जया देव तारी - भाग 9 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जया देव तारी - भाग 9

जया देव तारी - भाग ०९

 कबूल केल्याप्रमाणे दुपारी  देसायांची वामकुक्षी होण्याआधी  नारायण गडी घेवून हजर झाला. मोडलेल्या नक्षीच्या तुकड्यात लोखंडी चोरे मारून मुळबरहुकूम  जोडकाम केले. सांध्यांमध्ये चंद्रूस भरून फटी बुजवल्या. दोन स्वस्तिके नव्याने बनवून ती जोडून मोडलेली बाजू पूर्ववत केली. दांड्याचा पेचलेला भाग कापून नवीन  तुकडा भरून दांडा उजू केला. एकफुली नवीन भरली. मोडक्या शिपाया ऐवजी सागवानी लाकडाचा नवीन शिपाई  बनवला. त्याचा माथा नी कडा यावर जुन्या नगाबर हुकूम नक्षी कोरली. मग कडू तेलाच्या दिव्याची काजळी धरून  ती पॉलीशात खलून  नवीन जोडकामाची  मूळ रंगा शी  छटा जुळवून सगळ्या पालखीलाच पॉलिशचा हात मारला. सगळं काम एवढं बेमालूम झालेलं होतं की, पहाणाराला  मोडलेली पालखी  धडावलेली आहे हे खरंच वाटलं नसतं. बोलल्याप्रमाणे घेमार करून चार दिवसात नारायणाने काम पुरं केलं. देसायाने बोलल्याप्रमाणे  तो नी वांगडी  दोघानाही  दुप्पट रोज देवून  वर आणि नारायणाला खुशी म्हणून पंचवीस रुपये दिले.    

           खोतीणीने  देसायाच्या मागे  येशाच्या लग्नाचा धोशा  लावला. दर चार दोन दिवसानी  तीचे टुमणे सुरू झाले. अगदी अवचितपणे देसायाला  नंबरबाज तोडगा सुचला. खोताच्या माघारी वारस  तपासाच्या निमित्ताने  मोक्याच्या मिळकती त्याने आपल्या नावावर करून घेतलेल्या होत्या. पण वाडा आणि घरभाट अद्यापी  खोतणीच्याच नावावर होते. येशाचे लग्न करून देण्याच्या बदल्यात अर्धा वाडा नी घरभाट आपल्या नावावर करून द्यायची अट  त्याने  घातली.  नाहीतरी  देसायाला  बाहेर काढणे  अशक्यच होते. अर्धा तर अर्धा वाडा घेवून  देसायाची  बैदा टळत असेल  तर टळूदे. आपल्या नदरेसमोर येशा तरी  मार्गाला लागेल असा विचार करून तिने होकार दिला. त्याप्रमाणे खोतीणीने  मामलेदारासमोर कागद करून  सही दिल्यावर शंभू  कामाला लागला. त्याने बाळगलेले आचारी  जेवणं करायला फिरत त्यांच्या बघण्यात भू कोतापूरच्या  आप्पा पाध्यांची  मुलगी होती. मुलगी काळी सावळी  कुरडी होती. पण अचरट येशाला चांगली मुलग़ी कोण देणार होता?  त्यानी दुसऱ्याच दिवशी  कोतापुर गाठलं.मुलीचा बाप तयार झाला. त्याला सोबत आणून शंभू  देसायाशी भेट घालून दिली. खोताचा वाडा नी बारदाना बघून आप्पा पाध्ये खुश झाला. मुलाशी  बोलाचाली झाल्यावर  तो साधा एकमार्गी  आहे असे त्याना वाटले. त्यानी मुलीचे टिपण देले. 

           पुढच्या गोष्टी  रितीप्रमाणे झाल्या. बापाची परिस्थितीती कंगाल असल्यामुळे लग्न हळयातच खोतांच्या खर्चाने करायचे ठरले. वऱ्हाडाचा येता जाता खर्च वेतही देण्याचे शंभूने मान्य केले. खोताच्या  इतमामात रस वड्याचे प्रायोजन घालून येशाचे लग्न लागले. लग्न लागले नी  आठवडाभरातच देसायाने  खायचे दात दाखवले.  येशाला वाड्याबाहेर काढून  अर्ध्या गोठ्यात  त्याला  बिऱ्हाड थाटून दिले. नेमस्त चार लोकाना पुरतील एवढी भांडी कुंडी  आणि बारामण भात दिले. खोताच्या माघारी गुरांचे खटले शंभूने   कमी केले होते. मधल्या चौकात  गताडी काढून मधोमध भिंत घालून गोठा दुभाग केला. दोन बुभत्या गाई नी  एक म्हैस येशाच्या वाट्याला आली.  खोत मेल्यावर खोतणीने आपले सगळे दागिने उतरून ट्रंकेत ठेवलेले होते. येशाच्या लग्नात मंग़ळसूत्रासाठी  दोन तोळ्याची एक पुतळी , नथ, नी मोहन माळ एवढाच ऐवज तीने सुनेच्या अंगावर घातलेला होता. वेगळेचार झाल्यावर गोठ्यात मधल्या खणात बाजल्याखाली  तिची ट्रंक ठेवलेली होती.  

