किमया प्रेमाची Amita a. Salvi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमया प्रेमाची

Amiita Salvi

amitaasalvi@gmail.com

किमया प्रेमाची

तेव्हा माझ्या पतींची काही दिवसांसाठी पुण्याला बदली झाली होती.मी नुकतीच

बँकेतून. व्हाॅलंटरी रिटायरमेंट घेतली होती त्यामुळे मीही त्यांच्याबरोबर पुण्याला गेले होते.

आमच्या बंगल्याच्या बाजूलाच. देसाई वकीलांचा बंगला होता.बँकेतल्या खात्यासंदर्भात

त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी ओळख झाली.एकमेकांच्या घरी येणे-जाणेही चालू

झाले.त्यांचा मुलगा विक्रम इंजिनियर होता.पुण्याच्या एका काँप्यूटर कंपनीत एक्झिक्यूटिव्ह

म्हणून काम करत होता.त्यांची मुलगी नेहा तेव्हा काॅलेजमध्ये होती.दिसायला सुंदर, वडील

नामांकित वकील आणि घरची गडगंज वश्रीमंती त्यामुळे तो-यात असायची.रोज नवीन

फॅशनेबल कपडे,टिपटाॅप रहाणी यामुळे ती आजूबाजूच्या इतर मुलींमध्ये उठून दिसायची.

थोडी शिष्ठ वाटायची.ओळख झाल्यावर. तीसुद्धा आमच्या घरी येऊ लागली.खूप बोलकी

होती.नंतर माझ्या लक्षात आले की वरवर उथळ वाटणारी नेहा मनाने हळवी आहे.

बनवलेला कोणताही पदार्थ आवडीने खायची.म्हणायची "आमच्या घरी आचारी आहे.

रोज जेवणाचे नवनवीन प्रकार बनवतो पण तुम्ही प्रेमाने बनवलेल्या पदार्थांची चव

काही वेगळीच असते." तिची आई कधी सोशलवर्कसाठी तर कधी क्लब-पार्ट्यांसाठी

घराबाहेर असायची नेहा आणि तिच्या लहान भावाची काळजी घेण्यासाठी घरी नोकर

होते. कदाचित् त्यामुळेच आमच्या घरच्या खेळीमेळीच्या वातावरणाचे तिला आकर्षण

वाटत असे. अभ्यासातही ती हुशार होती.वडिलांच्या बुद्धिमत्तेचा वारसा तिला मिळाला

होता;पण खूप शिकायचे , चांगले करिअर करायचे, ध्येय गाठायचे वगॆरे गोष्टींचे तिच्या

ध्यानी मनीही नव्हत्या. बी.ए.झाल्यावर शिक्षण बंद करायचे तिने अगोदरच ठरवून ठेवले

होते. आणि ते तिने खरे केले.

नेहाने पुढे शिकायचे नाही असे ठरविल्यावर साहजीकच तिचे वडील तिच्यासाठी

चांगली स्थळे शोधू लागले.सुंदर आणि श्रीमंत घरच्या नेहाला अनेकजण स्वतः मागणी

घालत होते.पण तिला एकही स्थळ पसंत पडत नव्हते.प्रत्येकात तिला काही ना काही

कमतरता दाखवून ती नकार देत होती. दोन-तीन वर्षे अशी गेली . आता शेजारीसुद्धा

बोलू लागले,"असा कोण राजकुमार हिला पसंत पडणार आहे!" पण अशी बोलणी

ऎकू आली तरी मनावर घेण्याएवढी ती कमकुवत मनाची नव्हती.घरची लाडकी मुलगी

असल्यामुळे तिच्या पसंतीला आणि नापसंतीला महत्व होते.तिच्यावर. पसंती लादण्याचा

कोणी प्रयत्न कोणी केला नाही. शिवाय तिचे वयही काळजी वाटण्याइतके जास्त नव्हते.

मी त्यांच्या घरी जाई तेव्हा ब-याच वेळा अजय भेटत असे. अजयचे वडील

देसाईंकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. एका अपघातात त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा

मृत्यू झाला,तेव्हा अजय फक्त सात-आठ वर्षांचा होता.माणुसकीच्या नात्याने देसाईंनी

त्याचे पालकत्व स्वतःकडे घेतले.त्यांच्याकडेच तो लहानाचा मोठा झाला.त्याला त्यांनी

शिक्षणात काही कमी पडू दिले नाही.तोसुद्धा जात्याच हुशार होता त्यामुळे चांगल्या

मार्कानी ग्रॅज्युएट झाला.नंतर मात्र त्याने स्वतःच्या पायावर उभे रहायचे ठरविले.कुठेतरी

पार्ट-टाइम जाॅब करत एल.एल.बी. झाला. त्यानेही वकील व्हायचे ठरवले होते. देसाई

सर त्याचे आदर्श होते.वकीलीची सनद मिळविण्यासाठी मात्र पुण्यातल्या दुस-या

साॅलिसिटर फर्ममध्ये अनुभव घेण्याचा निर्णय घेतला.याचे कारण, जरी देसाईंनी त्याचे

पालनपोषण केले होते तरी त्याच्याशी त्यांचे वागणे मात्र तितकेसे आपलेपणाचे नव्हते.

त्यांच्या वागण्यामुळे ते मालक आणि हा त्यांच्या ड्रायव्हरचा मुलगा ही त्यांच्यातली

दरी कायम राहिली होती. वकीलीची सनद मिळाली की मुंबईला हायकोर्टात प्रॅक्टिस

करण्याची त्याची इच्छा होती.गिरगावात त्याच्या वडिलांची एका चाळीत लहानशी खोली

होती त्यामुळे कुठे रहायचे ही चिंता नव्हती.

आम्ही पुण्यात चार वर्षे राहिलो.नंतर परत मुंबईला ट्रान्सफर झाली आणि

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात पुण्याचा विसर पडला.मधे बरीच वर्षे गेली.एकदा भाच्याचे

लग्न ठरले होते म्हणून आम्ही चार- पाच जणी मिळून लग्नाच्या खरेदीसाठी गिरगावात

गेलो होतो.दुकानातून बाहेर येऊन फुटपाथवर उभ्या होतो;इतक्यात बाजूच्या बिल्डिंगमधून

बाहेर पडणा-या अजयकडे माझी नजर गेली.त्याचेही लक्ष माझ्याकडे गेले आणि तो

जवळजवळ धावतच माझ्याकडे आला.खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद त्याच्या चेह-यावर

स्पष्ट दिसत होता." आहेस कुठे तू? किती दिवसानी भेटतेयस! चल इथेच बाजूला मी

रहातो.चला सगळया माझा पाहुणचार घ्यायला."

माझ्याविषयीचा त्याला वाटणारा आपलेपणा जराही कमी झालेला जाणवत नव्हता.पण

आज मला वेळ नव्हता.मी त्याला समजावले, "आज नको.पण एक-दोन दिवसांमध्ये नक्की

तुझ्याकडे येईन.मलाही खूप बोलायचे आहे तुझ्याशी."

दुस-या दिवशी मला निवांत वेळ होता. रविवार असल्यामुळे तो घरीच असणार

ही खात्री होती. मी त्याच्याकडे अचानक् जाऊन त्याला चकित करायचे ठरवले.

त्याच्याविषयी जाणून घ्यायचे होतेच पण त्यापेक्षाही जास्त उत्सुकता होती नेहाविषयी!

खरे म्हणजे इतके दिवस मी तिला पूर्ण विसरून गेले होते.आज अजयला बघताच सर्व

जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी सकाळीच घरातून बाहेर पडले.अजयकडे पोहोचले

तेव्हा सकाळचे दहा वाजले होते. तो त्याच्या छोट्या मुलाला खेळवत हाॅलमध्ये बसला

होता.हातात पोह्यांची डिश होती.मला बघून म्हणाला,"बस. मी आलोच" मी बाळाशी बोलू

लागले आणि तोही बोबड्या भाषेत काहीतरी बोलू लागला.गोड हसला.मी उचलून घेतले तर

ओळख असल्याप्रमाणे खेळू लागला.तेवढ्यात अजय आत जाऊन पाणी आणि पोहे घेऊन

आला."बघ पोहे आवडतात का! माझी बायको पोहे छान बनवते."तो हसत म्हणाला.पोहे

खरंच चांगले झाले होते."तुझी बायको खरंच सुगरण आहे बरं का!"मी सर्टिफिकेट देऊन टाकलं.

" तुझी प्रॅक्टीस कशी चालली आहे?" मी पुढे विचारले.

"छान !सुरुवातीला जम बसवणं अवघड वाटलं पण आता सर्व ठीक आहे."तो म्हणाला.

"लग्न कधी झालं? " मी विचारलं ." तू पुणे सोडल्यावर काही दिवसांतच."तो म्हणाला.

"आणि नेहाचं पुढे काय झालं?तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला मिळाला की नाही?"

ते माझ्यापेक्षा या अमेयची आईच तुला सांगू शकेल.मार्केट बाजूलाच आहे.भाजी आणायला

गेली आहे.मला शिळ्या आणि ताज्या भाजीतला फरक कळत नाही म्हणून ती स्वतः

जाते भाजी आणायला.इतक्यात येईलच ती." बायकोविषयी त्याच्या मनातील कॊतुक

शब्दाबरोबर त्याच्या डोळ्यांमधेही दिसत होते.

तो बोलायला आणि जिन्यात कोणाचीतरी चाहूल लागायला एकच गाठ पडली.

"ती आलीच बहुतेक"तो हसत म्हणाला.कशी असेल याची पत्नी?हे कुतुहल मला आल्यापासून

वाटत होते.मी मोठ्या अपेक्षेने दरवाजाकडे पाहिले;आणि दरवाजातून आत येणा-या नेहाला

पाहून माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना.मला पाहून तिने तर मला मिठीच मारली.

"मुंबईत आल्यापासून तुमची वाट बघतेय.कुठे बाहेर गेले की डोळे तुम्हालाच शोधतात.काल

अजय तुम्ही भेटल्याचे बोलला आणि वाटलं तुम्ही नक्कीच याल भेटायला."ती भराभर बोलू

लागली.

"मी आता याला तुझ्याविषयीच विचारत होते.पण तुमच्या लग्नाविषयी मला काहीच कल्पना

नव्हती. तू कधी सांगितलं नाहीस मला!" मी गोंधळलेल्या मनःस्थितीतून हळू हळू स्वतःला

सावरत होते.कुठे ती अप्-टु- डेट रहाणारी, मी नेहमी फॅशनेबल ड्रेसेसमधली नेहा आणि कुठे

ही साध्यासुध्या गृहिणीसारखी दिसणारी नेहा!तेव्हा नखांवरील नेलपाॅलिशला ओरखडा गेलेला

चालत नव्हता घरात पाण्याचा ग्लास उचलायलाही नोकर होते आणि आज हातात

गच्च भरलेल्या भाजीच्या पिशव्या! ही कोणी वेगळीच नेहा माझ्यासमोर होती.

पण तेव्हापेक्षाही ती आता अधिक सुंदर दिसत होती हे मला नाकारता येत नव्हतं

"कसं सांगणार?मी मनाशी ठरवलं होतं की लग्न करेन तर अजयशीच;पण हा सर्व काही

कळूनही न कळल्यासारखे दाखवत होता.बाबांविषयी प्रचंड धाक मनात होता नं!

तुझ्यातर्फे याचं मन वळवायचं असं ठरवलं होतं पण तेव्हाच तुमची मुंबईला ट्रान्सफर झाली.

शेवटी एकदा स्पष्टपणे याच्याशी बॊलले.याच्या मनातलं प्रेमही याने बोलून दाखवलं पण

हा बाबांशी बोलेल अशी सुतराम् शक्यता नव्हती.शेवटी मीच घरी सांगून टाकलं

"माझ्यासाठी स्थळे शोधणे बंद करा.मी लग्न करेन तर अजयशीच! "बाबा खूप

रागावले.मला त्यानी फुलासारखं सांभाळलं होतं!प्रत्येक हट्ट पुरवला होता;पण माझा

हा निर्णय ऐकून म्हणाले," तुला जर त्याच्याशीच लग्न करायचे असेल तर मी फक्त लग्न

करून देईन;नंतर तुझ्या आयुष्याची जबाबदार तूच रहाशील"

" मी कबूल केलं.माझा विश्वास होता अजयवर! लहानपणापासून बघत आले होते मी

त्याला. बाबानी अगदी साधेपणाने लग्न लावून दिलं.लग्नाच्या दुस-याच दिवशी आम्ही

मुंबईला आलो."नेहा सांगत होती.

"इथे आल्यावर काही दिवस ही माझ्याबरोबर चाळीतल्या लहानशा खोलीत राहिली.

पण 'साखरेचं खाणार त्याला देव देणार' म्हणतात ते खोटं नाही.हिच्या पायगुणाने आमच्या

चाळीच्या जागी हा टाॅवर उभा राहिला आणि आम्हाला हा फ्लॅट मिळाला.माझी

वकीली चालायला लागेपर्यंत काही दिवस आवडत नसूनही हिने नोकरीसुद्धा केली."

तिच्यामुळे मी माझे चांगला वकील होण्याचे ध्येय साध्य करू शकलो." अजय

अभिमानाने सांगत होता.

"तू सगळं मिळवलंस तुझ्या कष्टाने,आणि जिद्दीने त्याचे क्रेडिट मला नाही तुलाच

जाते.उगाच माझं कॊतुक करू नकोस"नेहा म्हणत होती."तुम्हाला एक गंमत सांगू?आई

आणि विक्रम पूर्वीपासूनच आमच्याकडे येत जात होते,आताव बाबाही मुंबईला आले की

आमच्याकडेच रहातात.अमेयचा त्याना खूप लळा लागला आहे.आपल्या जावयाचा त्याना

आता अभिमान वाटतो.खरेच दिवस किती बदलतात नाही!"हे सांगताना तिचे डोळे पाण्याने

भरले होते."हे सर्व याच्या कर्तृत्वामुळे शक्य झाले आहे."नेहा अजयविषयी अभिमानाने

बोलत होती.

त्यांचे प्रेम पाहून माझी मात्र खात्री पटली होती ;की ही त्यांच्या एकमेकांवरील

प्रेमाची - विश्वासाची किमया होती.मी मनोमन त्या प्रेमरूपी किमयागाराला शतशः

प्रणाम केले आणि दैवी प्रेमाची देणगी लाभलेल्या त्या युगुलाला आशीर्वाद देऊन त्यांचा

निरोप. घेतला.