अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ५५ )
प्रेम घरी आल्यावर वैष्णवी त्याला साडीबद्दल विचारते. त्यावर तो तिला बोलतो की, त्याच्याकडे सेम पॅटर्न मधे साडी नव्हती म्हणुन नाही आणली.
त्या रात्री तो जरा अस्वस्थ होता. मेघाचे अशा प्रकारे त्याला बोलणे, त्याच्यासाठी खुप त्रासदायक होते. पण जर तिच्या बाजूने विचार केला तर ती कुठे चुकीची होती.
तिच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी असाच विचार केला असता. मग तिला का दोष द्यायचा. तिचा खुप जीव आहे अंजलीवर. त्यामुळे तिचे असे रिॲक्ट होणे साहजिकच होते. पण कुठेतरी तिच्या बोलण्यात काही गोष्टी विचार करायला लावणाऱ्या होत्या. कारण... अंजली जरी हे सर्व मान्य करत आहे असे दाखवत असली तरी, तिच्या मनात काय चालु आहे हे प्रेमला कळत होतं.
प्रेम जास्त विचार न करता झोपुन जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून तो वैष्णवीला तिच्या ऑफिस जवळ सोडुन आपल्या ऑफिसला येतो.
काम खुप असल्यामुळे आज दुपारपर्यंत त्याने मोबाईल पाहिला पण नव्हता.
दुपारी जेवण वगैरे झाल्यावर तो मोबाईल हातात घेतो. सर्वात आधी तो मॅसेज बॉक्स ओपन करतो. रात्री उशिरा अंजलीने त्याला एक भला मोठा मॅसेज पाठवला होता.
" प्रेम... खुप खुप थॅन्क्स...! कालचा दिवस माझ्यासाठी खुप सुंदर होता. आणि तुझ्या भेटीमुळे तो अजुन सुंदर झाला. मला खरच वाटलं नव्हतं की एवढं काही झाल्यानंतर तू, माझ्यासाठी वेळ काढून मला भेटायला येशील...! पण खरच खुप छान वाटलं. तुझे कसे आभार मानू तेच कळत नाही.
प्रेम मला नाही माहित तु माझ्याबद्दल काय विचार करतोय. पण मला एवढं माहित आहे की, तुझं माझ्या आयुष्यात असणं किती गरजेचं आहे. मग ते कसंही असो. त्याने मला काही फरक पडत नाही. पण तु माझ्या सोबत नेहमी असावा असं मनापासून वाटतं. मग तु मित्र म्हणुन असलास तरीही माझ्यासाठी खुप आहे. फक्त तु आहेस, हेच खुप भारी आहे. आणि हे असच राहू दे. एवढीच इच्छा आहे. बाकी काही नकोय मला. त्या बदल्यात तुझी मैत्रीण म्हणुन मी तुला कधीही निराश करणार नाही हे माझं प्रॉमिस आहे तुला. तुला मी जशी हवी तशी तसं मी वागण्याचा प्रयत्न करतेय. मी स्टडी पण मनापासून करतेय. आणि तुला वाटतं तसं नक्कीच काहीतरी बनुन दाखवेन, ज्याने मॉम डॅड सोबत तुलाही माझा गर्व असेल. आय प्रॉमिस. फक्त तु मला कधी तुझ्यापासून वेगळं करू नकोस. प्लीज 🙏🏻 पुन्हा एकदा थॅन्क्स...! कालच्या भेटीसाठी,,,,, खुप एनर्जी येते तुला भेटल्यावर...😊
बाय...! आणि सॉरी या मॅसेज बद्दल,,, चुकीच्या वेळी पाठवला, पण राहवत नव्हते म्हणुन पाठवला. सॉरी....! पुन्हा असं नाही करणार. प्रॉमिस....!"
तिचा मॅसेज वाचुन झाल्यावर तो पुन्हा मेघाच्या कालच्या बोलण्यावर विचार करू लागतो. पुन्हा त्याच्या डोक्यात नको त्या विचारांची गर्दी व्हायला लागते.
तो तिच्या मॅसेज ला रिप्लाय न देता मोबाईल बाजुला ठेवून कामात व्यस्त होतो.
