मला तेच करायला सांगतोयस त्याचं काय? " मी थोडी वैतागले. जाडू समोर असून पण बिथरले.

"फरक आहे सुने.. मी तूला तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या यशासाठी आणि आई बाबांच्या आनंदासाठी सांगत आहे. माझं ऐक, तो त्याचा मार्ग काढेल तू त्याच्या अडचणीत involve होऊ नकोस. तुझा वेळ वाया जाईल." जाडू म्हणाला.

"माझा आनंद?? तो कशात आहे? तूला खरच इतक्या वर्षात कळलंय कि नाही रे?? मला नाही जमत असं स्वार्थी होऊन आपलं आपलंच बघण. समोरचं अडचणीत असताना पाठ फिरवणं. अरे तो परिस्थितीने बेजार आहे. तो काय मागतोय? थोडा वेळ. थोडी साथ. तो काय पळवून नेणार आहे का मला? जे एवढं जखडून ठेवलंयस मला तू?" मी जाडूला असं बोलत होते?? माझा स्वतःच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता.

"सुने.. मी असं काहीही म्हणत नाहीये. एवढं वर्ष तुझं महत्वाचं आहे. तेवढं झालं कि कर काय करायचं ते. आत्ता त्याच्या नादाला लागू नकोस. मला त्याचा भरवसा नाही वाटत. खोटं बोलत नसेल कशावरून?? तुझं अभ्यासाचं नुकसान नको आहे मला. तू दुसरं काहीही नाव लावू नकोस माझ्या या प्रयत्नाना." जाडू समजावनीच्या सुरातच म्हणाला.

"अरे तो का खोटं बोलेल?? तुझा त्याच्यावर राग आहे मला माहित आहे. म्हणून तू त्याला संशयाच्या चष्म्यानेच पाहतोस प्रत्येकवेळी.. मी हजारदा सांगितलं तूला.. तो तसा नाहीये. पण तुझं सतत तेच..अरे त्याचं पण महत्वाचं वर्ष आहे. त्याला क्लास वैगरे काही नाही.. अभ्यासात आणि थोड्या मानसिक ताणात मदतीची गरज आहे.. आणि मी काही कोणाच्या नादाला वैगरे लागतं नाहीये. त्याला त्याच्या अवघड काळात थोडा सपोर्ट करतीये. तू मला सारखा सारखा अडवू नकोस. यावेळी मी खरंच काहीही ऐकणार नाही तुझं. या आधी नव्हते का स्वतःला सांभाळत..? तेव्हा तूच असायचा का सुनीला बरं वाईट समजवायला? मला पण अक्कल आहे. माणसं कळतात मला.

आणि सतत मला तुझा पहारा नको आहे. कंटाळून गेलाय जीव माझा. इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. हे नको करू, ते नको करू. आई बाप बास आहेत ना?! आणखी तू पण तसंच कर. डोक्यावर बस माझ्या आणि तू असा वागतोय म्हणून मी खोटं बोलत चाललीये. आधीसारखं बेधडक जगता येईना मला. संपूर्ण वेगळं आणि विसंगत वागतीये. मला माझी मीच पसंत नाहीये आता." माझा पारा चढत चालला होता आणि मी त्या भरात जाडूला काहीही बोलत होते.

"सुने..बस.. बस..  त्रागा नको करुन घेऊस.. शांत हो. इथून मागे सचिन सुद्धा नव्हता ज्याच्यासाठी तू माझ्याशी मतभेद करतीयेस...तूला मी नेहमी वर बघत आलोय. तिथे तू तशीच रहावी अशी माझी तळमळ आहे. पण तुझ्या मनावर कसलं आवरण बसलंय मला कळतं नाहीये. माझा हेतू मी तूला स्पष्टपणे सतत सांगत आलोय. पण तुझं मनं आता त्याबाबतीत गैरसमजाने भरलंय. असो. बहुतेक माझी काहीतरी चूक होतीये." जाडुने मोठा श्वास भरला.

"ठीक आहे. कर तूला हवं तसं. फक्त काहीही लागलं तर न संकोचता मला सांग मी तिथेच आहे. जिथे नेहमी असतो. " एवढच बोलून तो उठला आणि माझ्या डोक्यावर थोपटून गेला.

मी जाडूला खूप बोलले होते. ते शब्द परत एकदा माझ्या कानात वाजू लागले आणि माझ्या मेंदूमध्यें घण पडू लागले होते. मी माझ्या जाडूला दुखावलं होतं... कशासाठी??

स्वतःच्या स्वभावाला अनुकूल खतपाणी मिळून परत एकदा तशीच सुनी म्हणून जगण्यासाठी?
कि, सचिनबद्दल असणारा सॉफ्ट कॉर्नर मला हे करायला उदयुक्त करत होता.

भीतीने मला खूप जोरात धडधडत होतं. जाडूला मी कशी बोलले होते. हे काय करुन बसले होते मी?

🍁🍁🍁🍁

"थुनी. ठुन दे ते. पलेल." जालू म्हणाला होता.

"नाय पलणाल. धललंय मी." मी म्हणले.

आणि ते धरलेलं हातातून सटकून पडलंच.

भांड्यांच्या दुकानातली चिनी मातीची जड बरणी पडून तिच्या ठिकऱ्या झाल्या होत्या. आमच्या दोघांच्या आया आणि दुकानदार त्या कोपऱ्यात पळत आले जिथे आम्ही दोघे होतो.

"45 रुपयांची बरणी होती ओ ताई. " दुकानदार म्हणाला होता.

"मी पाल्ली." जालू खोटं बोलला.

खाडकन मला जाग आली. खोल आठवणीतून आलेली ती घटना एक स्वप्न बनून मला उठवून गेली. ती जाग शरीरालाच नाही तर मनाला पण आली होती.

जाडू होता, मला पाठीशी घालायला नेहमी होता, जाडू आहे. तो नेहमी असतो आणि असणार... तो म्हणालाय. मी किती पाखंड्यागत सगळं विसरून त्याला काहीही बोलले.
सुनी कुठं हरवत चाललीये? मी का अशी वागतीये??

🍁🍁🍁🍁

त्याचं मागणं सुद्धा माझ्यासाठी 
त्याचं जवळ असणंही माझ्यासाठी
बरं तर बरं त्याचंच हृदय मिळालं,
माझ्या शब्दशरांनी भेदण्यासाठी??

- क्रमशः 

शब्दभ्रमर 🍁🍁