एक प्रेम कथा अशीही.... भाग 7
बाहेर असलेल्या पक्षांच्या किलबिलाटाने अभिमन्यूचे डोळे उघडले. खिडकीतून उन्हाचा एक छोटासा कवडसा त्याच्या पलंगावर येऊन बसला होता जणू तो ही त्याला निद्रेतून जागे होण्यास सुचवीत होता. अभिमन्यूने घडाळ्यात पहिले. सकाळचे 9 वाजले होते. एक लांब जांभई देऊन आळस घालविण्याचा तो अपुरा प्रयत्न करीत होता. रविवार असल्यामुळे आज त्याची मनसोक्तपणे झोप झाली होती आणि आता वेध लागला होता एका गरमा गरम चहाच्या कपाचा. डोळे चोळत त्याने सर्व आवरायला सुरवात केली. सकाळची सर्व आवरा आवर करून अनिकेत आणि अभिमन्यू होस्टेलच्या बाजूला असलेल्या टपरीवर चहा प्यायला निघाले. रविवार असल्यामुळे आज कसलीही घाई नव्हती. नेहमीचा वर्दळीचा असणारा रस्ता आज कमालीचा शांत वाटत होता. त्या दोघांनी मनमुरादपणे गरमा गरम चहा पोह्यांचा आस्वाद घेतला आणि काही वेळातच होस्टेलवर परतले.
अभिमन्यू कुठलंतरी इतिहासाच पुस्तक वाचण्यात मग्न झाला होता. अनिकेतही आपल्या मोबाईलमध्ये गेम खेळत होता.
" अभिमन्यू, मी तुझा लहानपणापासूनचा मित्र तर नाही आहे पण मित्र या नात्याने काही प्रश्न विचारू शकतो का? "
अभिमन्यूने पुस्तकामधून आपले डोके वर काढले. हजार सश्यांच्या उत्सुकता असणाऱ्या चेहऱ्यांनी तो म्हणाला " हो त्यात काय एवढं विचारण्यासारखं विचार न तुला काय काय विचारायचं आहे "
" खरंच ना तुला राग तर नाही येणार ना? "
" नाही रे विचार तू बिनधास्तपणे "
" मला ऋतुजा कडून सर्व गोष्टी कळल्या म्हणून मला विचारायचं आहे कि तू तिला नकार तरी का दिलास? म्हणजे बघ ना काही दिवसाआधी मलाही अस वाटत होत कि तुझही तिच्यावर..... "
" मी तुला हे सर्व स्वःताच सांगणार होतो पण... जाऊदे... मित्रा भूतकाळाच्या काही पाऊलखुणा आपली पाठ सोडत नसतात रे. काहीतरी अचानकपणे घडत आणि सगळं ठप्प होऊन जात. "अभिमन्यू म्हणाला.
" तू असा कोड्यात बोलू नकोस. काय झालंय नक्की हे तू सविस्तरपणे सांग "
" ऐक तर मग... आठवतोय तो दिवस मला. नववीच्या सुट्या संपायला आल्या होत्या. एप्रिल मे महिन्याच्या तप्त उन्हात तपून धरणी उष्ण झाली होती. त्या तप्त झालेल्या धरणीवर जुन महिन्यात तुरळक पावसाच्या सरी बरसत होत्या. जून महिन्याची सुरवात होताच आम्हा वर्गमित्रांचा आवडता कार्यक्रम म्हणजे गावच्या टोकावर असलेल्या जांभळाच्या झाडावर दगडांचा वर्षाव करून जांभळे गोळा करणे. 25 जून अजूनही आठवतो तो दिवस मला. नित्यनियमाप्रमाणे आम्ही सर्वजण त्या जांभळाच्या झाडाखाली जमलो. मी एक भलामोठा दगड घेऊन त्या जांभळाच्या झाडावर भिरकावला. नेम चुकला होता... तो दगड भरघाव वेगाने जमिनीवर येत होता. समोर उभ्या असलेल्या शाळकरी मुलीच्या डोक्यावर तो आदळला.
" आई गं...... " एवढेच स्वर माझ्या कानी पडले. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते. डोळ्यातून अश्रूही ओघळू लागले होते. एवढ्यात पाठीमागून तिची आई धावतच तिच्याकडे येत होती. तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर रक्ताचे डाग उमटल्यामुळे तिचा चेहरा शेंदूर फासल्यासारखा दिसत होता. तिची आई अगदी जवळ येऊन पोहचली होती. आता मात्र आम्हा सगळ्याची तंत्री झाली आणि आम्ही तेथून पळ काढण्यास सुरवात केली. धावतांनीसुद्धा माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती. काय जाणे...कोण जाणे पण काहीतरी वेगळीच जादू होती तिच्यात. तीसुद्धा एक टक लावून माझ्याकडेच बघत होती. माझ्या जीवनातली खूपच रम्य आठवण आहे ती.
26 जून शाळेचा पहिला दिवस उजाळला. इतके दिवस शांत असलेली शाळा मुलांच्या सुरांनी आज गजबजली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर हर्षाचे आणि उत्सुकतेचे तुषार होते. आमचा पूर्ण कट्टाही बऱ्याच दिवसांनी भेटला होता म्हणून आमच्या गप्पानाही ऊत आला होता.
दहावीचा पहिला भूगोलाचा तास सुरु झाला. काळे मॅडम ह्या आमच्या नवीन वर्गशिक्षिका वर्गात आल्या आणि त्यांनी हजेरी घेण्यास सुरवात केली. नेहमीचाच नित्यक्रम हा त्यात एवढं नवीन तरी काय. जेव्हापासून शाळेत आलोय तेव्हापासून हेच बघतोय. एकामागोमाग एक सर्वांच्या नावाचे हजेरी चक्र सुरु झाले. सर्व तेच ते नाव परिचयाचे होते.
" श्रुती कदम " हे नवीनच नाव माझ्या कानी पडल. माझ्या नजरेनी त्या नावाभोवती घिरट्या घालण्यास सुरवात केली. माझ्या दृष्टीस पडली ती. तिच्या कपाळावर भली मोठी पट्टी बांधली होती. हो...ती.... तिच होती जिचा कपाळमोक्ष काल माझ्या दगडांनी झाला होता.
मधली सुट्टी झाली. खरंतर मला तिची माफी मांगायची होती. म्हणून माझे नेत्र तिलाच शोधत होते पण मुलीच्या घोळक्यात ती कुठे लुप्त झाली होती कुणास ठाऊक. काही वेळातच शाळा सुटली ती तिच्या घरी जाण्यास निघाली. मी धावतच जाऊन तिला गाठले. मला पाहताक्षणीच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
" माफ करा, काल चुकून माझा दगड तुला लागला म्हणून दोन्ही हात जोडून माफी मागतो तुझी "
" एकाच अटीवर माफ करेल मी".
" कुठल्या? "
स्मितहास्य देऊन ती म्हणाली " मलाही त्या जांभळाच्या झाडाचे तोडलेले जांभुळे हवे आहेत " तिचे ते बोलणे ऐकुन आम्ही दोघेही हसू लागलो. खूपच वेगळी होती ती राव.
" मी श्रुती नुकतेच माझ्या बाबाची मुंबईहून इथे बदली झाली आहे. मी या गावात नवीनच आहे आणि आपण तर एकाच वर्गात आहोत ना"
" हो "
" गावच्या बाहेर शेवटच्या टोकाला आमचं सरकारी घर आहे. तिकडं कुणीच नसत अगदी शांत शांत असा तो परिसर आहे. कधी वाटलं तर ये आमच्या घरी आईला तुला भेटून नक्कीच आवडेल ".
"हो नक्की येईल ".
अश्या प्रकारे आमच्या मैत्रीची सुरवात झाली. हळूहळू आमची मैत्री अधिकच घट्ट होत गेली. तिची माझ्या घरी ये जा सुरु होती तसेच मी ही तिच्या घरी चांगलाच परिचयाचा झालो होतो.
बांबूची गर्द सावली असणार एक ठिकाण आणि त्यालाच लागून खळखळ वाहणारा झरा ही आमच्या अभ्यासाची जागा होती. गावाच्या थोडी बाहेरच होती.
अधूनमधून पक्षाचे थवेही तेथे डोकावत होते. कित्येक तरी वेळ आम्ही तिथे बसून पाठांतर करीत होतो तर कधी गणिते सोडवित होतो.
एकदा आमच्या भूमितीच्या बाईंनी काही गृहपाठ दिला होता. मी तर पूर्ण गृहपाठ केला होता पण काय माहित काय विपरीत घडलं श्रुतीचा गृहपाठ अपूर्ण होता म्हणून बाईंनी तिला वर्गातून बाहेर जाण्याची शिक्षा दिली. माझ्या मनाला ते सहनच झालं नाही म्हणून गृहपाठ करूनही फक्त आणि फक्त तिच्याचसाठी मी वर्गाबाहेर गेलो. त्या घटनेनी माझ्या आयुष्यावर बराच प्रभाव पडला. त्या भाबड्या वयात कोणत्याही गोष्टींचा लळा लागला तर तो सहसा आयुष्यभर मनातून निघत नाही. आमची मैत्री पाहून माझे बरेच वर्गमित्र तिच्या नावानी मला चिडवत होते. माझ्या बालमनालाही बरेच प्रश्न पडले होते. माझ्या मनातही प्रेमांकुर उमलत होते. पण तिच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घ्यायचा ध्यास माझ्या मनाला लागला होता. दहावीचे वर्ष असल्यामुळे आता सर्वाकडून माझ्यावर अभ्यासाचा ताण येत होता. " दहावीचं वर्ष सर्वात महत्वाचं असतं " हे वाक्य सर्वांच्या तोंडातून ऐकू येत होत म्हणून मी माझं सर्व लक्ष्य अभ्यासावर केंद्रित केल. मनाला हुरहूर लावून जाणाऱ्या त्या प्रश्नाचं उत्तरही लवकरच विचारू हे ही मी पक्क ठरवलं होत.
कालचक्र वेगानं समोर सरकत होत. शाळेचे ते गोड दिवस कधी संपून गेले हे कळलंच नाही. दहावीची परीक्षा सुरु झाली होती. फेब्रुवारी महिन्यात ज्याप्रमाणे वृक्षाची पानगळ सुरु होते त्याचप्रमाणे परीक्षेला सुरवात झाल्यामुळे आमच्या त्या गोड दिवसाची पानगळ सुरु होती. एकामागोमाग एक मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, विज्ञान 1, विज्ञान 2, बीजगणित हे सर्व पेपर भराभर संपले होते. आता भूमितीचा पेपर बाकी होता. अधून -मधून मी श्रुतीला पेपरबद्दल विचारणा करीतच होतो.
आज शेवटचा भूमितीचा पेपर असल्यामुळे मी खूप खुश होतो. सकाळीच उठून सर्व प्रमेयची उजळणी केली होती आणि काही गणितेही सोडवली होती. नेहमीप्रमाणेच 10 वाजता मी परीक्षा केंद्रावर पोहचलो. पेपर सुरु व्हायला अजून तासभर अवधी होता म्हणून मी उजळणी करू लागलो. तेवढ्यात ती येऊन माझ्या बाजूला उभी राहिली.
" किती अभ्यास करतो रे आता तरी पुस्तक सोड " तिच्या आवाजाने मी पुस्तकातून डोके बाहेर काढले.
" आज अभ्यासाचा शेवटचा दिवस आहे ना म्हणून जरा जास्तच अभ्यास कराव म्हटलं " माझं बोलणं ऐकुन ती हसू लागली.
" श्रुती आज आपण आपल्या रोजच्या जागेवर भेटायचं का? ". माझ्या मनात असलेले प्रेमरंग आज व्यक्त करावे एवढीच इच्छा माझ्या मनात होती.
" हो नक्की भेटू" ती हसून म्हणाली.
काही वेळातच घंटा झाली. भूमितीचा पेपर सुरु झाला. एव्हाना एवढा सावकाशपणे सरकणारा वेळ आज मात्र पेपरच्या नादात कधी संपून गेला हे कळलेच नाही. पेपर संपल्यानंतर आम्ही सर्व वर्गमित्रांनी मौजमजा करण्याची हौस भागवली आणि घरी परतलो.
ठरल्याप्रमाणे 4:30 वाजताच मी आमच्या नेहमीच्या जागेवर जाऊन तिची वाट पाहत होतो. आज निखळपणे वाहणारा तो झरा फारच सुंदर भासत होता. ते बांबुचे बनही आज नेहमीपेक्षा जरा जास्तच मोहक वाटत होते. या सर्वात खरंच बदल झाला होता कि आज त्यांच्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला होता...काय कुणास ठाऊक. 5 वाजले होते. एका चकोराप्रमाणे मी तिची वाट पाहत होतो. दूरवरून दिसणारी तिची सौंदरवान आकृती बघण्यासाठी माझे नेत्र आतूर झाले होते. 5 वाजून गेले होते. 5 चे 6 .. आणि 6 चे सात झाले होते. तरीसुद्धा तिचा काही पत्ता नव्हता. सर्वत्र अंधार पसरू लागला होता तरीपण ती येईल अशी आस माझ्या मनाला लागली होती. काही गोष्टी फार नकळतपणे घडतात याची जाणीव मला त्या दिवशी झाली. खिन्न मनाने मी घरी परतू लागलो कारण तिने आपला शब्द पाळला नव्हता.
क्रमश.....