Domdi books and stories free download online pdf in Marathi

डोमडी - National Story Competition - Jan 2018

डोमडीमनीष गोडे

एका काळ्या रात्री सुमारे दोन वाजता, एम्बुलेंसच्या आवाजाने मी जागा झालो..! कोण म्हणुन सहज स्ट्रीटलाईटच्या उजेडात बघण्याचे प्रयत्न करीत होतो. एम्बुलेंस, जवळच एका झोपडीसमोर उभी झाली. जीव धाडकन झालं... काय झालं, कोण गेलं... अशे एक-ना-अनेक प्रश्न पडत होते.

“धनूचा नवरा गेला वाटतं...” जवळच उभी बायको म्हणाली..! थोड्याच वेळानी धनू म्हणजे धनश्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटत होते, पण एकदा गेलेला माणूस कधी परतुन येतो का..? आमच्या डोळ्यासमोरून धनू आणि तिच्या भूतकाळात घडलेल्या बर्याच गोष्टी, एक मागून एक चित्रफीतीप्रमाणे येत होत्या. विचारांचा चक्र जस-जसं झोपेत रुपांतरीत होत होतं, तस-तसं धनूच्या रडण्याचं आवाजही मंद पडु लागलं..!

धनूला दोन मुलं होती, एक सहा वर्षाचा मुलगा आणि दुसरी पाच वर्षाची मुलगी. दिसायला ती काळी-सावळी होती, म्हणून तिचा नवरा तिला प्रेमाने “डोमडी” असा हाक मारायचा..! एरवी तो तिला कधीही कूणाकडे कामाला नाही पाठवायचा, ना घरकामाला ना कूठल्या नोकरीला..! ती नेहमी म्हणायची,

“अहो, मलासुद्धा कामावर जाऊ देत जा.., तितकेच आपल्या घराला हाथभार होईल आणि मी पण आत्मनिर्भर होईल..!” पण त्यानी कधी तिचे ऐकले नाही.

“तू मुलं आणि घरदार सांभाळ, मी आहे ना काम करायला..!” असा तो नेहमी म्हणायचा. बाहेरचे जग आपल्या बायकोकडे वाईट नजने बघेल, अशी त्याची समझ असावी. रात्रंदिवस ऑटोरिक्शा चालवुन तो आपल्या बायको-पोरांचा सांभाळ करीत होता. थकूनभागून आल्यावर थोडीशी पीतपण होता. जशी सोबत, तश्या सवयी आपोआप लागतात.., नाही का..? मेहनतीचे काम करणारे, मजूरवर्ग यांना संध्याकाळी थोडी घेतल्याशिवाय झोप लागत नसावी..! असो.

एके दिवशी धनूच्या नवर्याला ऑटो-स्टँडवर चक्कर आली आणि तो खाली रस्त्यावर कोसळला..! त्याच्या सोबतच्या ऑटो-ड्राईवरांनी त्याला लगेच हॉस्पिटलला नेले, पण तो आधीच मरण पावला होता. ऑटोप्सी रिपोर्टप्रमाणे त्याच्या मेंदूत गाँठ आल्याचे कळले, ती फूटल्या कारणाने तो चक्कर येऊन पडला असावा. ऑटो आता धनूच्या घरासमोर एकटाच उभा रहायचा. तिचे मुले त्यात बसून खेळायचे, कोण होता आता त्याला चालवायला..? हळू हळू धनूची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. घरात होतं ते सगळं संपायला लागलं. माझ्या बायकोनी तिला घरकामाला यायला बोलविले, पण तिनी चक्कं नकार दिला, म्हणाली,

“ह्यानां आवडत नव्हतं..! होते तेव्हां काही काम करू दिले नाही, आता उपासमारा होत आहे. मुलांच्या शाळेची फी भरायला सुद्धा पैसे नाही आहे..!”

“मग आता काय करणार..?” बायकोनी विचारले. ती काहीही न बोलता, खाली मान करून निघून गेली. मला तिचं जरा नवलच वाटलं. मरेल पण वाकणार नाही, अशी ती वागत होती. मी तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो, तसंही मी बायांपासून दोन हाथ लांबच असतो. कारण पुरूषांनी जर परक्याबाईची चांगल्या अंतःकरणानी जरी मदद केली, तरी बघणार्याला अनर्थ काढायला एक क्षण सुद्धा लागत नाही..! हा युगच आगळा-वेगळा आहे. स्त्री-पुरूषांचे संबंध, आदी सारखे पवित्र राहिले नाही. तरूण भाऊ-बहीण जरी सोबत जात असले तरी याचा वेगळाच अर्थ लावल्या जातो. घोर कलयुग आहे हा..!

धनू कशी बशी दिवस काडीत होती. तिचे मुले आता शाळेतसुद्धा जात नव्हते. ऑटो उभा-उभा खराब होण्यापेक्षा त्याला किरायानी दे, असे तिच्या नवर्याच्या एका मित्रानी तिला एके दिवशी सुचविले. तिला ते योग्यही वाटले आणि धनूने आपला ऑटो त्या माणसाला विश्वासाने देऊन दिले. काही दिवस व्यवस्थित गेले, तो संध्याकाळी तिला पैशे आणून द्यायचा. धनूला तितकाच आधार वाटत होता त्याचा. तिने देवाचे आभार मानले. दसर्याच्या दिवशी त्याने ऑटो धूवूनपुसून काडले, फूलांनी सजवून पूजा केली. नारळ फोडून प्रसाद वाटला, थोडा वेळ मुलांसोबत खेळुन तो परत जायला लागला, तितक्यात धनूनी त्याला थांबवुन संध्याकाळी जेवण करायला सांगितले. तो हो म्हणुन निघुन गेला.

संध्याकाळची रात्र होत आली होती, पण तो जेवायला आला नाही. वाट पाहता पाहता तिला झोप यायला लागली. “धनू...!” कुणीतरी तिला हाक मारली, ती जागी झाली..!

“खूप उशीर केलं यायला..?” तिने विचारले.

“हो.., बराच उशीर झाला..!” तो म्हणाला. धनूनी त्याला जेवणाचे ताट वाढले. दहा वाजत आले होते, जेवण आटोपल्यावर त्याने धनूला विचारले,

“धनू... माझ्यासोबत पाट (दुसरे लग्न) लावशील..?” धनू अचानक असा प्रश्न ऐकल्यावर घाबरली..! काय उत्तर द्यायचे, तिला कळत नव्हतं, त्याचे तिरस्कारही करू शकत नव्हती, कारण त्याच्याच सहार्याने, सद्यस्थितीत तिचे घर चालत होते. आणि तो ही काही चुकीचे बोलत नव्हता, दोघांना एकामेकाची गरज होती. ती काहीही बोलली नाही. त्याने सुद्धा जास्त जोर दिला नाही. “तू विचार करून सांग, काही घाई नाही आहे..!” तो धनूला सांगत निघुन गेला..!

धनूच्या डोळ्याची झोपच उडाली होती..! तिचा नवरा जाऊन जेमतेम सहा महीने होत आले होते, तिला आपले जूने दिवस आठवायला लागले..! मागच्या वर्षी दसर्याला सगळेजण रावणदहनासाठी आपल्या ऑटोनी गेलो होतो. जत्रेत त्याने धनूला नवीन बांगड्या आणि पायातली चांदीची चाळ घेऊन दिल्या होत्या..! ती किती खुश झाली होती..., मुलांना फूगे आणि लाकडी तलवार घेऊन दिली होती. मुलगा हातात ती तलवार घेऊन “जय श्रीरामचा” जयघोष करीत इकडुन तिकडे उड्या मारीत होता..! परत घरी येतांना मारूतीच्या देवळात त्यांनी “सोनं” (आपट्याचे पानं) वाहीले आणि मग घरी येऊन आदी आपल्या देवघरात नंतर एकामेकाला सोनं दिले होते..! मुलं बाहेर पळाल्यावर त्याने तिला घट्ट मिठीत भरले... आणि म्हणाला,

“डोमडे... पुढच्यावर्षी तुला सोन्याच्या बांगड्या घडवून देणार..!” “नक्की..?” तिने विचारले. “अगदी सोळा आणे..” तो म्हणाला..!

दोन थेंब तिच्या डोळ्यातून खाली घसरले...! पाहटेचे चार वाजत आले होते..! तिने डोळे पूसले आणि मुलांजवळ झोपायला गेली. पण झोप काही लागत नव्हती..! नशीबानी अशी थट्टा केल्यावर कशी लागणार होती तिला झोप...? दुसरे लग्न करायचे की नाही, आपल्या मुलांचे कसे होईल, ते शेवटी सावत्र मुलंच गणल्या जाणार होते..! माणसाचे काय, त्याला ती फक्त रात्री एक सहचरी म्हणून हवी होती, पूढे त्यांचे मुलं झाले कि तिच्या आपल्या मुलांकडे आपोआप दुर्लक्ष होत जाणार होते..!

“नाही...” ती पुटपुटली..., मी आपल्या मुलांना अश्या वार्यावर सोडू शकणार नाही. मी त्यांच्यासाठी जगेल, आपल्या नवर्याचे स्वप्न पूर्ण करणार, त्यांना चांगल्या शाळेत शिकविणार, त्यांना त्यांच्या पायावर उभे करणार..! अशे मनाशी घट्ट निर्धार करून ती झोपी गेली.

“आई.., सकाळचे सात वाजले..!” मुलीने धनूला उठविले..! धनू पटकन उठली आणि घरातल्या कामात गुंतून गेली. नऊच्या सुमारास ‘तो’ ऑटो घ्यायला आला, धनूनी काहीही न बोलता त्याला ऑटोच्या किल्या दिल्या. तिची मानसिक तैयारी नव्हती, त्याच्या प्रश्नाचे उत्तर तिला सापडत नव्हता. काय सांगू त्याला, तिला काहीच कळत नव्हतं...!

संध्याकाळी तो जेव्हा ऑटो परत करायला आला, तेव्हां धनूनी त्याला म्हटले, “दादा, तुझे आमच्यावर, माझ्या मुलांवर खुप उपकार आहे..! तू जर नसता तर आमच्यावर उपासमाराची वेळ आली असती..! तू देवा सारखा आमच्या मदतीला धावून आला, किंबहुना त्यांनीच तुम्हाला जणू आमच्या करीता पाठविले असणार..! एक उपकार अजून करशील..?” त्यानी प्रश्नवाचक नजरेनी तिच्याकडे बघितले...?

“काय..?” तो म्हणाला.“तुम्ही मला ऑटो चालविण्याची शिकवणी आणि लायसंस मिळवून द्याल..?”

एक क्षण तो विचारातच पडला.., त्याला आपला अपमानसुद्धा झाल्यासारखे वाटले असेल, पण तो पटकन सावरला..., रुमालाने घाम पूसत, चेहर्यावर हास्य फुलवित म्हणाला,

“का नाही.., आपल्या वहिणीसाठी इतकंही करू शकणार नाही का..?”

तिच्या डोळ्यात पाणी आले, या वेळेस मात्रं ते सूखाचे अश्रु होते...! धावतच ती घरात गेली आणि आपल्या नवर्याच्या फोटोपुढे हाथ जोडत म्हणाली,

“खरचं, तुम्हाला आमची काळजी आहे हो..!! तुम्ही गेलात पण तिथूनसुद्धा आमची पाठराखन करीत आहात..!”

“डोमडे... मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, कूठल्याही रुपात तुमचे सांभाळ करणार आहे.., हे माझे वचन आहे तूला..!” तिनी मान वर करुन फोटोकडे बघितले आणि तिच्या डोळ्यातून सजलधारा वाहू लागल्या..!!!

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED