जया देव तारी - भाग ०८
मूर्ती घेवून तिघेही अथणीला आले. तिथे मुक्काम करून कोल्हापूर राधानगरी वरून हळयात पोचले. दत्तजयंती पूर्वी आठवडाभर गजाबारात दत्तमुर्तीची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम योजला होता. धार्मिक विधीला मुलगा नी सून बसणार होते. विधी सुरू झाला नी ‘हूं हूं ’ करीत मुठी वळून गाभाऱ्या भोवती प्रदक्षिणा मारताना मोठ्या चलाखीने कनटीला खोचलेली भस्माची पुडी मुठीत खोलून कागदाचा बोळा खाली टाकून देवासमोर आल्यावर शंभू वदायला लागला. लटा लटा आंग हालवीत दाण् दाण् पावले आपटीत औदुंबराच्या झाडा समोर जावून घुमायला लागला. माहितगार जाणते पुढे झाले नी शंभूच्या पाया पडून त्यानी विचारणा केली. “ तू कोण आहेस? इथे कशाला आला आहेस? ” त्यावर शंभूच्या अंगात आलेला संचार वदायला लागला....“ मी गाणगापूरच्या दत्ताचं सत्व आहे... माझा अंश या देवस्थानात कायमस्वरूपी ठेवून मी कुड सोडीन ....” मग़ मूठ उघडून म्हणाला, “हा गाणगापुरातला प्रसाद आणि एक श्रीफळ उंबराच्या मुळात पुरा म्हणजे माझा इथे कायम अधिवास राहील. या स्थानात केलेली सेवा , इथे दिलेले दान गाणगापुरात रुजू समजा. ” तेवढ्यात कुणीतरी श्रीफळ घेवून आला ते हातात घेवून त्यावर भस्म टाकून ते औदुंबराच्या मुळात ठेवल्यावर संचार कुड सोडून गेला नी शंभू धाडकन् आडवा पडला.
दुपारी प्रतिष्ठापना विधी उरकल्यावर मुख्य आचार्य मोघे शास्त्र्यानी अवसराने सांगितल्या प्रमाणे औदुंबराच्या मुळात ठेवलेले श्रीफळ तिथेच खड्डा खणून पुरून टाकले. लोक उलटसुलट चर्चा करीत होते. देव,देवता, देवचार असे कोणाकोणाचे अवसर येतात, पण दत्ताचं वारं आलेलं ऐकीवात नाही. झाला प्रकार अयाश्चक्रीच म्हणायला हवा. काही लोक भक्तिभावाने म्हणत होते की इथे प्रत्यक्ष गाणगापुरातल्या दत्ताचा अंश आहे. हे स्थान नरसोबाच्या वाडीसारखे प्रसिद्ध्दीला पावणार. संध्याकाळ पर्यंत महाप्रसादाच्या पंक्ती उठत होत्या. संध्याकाळ पासून उत्तर रात्री पर्यंत गावातल्या पाचही वाड्यांची आळीपाळीने भजनं चालली होती. खोतांच्या इतमामाला साजेसा दणकेबाज कार्यक्रम झाला. गावात दत्ताचे मंदिर नव्हते त्यामुळे गावातले झाडून सगळे लोक दर्शनाला लोटलेले होते. देवा समोर नारळाचा ढीग साठला होता आणि दोन ताम्हनं भरून खुर्दा मात्र संपूर्ण कार्यक्रमात येशा खोताला खड्यासारखा वगळलेला होता. ही बाब मात्र जुन्या जाणत्याना चांगलीच खटकली. लोक म्हणाले की. या तक्षीमेचा जो मालक तोच गाजीचा पाजी झाला नी कोण कुठचा देसाई या पांढरीत रुजून शिरजोर झाला.
