विलक्षण भाग ४सकाळी मी सर्व कामे आटोपून पुन्हा कामाला लागलो.मला आजच ती वही पूर्णपणे वाचायची होती.माझ्यासाठी आता ती लिपी अगम्य राहिली नव्हती.मी झपाझप भाषांतर करत गेलो.सुमारे दिड तासात मी सगळी वही भाषांतरीत केली.सगळा इतिहास माझ्या समोर होता.मी लताबाईंनी लिहिलेली माहिती वाचायला सुरुवात केली.....'त्या रात्री मी बेभानपणे आडवाटेने चालत पहाटेला एका गाडीतळावर पोहचले.माझ्या पायात काटे घुसले होते.हात पायावर ओरखडे उमटले होते. वाटेत एक नदीवर मी हातपाय धुतले. चादरीत गुंडाळली मुलगी आता जागी झाली होती.तिची अफूची नशा उतरली होती.ती सारखी रडत होती. मला कळत नव्हतं मी नेमकं काय कराव.तिथल्या चहावाल्या आजोबांकडून दुध घेऊन मी ते मुलीला पाजलं.सर्व्हिस गाडीतून कोल्हापूर गाठलं.तिथे माझी मावशी राहत होती .मी तिथे दहा बारा दिवस राहिले.मी मावशीला एवढंच सांगितलं की प्रसुती दरम्यान हिची आई वारली .घरातली माणसं या मुलीला मारायला बघत होती.मी तिला वाचवून घेऊन आलेय.क्षणभर मलातिच्या डोळ्यात संशय दिसला.पण तिने माझ्यावर विश्वास ठेवला. थोडं स्थिर स्थावर झाल्यावर मी खानापूर गाठलं.त्या मुलीचं नाव मी गौराई ठेवलं. विवेकला सुध्दा मी तेच सांगितले जे मावशीला सांगितले होते.माझा भाऊ विवेक याला मी जे केलं ते पटलं नव्हतं.पण जे घडलं ते नियतीने ठरवलं होतं त्यात माझा काही दोष नव्हता.हळूहळू तो ही शांत झाला.त्याची बायको कमल हिने सुध्दा माझ समर्थन केले.मी अविवाहित होते...अवघं २६ वर्षे वय होतं माझं.गौराई साठी मी अविवाहित राहायचं ठरवलं.मी तिला माझ नाव दिले.तिला शिकवलं. गौराई दिसायला देखणी... सुशील होती.मॅट्रिक झाल्यावर ती एका कन्नड शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला लागली.विवेकचा मुलगा दिनकर व ती लहाणपणापासूनच एकत्र वाढली होती...खेळली होती.दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.खरतर मी गौरीला तिचा खरा इतिहास कधीच कळू दिला नव्हता.' कोटणीस ' हे नावही तिच्या कानावर पडू नये याची मी खबरदारी घेतली होती. कोटणीसांच पुढे काय झाले तेही मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.गौरीसाठी मी आई होते आणि ती माझ्या वर अतिशय प्रेम करत होती. दिनकर व गौराईच लग्न आम्ही थाटामाटात लावून दिले.लोकांत थोडी फार चर्चा झाली.पण आम्ही त्या कडे लक्ष दिले नाही.खर काय होते ते फक्त मला व विवेकलाच ठाऊक होतं.भामिनीने दिलेल्या सोन्याच्या बांगड्या मी लग्नात गौराईच्या हातात घातल्या. या सगळ्या कालावधीत मी कुडाळच्या ' कोटणीस ' कुटुंबाच काय झाले ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. खरं तर ' कोटणीस ' हे नाव आठवलं तरी माझ्या अंगावर काटा येत असे. दुर्गा, भामिनी, सूर्यकांत, चंद्रकांत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे विश्वंभरांचा शेवट कसा झाला? त्यांच्या पापाचा हिशोब नियतीने केला की नाही?असे बरेच प्रश्न माझ्या मनात यायचे.पण त्यांची उत्तरे शोधण्याचे धाडस माझ्यात नव्हते.' लता पुजारेंनी लिहिलेल्या माहितीचा हा सारांश वाचल्यावर आता माझ्या डोळ्यासमोर एक चित्र निर्माण झाले.