लिंग्या गुरवाला लॉटरी लागली भाग 1
कालवीतून टेंबवलीत जाणाऱ्या रस्त्यावर भिड्यांच्या घराकडून जरा पुढे गेल्यावर मळे जमीन सुरू व्हायची. तिथे सड्यावरून आलेल्या व्हाळावरची मोरी ओलांडून जरा पुढे गेलं की जवळ जवळ दीडेक फर्लांग अंतरा पर्यंत गोड्या पाण्याची प्रचण्ड मोठी गोड्या पाण्याची कोंड पसरलेली होती. कोंडीत बारा महिने पाणी असायचं. ऐन उन्हाळ्यात कोंडीत कमरभर पाणी असायचं. पूर्वी तिथे फक्त पांढरी कमळं असायची. पण पराडकरांच्या सुनेन कुठून कुठून शोधून लाल नी तांबड्या कमळांचे कंद आणून टाकलेन. सात आठ वर्षात त्यांच बियाणं पसरलं. आता बारमास लाल ,निळ्या, पांढऱ्या कमळानी कोंड भरलेली असायची. कोंड शेवटली की तिथून डाव्या अंगाला दरड सुरू व्हायची. त्या कोपऱ्यावर ठेंगू मुळमाचं घर होतं. मग घाडी वाडी सुरू होई नी वाडीच्या टोकाला लिंग्या गुरवाचा चौसोपी वाडा होता. सहा पिढ्यांमागे गावच्या वीर भद्रेश्वराच्या पूजेसाठी दापोलीकडच्या कुठच्याशा गावातून लिंगायत गुरव गावात आणून त्याला ईश्वराच्या ईनामतीपैकी खंडीभर भात पिकेल एवढी खरी दिलेली होती.
सुरुवातीला गुरवाला राहण्यासाठी वीर भद्रेश्वराच्या देवळा शेजारी धर्मशाळेला लागून दोन खण बांधून दिलेले होते. हे लोक शिवभक्त असल्यामुळे पुरुष मंडळी गळ्यात चांदीचे लिंग दोऱ्यात ओवून बांधित असत म्हणून त्याना लिंग बांधलेले अशा अर्थाने ‘लिंग्ये ’ किंवा ‘लिंगड्ये’ गुरव म्हटलं जायचं. कुळवाड समाजात देव देवस्कीची कामं सांभाळणारे लोक , त्यानाही गुरव म्हटलं जाई. ते कुळवाड गुरव नी लिंगायत गुरव यांच्यातला फरक ओळखण्यासाठीही लिंगायत गुरवाना जानपद समाजात लिंग्ये / लिंगड्ये संबोधलं जाई. ही कुचेष्टा किंवा टिंगल नव्हती. जानपद समाज सरसहा लंगड्या, टकल्या, मोना असा उल्लेख करीत त्या मागेही संबंधिताचं व्यंग काढणं हा उद्देश नसे. एकाच हरी या नावाचे दोन इसम असले तर एक टकल्या/ लंगड्या/ ठेंगू/ उंचाड्या/ काळा/ गोरा/ दाढीवाला/ मिशयाळा / चकण्या असा शारीर विशेषानुरूप संबोधला जाई नी संबंधितालाही त्यात काही गैर आहे असं वाटत नसे.
श्रावणात दर रविवारी आणि महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी गुरव मोठं पोतं भरून बिल्वदलं घेवून गड्या सोबत गावभर फिरून बेल घालायचा. गावकरी त्या बदल्यात अच्छेरभर तांदूळ घालीत. गाव फिरून पुरा होई तेंव्हा गुरव नी त्याच्या सोबतचा गडी डोक्यावरच्या ओझ्याने दमगीर होवून घर गाठीत एवढे तांदूळ जमत असत. श्रावणात दर सोमवारी बहुसंख्य घरातून देवाला नैवेद्याचे पान वाढायची प्रथा होती. दुपार नंतर गुरव टोपला घेवून गावभर फिरून नैवेद्याची पाने जमवून देवळात जायचा. देवाच्या गाभाऱ्या समोर नैवेद्याचा टोपूल थेवून गाऱ्हाणे घातल्यावर एक पान मंदिराबाहेर जैनाच्या गोट्यासमोर देवाला मानवून गुरव टोपूल घेवून घरी जाई. गुरवाच्या घरातल्या ४/५ माणसांपुरते अन्न ठेवून उरलेला टोपला घाडी वाडकराना दिला जाई. गावातले मानकरी भिडे , मराठे, देसाई यांच्या घरातून तर देवाला बारमास दुपारचे नैवेद्याचे पान द्यायची प्रथा होती. त्यासाठी स्वतंत्र पैरे (कामवाली) मुक्रर करून तीन्ही घरचा नैवेद्य देवळात पोच केला जायचा.
कार्तिक्या नवमी पासून टिपऱ्या पौर्णिमेपर्यन्त देवाचा उत्सव होत असे. त्या काळात रोज रात्री पुराण नी किर्तन व्हायचे. उत्सवा पूर्वी देवाचा मुखवटा पालखीत ठेवून गावभर बारावाड्यांमध्ये देवाची फेरी व्हायची. दुपारनंतर पाचसहा खांदकरी . ढोल ताशा घेतलेले वाजपी नी गुरव पालखी घेवून बाहेर पडत सुरूवात मुख्य मानकरी मराठे यांच्या घराकडून व्हायची नी गावरूढी प्रमाणे एकेक वाडी घेतली जाई. वाडीत ठरलेल्या जागी पालखी ठेवल्यावर गुरव मोगर्शिंग वाजवून वर्दी देत असे. मग वाडीतली झाडून सगळी माणसं पाया पडायला येत. यावेळी जमणारे पायापडणीचे तांदूळ, नारळ नी पैसे यावर गुरवाचा हक्क होता. खांदकरी नी वाजपी एकेका वाडीतून आळीपाळीने दिले जात. देवस्थानाच्या सेवेत चांगली मिळकत होत असल्याने गुरव वधारला. मुख्य मंदिराच्या ओवरीत आकारी ब्राह्मण आणि लक्ष्मी नारायण यांची दोन लहान देवळे होती. आकारीच्या देवळात घाडी गुरव कौल प्रसाद घेत. लिंगायत गुरव देवस्थानात आल्यावर हळू हळू त्यानेही कौल प्रसाद घ्यायचे काम सुरू केले. येणारा माणूस त्याच्या इच्छेप्रमाणे घाड्याला किंवा लिंगायताला आपल्यासाठी प्रसाद घ्यायला सांगे.
तीन पिढ्यांनंतर विठलिंग गुरवाने कमळ कोंडीच्या बाजूला घाड्यांपैकी आगर विकत घेवून तिथे किराणा मालाचे दुकान सुरू केले. गावात कुळीथ, चवळी, वाल, मूग, उडिद आणि उन्हाळी मिरची मोठ्याप्रमाणात पिके. लिंग्या गुरव कडदण नी मिर्ची यांची घावूक खरेदी करून तो माल फोंडा, कणकवलीच्या बाजारात नेवून विकी. त्याचा व्याज बट्ट्याचाही धंदा होता. पावसाळ्यात गरजूना सवाईने भात, तांदूळ उसनवार देई. त्याकाळी वावशेर, अच्छेर, पायली, कुडव अशी लाकडाची आयदणं बनवून ती वापली जात. त्याना ‘फरा’असं म्हणत. या मापांच्या माथावळीला कडणी तडकू नयेत म्हणून तांब्या पितळेच्या पातळ पट्ट्या बसवलेल्या असत. (क्रमश:)