लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - अंतिम भाग 4
राधे घरी गेली. तिला बघितल्यावर शेजारणी विचारायला आल्या. राधेला पुन्हा रडायला आले. तिने रडत रडत सगळी हकिकत सांगितली. संध्याकाळ पर्यंत पुऱ्यागाबतडीत वार्ता पसरली. एक दोन बेरकी माणसानी शंका काढली. खर्कट्या हाताची शितं चाटून मगच कावळा हाकलणारी महा कंजूष लिंगायताची जातकूळी. त्याने राधेला जेवायला घातले. भरपूर पांसुपारी देवून वर आणि रुपये वीस तिच्या हातावर टेकवले ते सुखासुखी नाहीत. यात कायतरी पाणी मुरतंय, अशी शंका आल्यावर त्यानी राधेला भेटून कसे कसे काय काय झाले ते खोदून खोदून विचारून घेतले. “तू टिकीट वापिस कित्या घितलंस नाय? टिकीट आसती तर आमी कोनीतरी पुन्ना जावन् बगितलंव आसतंव. तो मानूस म्हंज्ये गुवातलो पैसो दुकू धोवन घेनारी अवलाद ... तेना बिनकारणी तुका वीस रुपये कशे काय दिलान ह्येचा अजाब करतंव आमी नी म्हनूच आमका शक खाता ....... ” आता राधेला ही काय सुधरेना. ती त्याच पावली तिकीट मागून आणायला भल्याच्या दुकानाकडे जायला निघाली.
राधा दुकानात गेली तेंव्हा सांजावत आलेलं होतं. संध्याकाळी दुकानात खूप गर्दी असायची. तीने दुपारी देलेले तिकीट वापीस मागितल्यावर आधी भल्याने काहीच लक्ष दिले नाही, पण ती रडा भेकायला लागल्यावर तिची ब्याद एकदाची टळू दे , म्हणून कातावत, “आता गार्दीच्या टायमाक सुदरला तुका ? जरा आदी इलं आसतस तर काय बापूस म्येलो आसतो काय तुजो ” म्हणत तो उठला आणि मागच्या बाजुला पडलेली चार तिकीटे उचलून तिच्यापुढे टाकीत “ ही घी, ह्येतू तुजी खयची टिकीट हा ती तूच सोद नी घी ” आपल्या तिकीटाचा पिवळा रंग तिच्या ध्यानात होता “माजी टीकीट हळदया रंगार हुती. नी ती खोलून बोळे करून टाकला हुतास तुमी....ह्येतू ही दोन निळी नी याक तांबडा नी ही दोन खैची येगळ्याच रंगार हत ..... ह्येतू माजी टिकीट नाय हा.....” तिचा पाडकपणा लक्षात येवून भल्या मनातून ज्याम भडकला होता. पण तिला कायतरी मथवून वाटेला लावता येणार नाही हे ओळखून तो नाइलाजाने उठला. तिचे वर्णन ऐकल्यामुळे याखेपी तो सावध झालेला होता. त्याने पाठमोरा होत पिवळ्या रंगाचे तिकीट उचलून त्याचा बोळा करून तो उलडीत तिच्यासमोर ठेवून म्हणाला ,“ ह्यां बग तुजाच काय? ” तिकीटाचा रंग बघून तेचं समाधान झालेलं होतं. व्हाय व्हय ह्याच सा वाटता म्हणत तिने त्याची घडी करून पदराच्या शेवात बांधली नी ती निघून गेली.
ती घरी पोचली तेंव्हा काळोख झालेला होता. शेजार्ची चार पाच जणं तिची वाट पहात ओसरीवर बसून राहिलेली होती. तिने साण्यातला टुका उचलून आत न्हेला, चुलीतलं शेळकुंड चुलाणाच्या कडेवर घसटून त्यावर फुंक मारून ज्वाळ उठल्यावर टुका पेटवला. बाहेर येवून पदराच्या शेवाला बांधलेले तिकीट काढून त्याच्या घड्या उलगडून दाखवीत ती म्हणाली . ही माजी टिकीट.... दुकानात सांजवानची लय गर्दी मेलो माज्यारी लक्षच देय नवतॉ. मी पिच्चा पुरवल्यावर आदी खैची नुको ती टिकीटी दिलान. पन माज्या टिकीटीचो हळदिवो रंग माज्या ध्येनात हुतो. मग बाय कायकाय करून माजी टिकीटी दिलान माका.” ती हे बोलत असताना तिचा नातू पुढे आला. ते तिकीट उजेडासमोर धरीत त्याने नंबर वाचला. तिच्या तिकीटाचे शेवटचे नंबर त्याच्या लक्षात होते.