विश्वंभर कोटणीस हे प्रचंड दबदबा असलेलं नाव होतं.कोटणीस कुटुंब स्त्रीयांना कमी लेखत असे.तसच ते आपण अजूनही सरदार असल्याच्या नादात वावरत.विश्वंभर कोटणीसांनी आपल्या सगळ्या कुटुंबाला आपल्या धाकात ठेवले होते. त्यांचा मोठा मुलगा सूर्यकांत हा आपल्या बापाला त्यांच्या काळ्या कारवायांत मदत करायचा. तर दुसरा मुलगा चंद्रकांत हा बापाला खूप घाबरायचा त्यामुळे त्याच व्यक्तिमत्त्व फुलले नव्हते.पण तो आपल्या बायकोवर प्रेम करायचा.या उलट सूर्यकांत भामिनीला मारझोड करायचा.दुर्गा,भामिणी यांच्याकडे त्यांचे नवरे फक्त उपभोगाची वस्तू व वंशवृद्धीचे साधन याच नजरेने बघायचे. मुलगाच हवा या हव्यासापोटी त्यांनी गौरीची पहिली मुलगी नम्रता हिला विहिरीत ढकलले होती. तर गौरी आणि नुकतीच जन्मलेलीदुसरी मुलगी जिचे नावही ठरवलं नव्हतं तिला मारण्याचा प्रयत्न केला होता.पण भामिनी ने जिवावर उदार होतमुलीला वाचवलं होतं.लता पुजारे या त्या वेळच्या गायनॉकोलिजिस्टने आपलं सारं आयुष्य त्या मुलीच्या संगोपनात घालवलं. पण ती मुलगी जीवंत आहे हे फक्त भामिनी आणि लता पुजारे यांनाच माहीत होतं. विश्वंभर व सूर्यकांत यांना गौरी व तिची मुलगी त्या भयंकरआगीच्या भक्ष्यस्थानी पडली असंच वाटलं होतं. ह्या मुलीच नावही लता यांनी गौराई ठेवलं तिचं लग्न आपल्या भावाच्या मुलाशी म्हणजे दिनकरशी लावून दिलं. या दोघांचा मुलगा म्हणजे रघुनाथ पुजारे ज्यांनीकोटणीसांची जमीन विकत घेतली होती.हा एक विलक्षण योगायोग होता.सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुसरी गौराई जी साधारण पंच्याहत्तर वर्षांची होती आणि ती चांगली धडधाकट होती.या सगळ्या घटनांमध्ये लता पुजारे यांनी जो त्याग केला होता तोही विलक्षणच होता. अजूनही काही गोष्टी अनुत्तरित होत्या.रात्री बंगल्यातफिरणारा तो आत्मा कोणाचा? कश्यासाठी तो असा भटकत आहे.रस्त्यावर अपघात घडवण्याचा त्या आत्म्याचा हेतू काय? हे सगळं कोणाकडून व कसं कळेल ह्याचाच मी विचार करत होतो.त्या गुराखी काकांना मी पुन्हा भेटलो पण त्यांनाही कोटणीसांच शेवटी नेमकं काय झाले हे माहीत नव्हते. या घटनांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या ' लता पुजारे ' यांचं निधन झाले होते.त्यामुळे माहिती मिळवण्याचे सगळे मार्ग बंद झाले असे मला वाटले. त्या दिवशी सायंकाळी मी थोडा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. मी कुडाळची घोडे बाव...देवाचा डोंगर...वालावलच लक्ष्मीनारायण मंदिर.. नयनरम्य खाडी बघून नंतर धामापूरचा तलाव पाहिला...भगवती मंदिर व त्याच्या उजव्या बाजूला तलाव आहे.तलाव खूपच मोठा आहे आणि पाण्यावर लाटाही उसळताना दिसतात.सभोवताली हिरवीगार झाडी देखील आहे. सायंकाळी मी मालवण बंदरावर जाऊन पुन्हा हुमरमळा येथील पुजारेंच्या बंगल्यावर आलो.मला या जागेच्या आणि कोटणीस कुटुंबाच्या संदर्भात जो इतिहास समजला होता तो पुजारेंना सांगावा लागणार होता.याच ठिकाणी तो सांगणे योग्य होते.मी रधुनाथ पुजारे यांना सांगितले की त्यांनी उद्या खानापूर वरून कुडाळ हुमरमळा येथे यावे. सोबत त्यांची वृध्द आई गौराई हिला आणायला सांगितले.बाळकृष्ण सखाराम राणे भाग ४ समाप्त