संजीवनी - Part - 1 Amita a. Salvi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संजीवनी - Part - 1

संजीवनी

काही कामासाठी बाहेर गेलेले नानासाहेब घरी आले, ते चिंब भिजूनच. पावसाळा संपला असताना पावसाने आज अचानक हजेरी लावली होती.त्यांच्या सुनेने, रेखाने दार उघडले. " बाबा, तुम्ही उन्हासाठी छत्री नेली होती, एवढं भिजायला कसं झालं ? " तिने आश्चर्याने विचारले.

" पावसाबरोबर वाराही होता, त्यामुळे छत्रीचा उपयोग झाला नाही. दिवाळी काही दिवसांवर आलीय आणि आता हा पाऊस! सगळे ऋतु बदलायला लागलेयत बहुतेक ! " नानासाहेबांच्या स्वरात चीड होती.

"तुम्ही कपडे बदलून या! तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते." रेखा किचनकडे जाता जाता म्हणाली.आणि नाना त्यांच्या खोलीकडे वळले; पण आत जाता जाता त्यांची पावले दरवाजाजवळ थबकली. अात त्यांचा नातू सागर फोनवर हलक्या आवाजात बोलत होता. नानांच्या कानावर अगदी तुटक शब्द पडत होते.

" माझ्या लक्षात आलंय; तू आजकाल मला टाळायचा प्रयत्न करतेय! " सागर उत्तेजित स्वरात बोलत होता. समोरच्या व्यक्तीने बहूतेक त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला असावा, कारण तो पुढे म्हणाला ,"मला सबबी नको आहेत. काय चाललंय सगळं माहीत आहे मला! तुला आता नवीन मित्र मिळालाय! गेले काही दिवस त्या सनीबरोबर दिसतेस तू! गेले चार महिने मला रोज काॅलेज बुडवून बाहेर भटकायला यायची गळ घालत होतीस. माझी अॅटेंडन्सही |पूर्ण झाली |नाही. टर्मिनलसाठी माझा मागचा परफाॅर्मन्स बघून परमिशन मिळालीय. माझ्या पूर्ण करीयरची वाट लावलीयस ; आणि आता नवीन मित्र मिळाल्यावर मला विसरलीस. हे तुला भारी पडणार आहे. सोडणार नाही तुला मी! " मोबाईल काॅटवर फेकून देऊन सागर डोक्यावर चादर घेऊन झोपून गेला.

| नाना चोरपावलाने आत गेले आणि कपडे बदलून हाॅलमधे बसले. ते शांत दिसत असले, तरी त्यांच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. त्यांच्यातला पोलिस अधिकारी त्यांना सागरचं भवितव्य धोक्यात असल्याची सूचना देत होता. सागरला यातून कसंही करून बाहेर काढण्याचा त्यांनी निश्चय केला होता. रेखाच्या हातातून चहाचा कप घेताना त्यांनी विचारलं, " आज सागर काॅलेजला नाही गेला?"

"आज सकाळपासून त्याचं डोकं दुखतंय, म्हणून मीच त्याला म्हटलं की घरी राहून विश्रांती घे.आता त्याची टर्मिनल जवळ आलीय. तब्येत चांगली रहायला हवी." रेखा म्हणाली . मुलाच्या आयुष्यात काय उलथापालथ चालली आहे, याची जराही कल्पना तिला नव्हती. "त्याचं जरा डोकं दुखलं तर त्याच्या काॅलेजला बुट्टी ! मी मात्र कधी शाळेत जात नाही म्हटलं, तर आम्हाला उपदेशाचे डोस मिळतात." आत येत त्यांची नात माधुरी लटका राग दाखवत म्हणाली.

" दहावीची परीक्षा होऊ दे. मग एवढी रजा मिळेल, की घरी राहून कंटाळशील." रेखा हसत म्हणाली.

"कसा चाललाय तुझा अभ्यास. सागर मदत करतो की नाही?" नानांनी सहजपणा दाखवत विचारले. कारण माधुरीकडून नक्कीच काही तरी माहिती मिळेल याची त्यांना चांगलीच कल्पना होती.

"कुठे हो आजोबा! आजकाल तो त्याच्याच दुनियेत असतो. काही विचारायला गेले तर लक्ष असतं कुठे त्याचं? केवढा भाव खातो! तो पुर्वीचा दादा वाटतच नाही." माधुरीला जाणवणारा सागरच्या वागण्यातला फरक तिने लगेच बोलून दाखवला पण काही गंभीर प्रकरण अाहे याची कल्पना तिला अालेली दिसत नव्हती.

माधुरी क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली, आणि आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेत नानांनी सागरच्या मित्राला - अनीशला - फोन लावला. "मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. मला माहीत आहे, तुझी टर्मिनल जवळ आलीय. पण माझ्यासाठी थोडा वेळ काढ."

