लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - भाग 3 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - भाग 3

लिंग्या गुरवाला लॉटरी लागली  भाग 3 

मुळात लाख म्हणजे किती हे त्याला तरी कुठे माहिती होतं. दोन दिवसानी  लोके मास्तर मासे घ्यायला आले तेंव्हा राधेला अकस्मात आठवलं  नी तिने त्याना विचारलं. त्यानी मग शंभराच्या शंभर नोटांचं एक बंडल अशी  दहा बंडलं म्हणजे एक लाख होतात. गावतले लिंगायत नी  देसाई  या असामीना गावात लाखे  सावकार म्हणत. तो संदर्भ दिल्यावर  लाख रुपयाचं मोल राधेच्या लक्षात आलं. “ बाय माज्ये... लाटरीच्ये इतके पैशे भेटतत काय...... मी चार रोजामागे टिकीट काडलीहा......  माजो जल्म एकादशी रोज झालो  तोच आक्डो मी घितलल्या टिकीटीवर हा.  म्हंज्ये बवतेक माका भक्षिस मिळात आसा माका वाटता हा......”  तीने  लोके मास्तराना आप्ण कां चौकशी करतोय् ते भावर्ठी पणाने सांगून टाकले. मास्तर हसले....”अस्स काय..... लागात लागात ... देव करो नी तुका लाटरी  लागॉने ,,,” 

                   निकाल लागायला अजून वीस दिवस अवधी होता. पण राधेला काही थोप निघेना. ती दर दोन तीन दिवसाआड  अकरा तारखेला नक्की  निकाल लागेल ना? सरकार तारीख बदलणार नाहीना याची  भल्या लिंगायताला  विचारून खातरजमा करून घेई. निकालाचा दिवस आठवडाभरावर आलेला असताना कोणीतरी  तोडगा सांगितला म्हणून तिने ग्रामदेव वीर भद्रेश्वर, गावदेवी  पावणाई  नी  त्यादिवशी शनिवार होता म्हणून मारुतीच्या देवळात जावून रोज अकरा प्रदक्षिणा घालायचा नेम सुरू केला. अकरा तारीख उजाडली. सकाळी म्हावून धुवून तिकिट घेवून तिने भल्या लिंगायताचे दुकान गाठले. दुपारी दहाच्या देवगड तळेबाजार व्हायाटेंबवली गाडीवरून  पेपर येईल तेंव्हा  निकाल समजेल असे सांगून भल्याने तिला वाटेला लावले.  राधे खट्टू  होवून घरी गेली. दहाची गाडी  कधीच टायमावर सुटत नसे ती दुपारी  बारा साडेबारा पर्यंत कधीही सुटे नी  एक गीड्च्या सुमाराला टेंबलीत येई. राधे अकरा वाजताच मांडावर जावून गाडीची वाट बघित राहिली.  दीडच्या सुमाराला गाडी आली. भल्याचा गडी  पेपर घ्यायला आलेला होता. त्याच्या बरोबरच राधे भल्याच्या दुकानात गेली. जेवण वेळ असल्यामुळे  दुकानात एकही गिऱ्हाईक नव्हते. भल्या पोट खाजवीत  घरातून जेवणाची वर्दी कधी येते याची वाटच बघित होता. राधेने  लगबगीने पुढे जावूज  पदराच्या शेवाला बांधलेली तिकिटाची घडी अच्चळ काढून भल्याकडे दिली. 