           लग्न झाल्यावर ज्येष्ठात सून माहेरी गेल्यावर  दुपारी  सामसूम झाल्यावर खोतणीने ट्रंक उघडली. आत एक जुना कद, धाबळी, चांदीची  वेढणं नी पैंजण एवढेच नग होते. बाकीचा सगळा ऐवज लंपास झालेला होता. खोतणीच्या डोळ्यापुढे काजवे चमकले. बराच वेल शून्यात नजर लावून ती बसूनच  होती. येशाने चुलीवर चहाचे आढण चढवून आयशीला हाक मारली तेव्हा ती भानावर आली . ट्रंकेचे झाकण लावून कुलूप न लावताच  खाटेखाली ढकलून ती स्वयपाक घरात गेली. घशाला कोरड पडली होती. घटाघट तांब्याभर पाणी प्याल्यावर ती सावध झाली नी त्यावेळी तिला रडू फुटले. गडवीत पायरीवर बसून वाड्याच्या दिशेने तॉं करून  कडा कडा बोटे मोडून शंभूच्या नावाने कानडीतून चरचरा शिव्यांचा पट्टा   सोडला. येशाला एरवी कानडी येत नसले तरी  शिव्या म्हायती होत्या. आयशीचे एवढे काय बिनसले तेच त्याला कळेना. त्याने चाहाचा कप न्हेवून तिच्या समोर ठेवला. पण खोतणीने तिकडे  ढुंकूनही बघितले नाही. बाजुलाच रहानार्‍ए दोन्ही आचारी त्यांच्या बायका येवून बसल्या. त्यानी  चौकशी केल्यावर  “मसण्या संभ्याने   अर्धावाडा  सांगून माझा  आंग़ठा घेतलान नी पुरा वाडा  गिळलान.... त्यानेही पोट भरले नाही म्हणून माझ्या नकळत माझी ट्रंक उघडून  माझी टिक्का, पुतळ्याची माळ, गोठ पाटल्या, बाजूबंद, आंग़्ठ्या,वळी , माझ्या नवऱ्याची  सर्पोळी  सगळा सगळा ऐवज लांबलान....... मेल्याचे तळपट होईल ” असे सांगून तिने पुन्हा हंबडा फोडला.  आलेल्या बायानी तिची समजूत घालून थंड झालेला चहा तापवून आणून तिला बळे बळेच प्यायला लावला  नी त्या उठून गेल्या. विरड भर तिचे  रडणे नी शिव्याशाप देणे खळले नाही. 

                   चार पाच दिवस खोतीण सैरभैर झालेली होती. धड जेवी खाईना. सारखी शंभूच्या नावाने शिव्या घालीत रडत ऱ्हाई. येईल जाईल त्याला देसायाना आपल्याला फसवून वाडा कसा गिळंकृत केला, आपली ट्रंक फोडून आपले स्त्री धन कसे लांबवले ही थविका सांगत राही. आठवडाभराने  ती भ्रमिष्ट झाली. आपण कोण काय याचेच तिला विस्मरण होई. बाळ्पणच्या आठवणी मध्येच मराठीत मध्येच कानडीत सांगत राही. एकदोन वेळा तंद्रित बाहेर पडून बाणेवाडीच्या घाटीला लागली. वाडकऱ्यानी  चौकशी  इल्ल दुंडरू कल्ल सुंडरू  कानडीतून काय कायबडबदायला लागली. ती हल्ली भ्रमिष्ट झालेली आहे ही वदंता होती. वाडीतल्या बायकानी तेला घरी आणून पोचवलेनी. आता तेच्यावर लक्ष ठेवणे हे घरच्याना एक नवीनच व्यवधान झाले. त्याच दरम्याने येशाला मुलगा झाला.(क्रमश:)