लिफ्ट -part II Amita a. Salvi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लिफ्ट -part II

लिफ्ट

( part II )

त्या दिवशी मेधाला संध्याकाळी लवकर घरी जायचं होतं. मीनाला - रात्रपाळीच्या नर्सला यायला वेळ होता. मेधा गेल्यावर काही वेळाने सुमन त्यांना काही हवं नको विचारायला त्यांच्याजवळ गेली. त्यांनी तिला जवळ बसवून घेतले. मनातला सल सुमनला सांगण्याएवढा विश्वास गेल्या काही दिवसांमधे त्यांच्या मनात निर्माण झाला होता.

"सकाळी फोन आला तेव्हा झालेलं बोलणं तू ऎकलं असशीलच!" त्या गंभीर स्वरात म्हणाल्या. त्या अजूनही मुलाच्या फोनचा विचार करतायत हे पाहून सुमनला आश्चर्य वाटलं.

"हो! ऎकलं मी! पण तितकंसं काही लक्षात आलं नाही. " ती म्हणाली. नवीन ओळख असल्यामुळे जास्त चॊकशी करणं तिला प्रशस्त वाटत नव्हतं.

"आमची जुनी बिल्डिंग पाडून नवा टॉवर उभा रहातोय. एका वर्षापासून नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे. एका मजल्यावर दोनच फ्लॅट असणार आहेत. साकेत म्हणतोय, की मजल्यावरचा दुसरा फ्लॅट आपण घेऊ. म्हणजे पूर्ण मजला आपल्याकडे राहील." सुनिताबाईनी बोलायला सुरुवात केली.

"किती छान! एवढं मोठं घर मुंबईत असणं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे! लकी आहात तुम्ही." सुमन म्हणाली.

"हो! पण एवढ्या मोठ्या घरात मी म्हातारी एकटी रहाणार आहे, हे तू विसरतेयस! आज मी पंच्याहत्तर वर्षाची आहे. काही वर्षांनी बाहेर किती फिरू शकेन, सांगता येत नाही. संपूर्ण मजला आमच्याकडे आला, कीया दोन नर्सशिवाय दिवस-रात्र कोणाचं तोंडही मला दिसणार नाही. फ्लॅट एकोणिसाव्या मजल्यावर त्यामुळे येणारी- जाणारी, अगदी रस्त्यावर चालणारी माणसंही दिसणार नाहीत. निदान शेजारी असतील तर आपण माणसात आहोत असं वाटेल. त्यांच्या घरातल्या मुलांचे हट्ट, खेळण्याचे आवाज, तरूणांची थट्टामस्करी, कामांवर जायची घाई, धावपळ हे सर्व दिसलं तरी आपण एकटे आहोत असं वाटत नाही. मोठा फ्लॅट, बाहेरचे निसर्गसॊदर्य हे सगळं काही काळासाठी ठीक असतं पण खरं चैतन्य मिळतं, ते आजूबाजूच्या माणसांकडून ! अनेक वर्षे एकत्र रहाणारे आणि जिवाला जीव देणारे शेजारी, हे मला एकटी राहूनही एकटेपणा न वाटण्याचं सगळयात मोठं कारण आहे. साकेतचं काय? वर्षातून एकदा येतो. ती पण ईन मीन तीन माणसं! आहे ही जागा आम्हा चॊघांसाठी खूप मोठी आहे. तो कधी कायमचा इथे येईल किंवा न येईल, त्यासाठीमाझं उरलेलं आयूष्य एकलकोंडेपणाने घालवायला मला आवडणार नाही." त्या कधीनव्हे ती, त्यांच्या मनातली एकटेपणाची खंत बोलून दाखवत होत्या

" तुम्ही साकेतला हे सर्व सांगितलं का?" सुमनने विचारलं.

"हो! पण तो म्हणतो, की आताच संधी आहे. मी बिल्डरशी बोलून फ्लॅटचे पॆसे त्याला पाठवून देतो. तो नवीन घर खरेदी करतोय, त्यामुळे माझ्या संमतीचा प्रश्नच येत नाही. मला मात्र माझे पुढचे दिवस कसे असतील या कल्पनेनेच अंगावर काटा येतोय." इतक्या दिवसांत त्यांच्या चेह-यावर कधीही न दिसलेली भीति आज मात्र स्पष्टपणे जाणवत होती. वार्डमधे पेशन्टना भेटायला डॉक्टर आले आणि सुमनला विषय अर्धवट सोडून तिथून उठावं लागलं.

"उद्या सकाळी तुम्ही यांना घरी नेऊ शकता. मी डिस्चार्जचे पेपर्स तयार ठेवायला सांगतो." डॉक्टर म्हणाले, आणि सुमन दुस-या दिवशी निघायची तयारी करायला लागली.

दुस-या दिवशी सुनिताबाईंचा निरोप घेताना आपण अगदी जवळच्या व्यक्तिपासून दूर जात आहोत असं तिला वाटत होतं.

घरी गेल्यावर तिला सुनिताबाईंची आठवण झाली, की तिच्या मनात विचार येई, 'पूर्ण मजल्यावर त्या एकाकी कशा रहातील? ' पण दुस-या क्षणाला ती स्वतःची समजूत काढत असे. 'त्या ग्रेट सुनिताबाई आहेत. या पेचातूनही काही ना काही मार्ग त्या नक्कीच काढतील. परिस्थितीने हरणा-यांपैकी त्या नाहीत.'

***

अधून मधून सुमन सुनिताबाईना न चुकता फोन करत असे. त्यांच्याशी बोलल्यावर तिच्या मनाला उभारी मिळत असे. त्यांच्यातला आत्मविश्वास नकळत तिच्या मनाचाही ताबा घेत असे. आणि तिला माहीत होते; त्याही तिच्या फोनची वाट बघत असत. त्या दोघींची मने जुळायला हॉस्पिटलमधले चार -सहा दिवस पुरेसे झाले होते. मधे एक वर्ष गेलं. त्यांच्या इमारतीचं काम पूर्ण झालं होतं. आणि त्या नवीन घरात रहायला गेल्या होत्या. त्यांच्या मुलाने त्यांच्या विरोधाकडे लक्ष न देता शेजारचा फ्लॅट विकत घेतला होता. 'पूर्ण मजल्यावर सुनिताबाई एकट्या कशा रहात असतील?' हा विचार राहून राहून सुमनला अस्वस्थ करत होता. त्यांना भेटावं असे तिला खूप वाटत होतं, पण त्यांना फोन करून त्यांच्या नवीन घर लावण्याच्या कामात व्यत्यय आणणं तिला योग्य वाटत नव्हतं. तिची तगमग बहूतेक सुनिताबाईंपर्यंत पोहोचली असावी कारण एक दिवस त्यांनीच तिला फोन करून नवीन घर बघायला येण्याचे आमंत्रण दिले.

दुस-याच दिवशी सुमन त्यांना भेटायला गेली. फ्लॅट अत्यंत सुंदर आणि प्रशस्त होता. पण दुसरे रहिवाशी नसल्यामुळे मजल्यावर भीषण शांतता होती. खरंच, सुनिताबाईंनी जी भीति बोलून दाखवली होती, ती अगदी खरी होती.

पण सुनिताबाई मात्र नेहमीप्रमाणेच प्रसन्न दिसत होत्या.त्या कोणत्याही दडपणाखाली आहेत असं वाटत नव्हतं. आता त्यांचं चालणंही सुधारलं होतं. सुमनसाठी त्यांनी स्वतः कोफी बनवली.

"कसं वाटलं माझं नवीन घर?" सुमनसमोर कोफी ठेवत त्यांनी विचारलं.

"छान आहे. आणि तुम्ही सजावटही उत्तम केली आहे. इंटीरियर डेकोरेटरने सगळं केलंय का?" सुमनने संभाषण पुढे नेण्यासाठी चॊकशी केली.

" नाही! हल्ली उत्तम तयार फर्निचर मिळतं. मी ऑर्डर देऊन मागवून घेतलं."सुनिताबाई म्हणाल्या.

" खरंच तुम्हाला सजावटीची चांगली जाण आहे!" सुमन कॊतुकाच्या स्वरात म्हणाली.

" साकेतच्या आवडीप्रमाणे घर सजवायचं असं ठरवलं होतं, पण तो काही येऊ शकला नाही. मग काय... मला जमलं तसं सजवलं! चार - सहा महिने तरी येऊ शकत नाही असं म्हणालाय! त्यांना सगळ्यांना घरात वावरताना बघण्याची खूप इच्छा आहे ! एवढं मोठं घर माणसांनी भरलेलं बघावं असं वाटतंय! बघू त्यांना यायला कधी जमतंय!" सुनिता ताईंना इतकं भावूक होताना सुमन प्रथमच पहात होती.

"एवढ्या मोठ्या घरात एकटं वाटत असेल नं तु्म्हाला? शिवाय मजल्यावरही दुसरं कोणी बि-हाड नाही." ती आल्यापासून तिच्या जिभेवर येऊ पहाणारा प्रश्न तिने विचारला. खरं म्हणजे तिला मनापासून त्यांची काळजी वाटत होती.

"नाही! तशी मला या दोघींबरोबर रहायची सवय झाली आहे. साकेत काही दिवस इथे यावा असं वाटणं ही 'आई' म्हणून वाटणारी मनाची तळमळ आहे. पण बाकी मला काही प्रॉब्लम नाही. या दोघी चोवीस तास माझ्याबरोबर असतात आणि आता त्या जणू माझ्या मुलीच झाल्या आहेत. इथे आल्यापासून मला आणखी एक मैत्रीण मिळाली आहे... इथली लिफ्ट. पूर्वी घर पहिल्या मजल्यावर होतं, पण तेवढे जिनेही गुडघेदुखीमुळे मी कसेबसे उतरत असे. आता एवढ्या उंचावर राहूनही लिफ्टमुळे मी सकाळ- संध्याकाळ. दोन्ही वेळा खाली उतरते. गार्डनमधे बसते. थोडा वेळ चालते. सोसायटीतल्या अनेक बायका भेटतात. जुने शेजारी आहेतच पण नवीन लोकही चांगले आहेत. छान गप्पा होतात. दिवस कसा जातो कळतही नाही. शिवाय दर रविवारी आम्ही काही बायका मिळून मुलांचे संस्कार वर्ग घेणार आहोत. त्यामुळे आता एकटेपणाच्या तक्रारीला जागाच उरणार नाही. आता असं वाटतं की मी उगाच काळजी करत होते. "

त्यांचं बोलणं ऐकून सुमनला तिच्या मनावरचं मोठं ओझं उतरल्यासारखं वाटलं.

"वा! वा! म्हणजे या नवीन सखीशी तुमची चांगलीच गट्टी जमलेली दिसतेय." ती हसून म्हणाली.

"हो! अगदी खरं आहे. या लिफ्टशिवाय आयुष्याची मी कल्पनाच करू शकत नाही. ती नसेल तर बाहेरच्या जगाशी माझा काही संबंधच रहाणार नाही. आणि त्या जगण्याला ' जगणं ' म्हणता येणार नाही." सुनिताबाई म्हणाल्या.

सुमन अत्यंत प्रसन्न मनाने त्यांचा निरोप घेऊन निघाली. सुनिताबाईंना आनंदात पाहून तिचं मन हलकं झालं होतं. आजकाल तिच्या नकळत ती स्वतःला त्यांच्या जागी ठेऊन पाहू लागली होती. त्या जर एकट्या राहून समाधानी आयुष्य जगू शकतात, तर मी भविष्यातील अडचणींचा बाऊ करून काल्पनिक दुःखात माझा आज का खराब करून घेऊ? असा प्रश्न ती स्वतःला विचारू लागली होती. हळू हळू मुलगा अमेरिकेला गेल्यामुळे निर्माण झालेली मनाची पोकळी कमी होऊन मन वर्तमानातील आनंदाचा शोध घ्यायला लागलं होतं.

तिला माहीत होतं, सुनिताबाई त्यांच्या आनंदी आयुष्याचं श्रेय लिफ्टला देत होत्या, पण जरी लिफ्ट नसती तरी त्यांनी काहीतरी उपाय नक्की शोधून काढला असता. त्यांना आनंदी जीवन देणारी खरी लिफ्ट होती---- त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि आत्मविश्वास . मुलगा जवळ नाही म्हणून कुढत बसण्याऐवजी त्यांनी स्वतःचं एक जग निर्माण केलं होतं आणि त्या जगात आनंदशोधतहोत्या. आपल्याकडे त्यागाची संकल्पना अशी आहे, की त्याग करणारी व्यक्ती दुःखी कष्टी दिसली पाहिजे. आणि तेव्हाच त्याने केलेल्या त्यागाकडे जगाचं लक्ष जातं. सुनिताबाईंना या वयात एकाकी आयुष्य जगताना किती त्रास होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी! पण त्यांच्या हसतमुख चेह-यामुळे त्यांच्या मनातील वेदना ओळखता येणं अशक्य होतं. या वयातही त्या स्वावलंबी आयुष्य जगत होत्या. त्या एवढ्या स्वभिमानीहोत्या, कीमुलाकडेहीआपल्या अडचणींचे रडगाणे न गाता, स्वतः मार्ग शोधत होत्या. आणि हे सर्व करताना त्याला अपराधी वाटू नये याचीही काळजी घेत होत्या. हे प्रेम आणि ही जिद्दच त्यांच्या सुखी - समाधानी जीवनाची खरी लिफ्ट होती.

***

- END -