इकडे अंजली मात्र सकाळपासून त्याच्या रिप्लाय ची वाट पहात होती. दुपार होऊन गेली होती तरीही त्याचा रिप्लाय आला नव्हता. ती मनात विचार करते, ' ठिक आहे, बिझी असेल तो कामात, मॅसेज वाचला नसेल अजुन. वाचल्यावर नक्की रिप्लाय करेल तो.' अशी स्वतःचीच समजुत काढते. तिला त्याने दिलेली साडी आठवते, ती साडी बॅगमधून काढून ती नेसुन स्वतःला आरशासमोर बघत उभी असते. तेवढ्यात डोअर बेल वाजते. ती तशीच डोअर ओपन करायला बाहेर जाते.
डोअर ओपन करून बघते तर समोर मेघा उभी होती. तिचा चेहरा सांगत होता की ती रागात आहे. ती आत येताच अंजलीला हाताला पकडून तिच्या रूम मधे घेऊन जाते. तिला बेडवर बसवते आणि रागातच तिला बोलते.
मेघा : काय चाललंय तुमचं....? झालं तेवढं पुरेसं नाही का...?
अंजली : असं का बोलतेय तु....?
मेघा : हे बघ अंजु...! मी असं का बोलतेय हे तुला चांगलं कळत आहे, पण मला काही कळत नाही असं तु समजु नकोस. का करतेय हे सर्व...? बस् झालं आता...! संपलय सर्व आता, सोड त्याचा नाद आता.
अंजली : अच्छा...! म्हणजे तु प्रेम बद्दल बोलतेय तर...!
मेघा : काय गरज होती त्याला भेटायची काल...? मुर्ख आहेस का जरा...? का डोक्यावर पडली आहेस...! लग्न झालंय आता त्याचं... कळतंय का तुला...!
अंजली : माहित आहे मला, आपण गेलो होतो ना लग्नाला...!
मेघा : माझं डोकं फिरवू नको आता...! नाहीतर एक लाऊन देईन ना अशी, सगळं विसरून जाशील.
* मेघा खुप रागात होती. अंजली बेडवरून ऊठुन तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला बेडवर बसवून बोलते...
अंजली : अगं जरा शांत होशील. आणि मी तुझा राग समजू शकते. पण मेघा तुला जसं वाटत आहे तसं काहीच नाही.
मेघा : अच्छा...! एवढी पण मुर्ख मी नाही आहे. कळतंय मला सर्व...!
अंजली : मेघा....! अगं खरच बोलतेय मी, कसं सांगु तुला आता...!
मेघा : काय सांगायचं आहे तुला...? तुला कळत नाही का..., तो नालायक तुझा फायदा घेतोय. डोळे उघड जरा...!
अंजली : मेघा प्लीज....! बस् झालं...! खुप ऐकुन घेतलं तुझं...! तु मला हवं ते बोल, हवं तर मार मला, पण प्रेमला काही बोलू नको. तो खुप चांगला मुलगा आहे गं...! उगाच का त्याला दोष देतेय...?
मेघा : पागल झालीय तु....! अजुन पण तुझ्या डोक्यातून जात नाही का तो...?
अंजली : मेघा...! अगं थोडा तरी विश्वास ठेव माझ्यावर...! मी खरं बोलतेय...! तुझा खुप मोठा गैरसमज होतोय. आमच्यामध्ये असं काहीच नाही जे तुला वाटतंय. आम्ही फक्त मित्र आहोत आता... कळलं. आणि काल पण आम्ही मित्र म्हणूनच भेटलो होतो.
* ती अशी बोलल्यावर मेघा तिचा हात पकडून स्वतःच्या डोक्यावर ठेवत तिला बोलते...
मेघा : अच्छा...! मग घे माझी शपथ आणि बोल की तु जे बोलतेय ते खरं आहे.
* अंजली आपला हात तिच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न करत बोलते...
अंजली : काय बावळटपणा करतेय तू....?
मेघा : बावळटपणा तु करतेय अंजु...मी नाही, खरच जर असं असेल तर बोल ना मग.
अंजली : मेघा...! कसं पटवून देऊ यार तुला...? प्रेम माझ्याकडे फक्त एक मैत्रीण म्हणून पाहतोय गं...! त्याच्या मनात असं काहीच नाहीय.
मेघा : आणि तु....? तुझ्या डोक्यात काय चालु आहे....? का ही साडी नेसुन मिरवतेय मग...! कोणी त्यानेच दिलीय ना...! काय आहे हे अंजु...! का एवढी पागल झालीय त्याच्यामागे. तो सेटल झालाय आता. सोडुन का देत नाही हा विषय. आधीच खुप त्रास झालाय याचा सर्वांना. ते पाहून पण तुला काही वाटत नाही का...? अजुन का टेन्शन वाढवतेय सर्वांच....?
अंजली : मेघा...! प्लीज तु तरी असं नको बोलू ना यार...! प्लीज समजुन घे मला. मी नाही कोणाला त्रास होऊ देणार....!
मेघा : तु जे काही वागतेय त्यावरून तर असं काही वाटत नाही. एवढी कशी आंधळी झाली आहेस त्याच्या प्रेमात की तुला हे पण कळत नाही की, आजपर्यंत त्याच्यामुळे किती रामायण घडलं आहे ते. तुझ्या मॉम डॅड ला किती त्रास झालाय याचा हे विसरलीस का...?
अंजली : मेघा...! सगळं कळतंय मला पण मी काय करू सांग ना....? आणि मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय...! तो मला माझ्या आयुष्यात हवा आहे नाहीतर मी मरून जाईल गं....!
मेघा : एवढे दिवस राहिलीस ना त्याच्याशिवाय...! मग आता असं अचानक काय घडलंय...?
अंजली : मला नाही माहित मेघा...! पण त्याच्याशिवाय मी स्वतःला इमॅजिन पण नाही करू शकत.
मेघा : अगं पण कळतंय का तुला, तु काय बोलतेय ते...?
अंजली : कदाचित चुकीचं असेल हे, पण मला नाही फरक पडत.
मेघा : पागल झालीय तु....! कर तुला जे हवं ते...! पण लक्षात ठेव, एक दिवस असा येईल की, तो तुझा वापर करून निघुन जाईल आणि त्या दिवशी तुला कळेल तु काय चुक केलीय ती.
अंजली : मेघा प्लीज यार...! तु तरी असं नको बोलू यार, एवढे दिवस तो आपल्यासोबत होता. तुलाही असं वाटतं का, की तो असं काही तरी करेल...! एवढच ओळखलं का तु त्याला...?
मेघा : अंजु....! मुलांचा काही भरोसा नसतो गं...! वेळेनुसार बदलतात मुलं. आणि त्याच्याबाबतीत बोलशील तर, त्याने तुला सोडुन दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले तिथेच तो माझ्या नजरेतून उतरला...! आणि मला तर आता असच वाटतंय की, तो फक्त त्याच्या फायद्यासाठी तुझ्यासोबत मैत्रीचे नाटक करतोय बस्... बाकी काही नाही.
अंजली : प्रेम नाही आहे तसा...! त्याला जर माझा फायदा करून घ्यायचा असता तर तो त्याने कधीच करून घेतला असता. पण तो खरच खुप चांगला आहे. विश्वास ठेव... तो असं काहीच करणार नाही. याची मला पुर्णपणे खात्री आहे.
मेघा : ठिक आहे...! एवढं समजाऊन पण तु जर तुझ्या मनाला वाटेल तेच करणार असशील, तर मग मी का माझा वेळ वाया घालवतेय इथे. कर तुला जे हवं ते....!
* एवढं बोलुन ती रागारागाने तिच्या घरातून निघून बाहेर पडते. अंजली तिला आवाज देत असते पण ती काही थांबत नाही....
अंजली तिथेच बेडवर बसुन रडायला लागते. काही वेळाने डोअर बेल वाजते...! ती उठून डोळे पुसत बाहेर येते आणि डोअर ओपन करते. मॉम आत येताच ती त्यांना घट्ट मिठी मारून रडायला लागते. मॉम तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात...
मॉम : अरे...! काय झालं बाळा...? का रडतेय...? मेघा सोबत काही झालं का...? ती पण घाईत निघून गेली जाताना...! काय झालंय सांग बघु आधी...!
