Ti Chan Aatmbhan - 5 books and stories free download online pdf in Marathi

ती चं आत्मभान ... 5

५. परिवर्तन घडतांना..

विजया पाठक.

प्रत्येक मुलगी काही स्वप्न उराशी बाळगून जगत असते. कधी झटत असते कधी समाजाशी लढा देत असते. अनिशा सुद्धा बरीच स्वप्न उराशी बाळगून जगत होती. अनिशा दिसायला तशी रूपवान. कोणावरही सुंदर छाप पडेल अस वागण बोलण अनिशाच होत. अनिशाचं कॉलेज पूर्ण झाल ते अगदी आरामात. आणि तिला मनासारखा जॉब लगेचच मिळाला. अनिशा खुश होती. मनासारखं शिक्षण पूर्ण झाल्यावर मनासारखा काम करता येणार ह्या गोष्टीचा अनिशाला आनंद झाला होता. जॉब चालू होऊन थोडे दिवस झाले. काही दिवसातच तिला प्रमोशन मिळाल. अनिशा आणि तिच्या घरातले खुश होते. ऑफिस जॉईन केल्यावर काहीच दिवसात ऑफिस मध्ये बॉसच्या आवडत्या लोकांच्या यादीमध्ये अनिशा गेली होती आणि त्यामुळे आपसूकच सगळ्या प्रकारचे फायदे तिला मिळत होते. तिची आई खुश होती आणि ती अनिशा बरोबर बोलायला लागली,

"अनिशा, तुझा जॉब चालू होऊन फक्त काही महिनेच झाले आणि तुझी प्रगती वाखाखण्याजोगी आहे. तुझा पगार सुद्धा एकदम वाढला. आता तुझी सगळी स्वप्न लवकरच पूर्ण होतील."

"हो आई.." खुश होऊन अनिशा बोलायला लागली, "माझ्यासाठी सुद्धा अनपेक्षित होत हे सगळ. मला वाटलेलं खूप स्ट्रगल असेलं. अगदी सहज मिळतंय यश.. अर्थात कधी कधी भीती वाटते सहज मिळालेल्या यशाची. पण मस्त वाटतंय."

"अनिशा, तुझ काम चांगल आहे. पण महत्वाच ऐक, चुकीचं काही करू नकोस. चुकीचं होत असेल तर गप्प बसून राहू नकोस! आणि कामावर लक्ष केंद्रित कर. भरपूर प्रगती कर अनिशा!!" अनिशाची आई अनिशाच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली.

दिवस भराभर पुढे जात होते. अनिशाची ऑफिस मधली प्रगती दृष्ट लागेल अशी होत होती. आणि एका दिवशी अनिशाचा मूड एकदमच बदलला. तिच्या आईनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण अनिशा काहीच बोलली नाही. अनिशाच्या आईला अनिशा मध्ये होणारा बदल जाणवत होता. तिला जाणवलं काहीतरी चुकीचं होतंयं कारण अनिशा छोट्या छोट्या गोष्टीतून समाधान आणि आनंद मानणारी होती पण अनिशा एकदमच बदलायला लागली होती. अनिशा मध्ये होणारा बदल आईनी पहिला होता. अनिशा काहीच मोकळेपणानी बोलत नाही हे पाहून अनिशाला समोर बसवून घेतलं आणि ती बोलायला लागली,

"अनिशा.. मला सांग, हल्ली तू ऑफिस ला जातांना खूप खुश नाही वाटत. आधी तर तू खूप खुश असायचीस. काहीतरी बिनसलं आहे? तुला काम आवडत नाहीये? की अजून काही? अनिशा तू बोलत जा. आधी तर सगळ सांगायचीस. आणि हल्ली तू काहीच सांगत नाहीस. मला तर अस वाटतंय तू माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवती आहेस. तुला ऑफिस मध्ये कोणी आवडायला लागलाय आणि बाबा काय म्हणतील अस काही टेन्शन आहे का?"

"आई.. नको ना ग आता तो विषय! आज रविवार आहे मला जरा निवांत बसू दे. आणि किती प्रश्न एका वेळी विचारशील?"

"तुझी काळजी वाटते ग अनिशा. तू आधीसारखी वाटत नाहीस आता."

"काम वाढलयं..बाकी काही नाही ग आई. तू इतका विचार नको करूस. आणि मी आता मोठी झालीये. माझे प्रश्न मी सोडवेन. लव यु आई. आणि प्लीज बाबांना चुकूनही काही बोलू नकोस."

"बाबांन काही नाही बोलत पण त्यांना काही कळत नाही ह्या भ्रमात राहू नकोस अनिशा. आणि नक्की काही सिरिअस नाही ना?" प्रश्नार्थक मुद्रेने आईनी अनिशाला विचारलं.

"हो हो आई.. काही सिरिअस नाही. अगदीच काही वाटल तर मी सांगेन तुला. काळजी नको करूस! आयुष्य एकदम बदललं ना.. कॉलेज मध्ये मनासारखं वागता यायचं आता ऑफिस मध्ये वातावरण बदललं, टेन्शन आणि जबाबदारी सुद्धा वाढली म्हणून तुला वाटलं असेल मी खुश नाहीये. मी खुश आहे. भरपूर पगार मिळतो. अर्थात काम वाढलं आहे पण पैसे सुद्धा साठवायचे आहेत. तुला माहिती आहे माझी बरीच स्वप्न आहेत. थोडे कष्ट तर करावेच लागणार ना. थोडी तडजोड. सहजासहजी काहीच मिळत नाही. मला माझ्या स्वत:च्या जोरावर सगळं करायचं आहे." चेहऱ्यावर खोट हसू आणत अनिशा बोलली

"ठीके अनिशा..पण कधी काही वाटलं, कोणताही ताण आला तरी माझ्याशी किंवा बाबांशी बोलत जा."

"येस येस आई.." अनिशा आईला बिलगली, "आणि हो,कोणी आवडलं तर पहिल्यांदी तुलाच सांगेन. आई आता जरा इतर पेंडिंग काम करते. आणि हो आई, उद्या सकाळी मिटिंग आहे सो लवकर जायचं आहे. मला प्लीज ६च्या आधीच उठव."

"चालेल अनिशा. तू खुश राहा आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर. आमच्यावेळी मी काम करायची परिस्थिती नव्हती नाहीतर माझीच सुद्धा बरीच स्वप्न होती. पण तुझ्या जन्मानंतर मी सगळी काम सोडली. असो, झाल ते झाल.. तू मस्त काम कर आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर." अनिशा आईला बिलगली. आणि हळूच डोळे पुसले. मग मात्र खंबीर झाली आणि कामाला लागली. त्यादिवशी अनिशा लवकरच झोपली खरी पण अनिशा खूप अस्वस्थ होती.

दुसऱ्या दिवशी घड्याळात ६ वाजायला आले. अनिशाच्या आईनी घड्याळ पाहिलं आणि अनिशाला उठवायला हाक मारायला लागली. तिच्या खोलीतून काहीच आवाज आला नाही म्हणून आई अनिशाच्या खोलीत गेली. अनिशाला हलवून उठवल आणि परत तिच काम करायला स्वयंपाकघरात गेली. अनिशाला जाग आली खरी पण तिच डोकं जड झालाय ह्याची जाणीव तिला झाली,

"वाजले पण ६? डोकं दुखतंय आज. आज नाही जात मी ऑफिस ला.. सुट्टी घेते आणि घरीच राहते." असा विचार अनिशानी केला पण तिला जाणवलं तिचा प्रोजेक्ट संपत आलाय आणि महत्वाची मिटिंग होती. मिटींगसाठी तिच्या बॉसला तिने मिटिंग घ्यावी अस वाटत होत. इच्छा नसतांना आळस देत अनिशा गादीवरून उठली आणि तोंडावर सपासप पाणी मारून घेतलं. मन फ्रेश केल. डोके दुखीवर एक गोळी घेतली. आणि पटापट आवरून तयार झाली. आदल्या रात्री अनिशाच्या मनात विचारांची खूप घालमेल झाली होती. तिला जाणवायला लागल होत, तिच्या ऑफिस मध्ये बॉसच वागण काहीतरी विचित्रच आहे. तिचा बॉस विनाकारण काही ना काही काढून तिच्याशी अंगलट करायचा सतत प्रयत्न करायचा. अनिशाला ती गोष्ट अजिबात आवडत न्हवती पण तिच्यासाठी तिची स्वप्न पूर्ण होण सुद्धा महत्वाच होत. स्वप्नपूर्तीसाठी थोडी तडजोड तिने मान्य केली होती. त्यामुळे अनिशानी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा निर्णय घेतला होता.

अनिशा वेळेआधीच ऑफिसला पोचली. ऑफिसमध्ये बॉस सोडून कोणीच आल न्हवतं. अनिशा तिच काम पाहत तिच्या डेस्क वर बसली. तिचा बॉस, शेखर ह्यांनी अनिशाला पाहिलं आणि तो तिच्या डेस्क जवळ आला. आणि बोलायला लागला,

"अनिशा, ऑल सेट फॉर द मिटिंग? आज मिटिंग तू घेणार आहेस. आज चांगल काम केल तर तुला अजून सरप्राईजेस मिळतील अनिशा." अनिशाच्या गालावरून हात फिरवत बॉस बोलला. सुरवातीला शेखरच्या अश्या वागण्याच अनिशाला काहीच वाटल न्हवत. पण आता मात्र अनिशा विचारात पडली. अनिशाला ती गोष्ट खटकली पण ह्यावेळेसही ती काही बोलली नाही. तिला जाणवत होत, शेखर तिच्याशी सलगी करायचा एकही प्रयत्न सोडत नाही. पण अनिशा तरीही शांत राहिली. तिने फक्त शेखरचा हात बाजूला केला आणि बोलली,

"हो हो सर.. आहे माझ्या लक्षात. आजची मिटिंग माझ्यासाठी खास असेल. मी माझ काम चोख केलय. तुम्ही काळजी नका करू."

"अ.. तू मला सर का म्हणती आहेस अनिशा? मी तुला सांगितलं आहे अनिशा. आपण दोघचं असू तर तू मला शेखर म्हणावस. आत्ता तर आपल्या दोघांशिवाय ऑफिस मध्ये कोणीच नाही. तरी आज तू सर म्हणून का बोललीस? तुला पुढची प्रमोशनन्स लवकर हवी आहेत ना?"

"सर, तुम्ही मोठे आहात. हुद्यानी आणि वयानी सुद्धा. मग मी तुम्हाला नावानी कस बोलवू? आणि प्रमोशन कामावर मिळालं ना मला?" अनिशा विचारात पडली आणि थोड सावरून अनिशा बोलली.

"आपण दोघ असतांना कसली काळजी करतेस अनिशा? आणि प्रमोशन फक्त कामावर थोडी असत? तू खूपच भोळी आहेस अनिशा. तू काही गोष्टी मला दे..म्हणजे फक्त तुझा वेळ. आणि तुला हव ते मी देईन. तुला प्रमोशन आणि पगार वाढ हवी आहे ना? त्याची चिंता तू सोड.. मला खुश कस ठेवता येईल ह्याकडे लक्ष ठेव म्हणजे बास. असो.." शेखर बोलत होता तितक्यात ऑफिस मध्ये इतर स्टाफ यायला सुरवात झाली. तस लगेचचं शेखरच बोलणं वागणं बदललं,

"मिस अनिशा, ऑल द बेस्ट. मिटिंग कशी घेता त्यावर पुढच्या गोष्टी ठरतील."

शेखरच वागणं बोलणं ऐकून अनिशा चकित झाली. "कोणत्या पुढच्या गोष्टी? आणि प्रमोशन फक्त कामावर नसत?" शेखरचे शब्द तिच्या मनातून जात न्हवते. आता अनिशाला सगळ्या गोष्टी नीट समजायला लागल्या होती. तिच्या मनात बरेच विचार चालू होते पण ते विचार झटकून तिने मिटिंग वर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. शेखर तिच्यासामोरून निघून गेला. आणि अनिशा मिटिंगची तयारी करायला लागली. अनिशानी तिची तयारी व्यवस्थित केली होती. त्यामुळे मिटिंग सुद्धा एकदम चांगली झाली. आपल्या बोलण्यातून अनिशानी सगळ्यांवर छाप पडली. शेखर तिचा बॉस पण अनिशाच्या कामानी खुश झाला. कॉन्फेरंस हॉल रिकामा झाला. अनिशा तिच सामान आवरून कॉन्फेरंस हॉलच्या बाहेर पडायची तयारी करत होती. अनिशाच बाकी कुठे लक्ष न्हवत. तितक्यात शेखरनी कॉन्फेरंस हॉलचं दार लाऊन घेतलं. आणि अनिशा समोर येऊन बोलायला लागला,

"वेल डन अनिशा! आजची मिटिंग मस्त घेतलीस. पहिलीच जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडलीस." हे बोलतांना शेखर अनिशाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतच होता. पण अनिशा सावध होती. तिने शेखरला तिच्या जवळ येऊन दिल नाही. पटापट सामान पर्स मध्ये भरलं आणि जागेवरून उठली,

"थँक्यू सर.. मी जाते आता."

"थांब थांब.. अनिशा! घाई काय आहे? तुला सरप्राईज काय आहे ऐकायचं नाहीये?" शेखर हसत बोलला. त्यावर अनिशानी थंडपणे उत्तर दिल, "हो सर, काय आहे सरप्राईज?"

"अशी कशी विसरलीस तू? बर, आत्ता नको.. आज संध्याकाळी माझ्या घरी ये डिनरला. मग सांगतो सरप्राईज..."

शेखरच बोलण ऐकून अनिशा मनातून घाबरली. पण चेहऱ्यावर हसू आणत ती बोलायला लागली,

"सर, तुमच्या घरी का??"

"आहे एक छोट काम. आणि सरप्राईज ऐकायचं आहे ना?" अनिशा शेखरच बोलणं ऐकत होती. तिच्या मनात विचारांची गर्दी झाली होती. बॉस ला हो म्हणाव की नाही ह्या विचारात ती होती पण ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लाऊ असा विचार करत अनिशानी मान डोलवून होकार सांगितला. "बर सर.. तुम्ही तुमचा पत्ता आणि कधी येऊ ते मेसेज करा." अनिशा इतक बोलली आणि लगबगीनी कॉन्फेरंस हॉलच्या बाहेर पडली. अनिशा तिच्या डेस्क वर आली आणि तिच्या मनात विचारचक्र चालू झाल. तिला तिची चूक जाणवायला लागली. आधी जेव्हा शेखर तिच्याशी जवळीक करायचा प्रयत्न करत होता तेव्हा तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल होत. तिने शेखरला तिच्या जवळ येऊ दिल नाही पण स्पष्ट नकार सुद्धा कधी सांगितला न्हवता. बॉस ने थोडी जेवळीक करून प्रमोशन, पगार वाढ मिळत असेल तर काय होतंय असा विचार तिने केला होता. अनिशाची स्वप्न मोठी होती आणि सगळी स्वप्न पूर्ण करतांना थोडी तडजोड करत होती. पण अनिशाला तिची चूक उमगली होती. स्वस्तात मिळालेली कोणतीच गोष्ट अंगी लागत नाही ही गोष्ट तिच्या लक्षात आली होती. आणि चुकीच्या गोष्टींना वेळीच विरोध केला पाहिजे हे अनिशाला जाणवलं. अनिशाच काम चोख होत आणि आता मात्र तिला स्वतःच्या गुणवत्तेवर तिला पुढे जायचं होतं.