“ आज्ये ही तुजी तिकीट नाय तुज्या तिकीटीत शेवटाक सात नी मग्ये अकराचो आकडो हुतो . तां ह्या तिकीट नाय ह्या खयचा येगळाच तिकीट दिसताहा.....” त्याचं हे बोलणं ऐकल्यावर तिच्या तिकीटाला बक्षिस लागलेलं असणार म्हणून भल्याने नक्की लबाडी करून ते आपल्याकडे ठेवलेलं असणार ही सगळ्यांची खात्रीच पटली. वाडीतल्या जाणत्यांच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर साताठ जण राधेला सोबत घेवून लिंग्याला जाब विचारायला गेले.
त्यांचं बोलणं ऐकल्यावर भल्याने खाली पडलेली लोकानी टाकलेली तिकीटं पुंजावून मंडळीच्या पुढ्यात टाकली. त्यांच्यात दोघेजण वाचन येणारे होते. त्यानी सगळ्या तिकीटांवरचे नंबर बघितले. त्यात शेवटी अकरा नंबर असणारं तिकीट काही मिळालं नाही. त्यानी तसं सांगितल्यावर भल्या म्हणाला, “आता ह्येतू मी तरी काय सांगणार?”
त्यावर एकजण बोलला“त्ये नंबराच्ये तिकीटीक भक्शिस आसनार म्हनून तुमी लाबाडी क्येलास असो रादेक शक हा.... तेका फसवल्यार तुमका चुकल्यासारा झाला म्हनू तुमी तेका वीस रुपाये दिलास असां वाडीतल्यांचा म्हणणां हा.....आता ह्या खोटा आसतातर रादेची अकराचो आकडो असलेली टिकीट मिळाली आसती ना? ती मिळाली नाय म्हंजे तुमी ती उकलून ठेवलेली आसनार असो आमकापण शक हा.....” आता मात्र भल्याच्या अंगाचा नुसता तिळपापड झाला. ही बाचाबाची ऐकून त्याच्या घरातली माणसंही एकामेळान येवून आलेल्या लोकाना दमदाटी करायला लागली.
आता भल्यालाही जोर चढला. “ ह्या लय झाला. आता बऱ्या बोलान उटोन चलोक लागा. दोपारच्या टायमाक ही रांडमुंड बाई माज्या दारात रडोक लागली म्हंताना माका तेची दया इली म्हनू मी तेका अन्न घतला. तेचे हपाप नुको म्हनू रुपाये वीस काडून दिले. ह्ये उपकार फेडूक तुमी मेळ करून माज्या दारात येवन् माकाच धमक्यो देतास? मी पोलिस केस करनार..... ” ही मात्रा लागू पडली आणि माणसानी काढता पाय घेतला.
राधे संतापून बोटं मोडीत रडत भेकत म्हणाली “मी राण्ड मुण्ड बाई.....तू मोटो डांबीस हस. माजा भक्शिस खावसाटना तु माजी तिकीट बगल्यावर फेकल्यासारा नाटाक क्येलस.... तुका माजे हपाप भोवल्याशिवाय ऱ्हाणार नाय. ” महिनाभर गेल्यावर भल्या लिंगायताने गपाचुपीत तालुल्याच्या बँकेत तिकीट जमाकरून बक्षिसाची रक्कम घेतली.
लाखाचं बक्षिस ही त्याकाळी मोठी खळबळ जनक आणि अपूर्वाईची सनसनाटीची घटना असल्यामुळे लपून थोडीच रहाणार? बँकेतल्या लोकांमुळे ही गोष्ट बोलबोल म्हणताना षट्कर्णी झाली नी चार दिवसानी तालुक्यातून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक पेपरमध्ये “ भलुशेठ लिंगायत याना लाखाची लॉटरी लागली ” या मथळ्याखाली ठळक टाईपमध्ये बातमी छापून आली. पेपरात आलेल्या बातमीत बक्षिस मिळालेल्या तिकीटाचा नंबरही छापून आलेला होता. गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांकडे पेपर येत असे. राधे गाबतीणीशी झालेल्या बाचबाचीमुळे तिकीटाची भानगड आधीच गावभर झालेली होती. आता पेपरात बातमी छापून आल्यावर लिंगायताने केलेली मखलाशी शाबीतच झाली नी गावाच्या इतिहासात एका नव्या खणकथेची भर पडली. (समाप्त)
※ ※ ※ ※ ※ ※ ※ ※