* अंजु काहीच बोलत नव्हती. ती फक्त रडत होती. मॉम तिला आत घेऊन येतात आणि सोफ्यावर बसवतात. आणि तिच्या बाजुला बसतात. आपल्या साडीच्या पदराने तिचे डोळे पुसत तिला विचारतात...
मॉम : काय झालं आता तरी सांग...! कशावरून भांडण झालं तुमचं...? आणि एवढं रडायला काय झालं...!
* अंजली कशीबशी स्वतःला सावरत मॉमच्या खांद्यावर डोके ठेवत बोलते.
अंजली : सॉरी मॉम....!
मॉम : का बरं...?
अंजली : असच सॉरी...!😌
मॉम : बरं ओके...! बोल आता मग काय झालं ते...!
अंजली : मॉम...! एक विचारू...? तु रागावणार तर नाहीस ना...?
मॉम : बोल ना बाळा...! मी का रागावू उगाच...!
अंजली : पण मी काही बोलल्यावर...!
मॉम : बोल जे मनात आहे ते...! मी नाही रागावणार....!
अंजली : मॉम...! मी काल प्रेमला भेटले होते. आणि हे मी तुला सांगितले नव्हते.
मॉम : हो...! ते कळलं होतं मला...! पुढे बोल. काय झालं मग....!
अंजली : मॉम मी ॲक्सेप्ट केलं आहे सर्व. मग आता आम्ही मित्र म्हणुन पण नाही राहू शकत का...? हे चुकीचं आहे का...?
* तिचा प्रश्न ऐकुन मॉम तिला समोर घेतात.
तिचा हात हातात घेत तिला बोलतात...
मॉम : हे बघ बाळा....! एका बाजूने विचार केला तर, चुकीचं आहे...! याचं कारण मी तुला सांगते. कोणत्याही मुलीला आपल्या नवऱ्याची अशी कोणीतरी मैत्रीण आहे की, त्यांच्यामधे लग्नाआधी काहीतरी संबंध होते. तर ती काय करेल...? तुच सांग बरं...?
अंजली : याचा अर्थ असा होतो की, आम्ही मित्र म्हणुन नाही राहू शकत... हो ना...?
मॉम : ते पुर्णपणे तुम्हा दोघांवर अवलंबून आहे.
अंजली : म्हणजे....?
मॉम : म्हणजे हेच की, पुढे जाऊन याचे परिणाम काय होऊ शकतात याची कल्पना दोघांनाही असणार आहे. मग अशी रिस्क घेऊन ती मैत्री कायम ठेवावी की, आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला पुढे काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ती तिथेच थांबवावी. हा निर्णय दोघांनी मिळुन घ्यायला हवा. असं मला वाटतं.
अंजली : मला नाही कळलं...! मॉम तुच सांग ना...? आम्ही मित्र म्हणुन नाही राहू शकत का...?
मॉम : अंजु...! मला जे सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं आहे. बाकी तुमची मर्जी. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, तुझ्यामुळे त्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम यायला नकोत, आणि मला माझ्या बाळाला पुन्हा तसं पाहायचं नाही. खुप मोठं झालेलं पहायचं आहे तुला....!😌
* मॉम थोड्या इमोशनल होतात...
अंजली : मॉम...! मी तुम्हाला दिलेलं प्रॉमिस कधीच तोडणार नाही. ट्रस्ट मी...! पण...😌
मॉम : हो...! मला पुर्ण विश्वास आहे बाळा तुझ्यावर....! बाकी मला वाटतं की माझं बाळ आता मोठं झालेलं आहे. मग ते जे काही करेल ते मॉम डॅड आणि सर्वांचा विचार करूनच करेल. 🙂
* मॉम असं बोलल्यावर अंजली तिथेच मॉम ला मिठी मारत बोलते...!
अंजली : आय लव्ह यू मॉम...! तु जगातील सर्वात भारी मॉम आहेस... 🙂
मॉम : बरं...! पुरे झालं आता...! आणि आता रिलॅक्स हो. ऊठ चल फ्रेश हो, मी कॉफी बनवते.
* मॉम तिथून ऊठुन किचन मधे जातात. काही वेळात अंजु पण फ्रेश होऊन येते. मॉम दोन कप मधुन कॉफी घेऊन हॉल मधे येतात. दोघी सोबत कॉफी घेत काही वेळ गप्पा मारतात.
पुढे काही दिवस असेच निघुन जातात.
अंजु आता प्रेमला जास्त मॅसेज वैगरे करत नव्हती. फक्त त्याच्या ऑफिसच्या वेळेत एखादा मॅसेज करत होती. पण त्यालाही प्रेम कधीतरी रिप्लाय देत होता. अंजलीला हे जाणवत होतं. कारण हळू हळू ते अंतर वाढत चालले होते. एक एक महिना होऊनही त्याचा काहीच रिप्लाय येत नसायचा. या गोष्टीचे तिला वाईट तर वाटत होते. पण तिनेच त्याला प्रॉमिस केले होते. त्यामुळे ती जास्त काही करू शकत नव्हती.
तिने आता स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतले होते. आणि प्रेम त्याच्या संसारात व्यस्त होता. काही महिने असेच निघुन जातात. त्या वर्षातील शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर चालू होता. ख्रिसमस च्या निमित्ताने तरी प्रेमची भेट होईल या आशेवर तिने एवढे दिवस त्याला न भेटता काढले होते.
ख्रिसमसच्या एक दिवस आधी दुपारच्या वेळेत ती त्याला मॅसेज करते...
' प्रेम... एवढे दिवस गेले. मी तुला कधी बोलले नाही की मला भेट. पण उद्या ख्रिसमस आहे. माझी मनापासून इच्छा आहे की उद्या तुला भेटावं... भेटशील का...? थोड्या वेळासाठी... मी रिक्वेस्ट करतेय तुला, प्लीज फक्त थोडा वेळ भेट. हवं तर त्यानंतर तु बोलशील तेव्हा भेटू. मग तर झालं. येशील ना....? मी उद्या संध्याकाळी सात वाजता चर्चमधे प्रेयर साठी जाणार आहे. मोबाईल माझ्याजवळच असेल. तु आलास की कॉल कर. मी वाट पाहिन... पण प्लीज तु ये....!
प्रेम तो मॅसेज वाचुन झाल्यावर विचार करत असतो. खरच मागील चार महिन्यात तिने असा कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. मग एक दिवस थोड्या वेळासाठी तिला भेटलो तर काय हरकत आहे....
त्यावर त्याचं दुसरं मन बोलत होतं...' मेघा काय बोलत होती हे विसरलास. आत्ता कुठे ती थोडीफार सावरली आहे. हे जर असेच चालू राहिले तर तिच्या डोक्यातुन हे सर्व कसे निघणार. हि गोष्ट पण तितकीच खरी होती की, तिने सर्व काही मान्य केलं असलं तरी, ती अजुनही फक्त मित्र म्हणुन भेटत नाही. तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे. आणि जर हे असेच चालू राहिले तर ती कधीच यातून बाहेर पडणार नाही. मग त्यासाठी मलाच थोडं कठोर बनावं लागेल. नाहीतर पुढे जाऊन दोघांनाही याचा खुप त्रास होईल. त्यासाठी मलाच हे सर्व कुठेतरी थांबवायला हवं. आणि तिला पण या गोष्टीची जाणीव करून द्यायला हवी. तिला नीट समजवायला हवं. पण त्यासाठी पुन्हा तिला भेटावं लागेल. त्यात उद्या ख्रिसमस आहे. ती छान मूडमध्ये असेल. मग उद्या हे सर्व नाही बोलता येणार. मग काय करावं...? नंतर कधीतरी तिला भेटुन हे सर्व बोलावच लागेल... पण उद्याचं काय...! उद्या ती वाट बघत राहील. तिला मॅसेज करून सांगाव का... की उद्या मी नाही भेटू शकत म्हणून...! काय करावं ते कळत नव्हतं...!
बघू उद्याचं उद्या...! असा मनातच विचार करून तो कामाला लागतो.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून घरी आल्यावर फ्रेश होऊन तो बाहेर येतो. तिला भेटायला जायचं की नाही हा विचार अजुन त्याच्या डोक्यात चालु होता. अखेरीस तो गाडी काढतो आणि चर्च जवळ येऊन थोड्या अंतरावर गाडी पार्क करून थांबतो.
तिथून चर्च च्या गेट कडे पाहत असतो. खुप वेळ झाला तरी त्याला अंजली कुठे दिसत नव्हती. तो मोबाईल हातात घेऊन तिला कॉल करतो. ती कॉल रिसिव्ह करत नव्हती. तो पुन्हा एकदा कॉल करून बघतो, तेव्हा पण कॉल उचलला जात नाही.
थोड्या वेळाने तिचा कॉल येतो... तो रिसिव्ह करत तो गेट कडे पाहतो तर अंजली गेट मधुन फोन वर बोलत बाहेर येत होती.
अंजली : हाय...! कुठे आहेस...? मी बाहेर आलीय. तु कुठे आहेस...?
* प्रेम लांबूनच तिला पहात होता. त्याला भेटण्याचा तिचा उत्साह जाणवत होता. व्हाईट कलरच्या त्या ड्रेसमध्ये ती एका परीसारखी दिसत होती. गेटवर उभी राहून ती इकडे तिकडे पहात होती. तिला पाहून प्रेम बोलतो....
प्रेम : हाय...! खुप सुंदर दिसत आहेस...!
अंजली : थॅन्क्स...! पण तू कुठे आहेस...? मला का दिसत नाहीस तु...?
प्रेम : इथेच आहे...!
अंजली : अरे...! पण मला खरच नाही दिसत आहेस...! सांग ना कुठे आहेस...!
प्रेम : तुझ्या डाव्या बाजुला झाडाखाली बघ...!
अंजली : एवढ्या अंधारात का थांबला आहेस...! थांब मी आलेच...!
*असं बोलुन ती तिचा ड्रेस सावरत घाईघाईने त्याच्याजवळ पोचते. त्याला समोर पाहून त्याला अलगद मिठी मारते.
तिथे आजुबाजूला खुप लोक होते. ते पाहून प्रेम तिला बोलतो.
प्रेम : अंजु....! इथे खुप लोकं आहेत आणि ते आपल्याकडे बघतायत...!
अंजली : ठिक आहे ना...! ख्रिसमस आहे. आणि हे नॉर्मल आहे.
* प्रेम तिच्या मिठीतुन स्वतःला सोडवत तिला बोलतो....
प्रेम : हॅप्पी ख्रिसमस....! खुप गोड दिसताय.
अंजली : मेरी ख्रिसमस....! आणि खुप खुप थॅन्क्स.
प्रेम : कशाबद्दल...?
अंजली : तु आलास म्हणुन....!😊
प्रेम : अच्छा....! आणि जर मी आलो नसतो तर...!
अंजली : मी असा विचार केलाच नव्हता...! कारण मला माहित होतं... तु येशील...!
प्रेम : एवढा कॉन्फिडन्स...!
अंजली : हो....!
प्रेम : सॉरी पण तुला ख्रिसमस साठी काहीच गिफ्ट आणले नाही.
अंजली : तु आलास ना...! हेच खुप मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी...!
प्रेम : बरं ओके...! आता जा तु... तिकडे वाट बघत असतील.
अंजली : हो जाईन मी... थोडा वेळ थांब ना...!
प्रेम : नको....! जा तु....मी पण निघतोय.
अंजली : प्रेम...! आत्ताच तर आला आहेस...!
प्रेम : हो...! पण इथे असं जास्त वेळ थांबणं मला योग्य वाटत नाही. हवं तर आपण नंतर भेटू.....!
अंजली : खरच....! नक्की भेटशील...?
प्रेम : हो...! नक्की....!
अंजली : मग ठिक आहे, जाते मी...! तु पण जा घरी...! बाय...!
* असं बोलुन ती जाता जाता पुन्हा त्याला अलगद बिलगते. आणि तिथून निघून चर्च मधे जाते. जाताना खूप वेळ ती मागे वळून पहात असते. प्रेम थोडा वेळ तिथे थांबुन घरी जायला निघतो.
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️