जया देव तारी - भाग ०३
म्हणून दत्तंभट खोतांकडे जायला निघाला. तो गेला लगेचच बापू दात्ये रोजच्या रिवाजाप्रमाणे आले. ते आले तेंव्हा दत्तू गुरव बळाणीवरच बसलेला होता. दात्यानी गाभाऱ्याला कुलूप बघितल्यावर गुरवाला विचारले तेव्हा त्याने मिराशांची काय ताकिद आहे त्याची उजळणी केली. त्यावर काहीही न बोलता बापूनी गाभाऱ्या बाहेर कोनाड्यातला गणपती नी समोरचा नंदी यांची पुजा केली. गाभाऱ्याच्या चौकटीच्या उंबऱ्यावर पाणी ओतून ईश्वरासाठी बिल्वदल नी फुलं ठेवली. मग आवाठातल्या लक्ष्मीकेशव, काळभैरव , मुळवसाची पूजा करून ते निघून गेले. मात्र त्या दिवासानंतर त्यानी ईश्वराची नित्यपूजा कायमची बंद केली. श्रावणात नेमधर्माच्या निमित्ताने कोणकोण गावकरी देवदर्शनाला येत. तेही ईश्वराच्या गाभाऱ्याला कुलूप बघून अजाब करीत.
दसऱ्यानंतर दोन दिवसानी खोतांची बायको बाळंत झाली. मुलगा पायाळू जन्माला आला. अकरा मुलींच्या पाठीवर झालेला लाडा कोडाचा मुलगा. खोताने मुलगा झाल्याची वार्ता सुवणीने दिल्यावर गड्याने उखळीबार काढायला सांगितले. दिवाळी आणि अन्य वार्षिकांच्या वेळी उखळीबार काढायची प्रथा होती. अवेळी बारांच्या आवाज आयकून लोकाना अजाब वाटले. काही जणानी कुतूहलापोटी खोतांचा वाडा गाठला. खोताला मुलगा झाल्याची वार्ता गावभर पसरली. खोतानी दणक्यात षष्टी पूजनाचा घाट घातला. त्या काळी षष्टी पुजनाला गावातली ब्राह्मण मंडळी आणि सवगवीची कुळवाडी, सोनार सुतार वगैरे इतर समाजाची माणसं बोलावायची प्रथा होती. ब्राह्मणांसाठी हरभऱ्याच्या आणि इतरांसाठी कुळथाच्या घुगऱ्या केल्या जात. रात्री आलेल्या मंडळीना चवईच्या पानावर किंवा केळीच्या फाळक्यावर ओंजळभर मीठमसाला घालून उसळीसारख्या रांधलेल्या घुगऱ्या देत. आलेली माणसं आपल्याला मिळालेलं घुगऱ्यांच पान पंचाच्या शेवाला बांधून घरी नेत. तालेवार मंडळीकडे षष्टी पुजन असले की आलेल्या लोकाना घरठेप जादा पान न्यायला देत. शिवाय खायला ही घुगऱ्या देवून त्यावर अदमुरे दही वाढीत असत.
