Savatra Prem books and stories free download online pdf in Marathi

सावत्र प्रेम

प्रेमकथा

सावत्र प्रेम

ही गोष्ट आहे, दोन मित्रांची. एक सामान्य तर दुसरा असामान्य. दोन विपरित वृत्तींचे माणसे एखाद्या वेळी निभवुन घेतील, पण जर त्यातला एक “दिव्यांगी” असेल तर..? सिनेमातली ‘दोस्ती’ वगैरे ठिक आहे हो..., आपण विचारात तेव्हां पडतो, जेव्हां अशे मित्र आणि त्याचे जीवन आपल्या डोळ्या समोरुन जातो. तर मित्रांनो, अशीच एक मैत्री, जी मी जवळुन अनुभवली आहे, त्यांची ही गोष्ट.

कॉलेजमधे असताना, मी ज्या मेस मधे जेवायला जात होतो, तिथे अशेच दोन मित्र जेवायला यायचे. एक ‘अजय’ नावाचा, सावळा उंचपुरा आणि अप-टु-डेट मुलगा, जो मेस मधे आल्या-आल्या आदि दोन खुर्च्या रिजर्व करायचा आणि बाहेर जाउन गाडीवर बसलेला आपल्या दिव्यांगी मित्र भावेशला, ज्याचे दोन्ही पाय कंबरेपासून लुळे होते, आपल्या दोन्ही हातात अलगत उचलुन आणायचा आणि एका खुर्चीवर बसुन द्यायचा व स्वतः बाजूच्या खूर्चीवर बसून जेवायचा. आम्ही सगळे त्यांच्याकडे मोठ्या कौतुकाने बघायचो, ते कशे एकामेकाला सांभाळून घेतात आणि मुख्य म्हणजे ते दोघे अगदी सामान्य लोकांनप्रमाणे वागायचे. कशाची ही परवा न करता, ते सहज आप-आपले कामे करायचे, जणू त्यांना आता एकामेकाची सवयच लागली असावी.

अजय आणि भावेश रोज सकाळी आणि संध्याकाळी मला भेटायचे. हळू हळू परिचय वाढला आणि मी एके दिवशी त्यांच्या रुमवर दोघांना भेटायला गेलो, सहज बोलता बोलता मी त्याच्याबद्दल चौकशी केली, तर भावेश म्हणाला, “बाबू, याचे वडिल आमच्याकडे लहानपना पासुन लाकडाच्या टालावर लाकडे विकण्याचे काम करायचे. आमच्याकडे फॉरेस्टचे लाकडे येतात आणि लाकडे विकणे हा आमचा व्यवसाय आहे. याचा आणि माझा जन्म एकाच महिन्यात झाले आहे, मी जरी काही दिवसानी मोठा असलो, पण हा पट्ठा माझ्या मोठ्या भावासारखी देखरेख करतो. अगदी म्हणजे, सकाळी संडासाला नेण्यापासून तर रात्री झोपून देयी पर्यंत, हा माझी सेवा करीत असतो. लहानपना पासून हा माझ्या सोबतीला आहे, तेंव्हा हा मला बाईसीकलवर शाळेत घेउन जायचा. आता पल्सरवर नेतो..!” हा-हा-हा...” दोघेही हासायला लगले.

“ “बरं का मन्या..,”” चहा देत अजय म्हणाला, ““लहानपना पासून माझे संपूर्ण खर्च शेटजी, म्हणजे, भावेशचे वडीलच उचलत आहे.”.!”

“ “अरे पण तु माझी सेवा करित नाही का...?”” भावेश हसत म्हणाला...! मग दोघेही हसायला लागले. मी पण चहा घेत त्यांच्या आनंदात सामील झालो.

भावेश, हा एका गुजराती कुलीन घराण्याचा दिव्यांगी मुलगा होता आणि त्यांचा लाकडाचा मोठा व्यवसाय होता. अजय, हा त्यांच्याकडे काम करणार्या एका गडीमाणसाचा गरीब मुलगा. जेमतेम पगारात अजयचे वडिलांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसावा कि त्यांच्या सारख्या गरिब मजूराचा मुलगा, आपल्या मालकाच्या मुलासोबत सी.ए.चे शिक्षण घ्यायला शहरात जाणार..! नशिबाचे खेळ बघा, अजयचा भविष्य, हा भावेशमुळेच चमकणार होता..! भावेश जर दिव्यांगी नसता, तर अजय जास्तित जास्त आपल्या वडिलांच्या सोबत टालावर कारकुन म्हणून झाला असता..., पण आता तो सी.ए. होणार होता. कुठे अकाऊंटेंट आणि कुठे सी.ए., खूप मोट्ठा फरक आहे यात, आणि याची परिणिती भविष्यात काय होणार होती, देवालाच माहित होती.

आमची भेटीगाठी रोजच व्हायची. ते दोघे कधी सिनेमा, तर कधी पानीपुरीच्या ठेल्यावर सुद्धा भेटायचे. पण असामान्याला सुद्धा सामान्याप्रमाणे कसे जगायचे, हे कुणी त्यांच्याकडुन शिकावे. वर्षावरवर्ष भराभर निघत होते, आम्ही सुद्धा आपआपल्या शिक्षणाच्या शेवटच्या उंबर्ठयावर येउन पोहोचलो होतो. एके दिवशी मेस मधे अजयला एक फोन आला आणि त्याच्या चेहर्यावरचे रंग उडाल्यासारखे झाले. तो फोन घ्यायला बाहेर आला आणि थोड्यावेळानी बोलुन जेवण आटोपटे घेतले. भावेश त्याच्याकडे उत्सुकतेनी बघत होता कि आता हा मला कुणाचे फोन होते, हे सांगेल...! शेवटी त्यांनीच अजयला विचारले, ““कुणाचा फोन होता रे..?””

“““ऑफिस मधुन होता, सरांचा...!” अजय म्हणाला.

ऑफिस म्हणजे जिथे हे दोघे आर्टिकलशिप करित होते, हे अम्हालापण कळले, पण त्यात घाबरण्यासारखे काय होते, हे भावेश सोबत आम्हा सगळ्यांना विचारात टाकत होते, पण अजयच्या सेवाभावामुळे त्याच्या या कृतीत जास्त काही शंका घेणे अम्हाला योग्य वाटत नव्हते. नंतर मला कळले, अजय ऑफिसच्या एका आर्टिकल मुलीच्या प्रेमात पडला होता...! प्रेम हा जर सांगून आला असता तर भावेशनी त्याला कधीचे ‘नो-एंट्री’ चा बोर्ड दाखविले असते.., कारण अजय जर त्याच्या जीवनातून एकदा का निसटला, तर त्याची देखरेख कोण करणार... हा एक मोट्ठा यक्षप्रश्न भावेशसमोर उभा होता. भावेशला कळल्यावर तो कसा रिएक्ट करणार, याची मला उत्कंठा आणि भिती सुद्धा होती.

भावेशला, अजयचे प्रेम-प्रकरण कळायला जास्त दिवस लागले नाही, पण तो मोठ्या मनाने त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करित होता. दिव्यांगी माणसे फार प्रेमळ आणि चांगल्या मनाचे असतात, हे माझ्या एकूण अनुभवावरून मी सांगू शकतो. काही असतात वेगळे, पण भावेशनी आपल्या मनावर पूर्ण ताबा मिळविला होता आणि तो कुठल्याही प्रसंगाला तोंड सुद्धा द्याला तैयार होता. काळानी भावेशसाठी काय लिहून ठेवले होते, देव जाणे. पण त्याचे भले व्हावे, हे आम्हा सगळ्यांना वाटत होते..!

