विलक्षण - 7 Balkrishna Rane द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विलक्षण - 7

विलक्षण ७

(झुंबर आपल्या डोक्यावर पडले असते तर!या विचाराने तो खूप घाबरला होता.तो तिथून निघून आपल्या खोलीत गेला.)पुढे........     त्या रात्री त्याला स्वप्न पडलं दोन शुभ्र हात त्याच्या गळ्याच्या दिशेने येताहेत आणि त्याचा गळा दाबताहेत.तो घामाघूम होत जागा झाला.तो एवढा भेदरला होता की आजूबाजूला बघायचही धाडसही त्याला होईना.त्याने डोक्यावर चादर ओढून घेतली व झोपण्याचा प्रयत्न करू लागला. आपण दरवाजा खरच बंद केला का हे पाहण्यासाठी त्याने चादर दूर करत दरवाज्याकडे पाहिले.तिथे एक धूसर पारदर्शक आकृती उभी होती.तिचे हात हळुहळू त्याच्या दिशेने सरकू लागले.ते लांब झालेले हात अगदी त्याच्या गळ्यापर्यंत पोहचले.भितीने सूर्यकांत ओरडला पण त्याचा आवाज बाहेर पडला नाही.घशातच गुरगुरल्यागत आवाज आला व तो बेशुद्ध पडला.सकाळी जाग आली तेव्हा पहिल्यांदा त्याचा हात आपल्या गळ्याकडे गेला. तिथे त्याला वळ उमटलेला दिसला.उठून त्याने आरशात पाहिले तर तिथे एक लालसर पट्टा उमटला होता.खोलीत थांबायचीही त्याला भिती वाटू लागली.तो दरवाजा उघडून बाहेर पडला.तर उंब-याच्या बाहेर त्याला लाल ठिपका असलेले पावलांचे ठसे दिसले. ते मेंदी लावलेल्या पावलांचे ठसे होते .या वाड्यात मेंदी फक्त गौरीच लावायची.म्हणजे काल खोलीत गौरी आली होती का? पण हे कसं शक्य आहे!आपणच तर तिला गळा दाबून मारलंय.हे आठवताच सूर्यकांताचा हात आपोआप आपल्या गळ्याकडे गेला.गौरी आपला पाठलाग तर करत नाही ना? ती सूडउगवतेय का? असे प्रश्न त्याला पडले.पुढचा आठवडाभर त्याला तेच स्वप्न पडायचे. त्याला रात्रभर झोप लागेनाशी झाली.दिवसा तो असंबद्ध बडबड करु लागला.त्याची नजर सतत कावरी बावरी दिसू लागली.आपल्या भोवताली कोणतरी वावरतोय असं त्याला सतत वाटू लागले. कोण होतं ते ! गौरीचा आत्मा की आणखी काही.जे घडत होतं ते तो कुणाला सांगूही शकत नव्हता.        त्याच्या बापाने आणि आई दुर्गाबाईंनी सुध्दा त्याची ही अवस्था बघून त्याला याबाबत विचारलं होते. कुडाळ वरून त्यांनी एका वैद्याला बोलावून तपासणी सुध्दा करून घेतली होती.वैध्दाने एवढंच सांगितलं की याला कोणताच शारीरिक आजार नाही.पण कसलातरी मानसिक धक्का बसला आहे.रोज खोलीत शिरणा-या त्या शुभ्र आकृतीचा त्याने एवढा धसका घेतला की तो एका रात्री उठला व सरळ भामिनीच्या खोलीकडे गेला.गेले वर्षभर भामिनी एकटीच ह्या खोलीत राहायची.दिवसा आपली सगळी कामं आटोपली की त्या खोलीत स्वतः ला बंदिस्त करुनघ्यायची.सूर्यकांतला तिची फिकीर नव्हती.पण आज त्याला एकटं झोपायची भिती दिसू लागली.कुणा नोकराला सोबतीला बोलवायचे तर चर्चा झाली असती. म्हणून तो भामिनी कडे आला होता." भामिनी, दरवाजा उघड.... ! उघड ना दरवाजा."आज त्यांच्या आवाजात नेहमीचा करडेपण नव्हता.ती दमदाटी नव्हती.तो विनवणी करत राहिला.पण भामिनीने अखेरपर्यंत दरवाजा उघडला नाही.सूर्यकांतला तिथे अंधारात एकट उभे राहायची भिती वाटू लागली.अखेर नाईलाजाने तो देवघरात गेला.देवाला साष्टांग नमस्कार घालून तो एका कोपऱ्यात झोपला.पण मध्ये मध्ये तो दचकून जागा व्हायचा.   भिती आणि तणावाखाली तो रोज तिळ तिळ मरूलागला. तो खंगत गेला.दारुच्या नशेत तो सगळं विसरण्याचा प्रयत्न करू लागला.तो एवढी दारू घ्यायचा की दोन दोन दिवस तो झोपून राहायचा. त्याची हीअवस्था बघून विश्वंभरही मनात चरकला.ही सगळी आपल्या पापांची फळ आहेत असे त्याला वाटू लागले.त्याने घरात होम हवन केले.त्याने काही होईना म्हणून एका अघोरपंथीयाला बोलावले.पण तो अघोरी  दुस-याच दिवशी तिथून काही न बोलता निघून गेला. त्या अघोरीच्या लक्षात आले की इथे एक शुध्द... निष्पाप आत्मा वावरतोय आणि त्याचा मुकाबला करणे आपल्याला शक्य नाही.सूर्यकांत विक्षिप्त बनला.मध्येच कुणावरही चिढायचा...नोकरांना चाबकाने मारायचा...तर कधी गुढघ्यात मान खाली घालून बसायचा.वारंवार गळ्याकडे हात लावून पाहायचा.        झालंही तसंच त्या रात्री तो असाच दारू पिण्यासाठी बसला.दारुचा पहिला ग्लास तोंडाला लावणार तोच खोलीत कुणीतरी आलंय यांची त्याला जाणीव झाली.खोली आतून बंद होती.मग आत कोण आलंय? तेवढ्यात त्याच्या समोर ती पांढरी आकृती प्रकट झाली.तिने स्वतः भोवती एक गिरकी घेतली.सूर्यकांताच्या हातातला ग्लास गळून पडला.तो उठून पळण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याचे पायच हलेनात .जाग्यावरच जखडून ठेवल्यासारखा तो तसाच राहिला.त्या आकृतीचे हात त्याच्या गळ्याच्या दिशेने सरकले.घाबरून सूर्यकांतने आपल्या दोन्ही हातांनी आपला गळा पकडला.त्या हातांनी आपला गळा पकडू नये असा त्याचा प्रयत्न होता. पण आता त्याचे स्वतःचेच हात त्याचा गळा दाबत होतै.आपला श्वास बंद होतोय... गुदमरतो आहे हे लक्षात येताच त्याने आपल्या हाताची पकड ढिली करण्याचा प्रयत्न केला.पण आता उलट ती पकड अधिक घट्ट झाली होती.एखाद्या सापळ्यात आपली मान अडकली असं त्याला वाटलं.ती पकड एवढी घट्ट झाली होती की त्यातून सुटण्यासाठी तो हात पाय ताणू लागला. त्याच्या गळ्याच्या नसा ताणल्या गेल्या.जीभ बाहेर आली.डोळ्यात रक्त साकळून बुब्बुळे बाहेर आली.आचके देत देत त्याची हालचाल हळूहळू मंद होवू लागली.त्या अखेरच्या क्षणी त्याला गौरीची अवस्था आठवली.अगदी तसंच आचके देत त्याने प्राण सोडले.एका पापी माणसाचा अंत झाला होता.या दरम्यान बाजूला निश्चल उभी असलेली पांढरी आकृती सुस्कारली. 'या घरात अजून एक पापी शिल्लक आहे.'

----****----****-----****-----******---    काही क्षण गौरी गप्प झाली.हे सर्व गौरीच्या तोंडून ऐकताना मला घाम फुटला होता.समोरचा पाण्याचा ग्लास उचलून मी तोंडाला लावला व घटाघटा पाणी प्यालो." विश्वंभरचे काय झाले?"" थांब, कोणीतरी बाहेर अंगणात आलंय." गौरी म्हणाली.मी विचार करत होतो की एवढ्या लवकर पुजारे कसे आले?" बर्वे गुरुजी आहेत.याचाही डोळा या जमिनीवर आहे.जा दरवाजा उघड."" पण तुम्ही !"" काही समजणार नाही त्याला."मी दरवाजा उघडला.समोर बर्वे उभे होते. मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले." अहो,आज रघुनाथ पुजारे येणार आहेत ना.मी फोन केलेला त्यांना .माझी बिदागी घ्यायची होती."" दुपार नंतर येतील." मी म्हणालो.तेवढ्यात गौरीने बसल्या जागेवरुन हात लांब केला व त्यांच्या पोटाला गुदगुल्या केल्या." अहो गुदगुल्या कसल्या करतात?" ते माझ्यावर वैतागले. " अहो, मी कसा तुम्हाला गुदगुल्या करेन.आपल्या मध्ये  चार - पाच फुटाच अंतर आहे."तेवढ्यात गौरीने त्यांच्या पोटाला चिमटा घेतला." अहो हे काय? तुम्ही जादुगार आहात का?" ते कळवळून म्हणाले.माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत ते निघून गेले.तशी गौरी खळखळून हसली.तेव्हा ती एखाद्या हिम परीसारखी दिसत होती.कित्येक वर्षे दाबून ठेवलेला तिचा खट्याळपणा जागा झाला होता.-----*****------****-----****-----*****---

-----*****------******-----****------***भाग ७ समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे