कोकणातले भोरपी- अंतिम भाग ५
गावातल्या जाणत्यानी वाड्यात जावून तंडामुंडी केल्यावर घेतल्या किमतीत वीस रुपये कमी करून नव्याने सौदा ठरवून दुसरा बैल दिला. तो मात्र वहिवाटला. त्याच दरम्याने फणशात दहा भांगे जमिन घेवून रुक्म्या भोरपी तिथे स्थाईक झाला . त्याने तो पाडा आपल्याकदे बाळगला. पावसाळी शेती नी उन्हाळी फडक्यांचे माडा पोफळीचे आगर तो अर्धलीने करी. तिथे बैल रहाट ओढायचे काम बैल मुकाट्याने करी. रुक्म्याकडे तो वीस वर्षे इमाने इतबारे जोत नी बैल रहाट ओढायचे काम करी. पुढचे दात पडले नी दाढा पडल्या नी बैल रवथाचे बोळे टाकायला लागल्यावर रुक्म्याने तो राधानगरीच्या बाजारात खाटकाला विकला.
अकरावी झाल्यावर आम्ही कॉलेज शिक्षणासाठी बाहेर पडलो. गावाशी संपर्क तुटला. भोरपी विस्मरणात गेले. पुढे हायस्कूलला नोकरीला लागल्यावर त्या गावी दिवाळी नंतर शाळे समोरून भोरपी जाताना दिसले. त्यातला म्हातारा काष्टी लावलेला पण सोबतचे दोन तरणे पोरग़े दादा कोडके स्टाईल पॅण्ट नी वर कोल्हापुरी पोटावर खिसा गंजी घातलेले होते, म्हातारा काष्टीवाला नसता तर ते भोरपी आहेत हे माझ्या लक्षातही आले नसते. चौकशी केल्यावर समजले की ती गावात रेडे खरेदी करायला आलेले होते. म्हातारे खडेसर झालेले कसले असतील तसले रेडे ते खरेदी करीत . संध्याकाळी जाताना मांडावर चार रेड्यांची जांग़ळ वडाखाली बांधलेली नी शेजारी जाळ पेटवून पोरगे निखाऱ्यावर मासे हुलपवताना दिसले. म्हातारा गोविदाचा हॉटेलात बसलेला होता. मी आत गेले नी मला आठवलं की याला मी आमच्या गावात बघितलेला आहे. म्हाताऱ्याला हाक मारली. “काय बाबा” डोळ्यावर पंजा धरून निरखीत तो उत्तरला “मी वळाकला नाय तुला......” कोण कुठचा सांगितल्यावर तो बोलायला लागला. त्याचे नाव होते सटवा. काळू भोरपी नी रुक्म्या त्याचे जावई असे तो म्हणाला. त्याला लाडू चहा देवून गप्पा मारल्या.त्यातून एक वेग़ळीच माहिती कळली.
दिवाळी झाल्यावर भोरपी लोक राजापूर पासून रेडे खरेदी सुरू करून अगदी कुडाळ सावंतवाडी पर्यंत मिळेल तिथे जनावरं घेत हायवेने मार्गक्रमणा करतात . एका रशीला चार पाच रेडे टांगलवून अशी दहा वीस रेड्यां ची जांग़ळ घेवून हायवेने चालत चालत आई, दोडामार्ग रस्त्याने ओल्ड गोव्या पर्यंत जातात . वाटोवाट थांबून आतल्या आतल्या गावानी फिरून मजल दरमजल करीत डिसेंबर मध्ये होणाऱ्या सायबाच्या फेस्ता पर्यंत गोवा गाठतात . तिथे ख्रिश्चन लोक मटनासाठी रेडे विकत घेतात. गोव्यात गेल्यावर काही हॉटेल मालकांचे एजंटही चढ्या भावाने जनावरं घेतात. फेस्ताला सहज दोन तीनशे रेडे खपतात म्हणे. त्यावर्षी पंधरा नोव्हेंबर नंतर सातार्ड्यात भावाकडे गेलो होतो वाटेत म्हाताऱ्या सटवा भोरप्याने सांगितल्या प्रमाणे तीन चार ठिकाणी वीस पंचवीस रेड्यांची जांग़ळ हाकीत निघालेले भोरपी उमगले. रेड्याच्या गळात बांढलेल्या दोरीने जनावराचा एक पाय टांगरवल्यामुळे त्याला धावता येत नसे. सातार्ड्यात गेल्यावर भावाच्या शेजारी राहणारे गोव्यात नोकरीला अस्लेले बागकर मास्तर भेटले. त्यांच्याकडे चौकशी केले असता, सेंट झेवियरच्या फेस्ताला हजारोंच्या सख्येने परदेशी पर्यटक येतात. ते सग़ळे गायी बैलाचे नी रेड्या म्हशींचे मटण खातात. त्या दहा पंधरा दिवसात शेकड्यांच्या संख्येत जनावरं तुटतात. तसे वर्षभरात कधीही दहावीस रेडे गोव्यात सहज खपतात, कारण गोव्यात नॉन व्हेज हॉटेलांमध्ये ढोरांचे मटण राजरोस मिळायचे. नॉनव्हेज खाणारानी चौकशी केल्यावर वेटर ढोराचे मटण असले तर ‘बडेका’ है किंवा ‘बफेलोज्’ म्हणून सांगत.