दिव्यांगी मुलाला त्याच्या आई-वडिलांनशिवाय दूसरे कुणीही समजू शकत नाही, पत्नी सुद्धा नाही, कारण तिचे, त्या व्यक्तिशी रक्ताचे नाते नसते. मग अजयतर परका होता, फक्त एका उपकाराखेरीज भावेशची सेवा करायला, भाग पाडायला दुसरे काहिच कारण नव्हते त्याला. तसे बघितले तर उपकार फेडण्याकरिता दुसरे अनेक मार्ग असु शकतात, तो या सेवेच्या मोबदल्यात पैशे घेउ शकत होता, पण तरी तो निश्काम भावनेने भावेशची सेवा करित होता. लहानपना पासुन तर आता २४-२५ वर्षा पर्यंत.., खुप मोठा काळ असतो हा. जीवनहा नेहमी बदलत असतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या नंतर, प्रत्येक तरुण मनाला कुणाचीतरी साथ लागते, त्यांच्या सळसळणार्या उग्र रक्ताला हळुवार फुंकर घालणारा कुणीतरी हवे असते. अजयचे मनसुद्धा कुणालातरी शोधित होता, कि जिच्या ऑफिसमधे येताच एक परिचित परफ्युमचा झोका सरळ डोक्यात शिरणार, कि जिच्या मोकळे केसांचा स्पर्श हवेहवेसे वाटणार, कि जी चोर नजरेनी आपल्या मैत्रिणीच्या घोळक्यातून त्याला स्माईल देणार, कि जी आपले केस सावरण्याच्या निमित्याने त्याला “हाय...” म्हनणार, कि जी ऑडिट करिता बाहेर जाता जाता, ““कॉल मी..”” चा संकेत देणार...!

अजयसुद्धा एक माणूस आहे, त्याला सुद्धा मन, भावना आहे, त्याचेसुद्धा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, एक सेवाभावी मन आहे, मग त्याला थोडे स्वतःसाठी जगणे, इतके स्वातंत्रतर मिळालाच पाहिजे, नाही का..? भावेशला सुद्धा हे कळत होते, तो दिव्यांगी आहे, पण अजयतर नाही..! तो अक्षम असेल, पण अजयतर सक्षम आहे..! आणि मन मोठे केल्यानी त्याचे लुळे पायतर सरळ होणार नाही, कि त्यात प्राणतर येणार नाही..! आयुष्याच्या शेवटच्या श्वासा पर्यंत त्याला एका आधाराची गरज भासणार होती, हा एक कटूसत्य भावेशला माहित होते, म्हणुन कधी कधी तो बेचैन होउन जायचा, कपाळावर घाम यायचा आणि तो आपल्या नशिबाला दोष द्यायला लागायचा..! मला इतकी बुद्धि दिली, दोन व्यवस्थित पाय दिले असते तर काय बिघडले असते देवाचे...? देवाच्या कारखान्यात सुद्धा अंग प्रत्यंग, ‘आउट-ऑफ-ऑर्डर’ होतात की काय..?

“ “काय विचार करतोस रे मित्रा..?”” भावेश दचकला..! “

“अरे, मी आहे ना...!”” अजय बोलला, जणु त्याला भावेशच्या मनाचे कळत होते.

“ “तुला... अंजली आवडते का..?”” भावेशनी अजयला सरळ प्रश्न विचारले. अजय दचकला, त्याच्या कपाळावर घाम फुटायला लागलं..! “

“तुला कुणी सांगितले..?”” अजयनी डोळे खाली करत, अपराधभावने विचारले.

“ “फुल उमळला कि तो त्याच्या सुगन्धानेच कळते...!”” भावेश मिस्किलपणे बोलला, “

“ऑफिसमधे सगळ्यांना माहित आहे तुमच्या प्रकरणाबद्दल...!”

“ “सॉरी...!” अजय हळूच बोलला...

“यात सॉरी बिरी कुठुन आले आता..?”” भावेश हसत बोलला, ““तु काय माझा गुलाम आहेस..?””

“ “नाही, मी तुला सोडुन जाईन, असे तुला नको वाटायला..!”” अजय सावरत म्हणाला.

“ “देवाकडुन बोलवने आले, तरी नाही जाशिल..?”” भावेश मसकरी करित म्हणाला.

अजय त्याच्या जवळ येउन खाली बसला आणि म्हणाला, ““हे सगळे कसे आणि कधी झाले, कळलेच नाही.., ती खुप छान मुलगी आहे रे..!”” अजय अंजलीची बाजू घेत कुठेतरी स्वतःला विसरला..!

“ “ए, हलो... ओ रोमियो... कुठे भटकले तुम्ही..?”” भावेश अजयच्या डोळ्यापुढून हाथ हालवित बोलला... ““मी जर तुझ्या जागी असतो, तर मलापण एकदा प्रेमात पडायला आवडलं असतं..!”” भावेश सुद्धा शुन्यात कुठेतरी हरवला.

***

एकाला प्रेम करता येत नाही, किंबहुना करण्याची परवानगी नाही, कारण तो अक्षम होता आणि दुसरा, जरी तो सक्षम होता पण प्रेमातपडुन सुद्धा तो प्रेम करु शकत नव्हता...! किती विरोधाभास आहे, नाही..? कारण प्रेम, हा एकट्याने होणारा क़ृत्य नाही आहे, त्याला संपुर्णता मिळते दुसरीकडून दिल्याजाणार्या दुजोर्याची. एकेरी प्रेम, हा प्रेम नसून मृगतृष्ना शिवाय काही नसते. पण अजय आणि अंजलीचे प्रेम, हा दोन्हीबाजूनी सारखे होते. अजय हा एक बुध्दीमान, हुतकरु आणि आकर्षक तरुण होता, अंजली सुद्धा देखणी, प्रेमळ आणि हुशार मुलगी होती, आणि दोघेही सी.ए. होणार होते.., मग का बरं त्याचे मिलन होणार नाही..? ऑफिसमधे सुगबुग होतीच त्या दोघांनविषयी.., सगळे त्याची जोडी बघून ‘मेड-फ़ॉर-इच-अदर’ म्हणायचे..! अजयच्या स्वपनाचा क्लायमॅक्स नेहमी भावेश जवळ येउन संपायचा, तो नेहमी अंजली आणि भावेशच्या मधे पिसूनजायचा. काय करावे काही कळत नव्हते त्याला, अंजली सोबत लग्न केले तर भावेश एकटा पडेल, अशी त्याची नेहमी कोंडी व्हायची. विचार करता करता त्याचे तारांबळ उडायचे..!

तिकडे अंजली, अजय सोबत स्वतःच्या लग्नाचे स्वप्न रंगवित होती. तिला भावेश बद्दल किती संवेदना होत्या, देव जाणे. कदाचित नसेल, कदाचित गरज भासत नसेल. तिला माहित होतं, ते फक्त इतकच कि अजयसोबत लग्नकरुन आपला नवीन ऑफिस सुरु करायचे आहे बस्स... तिच्या जीवनाच्या प्रायोरिटीज मधे प्रथम क्रमांकावर हाच एकमेव उध्दिस्ट होता, बाकीचे नंतर बघूया... स्वप्न रंगविने आणि त्याला पुर्णत्वाला आणने, हाचतर जीवन आहे. साम, दाम, दंड, भेद... माणुस आपले स्वप्न रंगवायला, या पैकी कुठलाही शस्त्र वापरु शकतो. त्याला शास्त्रानी सुद्धा पुर्ण परवाणगी दिली आहे, मग अंजलीने आपले स्वप्न का बरं पुर्ण नाही करावे..? अजय जर भावेशसोबत आर्थिक, भावनिक नात्यानी जुडलेला असेल, पण कधी न कधी त्याला स्वतंत्र व्हावच लागेल.., नाही का..?

जवळ जवळ वर्षभरानी निकाल लागला, ते तिघेही सी.ए.ची परिक्षा उत्तीर्ण झाले होते. अजय आणि अंजलीचं आनंद तर गगनात मावत नव्हता. भावेश मात्रं काहीसा विचलित झाला होता. मी त्याला विचारले, ““आता पुढे काय करायचं विचार आहे तुझा..?””

तो हसत म्हणाला, ““बघुया... काय आहे पुढे, आपल्या नशिबात..”!”

मला त्याच्या चेहर्यामागे अविरत दुःख दिसत होते..! मी मनातल्या मनात त्याच्यासाठी प्रार्थनेशिवाय काहीच करु शकत नव्होतो..! असं म्हणतात कि माणसानी, माणसाचे दुःख कमी करायला पाहीजे, त्याच्या कामात यायला पाहिजे. पण मी त्याच्या कुठल्याही कामात येऊ शकत नव्होतो. त्याच्या जीवनात एकच व्यक्ति कामात येऊ शकत होता आणि तो म्हणजे, अजय..! पण अजयतर अंजलीचा होणार होता..!!

***

सहा महिन्यानी अजय आणि अंजलीचे लग्न जुडून आले. नवीन ऑफिसचे सेटअप आणि लग्न, अश्या दोन्ही कार्य एकाचवेळी, त्या सुद्धा तेवढेच महत्वाचे होते..! दोघांची तारांबळ उडालेली होती, लग्नाच्या पत्रिकेपासुन तर ऑफिसच्या कामापर्यंत, अहोरात्र कामच काम. अजयनी भावेशला, काही दिवसासाठी गावाला जाण्याची विनंती केली आणि तो त्याला गावाला सोडून आला. त्याला नवीन घराची सोय सुद्धा करायची होती, अंजली घरात लागणार्या आवश्यक वस्तुंची यादी करित होती. अजय, ऑफिस आणि लग्नाच्या तैयारित लागला होता. तो पत्रिका घेऊन गावाला गेला आणि भावेश आणि शेटजींना लग्नाला आमंत्रित करुन, आपल्या आई-वडिलांना सोबत घेऊन परत आला.

लग्नाचा दिवस उजळला, गुलाबाच्या सुगंधात शहनाईचा सूर जणू सुगंध आणि सूरांचा मिलन वाटत होता. भावेश आपल्या आई वडिलांसोबत व्हिलचेअरवर आला होता. लग्न समारंभ आटोपल्यावर, अजय आणि अंजलीने, सगळ्यांना आपल्या नवीन ऑफिसला भेंट द्यायची विनंती केली. भावेशला मात्रं अपमानित झाल्यासारखं वाटत होतं. पण नाईलाजाने त्याला जावे लागले. सगळेजण अजय आणि अंजलीचे नवीन ऑफिस बघायला गेले. त्यांचे आई-वडिल आणि काही मित्र परिवार ऑफिसला पोहचले. छोटसं, नवीन चकचकित ऑफिस जणू त्यांचीच वाट बघत होता. चेंबर मधे तीन खुर्च्या बघुन सगळे दचकले. “हा तीसरा पार्टनर कोण रे..?” भावेशनी आश्चर्याने विचारले. अजय आणि अंजलीने त्याची व्हिलचेअर मधल्या खुर्चीजवळ नेऊन, त्याला अलगत उचलत, त्यावर बसविले आणि अंजली म्हणाली, “”अजुन कुणाची असेल दादा..., फक्त तुमचीच..!!”” दोघे आशिर्वाद घेण्यासाठी त्याच्या समोर वाकले...! पण भावेश त्यांच्या समोर खाली, खूप खाली वाकलेला वाटत होता. त्यानी अश्रुपुर्ण नेत्रांनी आपले हाथ, अजय आणि अंजलीच्या डोक्यावर ठेवले...!!!

समाप्त.

लेखक : मनीष गोडे, नागपूर.

इतर रसदार पर्याय