कोकणातले भोरपी - भाग 3 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोकणातले भोरपी - भाग 3

कोकणातले भोरपी  भाग 3

           एखादं आयदण विणून ते पुंग़ळ्या नी ग़ोळ्या गुतवून उजू होईतो प्रचंड खटापट असते. हे अत्यंत किचकट नी वेळमोडं काम असतं. जाळी विणताना आटीचा धागा संपला की  त्याच्या टोकाला नव्या आटीतला धागा विशिष्ट पद्धतीची गाठ मारून जोडावा लागतो. कारण वापर करताना ती गाठ नडीला येता कामा नये. नायलॉनचा धागा वापरात येण्याआधी आंबाडी, ताग आणि किशिष्ट प्रक्रिया करून सुती दोरा चिवट करून तो वापरला जायचा. भोरपी आले त्यावेळी  वरच्या वाडीत सरवज्याच्या घराजवळ रस्त्यावर बांधलेल्या मोरीच्या विरुद्ध बाजूला पावसाळी पाण्याच्या व्हावटीमुळे पुरुषभर खोल कोंड होती. त्यात वीत भर लांबीचे पिंगट रंगाचे मासे  दिसायचे.  आमचा वाटेली,  पांडु हेमल्याला सदला बदलीवर पाडा  द्यायचा सौदा ठरल्यावर  काळू नी  गोमा भोरपी त्याच्याकडे बदली बैल आणायला गेले. परत येताना गोमा भोरप्याने सहज म्हणून कोंडीत नजर टाकली. बैल तिथेच  टांगलवून त्याने काळूला पाग आणायला पिटाळला. काळू पाग नी टोपुल घेवून आला. गोम्याने कोंडीत पाग मारला. दोन वेळा पागून त्याने टोपलीभर सावे मासे  मिळाले. निम्मे  तिथेच खपले. पांडू हेमल्यानेही  दहाबारा मासे घेतले. 

          दुसरे दिवशी  पांडू आमच्या घराखाली मळ्यात चिखल करायला आला. त्याचं तोंड सुजून  भप्प झालेलं, ओठ  सुजून केळ्यासारखे टरटरीत झालेले नी  डॉले अक्षरश:  सोज ओथंबून हुरलेले होते. का& काय विचारल्यावर तो म्हणाला, “ माका साये -सावे  गोड्या पान्यातले  माशे  पटत नाय. ते खाल्ल्यावर चेयरो सुजता. पण साव्या माशाची   चव  खाऱ्या मच्छीपेक्षा  माका लय आवाडता. आता म्हणशा तर  साव्या माशाक हिवळान  लय.....  माजे दोनव झील  साव्या माशाची कडी   खायत्  नाय , मी, माजी मागारीण , आये  नीचेडू  चौगजुणां   खातांव.  भोरपी   आठवडाभर मुक्काम  ठोकून  होते.  त्यामुदतीत  त्यानी   मळ्यात  खांब तळ्यात  मेणा टाकून साचे मासे  मारले होते.  लखू परटाच्या  घराजवळ मोठं  निवलीचं बेट होतं . भोरपी आल्यावर चार दिवस सलग चार दिवस पावसाने दडी दिली होती नी   खामतळं  वहायचे बंद  झालं.  भोरपिणी कपडा लत्ता  धुवायला त्या तळावर जात त्यानी  तळ्यात मोठे मोठे मासे बघितलेले होते. पावसाळ्यात  मळा पाण्यात बुडाला  की खाडीतले मासे  व्हावटीतून  वर येत , तसे वर आलेले  मासे  तळ्यात  थावरलेले होते. 

         तळं  वहायचं  बंद झाल्यावर  भोरप्यानी परटाच्या घराजवळची निवल तोडून  भारा बांधून आणला. भोरपिणीनी  तळ्याच्या काठावर बसून  त्याचे बोट बोट लांबीचे तुकडे  तोडून घेतले  नी नंतर ते पुंजावून तळ्यात ढकलले. हे काम फार  जोखमीचं,  काळजीपूर्वक नी सांभाळून करावं लागतं. निवलीचा डिक अगदी बारीकशी  किणकिणी  चुकून माकून डोळ्यात उडवली तर  डोळा फुटला म्हणून समजा . त्याच्या डिकाचा नुसता उग्रम हाताला लागला तरी हात फोफावतो.  हातापायावर थेंब उडाला  तर तिथे  ढाण पडून  तो फोड पुवळणाला येतो.  जप्प्न काम केलं तरीही भोरपिणींचे हात फोफावले होते. तळ्यात निवल काड्या टाकल्यावर  माशांचे डोळे फुटले  नी मासे पृष्ठ भागावर  उपेवायला लागले . कोणीतरी  ही बातमी  दिल्यावर शाळेतल्या पोरांची नुसती झुंबड जमली तळ्यावर . भोरप्यानी  आकं  वापरून  मासे पकडलेनी   दोन टोपले भरून मासे मिळाले . काही काही मासे  हातभर लांब होते. शंकर परीट मोठी पिशवी  घेवून तल्लासावरच होता. त्याने दहाबारा  मोठे फडफडीत मासे   आणि दोन कोंजळी  लहान मासे  निवलीच्या बदल्यात  उचलले.   भोरपिणी लगेच वडची समोर मासे विकायला बसल्या.  आमच्या शाळेतले   बांदकर , लोके मास्तर , पोकळे बाई  यानीही त्या दिवशी मासे घेतलेनी.  रस्त्या कडेला  माजलेल्या  रान अळवाची पानं तोडून घेवून लोक त्यात  मासे गुंडाळून  घेत.

            त्या आठवडाभरात भोरपिणी गावात फिरून गोधड्या शिवून द्यायचं काम करीत. आमची आई त्यांची वाटच बघित होती.  दोन दिवसानी त्या आमच्या वाडीत आल्या. आईने वाडीत कोणाकोणाला  सांगूत ठेवलेलं होतं. त्यामुळे दुपारी अकरा वाजायच्या दरम्याने दोघीजणी उज्जू आमच्या  घरी आल्या. त्यांच्या सोबत एक लहान चेडू नी   पोरगा होता. पोराच्या अंगात   ढुंगणावर फाटलेली चड्डी होती.  पोरगेली  भोरपिण होती  तिची  साडी म्हणजे दोन  वेगवेगळ्या  साड्यांचे धडपे एकत्र  जोडून नऊवारापेक्षा जरा मी लांबीचा नग उभा केलेला होता. म्हणून काष्टा मारून  ढोपरा पर्यंत टाजग़ी   उंची   आली होती नी कमरेच्या  एका बाजुला  एक डिझाईन  नी दुसऱ्या  बाजुला दुसरे डिझाईन, निऱ्यांच्या घोळातून  गोधडी शिवायच्या धाग्याने जोडकाम   डोकावत होते.  दोन गोधड्या  शिवायच्या होत्या. आईने दरादामाची चौकशी करून  अस्तरासाठी दोन धडक्या  साड्या, परकरांचे नी  कसले कसले साठलेले धडपे, दोन ती जुनी धोतरे, आक्का ताईची दोन जुनी पातळं नी दोन विरलेले  बुरणुसाचे तुकडे असा ऐवज दिला. (क्रमश:)