आठवडाभराने दत्तजयंती आली. चतुर्दशीला उत्सवाची सुरूवात, पौर्णिमेला दत्तजयंती , रात्री आचरेकर गवईबुवांचा गायना कार्यक्रम, तिसर्या दिवशी पहाटे लळिताचे कीर्तन, आणि दुपारी समाराधना असा वार्षिकाचा कार्यक्रम देसायाने आखलेला होता. उत्सवाच्या वेळी भोवत्यांसाठी पालखी हवी होती. शंभूने दात्यांकडे विचारणा करायला माणूस पाठवला. दात्यानी सांगितले की मी एकटा देवस्थानचा अधिकारी नाही. आजपर्यंत ग्रामदेवतेच्या पालखीत अन्य कोणता देव बसवल्याची रूढ नाही. मी अडवीत नाही पण मी माझ्या अधिकारात होकारही देवू शकत नाही. गड्यानी हा निरोप सांगितल्यावर शंभू दोन गडी घेवून पुरळेत गोडशांकडे गेला. कामतेकर बुवांच्या कीर्तनात पेटीची साथ करायला रामभाऊ गोडसे यायचेच होते. त्यानी काहीही आढेवेढे न घेता पालखी न्यायची परवानगी दिली. चतुर्दशीच्या दिवशी दुपारीच शंभू देसायाची म्हातारी खटारली . गोठ्याच्या बाजुला खोलीत देसायाने बाळगलेल्या आचाऱ्यांकडे कामतेकर बुवांची रहायची सोय केली. देसायाना सुतक आल्यामुळे उत्सवाचे यजमानपण अनायासेच येशा म्हाजनाकडे आले. कीर्तनात कामतेकर बुवानी सुचक टिप्पणी केली. पहिल्याच वार्षिकात यजमानाना विघ्न आले खरे पण कोणा ऐऱ्या गैऱ्या ऐवजी दत्तात्रेयानी ग्रामप्रमुख महाजनांकडून सेवा करून घेतली.
उत्सव आटोपल्यावर शांभू देसायाने एक गडी आणि येशा बरोबर पालखी परत पाठवली. बाणे वाडीच्या घाटीत मोडणावर येशाला ठेच लागली नी तो भेलकांडत आडवा पडला. सोबतच्या गड्याला भार पेलला नाही आणि पालखी धाडकन कोसळली. पालखीच्या दांड्याला जोडलेली एका बाजुची फुली पेचली नी दांडा मोडला. पालखीची जमिनीवर पडलेली बाजू जोरात आदळल्यामुडे कडेच नक्शीकाम मोदून त्याचे तीन चार तुकडे झाले. पालखी उभी करताना लावायचे शिपाई – लाकडी खांब पालखीतच आडवे ठेवलेले होते. त्यातला एक मोडला. पालखीची अशी दुर्दशा झालेली बघितल्यावर गडी भीतीने रडायलाच लागला. येशालाही एवढी जोरात ठेच लागली होती की त्याच्या ब्रह्मांडी कळ गेली नी तोही बोंबलायला लागला होता. त्यांचा आवाज ऐकून वादीतले बापये गोळा झाले. येशाचा आंगठा फुटून रक्तबंबाळ झालेला बघितल्यावर दोघानी त्याला उचलून वाडीत नेले. जाणत्या बापयानी पालखी सारखी केली. दोन्ही बाजुच्या फुल्या सोडल्या. नकसकामाचे मोडलेले तुकडे, मोडका शिपाई नीट पालखीत ठेवून चौघानी अगदी जपून पालखी उचलली नी वाड्यावर न्हेवून पोच केली. पालखीची दैना बघितल्यावर शंभूच्या अंगान पाणी उतरलं.
सदरा चढवून रुमाल न बांधताच शंभू सुतार वाडीत गेला. बाबल्या बाहेरगावी गेलेला होता.पण त्याचा भाऊ नारायण ह्त्यारं पाजळीत बसलेला होता. त्याला लगोलग सोबत घेवून आला. नारायणाला पालखी दाखवीत म्हणाला, “ तुमचा कसब पणाला लावून पालखी दुरुस्त करा. झालंतर दुप्पट रोज घ्या. पण चार रोजात काम पुर्ण व्हायला हवे. गोडशांचा निरोप येण्याआधी पालखी पोच व्हायला हवी. माझी अब्रू राखा..... पण नाही म्हणू नका,,,, ” नारायण सुतार बोलला, “देसाई शेठ, तुम्ही काय काळजी नरू नुका. बगणाराला कळनार पन नाय असा चोक्कस काम करून देताव..... देवळाच्या कामाच्या टायमाक आमका तुमचो अनभव हा.... मी जावन् न्हाऊन जेवण खाण करून वांग़ड घ्येवून बेगूनच येतो नी दोन रोजात सगळा येवस्तीशीर करून द्येतो..... ”(क्रमश:)