माझी कोल्हापूर भेट Amita a. Salvi द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझी कोल्हापूर भेट

Amita Salvi

amitaasalvi@gmail.com

५०२,सामवेद,

राजेन्द्रनगर,

बोरिवली-पूर्व,

मुम्बई -४०००६६

१०-४-२०१६.

प्रिय मॆत्रीण उषा हीस

सप्रेम नमस्कार

तुझे पत्र मिळाले. हे पत्र लिहिताना तू बहुतेक खूप घाईत होतीस असे

वाटते नहेमीप्रमाणे सविस्तर पत्र न लिहिता अगदी संक्षिप्त मजकूर लिहिला आहेस.असो,या

इंटरनेटच्या जमान्यात आपण पत्रांद्वारे एकमेकींशी संबंध ठेवलाआहे हे पण खूप आहे.आपण

अधूनमधून फोनवरही बोलतो.पण पत्र लिहिण्यातील गंमत काही वेगळीच आहे.जेव्हा पेनातून

शब्द कागदावर उतरतात तेव्हा अंत:करणातील भावभावना त्या शब्दांमधून साकार होतात.

आज कॉम्पुटरचा वापर एवढा वाढला आहे; की लोक हाताने लिहिणेच विसरून गेले आहेत.

पण कोणत्याही तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर कधीही वाईट कारण त्यामुळे शरीर आणि बुद्धी

आळशी बनते.असो; आपण आपल्यापुरतं तरी पत्र लिहिणे चालू ठेवू.

तू तुझ्या पत्रात लिहिले आहेस की तुझा नातू रोहन याला अभ्यासापेक्षा खेळायला जास्त

आवडते;त्यामुळे त्याच्या अभ्यासाविषयी तुला काळजी वाटते.यात काळजी वाटण्यासारखे

काय आहे? मुले लहान असताना त्यांची नॆसर्गिक ओढ खेळण्याकडेच असते.आणि शरीर

सुदृढ रहाण्यासाठी मुलांनी भरपूर खेळणे आवश्यक असते.फक्त अभ्यासाचा वेळ आणि

खेळाचा वेळ यांची सांगड घालावी लागेल.खेळाएवढाच अभ्यासही महत्त्वाचा आहे हे त्याला

पटवून द्यावे लागेल.वाचनाची आवड लागावी यासाठी त्याला चित्ररूप गोष्टींची पुस्तके,

पंचतंत्र इसापनीति अशी पुस्तके आणून दे.सुरुवातीला वाचूनही दाखव.एकदा वाचनाची

गोडी लागली की अभ्यासाची गोडी आपोआपच लागेल. तो थोडा मोठा झाला की त्याचा

कल बघून एकाद्या कलेसाठी त्याला प्रोत्साहन दे. कला माणसाला आत्मविश्वास देते.

तुझा संतवाङ्मयाचा दांडगा अभ्यास आहे.ते बाळकडू आतापासूनच त्याला थोडे थोडे पाजत

रहा.संतांचे साहित्य माणसाला सुखदु:खांमध्ये मनाचा समतोल ठेवायला शिकवते.माणसाची

पारख करायला शिकवते.आजकाल व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग मुलाना स्मार्ट कसे दिसावे,

वागण्या बोलण्यातून समोरच्यावर छाप कशी पाडावी हे शिकवतात.आजच्या कॉर्पोरेट

जगात ते आवश्यकही आहे.पण जर अंगीभूत गूणांचा अभाव असेल तर फक्त वरवरच्या

रुबाबदारपणाचे पितळ उघडे पडायला वेळ लागत नाही.माणसाची लोकप्रीयता तो

माणूस म्हणून कसा आहे यावरच जास्त अवलंबून असते.

दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड करू नको.तुझ्यामागे सामाजिक कार्याचा

खूप व्याप आहे हे मला माहीत आहे.पण थोडे चालणे,व्यायाम,प्राणायाम,ध्यानधारणा चालू

ठेव .शारिरिक आणि मानसिक आरोग्य चांगलेअसेल तरच आपण सर्व कामे चांगल्या पद्धतीने

करू शकतो या गोष्टीचा विसर पडू देऊ नको.

गेल्या आठवड्यात आम्ही कोल्हापूरला जाऊन आलो.पहिल्या दिवशी जगज्जननी

महालक्ष्मीचे दर्शन घेतले.दुस-या दिवशी नरसोबाच्या वाडीला गेलो.नृसिंह सरस्वतींच्या

'मनोहर ' पादुकांचे दर्शन घेतले. महालक्ष्मी मंदीर म्हटल्यावर स्त्रियांच्या मंदिर

प्रवेशाचा वाद तुला आठवलाच असेल पण येथे स्रियांच्या मंदीर प्रवेशावर निर्बंध कधीच

नव्हते.सकाळी अभिषेकासाठी पुरुषांना गाभा-यात प्रवेश मिळत असे.तिथे जात-पात,

गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला जात नसे.स्त्रियांनाही गाभा-याच्या उंब-यापाशी

जाऊन अगदी जवळून दर्शन मिळत असे.मंदीर खूप पुरातन आहे; त्यामुळे हे नियम

का केले गेले असतील हा मुद्दा आपल्या विचारशक्तीच्या पलीकडचा आहे.पण हे नियम

भक्तांच्या भल्यासाठीच आहेत असा विश्वास जर आपण ठेवला तर अहंकाराच्या

आहारी जावून आंदोलने करण्याची गरज रहाणार नाही आणि आपली बुद्धी आणि शक्ती

आपल्याला स्रियांच्याच नाही; तर समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी वापरता

येईल.नरसोबाच्या वाडीला तर पुजा-यांशिवाय कोणालाही नृसींहसरस्वतींच्या

पादुकांजवळ प्रवेश नाही.पुजारीसुद्धा प्रथम कृष्णा नदीमध्ये स्नान करून तडक

देवळामध्ये जातात.हे तिथले नियम आहेत; आणि मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी

असे नियम असणे गॆर आहे असे मला तरी वाटत नाही.

यानंतर आम्ही कणेरी मठात गेलो.हा मठ पुणे बंगलोर हायवेवर कोल्हापूरपासून

गाडीने गेल्यास साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे असे म्हणतात की

येथील शिवमंदीर चॊदाव्या शतकात बांधले गेले आहे.काडसिद्धेश्वर महाराजांनी

मंदिराचा जिर्णोद्धार केला;त्यामुळे हा परिसर त्यांच्याच नावाने ओळखला

जातो.येथील बेचाळीस फूट ऊंचीची शंकर भगवानांची सुंदर मूर्ती सर्वप्रथम आपले लक्ष वेधून

घेते. ग्रामजीवनाचे दर्शन घडविणारे सिद्धगिरी म्यूझियम मठाच्या परिसरातच आहे.

डोंगराच्या चढ-उतारांवर हिरव्या गार वनराईच्या पार्श्वभूमीवर सिमेंटच्या पुतळ्यांच्या

आधारे पूर्वीचे स्वयंसिद्ध गाव साकार केलेले आहे. अगदी सुरुवातीलाच आपल्याला अनेक

ऋषि-मुनींचे दर्शन घडते.प्रत्येकाने पदार्थ-विज्ञान ,रसायन शास्त्र,ऒषध निर्माण,व्याकरण,

ग्रंथ निर्मिती इत्यादि क्षेत्रांमधे केलेल्या महत्त्वाच्या कार्याचा संक्षिप्त उल्लेख केलेला आहे.

येथून थोडे पुढे गेल्यावर रामायणाचा काळ प्रदर्शित केलेला आहे.शबरीची रामाशी भेट

दाखवणारा प्रसंग, त्यातील रामाची वाट बघणारी शबरी,तिच्या समोरची बोरे सर्व हुबेहूब

साकार केले आहे. यानंतर महाभारत काळ आपल्या समोर येतो.तिथून पुढे गेलो

की स्वयंपूर्ण ग्रामजीवन प्रत्यक्ष उभे केले आहे.येथील सिमेंटचे पुतळे इतके सजीव आहेत

की खरीखुरी माणसेच रोजचे व्यवहार करीत आहेत असे वाटते.बारा बलुतेदार त्यांची कामे

करताना दिसतात.चावडीवर पंचायत भरलेली दिसते.देवळात कीर्तन चालू असते.पुजारी

देवाची पूजा करत असतात.आठवड्याचा बाजार भरलेला असतो;पण तिथे पॆशांची नाही,

एकमेकांकडच्या वस्तूची देवाणघेवाण होतेय.झाडाखाली पारावर अनेकजण बसले आहेत.

त्यापॆकी कोणी शिदोरी खात आहे ,कोणी गप्पा मारत आहे तर कोणी झोपून विश्रांती घेत

आहे.या कलाकृती इतक्या हुबेहुब आहेत;की जवळ जाईपर्यंत खरी माणसेच पारावर बसली

आहेत असे वाटते.विटी-दांडू खेळणारी मुले अशा अविर्भावात उभी आहेत की कोणत्याही

क्षणी धावू लागतील.शेतकरी बॆल जोतून जमीन नांगरताना दिसतो तेव्हा वाटते ; बॆल

विश्रांतीसाठी थांबले आहेत आणि कधीही चालू लागतील.कोळीण ताजे मासे विकते

आहे.देवाच्या पालखीची मिरवणूक चालली आहे.पालखीसमोर वेगवेगळे खेळ खेळले जात

आहेत.प्रेक्षकांची थोडी मजा- मस्तीही चालली होती. वर दरडीवरील कठड्यापाशी

काही तरूण मुले उभी होती.कोणीतरी म्हणाले," हे पुतळे किती हुबेहूब बनवले

आहेत पहा!" आणि पुढच्या क्षणी ते 'पुतळे ' कठड्यावरून बाजूला होऊन चालू लागले;

आणि एकच हशा पिकला. हे तीन तास कसे गेले कळतच नाही.असे वाटते की आपण

कुठल्या तरी गावी जाऊन तिथल्या माणसाना भेटून आलो.तू कधी कोल्हापूरला गेलीस

तर कणेरी मठाला अवश्य भेट दे.

हे म्यूझियम पहाताना मला आमचे गाव आठवले.माझे आजोबा दरवर्षी सर्व कुटुंबाला

गावी घेऊन जात.त्या काळी एस् टी-बससाठी गावापर्यंत रस्ता नव्हता.डोंगराळ

प्रदेश असल्यामुळे बॆलगाडीही जाऊ शकत नव्हती.बोटीने विजयदुर्ग, तेथून पुढे

बोटीने खारेपाटणला उतरेपर्यंत उजाडलेले असे.गावातून गडी शिदोरी घेऊन येत.

पुढे नऊ मॆल चालत जावे लागे.घरी पोहोचेपर्यंत रात्र होई.नंतरचा एक महिना मात्र

इतका आनंदात जात असे की ह्या त्रासाची आठवणही होत नसे.मोठा चॊसोपी वाडा,

समोर सारवलेले अंगण, भिंतींवर-उंब-यावर चुन्याची नक्शी,सभोवतालचा

हिरवागार आसमंत,खेळायला खूप मुले;इथेच रहावे,परत जाऊच नये असे वाटे.

झाडाच्या सावलीत बसून झुळझुळ वारा अंगावर घेत गोष्टी वाचण्याची मजा काही

वेगळीच असे.गोठ्यात गुरे बांधलेली असत.भरपूर दूध-दुभते असे.झाडांवर

पिकलेल्या आंब्या-फणसांची चव काही वेगळीच असे. आज चित्र पूर्णपणे बदलले

आहे.घरापर्यंत गाडी जाते.वाड्यांची जागा बंगल्यांनी घेतली आहे.माणसांचा मात्र

अभाव झाला आहे.शेते ओस पडली आहेत, गोठ्याची गरज नाही कारण गुरेच

नाहीत .गावातल्या तरुणांनी शहरांची वाट धरली आहे.आताची मुले ग्रामजीवन

पहाणार ते अशा प्रदर्शनांमध्येच.'कालाय तस्मॆ नम:'हेच खरे.

तू सुचवल्याप्रमाणे मी चार महिन्यांपूर्वी बाल्कनीमध्ये वांगी आणि कोथिंबीर कुंडीत

लावली आहे.तू सांगितल्याप्रमाणे खतेही घातली आहेत.कोथिंबीर लगेच तरारली आता

वांगी लागायला सुरुवात झाली आहे.उत्तम खतांमुळे गुलाबांवर भरपूर फुले येऊ लागली

आहेत.तुझा ' टेरेस गार्डनिंग 'चा अनुभव माझ्या कामी आला.मार्गदर्शनाबद्दल आभार.

रोहनला अनेक आशिर्वाद.तुझ्या पत्राची वाट पहात आहे.

तुझी मॆत्रीण

विजया