रुक्म्या नी त्याची बाईल मासेमारीची आयदणं, मोरक्या, मुसकी , उन्हाळी आंबे काढायच्या घळाची आकी विणी. दहागावचे लोक त्याच्याकडून आयदणं घेत. आमच्या गावात भास्कर धनावडा पोर्ट ट्रस्ट मधून रिटायरमेंट घेवून आला. तो अट्टल मासे खाणारा. त्यानेमुंबईतून गरवारेचा धागा नी पुंग़ळ्या नी शिशाच्या गोळ्या अशी सगळी सामग़्री आणलेली होती. त्याने रुक्म्याकडून पाग़ विणून घेतला. पाग उजू करून झाला. आता आठवडा भराने आमावास्येच्या ताणावर शेवडीत जायचे होते. त्यावेळी नायलॉन चा पाग़ हा कौतुकाचा विषय होता कलोक येवून बघून बघून गेले. दोन दिवसानी सकाळी भिणभिणताना वाडीतला बेवड्या म्हाद्या भेटायला गेला, “ मग काय चाकरमान्यानूं , हल्ली मूळबांधार गेला हुतास की नाय? ”त्याने खडा टाकला . त्याच्या मुलाने मुळबांधा वरच्या भंडाऱ्याच्या मुलीशी प्रेम विवाह केलेला होता. पाव्हणा तालेवार होता. तो आजारी आहे अशी बातमी कळली होती. म्हणून तो बोलला “नाय गेलेलो. पण पावण्याक भेटॉक जावचा हा..... का रे....... ? ”
म्हाद्या बेरकीपणे म्हणाला “मी गेलं हुतय.... सजावारी भेटॉक गेलय. पावणो शीक हा . तेचो झील माका म्हणालू हेमल्यानो , म्हाताऱ्याक तांबवशीची कडी खायन शी झालीहा..... तुमच्या बांदार लय मिळतत..... आमच्या पावण्यान नयो पाग काडलान अशी बातमी हा. तुमी तेका माझा नाव सांगोन पाग माग़ॉन घेवा नी चार कालणावाट्यो हाडून देवा . मी नुको म्हणा हुतय तरी गुलामाच्यान पन्नास रुपाये काडून खिशात घतलान माज्या. दोपारी जोरगतीच्या ताणावर जायन् म्हणा हुतय पाग दिलास तर....” भास्कर चितपट झाला. त्याने म्हाद्याला पाग़ न्यायची परवानगी दिली. म्हाद्या पाग घेवून गेला. संध्याकाळी भास्कर वाट बघीत होता पण म्हाद्या आला नाही. चार दिवस वाट बघून त्याने म्हाद्याच्या घरी तीन चार वेळा माणूस धाडला पण म्हाद्या घरी भेटला नाही. “हे दोन रोज झाले, खय भायर गेलेहत. पाग खय ठेवलानी हा माका खबर नाय ” त्याची बायको ठरीव उत्तर देई. दुसरे दिवशी पाव्हणा गेल्याची बातमी आली म्हणून भास्कर प्रेतयात्रेला मूळबांधावर गेला. अग्नि लावल्यावर त्याने सुनेच्या भावाला बाजुला घेवून म्हाद्याची गोष्ट त्याच्या कानावर घातली . म्हाद्या त्याना भेटलेलाच नव्हता पाग मिळवण्यासाठी म्हाद्याने ते बंडल मारलेले होते, नी भास्कर फसला होता. (समाप्त )