"अहो आजोबा! असं का म्हणता? मी आज संध्याकाळी घरी येऊ का?" अनीश तत्परतेनं म्हणाला. सागरच्या सगळ्या मित्रांशी प्रेमाने वागणा-या आणि आपल्या पोलीस खात्याच्या कारकीर्दीतील किस्से रंगवून सांगणा-या करारी स्वभावच्या पण हसतमुख नानासाहेबांविषयी त्याच्या मनात खूप आदर होता.

"नको! घरी नको! आपण संध्याकाळी सहा वाजता 'लकी गार्डन'मधे भेटूया नक्की ये! मी वाट बघतो."

***

बरोबर सहाच्या ठोक्याला नाना गार्डनच्या दरवाजात उभे होते. अनीशही वेळेवर आला. नानांनी का बोलावले असावे याची त्याला थोडीशी कल्पना होतीच. त्यामुळे तो थोडा घाबरलेला वाटत होता त्याच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, "चल आपण त्या बाकावर बसून बोलूया." अनीश त्यांच्याबरोबर बसला पण तो नानांकडे पहायलाही घाबरत होता. जणू काही नाना त्याच्या नजरेतूनच सर्व काही जाणून घेतील असे त्याला वाटत होते. तोंडून काही चुकीचं गेलं आणि सागरला कळलं तर आपण जिवलग मित्राला गमावून बसू ही भीति त्याला सतावत होती. पण दुसरीकडे त्याला हे सुद्धा कळत होतं की सागरला कोणाच्या तरी भक्कम आधाराची गरज होती. त्याचे वडील बदलीमुळे बाहेरगावी होते. त्याच्या आजोबांना काही गोष्टी कळणं आवश्यक होतं.

" मला सागरविषयी तुझ्याशी थोडं बोलायचं आहे." नानांनी वेळ न घालवता थेट विषयालाच हात घातला. "आजकाल त्याची मनःस्थिती चांगली वाटत नाही. तू त्याच्याच काॅलेजमधे जातोस. त्यामुळे तुला कारण माहीत असणारच. मला काही सांगितलंस तर फार बरं होईल. मला सांग! काॅलेजमधे असं काय घडलंय की सागर इतका बदलून गेलाय? तू काही काळजी करू नको. आपल्या या भेटीविषयी त्याला काही कळणार नाही."

नानांचे आश्वासन मिळताच अनीशच्या मनातली भीति दूर झाली. आणि तो बोलू लागला."तुम्हाला तर माहीतच आहे आजोबा! सागर नेहमीच काॅलेजमधे पहिला येतो. यावर्षी काॅलेजमधे नवीन आलेली सोनल सतत सागरच्या मागे असायची. अभ्यासासाठी म्हणून तिने मैत्री वाढवली. हळू हळू सागर तिच्या जाळ्यात गुरफटत गेला. ती अभ्यासात यथातथाच आहे, पण दिसायला अतिशय सुंदर आणि स्मार्ट आहे. त्यामुळे सागरवर तिची लगेच भुरळ पडली. ब-याच वेळा काॅलेज बुडवून ती त्याला बरोबर घेऊन जात असे. गेल्या टर्मची त्याची अॅटेन्डन्स एवढी कमी आहे की त्याचे पूर्वीचे मार्क लक्षात घेऊन काॅलेजने कशीबशी त्याला परीक्षेला बसायची परवानगी दिली आहे. गेल्या महिन्यात काॅलेजमधे एक नाटक झाले. त्यात हीरोची भूमिका करणाऱ्या सनीशी सोनलची मैत्री जमली. आता ती सागरच्या ऐवजी त्याच्या मागे राहू लागली. हे लक्षात आलं, आणि सागर पार कोलमडून गेला. "

"हा सनी कोण आहे?" नानांनी विचारले.

"खूप मोठ्या घरचा मुलगा आहे तो! वडील जनहित पार्टीचे मोठे नेते आहेत. सनीला अभ्यासात फारसं स्वारस्य. नाही. जणू आजच मोठा नेता असल्याप्रमाणे वागतो. "

| " हं! हे सर्व बघूनच ती मुलगी त्याच्या मागे लागली असावी." नानासाहेब सर्व काही समजल्याप्रमाणे स्वतःशीच पुटपुटले.

" तिने फसवलं या भावनेपेक्षा आता काॅलेजमधले मित्र आपल्याला हसतील ही भीति सागरने एकदा मला बोलून दाखवली. मी त्याला समजावण्याचा प्रयत्नही केला की, सगळे तुला नाही, तर सोनलला चुकीची ठरवतायत; पण त्याला पटतच नाही. काॅलेजमधल्या मुलांपासून तोंड लपवण्यासाठी काॅलेजला येत नाही. आणि आला तरी पुर्वीसारखा मिळून मिसळून वागत नाही. कोणाशी बोलत नाही. तो अभ्यासात एवढा मागे पडलाय हे घरच्यांना कळलं तर त्यांना किती दुःख होईल, त्यांचा किती मोठा अपेक्षाभंग होईल या कल्पनेने त्याचा सोनलवरचा राग अधिकच वाढलाय. त्याला या मनःस्थितीत कोणीतरी समजुन घेण्याची गरज आहे, आजोबा! " अनीशची |मित्राविषयीची काळजी त्याच्या बोलण्यातून जाणवत होती.

| | " बाळा बरं झालं तू सर्व गोष्टींची मला कल्पना दिलीस. त्याचं बदललेलं वागणं मला दिसत होतं, पण त्यामागचं कारण कळत नव्हतं." नानासाहेबांनी अनीशचे फक्त आभार मानले नाहीत ; तर त्याला बागेत भेळपुरी खाऊ घालून मगच निरोप दिला.

| त्या रात्री सागर अभ्यासाला बसला, पण त्याची अस्वस्थता लपत नव्हती. त्याच्या समोर उघडलेले पुस्तक होते. पण लक्ष मात्र पुस्तकात नव्हते. अनीशकडून पूर्ण कहाणी ऐकल्यावर नानांना त्याची अतिशय काळजी वाटत होती, पण या नाजूक विषयावर त्याच्याशी बोलायचे कसे हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर होता. एक तर तो त्यांच्यासमोर मन मोकळे करेल असे त्यांना वाटत नव्हतं, आणि अधिकाराने काही सांगितलं ; तर तुमचा काळ वेगळा होता म्हणून उडवून लावले तर? आज सागर एवढेच त्याचे आजोबाही अस्वस्थ होते. त्यांनाही झोप लागत नव्हती.

***

दुस-या दिवशी सागरच्या चेह-यावर खूशी दिसत होती. छान तयार होऊन तो काॅलेजला जायला निघाला , तेव्हा नानांना वाटले, ' बहूतेक हळू- हळू धक्क्यातून सावरतोय.' त्यांनी मनातल्या मनात देवाचे आभार मानले.

त्या दिवशी सागर दुपारी लवकर घरी आला, पण नंतर तो त्याच्या खोलीतच अभ्यास करत बसला. त्याच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून नाना हाॅलमध्ये मासिक वाचत बसून राहिले. सोफ्यावरच त्यांचा डोळा लागला. ते उठले तेव्हा संध्याकाळ झाली होती. अतिविचारांनी त्यांचं डोकं दुखत होतं. रेखाने दिलेल्या चहाबरोबर अॅस्पिरिनची गोळी घेतली तर लवकर बरं वाटेल असा विचार करून त्यांनी रेखाकडे गोळी मागितली. रेखा आणि माधुरी एका कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार झाल्या होत्या. थोड्याच वेळात निघणार होत्या.

"अॅस्पिरिन दोन दिवसांपूर्वी सागरने मगितल्या होत्या. त्याने त्याच्या खोलीतच कुठे तरी ठेवल्या असतील" रेखा म्हणाली.

" मी मागतो त्याच्याकडे." असे म्हणून नाना उठले.

" बाबा! तो बाहेर गेलाय. त्या शोधाव्या लागतील.मी बघते त्याने कुठे ठेवल्या आहेत! "रेखा म्हणाली.

"मी बघतो. तुम्ही दोघी निघा आता! नाही तर तुम्हाला वेळ होईल." आपल्या खोलीकडे जात नाना म्हणाले. रूममध्ये जाऊन ते सागरच्या स्टडी टेबलचे खण शोधू लागले. अचानक् त्यांचे डोळे विस्फारले. त्यांची नजर ड्राॅव्हरमधल्या एका बाटलीवर पडली. ही अॅसिडची बाटली सागरच्या ड्राॅव्हरमध्ये कशी? आणि मनात तो विचार येताच नानासाहेब मट्कन् खुर्चीवर बसले. - अॅसिड अटॅक - आजवर अनेक वेळा ऎकलेला शब्द ; पण आपल्या सुसंस्कृत घराशी कधी याचा संबंध येईल, असं कधी चुकूनही त्यांना वाटलं नव्हतं. त्यांना वाटलं सागर आला की त्याला चांगलं धारेवर धरावं. आजपर्यंतचे संस्कार कसे विसरला हा मुलगा? पण काही क्षणांत त्यांनी स्वतःला सावरलं. यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार ते करू लागले.

|सर्वप्रथम त्यांनी ती अॅसिडची बाटली तेथून उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवली. सोफ्यावर बसून ते सागरची वाट पाहू लागले. रेखा आणि माधुरी कधीच निघून गेल्या होत्या. घर रिकामी होते. आणि नेहमीची प्रसन्नता घरात जाणवत नव्हती. रिकाम्या घरात नानांना खूप एकाकी वाटत होतं. त्यांना घुसमटल्यासारखं होत होतं. त्यांच्या मनातली भीति आणि सागरविषयीची काळजी ते कोणाकडे व्यक्त करू शकत नव्हते. शेवटी त्यांनी या मिशनमधील त्यांच्या एकुलत्या एका साथिदाराला - अनीशला फोन केला." सागर आज काॅलेजला आला होता नं! पुर्वीसारखा वागत होता की स्वतःमध्ये हरवलेला वाटत होता? त्या सोनलशी काही बाचाबाची झाली नाही नं?" त्यांनी अधीर स्वरात विचारले.

"तो आज खूप दिवसानी आम्हा मित्रांबरोबर हास्यविनोद करत होता पण मी त्याला विचारलं, की काॅलेजमधे येताना पूर्वीसारखे एकत्र येत जाऊया का? तेव्हा नको म्हणाला. अभ्यास मागे राहिलाय, लवकर येऊन काॅलेजच्या लायब्ररीत बसणार आहे अशी सबब त्याने सांगितली. उद्या रविवारची रजा आहे. आम्ही सगळे मित्र संध्याकाळी सी फेसला जाणार आहोत तिथे यायलाही त्याने अभ्यासाचं कारण सांगून नकार दिलाय. पण तिच्या एका मैत्रिणीकडून मला असं कळलंय की त्याने सोनलला कुठेतरी भेटायला बोलवून घेतलंय. उद्या तिचा वाढदिवस आहे, तुला शेवटचं भेटायचं आहे; असं तो तिला म्हणाला ; आणि तीही भेटायला तयार झालीय " अनीशने माहिती पुरवली.

"उद्या सगळे मित्र मजा करा. जमलं तर सागरलाही पाठवतो." नाना मनातलं विचारांचं वादळ लपवत म्हणाले. " तुम्ही काळजी करू नका आजोबा! सागर लवकरच नाॅर्मल होईल." अनीशने फोन ठेवता ठेवता त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला." नवीन काही कळलं तर मला कळवायला विसरू नकोस." नानांनी फोन ठेवला, पण त्यांच्यातल्या इन्सपेक्टरने मिळालेले सर्व दुवे जोडायला सुरुवात केली होती.

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी सागर घरी आला. "अरे सागर! किती उशीर! एकट्याला कंटाळा आला मला! तुझी आई आणि माधुरी बाहेर गेल्यायत. मी केव्हाचा तुझी वाट बघतोय! " नाना वातावरणात सहजपणा आणण्याचा प्रयत्न करत होते.

"आता टर्मिनल एक्झॅम जवळ आलीय, त्यामुळे एक्स्ट्रा लेक्चर होती. खूप दमलोय आजोबा!" सागर थकलेल्या आवाजात म्हणाला.

"तू फ्रेश होऊन ये. मी तोपर्यंत दोघांसाठी छान काॅफी बनवतो." नाना किचनकडे जाताजाता म्हणाले.

|काॅफीचे मग घेऊन ते आले, तेव्हा सागर सोफ्यावर आरामात बसला होता. काॅफी पिताना तो गंभीर होता, असं वाटत होतं की तो हे क्षण मनात जपून ठेवतोय. आजोबांची माया बघून त्याचे डोळे भरून आले होते हे सुद्धा नानासाहेबांच्या लक्षात आलं होतं. बहुतेक तो उद्या काय होणार आहे याचा विचार करत असावा. त्यांना त्याच्याशी खूप बोलायचं होतं पण सुरुवात कुठून करावी हेच कळत नव्हतं. त्याना हे सुद्धा कळत होतं की जर आज ते सागरशी बोलले नसते, तर बोलण्याची वेळ निघून गेली असती.

" वा! आजोबा! किती छान काॅफी बनवता तुम्ही! माझा सगळा थकवा निघून गेला. मी आता अभ्यासाला बसतो. टर्मिनल जवळ आलीय. " आता तो थोडा प्रसन्न वाटत होता.

सागर त्याच्या रूममधे गेला. थोड्या वेळाने नानासाहेब आत गेले. सागरने टेबलाच्या खणातलं सगळं सामान काॅटवर टाकलं होतं आणि रिकामा ड्राॅव्हर बाजूला पडला होता. आता त्याने कपाट शोधायला सुरुवात केली होती.

"किती हा गोंधळ! एवढं काय शोधतोयस सागर?" खरं उत्तर तो देणार नाही हे माहीत असूनही नानांनी विचारले.

"काही नाही आजोबा! एक पुस्तक शोधतोय. " सागर म्हणाला. त्याच्या चेह-यावरील भीति नानांच्या नजरेतून सुटली नाही.

"तू ती अॅसिडची बाटली तर शोधत नाहीयस नं? मला मगाशी तुझ्या खणात दिसली. जर फुटली तर वह्या - पुस्तकं खराब होतील , म्हणून मी तिथून उचलली. अॅसिडची बाटली कशासाठी आणली आहेस?" नानानी आवाजात सहजपणा आणत विचारले. आता विषयाला तोंड फोडलेच पाहीजे; त्याशिवाय सागरच स्वतः काही सांगणार नाही; हे त्यांच्या लक्षात आले होते.

सागरने |चमकुन |त्यांच्याकडे | पाहिलं. अनपेक्षितपणे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तो थोडा गडबडला आणि चाचरत म्हणाला, " ते एका प्रयोगाची प्रॅक्टिस घरी करण्यासाठी आणलं होतं."

"मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे सागर. आज घरी कोणी नाही हे चांगलं आहे. आपण मोकळेपणाने बोलू शकतो. मी गेले काही दिवस बघतोय, तू अस्वस्थ आहेस. ब-याच वेळा काॅलेजलाही जात नाहीस. घरात कोणाशी नीट बोलत नाहीस. स्वतःमधे हरवून गेलेला असतोस. तुझ्या मनाला कशाचा त्रास होतोय मला कळेल का? तुला विमनस्क बघून जीव तुटतो माझा." नाना कळवळून बोलत होते.

" तसं काही नाही आजोबा! अभ्यास जास्त असतो सकाळी काॅलेज, संध्याकाळी क्लास - खूप धावपळ होते; कोणाशी बोलायला वेळ मिळत नाही." सागरने आजोबांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

"पण गेले काही दिवस तूझं अभ्यासातही लक्ष दिसत नाही. तुला माहीत आहे नं? हे तुझं ज्यूनियर काॅलेजचं शेवटचं वर्ष ! या वर्षी मिळणा-या मार्कांवर तुला तुझ्या आवडीच्या कोर्सला अॅडमिशन मिळणार आहे. " नानांच्या बोलण्यावर उत्तर देण्याऐवजी सागर खाली मान घालून बसला होता. नानांच्या बोलण्यातली कळकळ त्याला कळत होती. पण आपली अगतिकता आजोबांना कळेल असे त्याला वाटत नव्हते.

काही क्षण शांततेत गेले. " ही सोनल कोण आहे?" नानांनी अगदी खालच्या आवाजात विचारले, आणि सागर भयचकित नजरेने त्यांच्याकडे पाहू लागला.

"तुम्हाला तिच्याविषयी कसं माहीत? " त्याला हा आश्चर्याचा दुसरा धक्का होता.

" तुझे आजोबा इन्सपेक्टर होते विसरू नको." नाना ताण कमी करण्यासाठी हसत म्हणाले.

" नाही! मला बाहेरील. कोणाकडून नाही कळलं! तुला तिच्याशी फोनवर बोलताना ऎकलं. काय म्हणत होतास तू? बदला घेईन! तू तिचा बदला घेशील पण आपल्या घरातली तुझ्यावर प्रेम करणारी सर्व माणसं घायाळ होतील, हे लक्षात नाही येत का तुझ्या?" आता सागरला स्वप्नांच्या दुनियेतून वास्तवात आणलंच पाहिजे हे ओळखून नानांनी सागरला समजावायला सुरुवात केली.

| आजोबांना सर्व काही माहीत आहे, हे सागरच्या लक्षात आलं आणि तो स्वतःचं मन मोकळं करू लागला. त्याचे डोळे डबडबले होते. नानांच्या कुशीत शिरून रडावं असं त्याला वाटत होतं. आपल्या दुःखात आजोबांसारखी भक्कम आधार देऊ शकणारी व्यक्ती सहभागी आहे आहे या जाणिवेनेच त्याच्या मनावरचा अर्धा ताण कमी झाला होता. " या सोनलने मला चार महिने बोटावर नाचवलं. नोट्स घेण्याच्या निमित्ताने माझ्याशी ओळख वाढवली. काॅलेज बुडवून शाॅपिंगला, सिनेमा - नाटकांना, तर कधी कुठे कुठे भटकायला घेऊन जायची. पिरियड बंक केले तर अभ्यास मागे पडेल म्हणालो की रागवायची, पुस्तकातला किडा म्हणायची. मीही तिच्या रुपाला आणि नख-यांना भाळलो. तिच्याशी मैत्री वाढवली. गेल्या सहा महिन्यात तिने मला एवढ्या वेळा काॅलेज बुडवायला लावलं, की कमी अॅटेंडन्ससाठी मला टर्मिनलला बसता येणार नव्हतं. माझा पुर्वीचा रेकाॅर्ड बघून मला परीक्षेला बसायला मिळणार आहे पण अभ्यास एवढा मागे पडलाय की परीक्षेला बसूनही काही उपयोग नाही. आणि माझ्या करीयरची वाट लावली आणि आता ती माझ्याकडे बघायलाही तयार नाही. एका दुस-याच मुलाबरोबर दिसते. मला तिचा का राग येणार नाही आजोबा? आणि तिला जर शिक्षा झाली नाही तर ती माझ्यासारख्या अनेक मुलांचे आयुष्य बरबाद करेल." स्वतःची बाजू मांडताना सागरच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. हे सगळं अनीशकडून कळलं होतं पण मनावरचा ताण कमी होण्यासाठी सागरला स्वतःच्या भावना व्यक्त करू देणं आवश्यक होतं. तो जेव्हा बोलायचा थांबला तेव्हा ते बोलू लागले.

| " काही माणसांचे स्वभाव वेळीच कळणे हिताचे असते. तुझ्यासारख्या हुशार मुलाला मागे पडलेला अभ्यास भरून काढणं मुळीच कठीण नाही. पण ज्या मुलीला करीअरचं महत्व कळत नाही, मित्राचं नुकसान झालं तरी जराही पर्वा करत नाही; तिच्याबरोबर आयुष्य काढणं किती त्रासदायक ठरलं असतं याचा जरा विचार कर. आताच तिचा खरा चेहरा समोर आला हे चांगलंच झालं! तिच्यामुळे किती लोकांचं आयुष्य बरबाद होईल हा पुढचा विचार तुला करण्याचं काय कारण आहे. तिला भेटणारे सर्वजण तुझ्यासारखे सरळ स्वभावाचे असतील कशावरून? या जगात शेरास सव्वाशेर कधी ना कधी मिळतोच. तिने जर स्वतःला सुधारलं नाही, तर तिच्या या बेताल वागण्याचा पश्चात्ताप तिला एक दिवस नक्कीच होईल. पण ते सर्व तिच्या नशीबावर सोडून दे. तिच्या विचारांमधून बाहेर पड आणि तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा विचार कर." नानांचं म्हणणं सागरला पटत होतं, हे त्याच्या चेह-यावरून नानांना कळत होतं. त्याच्या डोळ्यातले अश्रूही थांबले होते. त्यामुळे हुरूप येऊन ते पुढे बोलू लागले,

|" चूक तुझीही आहे. तुला जेव्हा कळलं, की तिच्या मैत्रीमुळे तुझं नुकसान होतंय, तेव्हाच तू तिच्यापासून दूर व्हायला हवं होतं. तुझ्या आई-बाबांनी तुझा जन्म झाल्यापासून तुझ्या उज्वल भविष्याची स्वप्न रंगवली. ती सत्यात उतरवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं आणि एका अविचारी मुलीने इतक्या अल्पावधीत तुझ्या भविष्यावर पाणी | फिरवलं, या गोष्टीला |तूही तिच्याइतकाच जबाबदार आहेस."

| आता आपली चूक सागरच्या लक्षात येऊ लागली होती. " साॅरी आजोबा, मी खरंच वहावत गेलो होतो. तिचा प्रभाव असा होता, की विचार करण्याची शक्ती मी गमावून बसलो होतो. पण आता माझ्या अभ्यासाचं जे व्हायचं होतं ते नुकसान झालंच नं! बाबांना कळेल तेव्हा मी कसं तोंड दाखवू त्यांना? त्यांच्या किती अपेक्षा होत्या माझ्याकडून!" तो आता एकाद्या मित्राप्रमाणे आजोबांकडे मन मोकळं करत होता.

| " आता तर तू अधिक मोठी चूक करतोयस.तुझा अभ्यास- करीअर यापेक्षा तू सुरक्षित असणं त्यांच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अभ्यास भरून काढायला तुला पुरेसा वेळ आहे. तिचं वागणं , तिचा भविष्याकाळ, हे सर्व विचार मनातून काढून टाक. ज्या वाटेने आपल्याला जायचं नाही त्या वाटेवरून दुसरं कोण जातंय याचा विचारच कशाला करायचा? या आधुनिक विचारांच्या काळात तुम्हा मुलांना आयुष्याचा जोडीदार पारखण्याची संधी मिळते, त्याचा योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी उपयोग करा. प्रथमदर्शनी प्रेम वगैरे भुलभुलैय्यामधे न अडकता निखळ मैत्री ठेवा, आणि गुणांची |पारख करून सुखदुःखात साथ देणारा साथीदार शोधण्याचा प्रयत्न करा." नानांना नातवाला कसं आणि किती समजावू असं झालं होतं. त्यांच्या मनातली काळजी उपदेशाचं स्वरूप घेऊन शब्दरूप घेत होती.

| "पण आमच्यामधे मैत्रीच होती आजोबा!" अजून विशीच्या आतलं |वय असलेला सागर, प्रेम - आयुष्याचा जोडीदार हे शब्द ऐकूनच लाजला होता. त्याने सोनालीबरोबरच्या मैत्रीला इतका गहिरा रंग दिला, पण इतका दूरवरचा विचार कधी केला नव्हता.

|"अच्छा! म्हणजे ती तुझी फक्त मैत्रीण होती. मग तिलाही तिच्या मनासारखी संगत शोधण्याचा हक्क आहेच नं! बाळ! आयुष्य नेहमी वहात्या पाण्यासारखं असलं पाहिजे. पाणी एका जागी थांबलं, तर कुजतं. आयुष्याचंही तसंच आहे. म्हणूनच फक्त आठवणींवर थांबून न रहाता भूतकाळ मागे टाकत, जो जीवनातील प्रत्येक क्षण जगतो, तोच यशस्वी होतो. तुझं आयुष्य तर आता सुरू झालंय. पहिल्याच धक्क्याने कोलमडून कसं चालेल? तुझा आत्मविश्वास डळमळीत होऊ देऊ नको. झालं गेलं विसरून आयुष्याची गाडी प्रयत्नपूर्वक परत मार्गावर आण." बोलताना आजोबा नातवाच्या काळजीने गहिवरले होते.

| त्यांना मधेच थांबवत सागर बोलू लागला, " पण आजोबा माझे मित्र, काॅलेजमधली मुले-मुली मला हसत असतील त्याचं काय?"

" एवढा विचार करू नको सागर! चार दिवस कुजबुज होईल, आणि नंतर सगळे विसरून जातील. आणि मला खात्री आहे, तिचं वागणं कोणालाही रुचणारं नाही; त्यामुळे तुला कोणीही दोष देणार नाही. एवढंच काय, काही काळ गेल्यावर तुलाही हा अजाण वयातला वेडेपणा वाटेल. तुलाच वाटेल की आपण सोनलला नको तितके महत्त्व दिले. काळ हे प्रत्येक जखमेवरचं ऒषध आहे. दुःख कितीही मोठं असलं तरी काळाच्या ओघात सॊम्य होतं. आणि तुझ्या बाबतीत तर तुझ्या चांगल्यासाठीच ती तुझ्यापासून दूर झाली असं समज आणि आनंदाने आपलं भविष्य बनव. " आजोबा अनेक प्रकारे नातवाला समजावण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या अनुभवाच्या बोलांचा सागरवर चांगला परिणाम झालेला नानांना दिसत होता. त्याच्या चेह-यावरील |कठोर |भाव कमी | झाले होते. आजोबांचा आयुष्याचा अनुभव कामी आला होता.

| |मंद हसत सागर म्हणाला," काही वर्षांनी नाही आजोबा! मला तर आताच माझ्या मूर्खपणावर हसू येतंय. माझी स्वप्नं - माझं करिअर, माझ्यावर |प्रेम करणारी घरातली माणसं- सगळं विसरून, तिच्या मैत्रीला अवास्तव महत्त्व देत होतो मी. आता असं वाटतं की तिच्यासारख्या मुलीने मैत्री तोडली, तेच बरं झालं. नाहीतर पुढे जाऊन अधिकच गुंता झाला असता. थँक्स. आजोबा! तुम्ही मला परत जमिनीवर आणलं. भरपूर मेहनत करून चार महिन्यांत पूर्वीचा रँक पटकावून पुढच्या | वर्षी | इंजिनियरिंगला चांगल्या काॅलेजमधे अॅडमिशन घेऊन दाखवतो की नाही बघा. जरी सोनलमुळे काॅलेजची लेक्चर मिळाली नसली तरी संध्याकाळच्या क्लासेसमधे सगळा अभ्यास व्यवस्थित झालाय. पण आजोबा! सोनलविषयी आई-बाबांना सांगू नका. ते उगाच चिंता करतील."

| "नाही सांगणार! तुला तुझी चूक उमगली यात सर्व काही आलं. पण मला तुझ्याकडून एक वचन हवंय. यापुढे कोणताही मोठा निर्णय घेताना स्वतःचा आणि घरच्या माणसांचा विचार करशील. मोठा प्राॅब्लेम असेल तर घरच्या कुणाला तरी विश्वासात घेशील. एकटाच कुढत बसणार नाहीस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यापुढे आयुष्यात कोणताही मोठा निर्णय भावनेच्या किंवा रागाच्या भरात न घेता विचारपूर्वक घेशील." आजोबांच्या बोलण्यावर सागरने त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाला,

| " नक्की आजोबा! सल्ला घ्यायला कोणी कशाला? तुम्ही अाहात नं माझे गाइड! " त्याच्या हास्यातून त्याच्या मनातले मळभ दूर झालं आहे; हे जाणवत होतं. जरा थांबून त्याने विचारले, "पण माझी ती बाटली तुम्ही कुठे ठेवलीय, ती मला द्याल का? मला एक एक्सपेरिमेंट करून बघायचाय. गेल्या महिन्यातलं एक प्रॅक्टिकल बुडालं ते घरी करून बघतोय! "

| आता त्याच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. नानांनी अॅसिडची बाटली आणून टेबलवर ठेवली. "सांभाळ हं! काचेची बाटली आहे, फुटता कामा नये. ते काळजीच्या स्वरात म्हणाले आणि खोलीबाहेर निघाले.

***

त्या दिवशी रात्री विवेक नेहमीप्रमाणे साप्ताहिक सुटीवर घरी आले. सागरला वडिलांशी मनमोकळेपणाने बोलताना बघून आपली मात्रा लागू पडली अशी नानांची मनोमन खात्री झाली. घर परत हसता-खेळताना बघून |मनातल्या मनात त्यांनी देवाचे आभार मानले. रविवारी संध्याकाळी ते विवेकना कारने स्टेशनला सोडायला गेले. येऊन पहातात तर सागर घरी नव्हता. त्यानी रेखाला विचारले." कोणाचा तरी फोन आला होता. हो! हो! नक्की येतो. अर्ध्या तासात येतो! असं म्हणाला आणि थोड्याच वेळापूर्वी मित्रांबरोबर चॊपाटीवर जातोय सांगून बाहेर पडला." नानांनी त्याच्या खोलीत जाऊन पाहिले. ती अॅसिडची बाटली जागेवर नव्हती हे पाहून त्यांचे पाय लटपटू लागले. ते मट्कन काॅटवर बसले. " अॅसिडची बाटली घेऊन सोनलला भेटायला तर गेला नसेल? त्याच्या मनात तरी काय आहे? काल एवढं समजावून सांगितलं ते फुकट गेलं बहुतेक! मला बेसावध ठेवण्यासाठी सर्व काही पटल्याचा त्याने खोटा अभिनय केला असेल?" अनेक विचारांचा कल्लोळ त्यांच्या मनात उठला होता. हे सर्व ते घरात कोणाला सांगू शकत नव्हते. रेखा आणि माधुरीला घाबरवून टाकणे त्यांना योग्य वाटत नव्हतं. शेवटी उलटसुलट | विचारांनी |गुदमरणारं मन शांत करण्यासाठी ते |इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या छोट्या बागेत जाऊन बसले. त्या बाकावरून त्यांना सागरच्या खोलीची खिडकी दिसत होती. काल भावविवश झालेला सागर त्यांना आठवत होता. त्याची समजूत काढण्यात आपण कुठे कमी पडलो हेच त्यांना कळत नव्हते. सोनलला तो कुठे भेटणार आहे, हे त्यांना माहीत असते तर होणारा प्रसंग ते टाळू शकले असते. त्यांनी प्रयत्न करायचे ठरवले.

त्यांनी अनीशच्या मोबाइलवर फोन लावला. पण तो फोन उचलत नव्हता. आता काय करावं या विचारात ते असतानाच त्यांचं लक्ष एका कुंडीकडे गेलं. कालपर्यंत गुलाबांनी डवरलेलं त्या कुंडीतलं झाड पार सुकून गेलं होतं. ते गुलाबाचं रोप नानांनी आवडीने लावलं होतं आणि सुंदर फुले सहज दिसावीत म्हणून बागेत बेडरूमच्या खिडकीबाहेर ठेवलं होतं. त्या झाडाची ती अवस्था पाहून ते त्या कुंडीजवळ गेले. कुंडीत काचा दिसल्या म्हणून त्यांनी निरखून पाहिलं. त्या त्याच काल पाहिलेल्या अॅसिडच्या बाटलीच्या काचा होत्या. म्हणजेच सागरने ती बाटली फेकून दिली होती. पण जाताना घाईत फेकल्यामुळे ती बाजूच्या पाचोळ्याच्या ढिगात पडण्याऐवजी चुकून कुंडीत पडली होती. नानांनी सुटकेचा श्वास टाकला.

तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला.तो अनीशचा फोन होता. " काळजी करू नका आजोबा! सागर आमच्याबरोबर आहे. आज खूप मजा करतोय तो! बोला त्याच्याशी!" अनीशला मित्राचा चांगला मूड बघून झालेला आनंद त्याच्या आवाजातून कळत होता.

"आजोबा! मी माझ्या काॅलेजच्या मित्रांबरोबर चॊपाटीवर आलोय . घरी यायला थोडा उशीर होईल . काळजी करू नका." सागरचा आवाज ऐकला, आणि नानांच्या मनातील सगळ्या शंका दूर झाल्या. त्यांनी परत एकदा त्या सुकलेल्या रोपट्याकडे पाहिलं. ते करपलेलं रोपटं सागरच्या मनाला सुजाण विचारांची संजीवनी मिळाल्याची साक्ष देत होतं " नानांच्या सर्व चिंता दूर झाल्या |होत्या. उद्या गुलाबाचं नवीन कलम लावायला हवं! माझ्या सागरच्या जीवनाप्रमाणे तेही बहरायला हवं." स्वतःशीच म्हणत ते प्रसन्न मनाने घराकडे निघाले.

संपूर्ण