भाग २
रात्र संपली होती… पण अंबिकाच्या मनातली अस्वस्थता अजूनही जागी होती.
पहाटे कधीतरी तिला डोळा लागला होता. पण झोप खोल नव्हती. डोळे मिटले की तीच अरुंद गल्ली समोर उभी राहत होती… पावसाने धुसर झालेल्या भिंती… लालसर पाणी… आणि ते भेदक, थंड, निर्विकार डोळे.
अंबिका दचकून जागी झाली.
खिडकीतून सकाळचा प्रकाश आत येत होता. रात्रीचा पाऊस थांबला होता. रस्त्यावर पाण्याचे ओघळ चमकत होते. घरात नेहमीची सकाळ सुरू झाली होती. आईने फोडणी घातलेल्या भाजीचा वास… स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज… बाबांनी पेपरची पानं उलटण्याचा आवाज. सगळं नेहमीसारखंच. फक्त तिच्या आत काहीच नेहमीसारखं नव्हतं.
ती अंथरुणावर बसून काही क्षण स्थिर राहिली. हात नकळत बोटांकडे गेले. त्या बोटांना अजूनही तो स्पर्श आठवत होता. क्षणभरासाठीच झालेला… पण स्पष्ट.
“विसरून जा…” ती स्वतःशीच पुटपुटली.
पण लगेच मनाने उलट विचारला
काय विसरायचं? काय पाहिलं होतंस ते? की का पाहिलंस ते?
ती उठली. आरशासमोर उभी राहिली. डोळ्यांखाली झोप न झाल्याचं जाणवत होतं. तिने चेहऱ्यावर पाणी मारलं.
“अंबिका!” आईचा आवाज आला. “नाश्ता थंड होतोय.”
ती खाली आली.
टेबलावर बाबा पेपर वाचत बसले होते. चष्म्याच्या वरून त्यांनी तिच्याकडे पाहिलं.
“काय गं? झोप झाली नाही वाटतं?”
“हं… थोडी उशिरा झोप लागली.”
बाबांनी पुन्हा पेपरकडे पाहिलं. “आजकाल लोकांना झोप का लागत नाही माहीत आहे? दिवसभर मोबाईल… आणि डोक्यात विचार.”
आई हसली. “तुमचे भाषण सुरू झाले सकाळी सकाळी.”
अंबिकाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं… पण लगेच ते विरलं.
पेपरची एक बातमी वाचत बाबा सहज म्हणाले,“लोक आता चुकीच्या गोष्टी पाहतात… आणि गप्प बसतात. म्हणूनच चुकीचं वाढतं.”
अंबिका नकळत थबकली. ते वाक्य तिने लहानपणापासून ऐकलेलं होतं. अन्याय पाहिला की गप्प बसायचं नाही. बाबांनी कितीतरी वेळा हे सांगितलं होतं. ती शांतपणे नाश्ता करत राहिली… पण मनात कालची रात्र पुन्हा जागी झाली.
ती गल्ली…
रक्ताचे डाग…
“अबीर … रिस्पॉन्ड …”
आणि तो माणूस
आईने बाबांसाठी टेबलवर डबा ठेवला आणि अंबिकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं.
"काय मॅडम आज काय चाललंय कुरापती डोक्यात?"आईने प्रश्नार्थक नजरेने विचारलं.
" काय गं आई! बाबा बघा ना सारखं मला काहीतरी म्हणत असते."ती बाबांकडे तक्रार करत म्हणाली… पण मनात वेगळाच निर्णय होत होता.
"मुलांच्या आई का उगाचच माझ्या लेकीच्या मागे लागता?" बाबा आईला हसत म्हणाले. तसं आई हसून मान उडवून आत निघून गेली.
तिच्या खोलीत परत येताच तिने टेबलावरची वही उघडली. काही कागद, नोट्स, पुस्तकं सगळं विखुरलेलं होतं. होतं. तिची पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाची शेवटची परीक्षा उरली होती. वर अभ्यासक्रमाचं एक पुस्तक ठेवलेलं होतं. तिने ते पुस्तक हातात घेतलं. त्यावर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं...
पत्रकारीता - सत्य शोधण्याची जबाबदारी.
ती काही क्षण त्याकडे पाहत राहिली. मग आरशात स्वतःकडे पाहून हळूच म्हणाली,
“जर खरंच पत्रकार व्हायचं असेल… तर अशा गोष्टींपासून पळून चालणार नाही.
काल मी घाबरले. कुणीही घाबरलं असतं." मनात काहीतरी निश्चय करत ती स्वतःशीच बोलली. " आई मी नीताकडे जाऊन येतेय." म्हणत तिने बॅग उचलली आणि ती निघाली.
रस्त्यावर सूर्य वर आला होता. कालच्या पावसाचा थंडावा हवेत होता. लोक आपापल्या कामाला निघाले होते. गाड्यांचे आवाज, रिक्षा, चहाच्या टपरीवरची गर्दी…
सगळं जिवंत. पण अंबिकाचं लक्ष फक्त एका दिशेला होतं. त्या गल्लीत...ती बाहेर उभी राहिली. काल रात्री तीच जागा भयाण वाटत होती. आणि आज...तीच जागा अगदी साधी दिसत होती. दिवसा लोकांच्या नजरेतून दुर्लक्षित राहणारी एक अरुंद वाट. ती काही क्षण थांबली. मन म्हणत होतं...परत फिर. पण दुसरं मन जास्त जोरात बोलत होतं...जर आज परत फिरलीस… तर आयुष्यभर फिरत राहशील. तिने खोल श्वास घेतला… आणि आत पाऊल टाकलं. दिवसाच्या उजेडात गल्ली वेगळी दिसत होती. जुन्या भिंतीवर पाणी वाळून गेलेलं. कडेला कचराकुंडी. वरून गेलेल्या तारांचा गुंता. रात्रीचं भय जणू कुठेच नव्हतं. ती हळूहळू पुढे गेली.
तीच जागा...तीच भिंत....जिथे काल लालसर डाग होते.
आणि आज काहीच नव्हतं. तिने भिंतीवर हात ठेवला. कोरडी, स्वच्छ. जसं काही घडलंच नव्हतं. तिच्या भुवया जुळल्या.
“इतक्या पटकन कोण साफ करेल…?” ती स्वतःशीच म्हणाली.
म्हणजे काहीतरी झालं होतं. आणि कोणीतरी ते लपवलं होतं. तिने खाली वाकून जमिनीकडे पाहिलं. चिखलात काही पावलांचे जुने अस्पष्ट ठसे होते. रात्री पावसाने बरंच काही पुसलं होतं…पण पूर्ण नाही. तिच्या डोळ्यांत चमक आली.
“अबीर”
हे नाव म्हणताना तिला विचित्र वाटलं. ती पुन्हा विचारात पडली. तो गुन्हेगार होता?
की काहीतरी वेगळं? अचानक तिचं लक्ष लक्ष गल्लीच्या टोकाशी गेलं.तिला जाणवलं. कोणीतरी…तिला बघतंय. ती ताठ झाली. हळूच मागे वळली. कोणीच नाही. गल्लीत शांतता होती. दूर रस्त्यावर एखाद्या गाडीचा हॉर्न. ती काही क्षण तशीच उभी राहिली. मन म्हणत होतं,'तू घाबरली आहेस म्हणून असं वाटतंय.'पण तिची नजर पुढे गेली. गल्लीच्या टोकाशी सावली हलली. क्षणभर. आणि अदृश्य झाली. तिचा श्वास अडकला. ती दोन पावलं पुढे गेली. कोपऱ्यावर पोहोचली. रिकामं. कोणीच नाही. पण तिथे हवेत अजूनही कोणाचीतरी उपस्थिती उरल्यासारखी जड शांतता होती.
दुसरीकडे…रस्त्याच्या पलिकडे उभा राहून अबीर शांतपणे तिला पाहत होता. काळा शर्ट. हात खिशात. चेहऱ्यावर नेहमीसारखी निर्विकार शांतता. पण नजर तिच्यावर खिळलेली. ती परत आली होती. त्याला काहीच आश्चर्य वाटलं नाही. कालच कळलं होतं, ती इतरांसारखी नाही. ती घाबरते. पण पळत नाही. त्याने हळूच नजर वळवली.
"ही मुलगी प्रश्न विचारणारी आहे…"त्याच्या मनाने त्याला सावध केलं.
क्षणभर थांबला."आणि प्रश्न विचारणारे लोक… धोकादायक असतात."
तो मागे वळला. चालत निघून गेला. अंबिका गल्लीतून बाहेर पडत होती. तिच्या हातात वही घट्ट पकडलेली होती. मनात भिती अजून होती. पण आता तिच्या भितीपेक्षा मोठी गोष्ट जन्माला आली होती... ती म्हणजे सत्य जाणून घ्यायची तीव्र इच्छा. आणि त्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा पहिला धागा....अबीर.
अंबिका गल्लीतून बाहेर आली, पण तिचे पाय आपोआप मंदावले. बाहेरचा रस्ता नेहमीसारखा गजबजलेला होता. चहाच्या टपरीवर लोक उभे राहून बोलत होते, शाळकरी मुलं धावत होती, एका रिक्षावाल्याने जोरात हॉर्न वाजवला. तिला क्षणभर विचित्र वाटलं. काही तासांपूर्वी त्या अंधाऱ्या गल्लीत काहीतरी घडलं होतं… आणि इथे जग नेहमीसारखं पुढे निघालं होतं. ती नकळत मागे वळून गल्लीकडे पाहू लागली. इतकी साधी वाटणारी जागा… पण आत काहीतरी दडलं होतं. ती पुढे निघणार इतक्यात चहाच्या टपरीवरून दोन माणसांचा मंद आवाज तिच्या कानावर आला.
“काल रात्री तिथे काहीतरी घडलं म्हणे…”गल्लीकडे मानेने ईशारा करून त्यातला एक जण म्हणाला. दुसऱ्याने लगेच आजूबाजूला पाहिलं.
"हो आपला बाळू रिक्षावाला सकाळी वर्दीसाठी आला होता, तो सांगत होता. एक माणूस पळत गल्लीत शिरला. घाबरलेला होता."
अंबिका थबकली. ती तिकडे सरळ पाहत नव्हती, पण तिचं लक्ष पूर्ण तिकडेच होतं. तिच्या मनात पुन्हा धडधड सुरू झाली. आता तिच्या मनात भितीसोबत एक नवा हट्ट जागा झाला होता. सत्य जाणून घ्यायचंच. तिने फोन काढला आणि नीताला मेसेज केला. ”संध्याकाळी भेटतेस? बोलायचं आहे."
काही क्षणांत उत्तर आलं..."हो. काय झालं?"
अंबिकाने स्क्रीनकडे पाहिलं.मग फोन लॉक केला. हे समोरासमोरच बोलायचंय. ती पुढे चालू लागली. तिला अजून माहिती नव्हतं. ती ज्या माणसाबद्दल विचार करत होती.... तो फक्त एक नाव नव्हता. तो एका अंधाऱ्या जगाचा दरवाजा होता.
आणि त्या दरवाजावर तिने पहिल्यांदा ठोठावण्यासाठी हात ठेवला होता.
ती घरी पोहोचेपर्यंत तिच्या मनात तेच विचार फिरत होते. आई काहीतरी विचारत होती, पण अंबिका फक्त हो-नाही इतकीच उत्तरं देत होती. तिचं लक्ष सतत दाराबाहेरच्या आवाजांकडे जात होतं. खोलीत जाऊन तिने बॅग बाजूला ठेवली आणि खिडकीजवळ उभी राहिली. खाली रस्त्यावर लोकांची ये-जा सुरू होती. सगळं नेहमीसारखंच. पण तिच्या आत काहीच नेहमीसारखं नव्हतं. कालपर्यंत अबीर हे फक्त एक नाव होतं. आज त्या नावामागे प्रश्न उभे राहिले होते. आणि अंबिकाच्या स्वभावाला प्रश्न अनुत्तरित ठेवणं कधीच जमत नव्हतं.
To be continued…
******************