           भग्याचे गल्ल्याच्या टेबलावर्ची चाळीशी डोळ्याना लावून  तिकीट हातात धरून पेपरातल्या निकालाच्या कोष्टकाशी ताडून बघितले . पहिल्या क्रमांकाचा नंबर ढळढळीत टाईप मध्ये चापलेला होता. AP 274411. राधेच्या तिकीटावर  तोच नंबर बघितल्यावर तो चपापला. पण चेहेरा पाडून च्यक् च्यक्  करीत मुंडी हालवीत  त्याने सिरीज  आणि नंबराचा एकेक आकडा नीत पडताळला . क्षणभर डोळे मिटून राधे गाबतिणीला कसे गंडवायचे हे योजून चाळीशी नाकाव्र ओढीत  वरच्या फटीतून राधेकदे बघीत आंबट तोंड करीत त्याने तिकीत चुरगाळल्या सारखे करून बाजुला फेकीत तो म्हणाला, “ तुज्ये तिकीटाचे पैशे फुकट गेले. तुजो नंबर नाय हा.....” राधे मोठी आशा धरून होती . भल्याचे शब्द कानात पडल्यावर तिच्या पायाखालची वाळूच सरकली . “शिरां पडो त्ये लाटरीवर ...... मी अगदी मोट्या  आशेर हुतंय.  माजो जलम येकादशीचो, माज्या तिकटीर  शेवटाक तोच आकडो हा... नी आज तारीक पन अकरा हा ...म्हनान माका काय नाय काय भक्षिस मिळात अशी आशा हुती ...प्न माज्या पदरात निरूस्पान इला.... ” नी राधे हुंदके देवून रदायला लागली. राधेने जे सांगितले ते ऐकून भल्याला कापरी भरली. त्याने बायकोला हाक मारून बाहेर बोलावले आणि राधेला आत नेवून गोळाबर अन्न घालायला सांगितले.  

         राधे आत गेल्यावर त्याने फेकलेल्या तिकीटाचा बोळा उचलून तिकीट सप्पय करून ते गल्ल्यात एकदम तळी ठेवले. ड्रॉवरला असलेले आंगचे कुलूप फिरवून चावी खिशात टाकून रोजच्या शिरस्त्या प्रमाणे दुकानाच्या दोन फळ्या आड करून तो घरात जेवायला गेला. बाया माणसानी समजूत घातल्यावर राधेच्या दु:खाचा कड आवरला. सकाळ पासून उपाशीपोटी फिरून जीव कलकलला होता. ती मागिलदारी मांडलेल्या पत्रावळी समोर बूड टेकून भाताच्या ठायातले  कडेचे ढिकूळ मोडून त्यावर कालवण ओतून बचक्या एवढे गोळे कोलसवीत कोलसवीत जेवायला लागली. “तेका कालाण- भाजी काय व्हायानुको सोयन् बग..... दोपारच्या टायमाक बापडी गरीब गाबतीण कोनच्या रुपान इली आसात जाना कोन.....” भल्याने बायकोला तंबी दिली. त्याचे जेजेवण झाल्यावर तो बाहेर जावून खाटल्या वर टेकून पान जमवायला लागला.आपलं पान खावून झाल्यावर पानाची चवड , त्यावर मूठभर तंबाखू नी  साताठ सुपारीची खांड राधेला न्हेवून दिली. राधेने जेवल्या जाग़ेवर शेणाचा बोळा फिरवून हात धुवून ती आत आली नी इतकी पानसुपारी दिलेली बघून अजाब करायला लागली. 

         थोड्याच वेळात तिकीटं घेतलेली कोण कोण लोक निकाल बघायला येवू लागले. आलेले लोक तिकीट नाय लागल की ते चुरगळून तिथेच टाकीत नी माघारी जात. आता दुकान उघडायचा टाईम झाला नी दोन्ही गडीही आले. त्यांच्या पाठोपाट सदू टुकरल तिकीत घेवून आला त्याला पन्नास रुपये बक्षिस लागलं. त्याच्या सोबत असलेल्या दोघाचौघांपैकी एकजण चार यत्ता शिकलेला होता. त्याने पेपरात बघून खात्री करून घेतली नी बराबर म्हणून मान डोलावल्यावर सदूने ते तिकीट भल्याकडे देवून त्याच्या कडून पन्नास रुपये घेतले. त्याच वेळी राधे गाबतीण जायला निघाली. भल्या लिंगायताने “ह्या नाय फुडच्या टायमाक तुका नक्की भक्षिस लागात चार रोजानी फुडच्या लाटरीची तिकीटी भेटती. ह्ये ठेव तुका....” म्हणत वीस रुपये तिच्या हातावर टेकवले. संढ्याकाळ पर्यंत तिकीटे घेतलेले झाडून सगळे लोक  येवून गेले. त्यांच्या पैकी सुलेमान होडीवाल्याला अडीजशे नी सखू पडवळणीला हजार रुपयाचे बक्षिस लागलेले होते.(क्रमश:)