ऑपरेशन ब्लॅक ताज - 2 Siddhesh Chaudhari द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ऑपरेशन ब्लॅक ताज - 2


आर्यनच्या मानेवरचा घाम आता पुरता गोठला होता. खोलीतल्या काळोखापेक्षा त्याच्या मनातला अंधार अधिक गडद झाला होता. स्क्रीनवर चमकणारी ती पांढरी अक्षरे—तुझ्या मागे पाहू नकोस—त्याला एका जागी खिळवून ठेवाण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या पाठीशी उभी असलेली आकृती इतकी जवळ होती की, तिच्या कपड्यांचा पुसटसा आवाजही आर्यनच्या कानावर पडत होता.
त्याच्या मध्यमवर्गीय, साध्या मेंदूने त्याला ओरडून सांगितलं की शांतपणे शरण यावं. पण त्याच्यातल्या डॉक्युमेंट कंट्रोलरच्या तांत्रिक मेंदूने एक गोष्ट ओळखली. सिस्टीम लॉक झाली असली तरी यूपीएसवर चालणाऱ्या मॉनिटरच्या खालच्या बाजूला एक बारीक हिरवा दिवा लुकलुकत होता. याचा अर्थ, कॉम्प्युटरचा डेटा ट्रान्सफर अजूनही बॅकग्राउंडला सुरू होता. फाईल जरी बंद झाली असली, तरी तो ५० जीबीचा डेटा अजूनही कॅशे मेमरीमध्ये जिवंत होता.
को... कोण आहे? आर्यनने कमालीच्या शांततेचा आव आणत विचारलं. त्याचा आवाज किंचित कापत होता.
त्याच्या पाठीमागून एक थंड, ओळखीचा हसण्याचा आवाज आला.
तुझ्या संपूर्ण करियरमध्ये फाईल्स ऑडिट केल्यास आर्यन... पण आज स्वतःचं आयुष्य ऑडिट करायची वेळ आली आहे.
तो आवाज दिग्विजय सावंतचा होता. आर्यनचा बॉस, ज्याच्या हाताखाली आर्यनने गेल्या तीन वर्षांत अनेक मोठ्या प्रकल्पांचे दस्तऐवज सांभाळले होते. नेहमी सुटाबुटात फिरणारा आणि चेहऱ्यावर कॉर्पोरेट हसू ठेवणारा दिग्विजय आज या काळोखात पूर्णपणे वेगळा भासत होता. त्याच्या एका हातात मोबाईलचा फ्लॅश चालू होता आणि दुसऱ्या हातात एक रिव्हॉल्व्हर होती.
सर? तुम्ही? आर्यनने हळूच मान वळवण्याचा प्रयत्न केला.
मी मघाशीच काय सांगितलं होतं? मागे पाहू नकोस! दिग्विजयचा आवाज हिंस्त्र झाला. त्याने बंदुकीचे टोक थेट आर्यनच्या पाठीला लावले. तू खूप मोठी चूक केलीस आर्यन. ती फाईल तुझ्यासाठी नव्हती. तू फक्त एक फाईल मॅनेज करणारा कर्मचारी आहेस, तुझी लायकी या सिस्टीमचे नियम पाळण्यापुरतीच आहे. ब्लॅक ताजच्या फाईलला हात लावून तू स्वतःच्या मृत्यूच्या वॉरंटवर सही केली आहेस.
सर, तो राष्ट्रीय सुरक्षेचा प्रकल्प आहे... पण त्या नकाशाच्या खाली जे काही आहे—
ते पाहणं तुझं काम नाही! दिग्विजयने त्याला मध्येच तोडलं. विक्रम सिंघानिया या देशाचे भविष्य बदलत आहेत. आणि तू? तू त्या भविष्यातला एक स्पीड ब्रेकर आहेस. आता गुपचूप तुझा युझर आयडी आणि पासवर्ड टाईप कर, जेणेकरून मला हा सर्व्हर पूर्णपणे डिलीट करता येईल.