मुलगा झाल्यामुळे खोत भलताच हौसावलेला होता. रोज सात भट बोलावून शांतीपाठ सुरू झाला. घरात लक्ष्मी पाणी भरीत होती, घर भरून दार वतेल एवढी गडगंच म्हणून खोतानी मोठा जलसा उडवला. पुऱ्या गावाला षष्टी पुजनाचं आमंत्रण दिलेलं होतं. आलेल्या सगळ्यानाच भेदभाव न करता हरभऱ्याच्या घुगऱ्या द्यायचं योजलेलं होतं . पाचमण हरभरे भिजत घातलेले होते. शंभू देसायाने मागिलदारी अंगणातच चर मारून चार मोठी तपेली चढवली नी तिन्हीसांजे बरोबर रांधप सुरू झाले. नारळ खोवायला, वाटप करायला वीस पंचवीस कुळवाडणी बोलावलेल्या होत्या. आलेल्या माणसाना केळीच्या फाळक्यावरून मोठा डाऊल भरून घुगऱ्या वाटल्या, शिवाय खायलाही दिल्या. घुगऱ्यांवर दही घालण्यासाठी तीन दिवस अगोदर पासून गावभरचं दूध जमवून दोन मोठ्या रांजणात विरजण लावून ठेवलेलं होतं. माणसं जमायला लागल्यापासून तो उशीर रात्री पर्यंत दणादण उखळीबार फुटत होते. मुलाचं नाव नावरशी वरून यशवंत ठेवले. बारशाला गावजेवणाला बुंदीच्या लाडवांच प्रजोजन घातलं. कुळवाडी पानावरचा जिन्नस उचलून बांधून न्हेतात असा अनुभव होता.म्हणून पंक्तीत पानावर एकदाच पाच लाडू वाढायचे, पुन्हा लाडू वाढायचे नाही असं ठरवलेलं होतं. ब्राह्मणांच्या पंक्तीना लाडवांवर आमटीवाढ्या पळीने तूप वाढण्यात आलं. तीन पंक्ती उठल्यावर खोतानी पैज जाहीर केली. किमान पाच लाडू खाणाऱ्याला दोन रुपये, दहा लाडवाना पाच रुपये बक्षिस जाहीर झाले. तरणे ताठे लोक पुन्हा बसले. गोडाची मिठी बसू नये म्हणून लाडवांसोबत लोणचं वाढण्यात आलं. जवळ जवळ पन्नास लोकानी पाच रुपये जिंकले. वासु मराठे, भगवान दात्ये, सदू जोशी, बग्या गोडसे यानी वीस वीस लाडू खाल्ले त्याना पंचवीस रुपये मिळाले. तर बबन दांडेकराने पठ्ठ्याने बत्तीस लाडू खाल्ले. त्याला खोतानी एकावन्न रुपये देवून जरीचा रुमाल बांधलेली. खोतांकडच्या बारशाच्या प्रयोजनाच्या कथा गावात आजही चर्चिल्या जातात. महिना झाल्यावर रिवाजाप्रमाणे बाळ बाळंतीण ईश्वराच्या पाया पडायला जाताना सनई ताशाचे वाजप सांगितलेले होती.
मुलगा झाल्यामुळे यंदा ईश्वराचा उत्सव झोकात करायचा होता. कोटकामत्याच्या कामतेकर बुवाना मोठी बिदागी देवून पाचारण करण्यात आलेले होते. साथीला पुरळेतले रामभाऊ गोडसे आणि तबल्याला प्रिंदावणचे गजाभाऊ गोखले याना बोलावलेले होते. त्या काळी मोंडातले गवई बापट आणि वाड्याचे आचरेकर गवई बैठका करीत. उत्सव आधी दोन दिवस त्यांच्या गायनाची बैठक झाली. पालखीतली बिछायत आणि छत सांगलीहून नव्याने तयार करून आणलेले होते. उत्सवाच्या वेळी पालखीच्या भोवत्या व्हायच्या त्यावेळी खास शोभेसाठी नाडण, तारामुंबरी आणि गवाण्यातले लाठी बनाटी खेळणारे मेळ सुपारी देवून बोलावलेले होते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी महारुद्र हवन योजून पाच गावच्या लोकाना महाप्रसादाला आमंत्रण दिलेले होते. समाराधनेला मोदक, रवालाडू. खीर, बासुंदी आणि घारगे अशी पंच पक्वान्ने होती. देवळाभोवती पोवळीवर पंक्ती बसवलेल्या होत्या. हजारभर माणसे महाप्रसाद घेवून गेली. त्यावर्षी जाणत्यांच्या आठवणीत प्रथमच ईश्वराचा उत्सव एवढ्या गजाबारात साजरा झाला.
यशवंत पाच वर्षाचा झाला तरी बोलेना. त्याची सतत लाळ गळत रहायची. हालचालही फार करण्याची तकस न घेता तो गोळांब्या सारखा लोळत रहायचा. तीन वर्षाच्या भरीला तो उभा रहायला लागला. खोतानी खास सुतार बोलावून पांगूळगाडा बनवून घेतलेनी. त्याला अंगाला लावून न्हाऊ माखू घालणे, खेळवणे यासाठी दिवसा आणि रातीवळ्यालाही कुळवाडीण ठेवलेली होती. शंभू देसायांच्या ओळखीने त्याला मिरजेत मोठ्या वैद्यांकडे न्हेण्यात आले. (क्रमश:)