लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - भाग 2 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - भाग 2

लिंग्या गुरवाला लॉटरी लागली भाग 2  

लिंग्या गुरवाकडे  माल द्यायची नी  घ्यायची  मापं वेगवेगळी असत. खरेदी किंवा उसनवारी परतफेड मापून घ्यायला केलेल्या मापाच्या  माथावळीला दोन-  दोन आंगळं रुंद  पितळी  पट्ट्या बसवून फऱ्याची  उंची वाढवलेली असे. साहजिकच त्यात किमान अच्छेरभर धान्य जादा मावत असे. विठलिंगाला एवढी बरकत आली की म्हातारपणी त्याने टोलेजंग सातखणी  चौसोपी वाडा बांधला. लिंग्या गुरवाचे दुकान म्हणजे जवळ जवळ व्यापारी पेढी  सारखं खटलं  होतं. सिझनल नारळ, सुपारी, रातांब्याची सोलं, रातांब्याच्या बिया, रिंगी, काजू बिया  हरतऱ्हेची  खरेदी  केली जायची. कुटूंबातला एखादा बापया  देवस्थान सांभाळी  आणि बाकीचे बापये नी  बायका माणसंही दुकान सांभाळीत. 

            स्वातंत्र्या नंतर  तराजू नी लोखंडी मापं आल्यावर जुने फरे मागे पडले. लिंग्या ताजव्याला पासंग बांधून मापात पाप करी. तराजूची दोन्ही पारडी  वजनाने समसमान उजू करण्यासाठी कमी वनाच्या पारड्याला  लोखंडी शिगेची गोलाकर वळी   हुकात गुंतवून बांधीत त्याला  –पासंग’ म्हणत. लिंगड्या मोठ्या खुबीने माप तोडण्यासाठी त्याचा वापर करी. उलट वस्तू खरेदी करताना पासंग लावलेला हूक विरुद्ध पारड्याला लावून जादा माल लाटला जात असे.  मिर्ची, कडधान्य यांची  पोत्यावारी घावूक खरेदी करताना  एखादा हुषार विक्रेता लिंग्याची ख्याती जगजाहीर असल्यामुळे माप करण्यापूर्वी  रिकामी पारडी उजू करून दाखवायला लावीत असे. पण लिंगड्याची औलाद मढ्याच्या टाळवेवरचं लोणी  खाणारी बिलिंदर! मोठं मोजमाप करायच्या ताजव्याना पारडी म्हणून लाकडाची   फळकटं  वापरीत.   त्या तराजूच्या वजन टाकायच्या  पारड्याला एका बाजूला कमरेत बांधायच्या  काळ्या गंड्याचा हातभर तुकडा बांधलेला असे.

                 माप करायच्या त्या खोलीत पुरेसा उजेड नसल्या मुळे पारड्याला बांधलेला गंडा  बिलकूल उमगत नसे. पारड्यात लोखंडी माप टाकताना लिंग्या गुरव किंवा त्याचा गडी  गंड्याचं टोक पायाच्या आंगठयाला गुठाळून ठेवायचा. माप करताना  वजनाचं पारडं  वर जातस वाटलं  की त्या मोक्याच्या वेळी आंगठ्याचा गंडा खेचून ते थोपवलं जाई नी  पाचसहा रत्तल अधिकचा माल पदरात पाडून घेतला जाई. काही  जाणते लोक घरी किंवा शेजारी पाजारी  ताजव्यावर मोजून शहानिशा करून वस्तू आणीत पण लिंगड्याकडे माप करताना घरी केलेल्या वजनात हमखास बरीच तूट येत असे. पण फसवणूक नेमकी कशी होत आहे याचा काहीच अंदाज न लागल्यामुळे गिऱ्हाईक बापडे रंजीस होत असे. वस्तू नगावर खरेदी करताना लिंगायत  पक्का डझन नी पक्का शेकडा ही  भाषा वापरीत. पक्का डझन म्हणजे  बारा नग मोजून त्या बाहेर दोन नग जादा नी पक्का शेकडा म्हणजे शंभर नगांबाहेर दहा नग जादा घेत असे. “ नाशिवंत वस्तू.... बगताना भायरसून चांगली दिसता पण भुतू कशी आसात कोणी बगली? मज्याकडसून वस्तू घेताना गिराईक चांगलो नग घेनार..... वायट् ते माज्या गळ्यात पडणार. दुसरा म्हंज्ये सगळो म्हाल खपात ह्येची काय शाश्वती नाय. तुमी माज्याकडसून पैशे घेवन् मोकळे..... नाय खपली  ती वस्तू माज्या गळ्यात पडनार नी माका खोट येनार” हे तत्वज्ञान तो वस्तू विकायला आलेल्याला सुनवून दर पाडून आणि जादा नग पदरात पाडून घेत असे, घेतलेल्या सामानाचा हिशोब कालोकालो भविष्याती , न्यायाने वर्ष सहा महिन्याने तीन चार खेटे मारल्यावर मिळायचा. 

        १९ ७० च्या दरम्याने  राज्य लॉटरी सुरू झाली . तेंव्हा भल्या लिंगायताने आपल्या दुकानात तिकिटं विकायला सुरुवात केली. त्याला असं धार्जिणं की दर सोडतीमेध्ये त्याच्या कडच्या  तिकीटांमध्ये  दोघा तिघाना हुकूमी काहीना काही बक्षिस मिळायचं. दोन तीन खेपाना  न खपलेल्या पंधरा वीस तिकीटाना  दोनशे, पाचशे रुपये बक्षिसं फुटली. तालुक्याच्या पेपरमध्ये या बातम्या हमखास यायच्या त्यामुळे आजूबाजूच्या गावानी भल्या लिंगायताच्या लॉटरी सेंटरचा  बोलबाला होता. गोरगरीब लोक आशेने ऐपत नसतानाही भल्याकडे एक दोन तिकीट घ्यायचे. मूळ बांधावरच्या  दोन गाबतिणी  त्याच्या दुकानाजवळ मासे विकायला बसायच्या. एकदा भल्याकडे  जानू टुकरुलाला पाच हजाराची लॉटरी लागली .गावात त्या गोष्टीची मोठीच चर्चा झाली. त्यामुळे मासे विकणाऱ्या गाबतिणीनीही  एकेक लोटरीचं तिकीट घेतलं. राधे गाबतिणीने घरी गेल्यावर ते तिकीट देवापुढे ठेवलं. तिच्या हमदाऱ्यात दिलेल्या मुलीचा नातू  सातवी पास झाल्यावर  हायस्कूलात जाण्यासाठी  तिच्याकडे रहायचा. त्याने कुतूहलाने ते तिकीट बघितलं. 

                  लॉटरीचं बक्षिस कसं ठरवतात याची  राधे गाबतीणीला कायच माहिती नव्हती. तिने हे  विचारल्यावर  शाळकरी नातवाने तिला तिकीटाकरचा नंबर वाचून दाखवला. त्यात शेवटी अकरा हा आकडा होता. तसेच  निकालाची  तारीख अकरा एप्रिल  होती  हे ही  नातवाने सांगितले.  ते ऐकून राधे म्हणाली, अकरा म्हंज्ये येकादस. माजो  जलम  माघ्या येकादशीक झालेलो हा. मी कळत्या वयापास्ना  येकादस धरतंय.... म्हंज्ये ह्येका  हजार हिश्शान भक्षीस  लागनार. पहिल्या नंबराला लाखाचं बक्षिस म्हंज्ये किती नोटा हे ही तिने नातवाला विचारलं. राधेची समज पडेल असं स्पष्टीकरण नातवाला देता आलं नाही.  (क्रमश:)