आर्यनचे डोळे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर होते. त्याला ठाऊक होतं की जर त्याने पासवर्ड दिला आणि दिग्विजयने सर्व्हर क्लियर केला, तर ब्लॅक ताजचा पुरावा कायमचा नष्ट होईल. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, पुरावा नष्ट झाल्यानंतर दिग्विजय त्याला जिवंत सोडणार नव्हता.
त्याच्यासमोर दोनच पर्याय होते. एकतर शरण जाणे किंवा त्याच्याकडे असलेल्या एकमेव शस्त्राचा वापर करणे—त्याची डिजिटल अचूकता.
आर्यनने कीबोर्डवर हात ठेवले. ठीक आहे सर... मी पासवर्ड टाईप करतो. पण सिस्टीम लॉक आहे, मला आधी फंक्शन की वापरून ती रिसेट करावी लागेल.
दिग्विजयला तांत्रिक कामातली फारशी समज नव्हती. तो फक्त मॅनेजमेंट पाहायचा. त्याने बंदुकीची पकड तशीच ठेवत होकार दिला. लवकर कर. माझ्याकडे जास्त वेळ नाही.
आर्यनची बोटे कीबोर्डवर फिरली. पण तो पासवर्ड टाईप करत नव्हता. त्याचे डोळे अंधारातही कीबोर्डच्या रचनेवर अचूक बसले होते. लाखो वेळा फाईल्स ट्रान्समिट करताना त्याचे हात कीबोर्डवर इतके सरावले होते की तो न बघताही अचूक शॉर्टकट कीज वापरू शकत होता.
त्याने शांतपणे ऑल्ट आणि टॅब बटण दाबून बॅकग्राउंड विंडो ओपन केली. त्यानंतर, अत्यंत हुशारीने त्याचा उजवा हात माऊसवरून सरकून सीपीयूच्या मागच्या बाजूला गेला, जिथे त्याची वैयक्तिक १२८ जीबीची एनक्रिप्टेड पेनड्राइव्ह आधीपासूनच लागलेली होती—जी तो रोजच्या बॅकअपसाठी वापरायचा.
त्याने कीबोर्डवर सर्व डेटा सिलेक्ट आणि कॉपी करण्याचे शॉर्टकट दाबले.
आणि मग त्याने शेवटची कमांड दिली, जी केवळ एका अनुभवी डॉक्युमेंट कंट्रोलरला माहिती असू शकत होती. त्याने सिस्टीमच्या कमांड प्रॉम्प्टमध्ये जाऊन थेट लोकल ड्राइव्हवरून पेनड्राइव्हमध्ये डेटा कॉपी करण्याची रोबोकॉपी कमांड रन केली. कॉम्प्युटरचा स्क्रीन अजूनही फ्रीझ होता, पण सीपीयूच्या आतल्या लहान लाल लाईटने वेगाने लुकलुकणे सुरू केले होते. डेटा ट्रान्सफर सुरू झाला होता!
झालं का? दिग्विजयने विचारलं, त्याचा संयम सुटत चालला होता.
हो सर, सिस्टीम लोड होतेय... फक्त ३० सेकंद, आर्यनने वेळ मारून नेण्यासाठी सांगितलं.
तितक्यात, इमारतीच्या बाहेरून पोलिसांच्या सायरनचा मोठा आवाज घुमला. दिग्विजयचा चेहरा अचानक धास्तावला. त्याने खिडकीबाहेर पाहिले. सिंघानियाच्या माणसांनी पोलिसांना मॅनेज केलं होतं, पण कदाचित क्राईम ब्रांचची गाडी तिथे अनपेक्षितपणे पोहोचती झाली होती.
ती ३० सेकंदांची संधी आर्यनसाठी जीवन-मरणाचा खेळ ठरली.
सीपीयूची लाल लाईट स्थिर झाली. डेटा कॉपी झाला होता. आर्यनने एका झटक्यात पेनड्राइव्ह खेचून काढली आणि ती खिशात टाकली. त्याच वेळी त्याने खुर्ची मागे ढकलली, ज्यामुळे चाकाची जड खुर्ची थेट दिग्विजयच्या पायावर जाऊन आदळली.
दिग्विजय वेदनेने ओरडला. त्याचा तोल गेला आणि त्याच्या हातातली बंदूक जमिनीवर पडली.
अंधाराचा फायदा घेऊन आर्यन केबिनच्या बाहेर पळाला. कॉरिडॉर पूर्णपणे काळोखात बुडाला होता. पण आर्यनला या पाचव्या मजल्याचा कोपरा अन कोपरा तोंडपाठ होता, कारण त्यानेच या इमारतीच्या फायर इव्हॅक्युएशन मॉडेलचे ऑडिट केले होते. त्याला माहिती होते की मुख्य लिफ्ट बंद असली तरी डाव्या बाजूचा आपत्कालीन जिना कुठे उघडतो.
तो धावत जिना उतरू लागला. वरून दिग्विजयच्या ओरडण्याचा आवाज येत होता, पकडा त्याला! तो खाली येतोय! त्याच्याकडे फाईल आहे!
आर्यन जिन्यावरून खाली उतरला आणि तळमजल्यावर आला. बाहेर पाऊस सुरू झाला होता. मुंबईची रात्र अब अधिकच भयंकर वाटत होती. तो गेटच्या देशाने पळाला, पण तिथे सिंघानिया इन्फ्रास्ट्रक्चरच्या दोन गाड्या उभ्या होत्या. त्यांच्या हातात टॉर्च चमचमत होते.
तो मुख्य गेटने बाहेर पडू शकत नव्हता. पण त्याला इमारतीच्या मागच्या बाजूचा ड्रेनेज आणि सर्व्हिस लेआउट माहीत होता. तो मागच्या कंपाऊंड वॉलकडे धावला, जिथे कचऱ्याच्या डब्यांच्या मागे एक लहान लोखंडी दरवाजा होता, जो थेट लोकल रेल्वे ट्रॅकच्या बाजूला उघडायचा.
त्याने तो दरवाजा ढकलला आणि तो बाहेर पडला. पावसाच्या पाण्याच्या चिखलात त्याचा पाय घसरला, पण तो तसाच उठला आणि रेल्वे ट्रॅकच्या बाजूने धावू लागला.
मागे ऑफिसच्या इमारतीचे दिवे अचानक चालू झाले. दिग्विजय आणि सिंघानियाचे माणसे टॉर्च घेऊन मागच्या बाजूला आले, पण तोपर्यंत आर्यन अंधारात आणि पावसात गडप झाला होता.
रात्रीचे ११:१५ झाले होते. आर्यन धापा टाककत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एका आडोशाला थांबला. त्याचा शर्ट पूर्णपणे भिजला होता, चष्म्यावर पाण्याचे थेंब होते.
त्याने खिशात हात टाकला. ती १२८ जीबीची पेनड्राइव्ह त्याच्या हातात सुरक्षित होती. या एका लहानशा प्लास्टिकच्या तुकड्यात आता देशातील सर्वात मोठा घोटाळा आणि ब्लॅक ताजचे भयानक सत्य लपलेले होते.
पण आता तो घरी जाऊ शकत नव्हता. कारण त्याला माहिती होतं, दिग्विजयकडे त्याचा घरचा पत्ता होता. कल्याणला असलेली त्याची पत्नी आणि मुलगी आता धोक्यात होत्या.
त्याचा फोन अचानक व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर एका अज्ञात नंबरवरून मेसेज आला होता:
आर्यन, तू जिथे आहेस तिथेच थांब. कबीर खान नावाचा क्राईम ब्रांचचा अधिकारी तुझ्या शोधात आहे. दिग्विजयने तुझ्यावर ऑफिसचा डेटा चोरी केल्याचा आणि देशद्रोहाचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. जर जिवंत राहायचं असेल, तर मला येऊन मिळ.
खाली एका कॅफेचा पत्ता होता आणि शेवटी लिहिलं होतं—किआरा सेन, आयटी सिक्युरिटी.