अनिशा लवकर घरी गेली. आणि रूमच दार लाऊन विचार करायला लागली. काय करायचं ह्या गोष्टीबद्दल तिच्या मनात संभ्रम होता. पण काहीतरी मार्ग अनिशा ह्यावेळी काढणार होती. आता मात्र अनिशा गप्प बसणार न्हवती. झालेली चूक सुधारून तिला चुकीच्या गोष्टी बदलायच्या होत्या. तिने शेखरला फोन लावला,

"सर.. अनिशा हिअर."

"बोल अनिशा.. तू आज रात्री माझ्या घरी येतीयेस ना? मी वाट पाहतोय तुझी. आणि सर का? शेखर म्हण की."

"हो हो शेखर...विसरलेच होते मी की आपण दोघ बोलतांना फक्त शेखर म्हणायचं." अनिशा खोट हसत बोलली, "मी आज एकदम खुश आहे. मला सरप्राईज काय आहे हे पहायची उत्सुकता आहे. शेखर, माझ प्रमोशन आणि पगार वाढ नक्की ना आता? आणि हो, आज मी पण एक सरप्राईज देणारे तुला शेखर!" अनिशा बोलत होती. शेखर अनिशाच्या बोलण्यातला बदल पाहत खुश झाला..आणि उत्साहानी बोलायला लागला,

"येस येस अनिशा. तू मला खुश कर आणि मी तुला हव ते देतो...तू फक्त ये आता घरी लवकर. आणि मला सरप्राईज.. वाह.." अनिशा शेखरच बोलण ऐकत होती आणि मनोमन हसत होती.

"आवरते आता. आणि येतेच लवकर." अनिशानी फोन बंद केला आणि आवरायला लागली. तिने एक सुंदर आकर्षक ड्रेस काढला आणि संध्याकाळी लवकरच आवरून घराबाहेर पडली. आणि शेखरच्या घरी गेली. आणि दाराची बेल दाबली. शेखरनी दार घडल आणि अनिशाला घरी पाहून तो खुश झाला,

"अनिशा.. तू वेळेच्या आधी आलीस. ऑफिस मध्ये येतेस त्यापेक्षा वेगळीच दिसती आहेस. एकदम फ्रेश आणि सुंदर!! ये की आत!.. फिल कम्फर्टेबल."

"येस. थँक्यू! ऑफिस मध्ये ड्रेस कोड आहे ना.. आणि हो, बाहेर मी अशीच वावरते." अनिशा सोफ्यावर बसली आणि चहुबाजूला नजर फिरवली,"मस्त सजवलय घर, शेखर. तू एकटाच राहतोस? बायको कुठे आहे?"

"ओह.. तुझ्यासाठी आपण ऑफिस मधला ड्रेस कोड बदलायचा का? तू सांग.. आणि थँक्यू घर आवडल ना? बायकोनी सजवलं होत घर पण मागच्याच वर्षी आमचा डिवोर्स झाला. आता एकटाच राहतो. कंटाळा येतो कधी कधी. एकट राहाणं अवघड असत ग अनिशा!"

"ओह.." अनिशानी जरा विचार केला आणि मग ती खंबीरपणे बोलायला लागली, "म्हणून तू ऑफिस मधल्या मुलींना त्रास देतोस का?" अनिशा भुवया उंचावत बोलली. शेखर तिच बोलण ऐकत होता आणि शेखर थोडा घाबरला.

"अ.. काय बोलते आहेस अनिशा?" त्याच्याशी अश्या शब्दात कोणीच बोलल न्हवत. थोडा घाबरून शेखर बोलला.

"सर, लेट मि कम टू द पॉइंट. मुलीला सारख गृहीतच का धरलं जात? कसही वागल तरी मुलगी काहीच बोलणार नाही? म्हणजे खरच आहे हे. मुली शक्यतो काही बोलण टाळतात. काही बोलणार नाही मग हव तस वागत राहा ही वृत्ती का ठेवता सर तुम्ही सुद्धा? तुम्ही खूप चांगले आहात सर. पण उगाच अंगचटीला का जाता सगळ्यांच्या. मुलींना नाही आवडत काही गोष्टी. काही मुली घाबरतात, काही विचार करतात पगार वाढतो आहे, प्रमोशन मिळतं आहे तर जाऊदे. होऊ दे होतंय ते. पण हे बरोबर आहे का सर? आम्ही ऑफिस मध्ये काम करण्यासाठी येतो सर. आमची पण खूप सारी स्वप्न आहेत. पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी चुकीचे मार्ग का अवलंबायचे? आम्हाला आमच्या मेहनतीवर पुढे जाऊ दे की. आणि मला आत्ता कळलं तुमच्या डिवोर्स बद्दल. पण बायको नाही म्हणून इतर मुलींना त्रास द्यायचा हे किती योग्य आहे?" अनिशा न थांबता बोलत होती. तिला माहिती न्हवत शेखर कश्याप्रकारे प्रतिसाद देईल. अनिशा मनातून थोडी घाबरली होती कारण अनिशा एकटीच होती शेखरच्या घरी. अनिशा थोडी सावरून बसली. शेखर तिचं बोलण ऐकत होता आणि तो अनिशाच बोलण ऐकून एकदमच नरमला,

"मी अस वागतो का तुझ्याशी? सॉरी अनिशा. मला खूप एकट वाटतं ग. मग काहीतरी विरंगुळा. मी कोणाला त्रास द्यायचा म्हणून म्हणून अस वागत न्हवतो. मला खरच एकट वाटत. मनावर खूप ताण येतो जेव्हा मी एकटा आहे हे जाणवत तेव्हा. मग मन रिझवायला काहीतरी करत राहतो. मी कश्या परिस्थितीमधून जातोय ह्याचा तू विचार कर." अनिशा शेखरच बोलण ऐकत होती. तिला सुद्धा शेखर बद्दल वाईट वाटत होत.

"सर, एक सांगू का? तुम्हाला एका मित्राची गरज आहे. ज्याच्याशी तुम्ही तुमची सुख दुःख शेअर करू शकाल. तुम्ही सगळी दुःख एकटे पचवताय मग साहजिकच त्याचा परिणाम इतर नात्यांवर होतो. बघा, तुम्हाला माझ म्हणण पटत असेल तर."

"हो खरचं.. अस कोणी हवयं ज्याच्या बरोबर मी मोकळेपणानी बोलू शकेन. पण अस कोणीच नाही माझ्याजवळ. मोकळेपणानी कोणाशी बोलताच येत नाहीत गोष्टी. मग मी मनात कुढत राहतो आणि त्याचा परिणाम माझ्या वागणुकीतून दिसतो."

"सर वूड यु माइंड, इफ वि बेकम फ्रेंडस?" अनिशानी शेखरला प्रश्न केला.

शेखर ऐकत होता. त्याचे डोळे लकाकले. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. आणि तो आता त्याचे वर्तन सुधारणार होता. शेखर मनापासून हसला. त्याच्या मनावरच सगळा ताण गायब झाला. दोघ जेवण्यासाठी डायनिंग रूम मध्ये गेले. शेखर भरभरून बोलायला लागला,

"अनिशा, आधी मी सॉरी म्हणतो आणि आता मी एक उत्तम बॉस म्हणून काम करेन ह्याची खात्री ठेव. आपल्या ऑफिस मध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ह्याकडे मी स्वतः लक्ष देणार. आणि हो, माझे डोळे उघडण्यास मदत केलीस त्यासाठी तुला खूप थँक्यू.. ह्याबद्दल तुझ प्रमोशन आणि पगारवाढ नक्की!" शेखर भरभरून बोलत होता आणि अनिशा त्याच्याकडे समाधानानी पाहत होती.

विजया पाठक.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED