जया देव तारी - भाग ०६
खोतांच्या महापुरुषा जवळ अवास्तुक उंबराचे रोप उगवले. ते चांगले हातभर उंच झाल्यावर एक दिवस शंभूच्या नजरेला पडले. तो दिवसभर त्यावर विचार करीत होता. रात्री अकस्मात त्याला युक्ती सुचली. महिनाभराने योजने प्रमाणे सगळी जम झाली. मग शुक्रवारी सकाळी गडी कामाला आले त्याना हाकारीत शंभू म्हणाला, “आज पहाटे मला स्वप्नात दृष्टान्त झाला. आगरात महापुरुषाच्या बाजूला उंबराचे झाड आहे त्याच्या डाव्या अंगाला गाणगापुरच्या पादुका आहेत. मी गेली पन्नास वर्षं इथे पडून आहे....... तू मला वर काढ आणि माझी प्रतिष्ठापना कर असा साक्षात दत्तगुरूनी मला आदेश दिलेला आहे. ” गडी माणसं भारावून म्हणाली, “येवडा हा तर खरा खोटा करूक काय हरकत हा? तुमी खय तो जागो दाकवा आपून त्ये जागी ख़णॉन बगूया...... ” शंभू पुरता पोचलेला होता त्यालाही गोष्ट गावगन्ना व्हायला धायची होती. म्हणून तो योजून म्हणाला, “बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. पण ही साधीसुधी बाब नाही. अशी किती स्वप्नं पडतात...... ती काय सगळीच खरी होतात थोडीच? मी जोशीबुवाना भेटून त्याना विचारतो. नी मग आपण पुढे काय करायचे ते ठरवूया.......”
चिंतू काका जोशानी ईश्वराच्या उत्सवात जाहीर उपमर्द केल्यामुळे त्यांच्याशी जवळीक करायचा विचारही शंभू जोशाने केलेला नव्हता. पण त्याने योजलेल्या बेतात अशी असामी गोवलेली असेल तर त्या गोष्टीचा अप्रत्यक्ष लाभ होईल हे ओळखून तो जोशीबुवाना भेटला. आपल्याला झालेला दृष्टान्त त्याने कथन केल्यावर स्वप्न कधी पडले वगैरे विचारल्यावर, “यात पन्नास टक्के सत्य असेल असे माझे मत आहे, तुम्ही मी मुहूर्त काधून देतो त्या दिवशी महापुरुषास नारळ ठेवून मग खणून बघा. तूर्त ही गोष्ट षटकर्णी नको होवू दे. बोलून चालून स्वप्नच ते....... ते प्रत्यक्षात ये ईलच ह्याचा काय भरवसा हो? प्रचिती नाही आली तर उगाच टिंगलीचा विषय होयचा...... ” चिंतू बुवा म्हणाले. मग त्यानी पंचांग काढून मुहूर्ताचा दिवस सांगितला. सव्वापाच एवढी भरभक्कम दक्षिणा देवून शंभू काका उठले. त्याना बसायला सांगून चिंतू काकानी आपल्या लेकीला हाक मारली. “ गो शालू, अगो शंभूरावास्नी लिंबाचे सरबत करून आण गो...... आज पयल्यानच आलेहेत ते आमच्या घरास...... त्यास्नी असेच धाडणे बरोबर नाय..... ”
दृष्टान्ताची गोष्ट गावभर पसरली. मुहुर्ताच्या दिवशी शे शंभर माणूस गोळा झालं. महापुरुषाला नारळ ठेवून औदुंबराच्या रोपा पासून सात हातावर उजव्या बाजूने खणकाम सुरू झाले दुपार पर्यंत तीन चार वाव लांबीला ढोपरभर तेव घेवूनही काही मागमूस लागेना. गडी नी जमलेले लोकही कंटाळले. एक दोन चौकस लोकानी शंभू काकाना विचारले की तुम्हाला दृष्टान्त झाला तो नेमका हाच जागा बरोबर आहेना? त्यावर सचिंत मुद्रेने डोक्याला ताण देवून आठवल्या सारखे करीत शंभू काका हातवारे करीत म्हणाले.....“ मी जरा दिशा योवजतो हां.... ” मग औदुंबरा सामोरे होत बेटे नाचवीत इकडेसे वाटते म्हणत त्यानी झालेल्या खणकामाच्या विरुद्ध बाजुला निर्देश केला. आता गड्यानी तिथून खणकाम चालु केले दोनेक हात पुढे खणीत गेल्यावर एका टेवा सरशी काहीतरी पांढुरके चमकल्या सारखे दिसले. गड्याने सावधपणे तेथे पिकावाचे टोक मारून ढिपळ काढल्यावर तीन आंगळे रुंद आणि टीचभर लांब काळाकिट्ट चांदीचा तुकडा हाती लागला. तो वर काढून नीट निरखल्यावर पादुकांचा आकार दृग्गोचर झाला. ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ’ म्हणत शंभू काकानी पादुका मस्तकी टेकवल्या वर जमलेल्या लोकानी बेंबीच्या देठापासून श्री गुरूदेव दत्त म्हणत हात जोडले. मग दत्त नामाच्या गजरात त्या पादुका खोतांच्या ओटीवर ताम्हनात ठेवल्या. त्यावर दुधाचा अभिषेक करून शुद्धोदक घालून देवघरातला चौरंग मांडून त्यावर त्या पादुका ठेवून पंचारत ओवाळीत आरत्या केल्यावर शंभू काकानी घरगड्याना उखळीबार काढायचे फर्मान सोडले.
पुढच्या आठवडाभरात पंचक्रोशीभर ही वार्ता पसरली. दर्शनासाठी माणसांची नुसती झुंबड उडाली. यशवंता नी अनंतराव आलेल्या माणसाना तीर्थ प्रसाद वाटून वाटून पार टेकीला आले. पादुका मिळाल्या त्या जागेवर आपण लौकरच खुप मोठं दत्तमंदिर बांधणार असल्याचा मनसुबा शंभुकाका बोलुन दाखवीत होता. गावातल्या लब्धप्रतिष्ठित असामीही पादुका आणि औदुंबराचं स्थान पाहून गेल्या. बघ्यांची रीघ ओसरल्यावर शंभुकाकाने दत्तमंदिर बांधायची जुळणी सुरू केली. वायंगणीचे मोघेशास्त्री बांधकामाची जागा बघणे, इमारतीचा आय काढणे ह्यातले तज्ज्ञ म्हणून प्रख्यात होते. त्याना पाचारण करण्यात आले. औदुंबराचे झाड हे वड पिंपळ यांच्या सारखे प्रचंड वाढत जाते आणि सहसा कधी नष्ट होत नाही. भविष्यात त्या वृक्षाचा उपसर्ग मंदिराला होवू नये यासाठी त्या झाडापासून सात हात जागा सोडून महापुरूषाच्या पूर्वेकडची जागा निश्चित करून नऊ हात रुंद आणि अठराहात लांब इमारतीचा आय आखून चारही कोपऱ्यांवर खुणेसाठी छिनेलं उभी करण्यात आली. मोघे शास्त्र्यानी पादुका नीट पारखून पारखून त्या किमान तीनशे वर्षापूर्वीच्या असाव्यात असा अंदाज केला. कैक वर्षं जमिनीत गाडलेल्या स्थितीत राहिल्यामुळे त्या काळ्या पडलेल्या होत्या. त्या सोनाराकडे देवून उजळून घेवून त्यावर सोन्याचे पाणी द्यायचा सल्ला त्यानी दिला. (क्रमश:)