ती चं आत्मभान.. Anuja द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती चं आत्मभान..

"ती"चं आत्मभान....

प्रस्तावना-

"ती"चं आत्मभान - आत्मभान म्हणजे काय तर स्वत्वाची जाणीव, स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार!! जे केल्याशिवाय आयुष्य जगण्यातली मजा येतंच नाही. प्रत्येकालाच आत्मभान असण्याची नितांत गरज असते आणि स्त्री जी समाजाचा एक महत्वाचा घटक आहे तिला तर आत्मभान असण अतिशय गरजेचं आहे. स्त्रीला जेव्हा आत्मभान येत तेव्हा ती स्त्री खऱ्या अर्थाने तिचं आयुष्य जगायला लागते आणि स्त्री जगायला लागली की समाज सुद्धा बदलायला वेळ लागत नाही.

"ती"चं आत्मभान.... ह्या कथासंग्रहासाठी १४ वेगवेगळे लेखक एकत्र आले आणि सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे हे पुस्तक तयार झाले. आत्मभान ह्या पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरच्या १५ कथा आहेत. त्या साऱ्या कथा स्त्री च्या आयुष्याभोवती फिरतात. प्रत्येक स्त्री ही एक रोल मॉडेल असतेचं आणि ते ह्या वेगवेगळ्या गोष्टीतून दाखवायचा आम्ही प्रयत्न केला आहे. ह्या पुस्तकातल्या प्रत्येक गोष्टीतून वेगळाच पैलू मांडायचा प्रयत्न झाला आहे. स्त्री ही अगदी जन्मापासूनच लढा देत जगते, स्त्री कधी स्वतःशी लढत असते तर कधी समाजाशी! प्रत्येक क्षणी आयुष्यात काहीतरी नवीन शिकत असते आणि शेवटी ती जिंकतेचं!! 'स्त्री जन्म भोगण्यासाठी आहे' ही विचारसरणी बदलायची गरज आहे. जुने दिवस गेले. आता नवीन वारे वाहू लागले आहे. स्त्रीच्या अस्तित्वाचा स्वीकार होतो आहे. आता स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. स्त्री अबला नाही हे ती जगाला दाखवते आहे. जेव्हा एक मुलगी, एक बाई स्वतः मधले गुण ओळखून तिची प्रगती करायला पुढे सरसावते तेव्हा तिच्या प्रगती सोबत समाजाला सुद्धा सशक्त बनवण्यास हातभार लावत असते. अश्या आपल्यातल्या प्रत्येक स्त्री ने आपल्यातले सुप्त गुण ओळखून अधिकाधिक प्रगती करावी आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्री ला खंबीर बनवण्यासाठी प्रेरणा घ्यावी हा ह्या पुस्तकामागचा उद्देश आहे. जन्म घेणारा प्रत्येकजण खंबीर आहे आणि तो खंबीरपणा टिकवून ठेऊन आयुष्य उत्तम बनवावं म्हणून प्रत्येक स्त्री साठी आणि स्त्री ला साथ देणाऱ्या सगळ्या पुरुषांना हे पुस्तक समर्पित आहे.

ह्या पुस्तकात मी संपादकाचे काम केलं आहे आणि ते करत असतांना प्रत्येकवेळी मला काहीतरी नवीन शिकायची संधी मिळाली. "ती"चं आत्मभान.. - हे पुस्तक वाचकांसमोर ठेवतांना मला विशेष आनंद होत आहे कारण ह्यात वेगळे विचार असलेल्या लेखकांचा सहभाग आहे. मला खात्री आहे की हे पुस्तक वाचतांना तुमचे विचार, तुमचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल आणि स्वतःची क्षमता नव्याने कळेल.

जाता जाता, पुस्तक कसं वाटलं हे सांगायला विसरू नका. आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या सुद्धा जरूर कळवा.

अनुजा कुलकर्णी.

anuakulk@gmail.com

१. आव्हान..

अमिता साळवी.

"वैशू! मी शाळेत जातेय! तुझ्यासाठी जेवण बनवून ठेवलंय. दुपारी जेवून घे. पुढच्या महिन्यात परीक्षा आहेत; त्यामुळे मुलांचे क्लासेस ठेवलेयत मी! त्यामुळे काही दिवस संध्याकाळी घरी यायला थोडा उशीर होईल. खरं तर आज मला जावसंच वाटत नाही. तुझ्या सुट्टीचा पहिला दिवस आहे ना! पण काय करणार? मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे." मालिनीचा पाय घरातून निघत नव्हता.

बारावीच्या परीक्षेनंतर आजपासून वैशालीची सुट्टी सुरू झाली होती. पेपर्स उत्तम गेल्यामुळे ती खूप आनंदात होती. ती मालिनीला म्हणाली,

" आई! मीसुद्धा थोड्या वेळाने कॉलेजमध्ये चालले आहे. मैत्रिणीही येणार आहेत. सुट्टीचा पहिला दिवस एंजॉय करायचा असं आम्ही ठरवलं आहे. पुढच्या महिन्यात युनिव्हर्सिटीची डान्स कॉम्पिटिशन होणार आहे. मला त्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे; त्याविषयीही प्रिन्सिपल मॅडम ना विचारून घ्यायचं आहे. डान्सची प्रॅक्टिससुद्धा सुरू करावी लागणार आहे. मला या डान्स कॉम्पिटिशन पासून खूप अपेक्षा आहेत." वैशाली उत्साहाने बोलत होती. नृत्य म्हणजे तिचा प्राण होता. आणि आता अभ्यासाचंही बंधन नव्हतं.

" ठीक आहे! कॉलेजमध्ये जाऊन ये. पण मैत्रिणींबरोबर उन्हात फार फिरू नको. हल्ली दुपारी खूप ऊन असतं. बाहेर फिरण्यापेक्षा त्यांना घरी घेऊन ये. किचनमध्ये वेफर्स ठेवले आहेत. फ्रीजमध्ये पॅटिस आणि कोल्ड्रिंकसुद्धा आहे. ओव्हनमध्ये पॅटिस गरम करून घे." मैत्रिणींना नेहमी घरी घेऊन यायची वैशालीची सवय तिच्या आईला माहीत होती. दिवसभर तिच्या घरी कोणी नसल्यामुळे त्यांना वैशालीच्या घरी मोकळे रान मिळत असे.

आई निघाल्यावर थोड्याच वेळात वैशाली बाहेर पडण्याची तयारी करू लागली. आईने जेवून निघायला सांगितले होते, ओट्यावर पोळी-भाजी होती; पण. वैशालीने तिचं आवडतं पॅटिस गरम करून घेतलं, वर तरतरी येण्यासाठी कोकाकोला पिऊन ती घराबाहेर पडली.

***

कॉलेजमध्ये तिच्या मैत्रिणी तिची वाट पहात होत्या. नृत्याच्या स्पर्धेसाठी कॉलेजतर्फे तिला पाठवले जाणार याविषयी सगळ्यांनाच खात्री होती. ही राज्यस्तरावरील नृत्यस्पर्धा असल्यामुळे अनेक कॉलेजमधील विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेणार होते; त्यामुळे या स्पर्धेला त्यांच्या दृष्टीने मोठे महत्व होते. काही वेळाने त्या सगळ्या प्रिन्सिपल मॅडमच्या केबिनमध्ये गेल्या. प्रिन्सिपल मॅडम वैशालीकडे थोडा वेळ पाहत होत्या. त्यांच्या मनात काहीतरी विचार चालले आहेत हे नक्की होतं. थोड्या वेळाने त्या बोलू लागल्या,

" हे पहा वैशाली! आपल्या कॉलेजमध्ये नृत्यामध्ये पारंगत तू एकटीच आहेस, त्यामुळे कॉलेजतर्फे स्पर्धेसाठी मी तुलाच पाठवणार यात शंका नाही पण स्पर्धेत फक्त नृत्याविष्कार पाहिला जात नाही; तर एकूण व्यक्तिमत्वही पाहिले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये तू स्वतःची काळजी घेतलेली दिसत नाही. वजन खूप वाढलेलं दिसतंय! नृत्यासाठी शरीर लवचिक असणे आवश्यक आहे नाहीतर हालचाली बेढब दिसतात. तू पुढच्या दीड महिन्यात स्वतःला फिट बनवू शकशील का? तेवढं केलंस तर नृत्यात तुझा हात कोणी धरू शकणार नाही याची मला खात्री आहे."

" हो मॅडम! मी स्वतःला फिट बनवेन याची खात्री बाळगा! परीक्षेसाठी तासनतास एका जागी बसून अभ्यास केल्यामुळे थोडं वजन वाढलंय. पण जिममध्ये जाऊन थोडे व्यायाम केले की सगळं ठीक होईल." वैशाली आत्मविश्वासाने म्हणाली.

यावर मॅडमनी फक्त मान हलवली आणि तिच्याशी हस्तांदोलन करत म्हणाल्या, " तुला स्पर्धेसाठी शुभेच्छा. चांगली प्रॅक्टिस कर."

***

प्रिन्सिपॉलच्या केबिनमधून बाहेर पडताना वैशालीचा चेहरा गंभीर होता; पण काही वेळातच मैत्रिणींच्या हास्यविनोदात ती सर्व काही विसरून गेली. सगळ्यांनी पंजाबी हॉटेलमध्ये जाऊन मस्त जेवण घेतलं,नंतर सिनेमा पाहिला संध्याकाळी सी फेसला जाऊन गळ्यात गळे घालून मऊ वाळूत चालण्याची मजा अनुभवली. आणि शेव- पुरी खाऊन जेव्हा वैशाली घरी गेली, तेव्हां अंधार पडू लागला होता. आईला घरी यायला उशीर झाला होता आणि छोट्या संकेतने बर्गरसाठी हट्ट केला होता; त्यामुळे रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी बाबा सगळ्यांसाठीच बर्गर घेऊन आले होते . रात्री वैशाली आईला म्हणाली, " आई! मला सकाळी लवकर उठव! उद्यापासून मी स्नेहा बरोबर जिमला जाणार आहे. वैशालीला सकाळी लवकर उठवणे, किती जिकीरीचे आहे मालिनीला चांगलेच माहीत होते, तिने फक्त मान हलवली.

वैशाली जिमला जाण्याविषयी खरोखर सिरियस होती, हे आईला दुसऱ्या दिवशी कळले. तिने आईवर अवलंबून न रहाता, रात्री तिच्या मोबाइलवर अलार्म लावला होता. आणि तयार होऊन वेळेवर स्नेहाची वाट पाहत बसली होती.

व्यायाम करून दोघी जिममधून बाहेर पडल्या तेव्हां त्या दोघींनाही खूप भूक लागली होती. कोपऱ्यावर गरम-गरम वडा- पाव खाऊन मगच दोघी घरी गेल्या , हा वडा- पाव रोजचाच झाला.

आठवडाभर दोघी नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करत होत्या. आठवड्याच्या शेवटी वजन करून पाहिलं तेव्हा वैशालीच्या अपेक्षेप्रमाणे ते कमी न होता उलट वाढलं होतं. नर्व्हस झालेल्या वैशालीनं घरी गेल्यावर आरशात पाहीलं. आपण दिवसेदिवस जास्तच बेढब होत चाललो आहोत असं उगीचच तिच्या मनात आलं. पण तिने जिमला जाणं चालू ठेवलं. तरीही तिचं वजन पुढच्या आठवड्यात तर अधिकच वाढलं. वजनाचं कार्ड पाहिलं आणि वैशालीच्या डोळ्यात पाणी तरळलं. नृत्य स्पर्धेत यश मिळवण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होणं आता अशक्य आहे याची जवळ- जवळ तिला खात्रीच पटली.

विमनस्क मनःस्थितीत ती घरी आली. नेहेमी मुलीचा प्रफुल्ल चेहरा पाहण्याची सवय असलेल्या मालिनीने तिला आश्चर्यानं विचारलं,

" काय झालं वैशू? तुझा चेहरा का उतरलाय? जिम मध्ये कोणी काही बोललं का?"

" काही नाही आई! उन्हातून आलेय, म्हणून तुला असं वाटत असेल." वैशालीने उडवाउडवीचं उत्तर दिलं.

मालिनी पुढे काही बोलणार; इतक्यात फोन वाजला. मालिनी फोन घ्यायला गेली. ती परत हॉलमध्ये आली तेव्हा खूप गंभीर दिसत होती.

" आईच्या शेजारचे शिंदे काका आहेत नं?

त्यांचा फोन होता. आईला ताप आलाय. तुझा संजय मामा , मामीला आणि छोट्या अंकिताला घेऊन दोन दिवसांपूर्वीच युरोप टुरला गेलाय. घरी कोणी नाही. संजय काकांनी डॉक्टरना बोलावून औषध चालू केलंय. आता तापही उतरतोय. पण अशक्तपणा खूप आहे. तसं काळजी करण्याचं काही कारण नाही असं शिंदे काका म्हणाले. पण कोणीतरी जवळ असायला हवं." मालिनीच्या चेहर्‍यावर काळजी स्पष्ट दिसत होती.

" तू नांदगावला जाणार आहेस का ? तो बिनधास्त जा! इथे बाबांची आणि संकेतची मी व्यवस्थित काळजी घेईन." वैशाली म्हणाली.

" मी कशी जाणार? पुढच्या आठवड्यात परीक्षा आहेत. मी रजा कशी मागू? शिवाय संकेतची परीक्षा पुढच्या आठवड्यात सुरू होतेय. त्यापेक्षा आता थोड्या दिवसांसाठी तूच गावी जा. परिक्षा आटोपल्या की; मी येईन तिकडे! आई आता बरी आहे. फक्त तिच्या सोबतीला जायचंय! शिंदे कुटुंब आणि गावातले इतर लोकही फार चांगले आहेत. तुला सगळी मदत करतील." मालिनी अजीजीच्या स्वरात म्हणाली.

" हो आई! जाईन मी तिकडे! आजीची चांगली काळजी घेईन." वैशाली म्हणाली नाहीतरी ती वजनाच्या काट्यांनी केलेल्या कट्टीमुळे चांगलीच

नाराज झाली होती. या सगळ्यापासून दूर जायला मिळालं तर तिला हवंच होतं. आता स्पर्धेत भाग घ्यायचा की नाही, याविषयीही ती साशंक होती.

नाहीतरी नांदगावला जायला तिला खूप आवडत असे. तिच्या संजय मामाने शेतकीमध्ये इंजिनीअरिंग केलं होतं. वडिलोपार्जित शेतीवर तो अनेक प्रयोग करत होता. इतर शेतकरीही त्याच्याकडून शेतकीविषयी सल्ले घेत असत , त्यामुळे गावातील लोकांना त्याच्याविषयी खूप आदर होता.

वैशाली येणार, हे आईने फोन करून कळवले होते, त्यामुळे शिंदे काका स्टॉपवर उतरून घेण्यासाठी आले होते. सामान घेण्यासाठी एक गडी बरोबर घेउन आले होते.

"कसा झाला प्रवास? काही त्रास झाला नाही ना?" त्याने आस्थेने विचारले.

" नाही काका! पण आता आजी कशी आहे?" वैशालीने विचारले.

" त्या बर्‍या आहेत. पण तू आलीस ते बरंच झालं. काळजी घेणारा माणूस घरात असलं तर लवकर हिंडायला फिरायला लागतील." शिंदे म्हणाले.

" इथे रिक्षा कुठे दिसत नाही. आईने खूप सामान पाठवलंय." वैशालीने इकडे -तिकडे पहात विचारलं

" छे ! इथे कुठली आलीय रिक्षा? संपूर्ण गावात एकच रिक्षावाला आहे, आणि तो आताच कोणाला तरी घेऊन गेला. आपल्याला चालतच जावं लागेल. काळजी करू नको. मी सामान घ्यायला सदाला घेऊन आलोय." शिंदे काका म्हणाले.

नेहमी ती येई, तेव्हा मामा काहीतरी व्यवस्था करत असे त्यामुळे वैशालीला हे सर्व माहीत नव्हते.

" किती चालावं लागेल?" वैशालीने विचारलं.

"आपलं घर इथून अर्ध्या तासावर आहे. फार लांब नाही!" शिंदे काका अगदी सहज म्हणाले.

***

मुंबई ते नांदगाव चॊदा तासांचा प्रवास करून आलेल्या वैशालीसाठी अर्धा तास काय? दहा मिनिटेसुद्धा चालणे कठीण होते. कसेबसे

तिने घर गाठले. तिला पाहून आजीच्या चेहऱ्यावर समाधान आले. तिच्या केसांवर हात फिरवत ती म्हणाली,

" खूप लांबचा प्रवास एकटीने केलायस. खूप दमली असशील. आंघोळ करून घे. आणि जेवून थोडा वेळ आराम कर. माझी काळजी करू नको.

मी आता ठीक आहे. शेजारच्या पाटलांच्या वासंतीने तुझ्यासाठी जेवण आणून ठेवलंय. आणि उद्यापासून तिला इथेच जेवण बनवायला बोलावलंय. "

"कशाला आजी? मला स्वयंपाक करता येतो. आणि थोडं मी तुझ्याकडून शिकले असते." वैशाली म्हणाली.

"पण इथला चुलीवरचा आणि स्टोव्हवरचा स्वयंपाक तुला जमला नसता. तुला उगाच त्रास झाला असता, म्हणून तिला सांगितलं. एरव्ही पण ती तुझ्या मामीला मदत करायला नेहमीच येते!" आजी म्हणाली

अर्धा तास चालून वैशालीच्या पोटात कावळे ओरडू लागले होते. आंघोळ करून तिने जेवून

घेतले. ज्वारीची भाकरी, झुणका आणि आमटी- भाताचं साधं जेवण तिला अमृतासारखे वाटलं.

आजीला मऊ भात खाऊ घालून तिच्याशी थोड्या गप्पा मारून तिला औषध देऊन नंतर

तिने थोडा वेळ विश्रांती घेतली. ती उठली तेव्हा

तिचा थकवा बहुतांशी निघून गेला होता. रात्री डॉक्टर आले. आजीला तपासल्यावर ते म्हणाले,

" यांचा ताप आता पूर्णपणे उतरलाय. पण

त्या आजारपणामुळे खूप अशक्त झाल्यायत. तू इथे आलीस, ते फार बरं झालं. त्यांना औषधं वेळेवर दे, हलका आहार दे. थोडावेळ बाहेर मोकळ्या हवेवर आता त्या बसल्या तरी हरकत

नाही. दहा- बारा दिवस तुला थांबावं लागेल. तोपर्यंत तुझे मामा - मामी येतीलच! त्यांना कळलं तर ते ट्रिप अर्धवट ठेवून येतील म्हणून त्यांचा फोन आला , तरी त्यांना काही सांगायचं

नाही असं यांनी शेजारीसुद्धा सगळ्यांना निक्षून सांगितलंय. "

" त्याचा फोन आला तरी मीही काही नाही सांगणार त्याला! सुट्टीत इथे राहायला आलेय असं सांगेन." वैशाली म्हणाली. डॉक्टर संजय मामाचे शाळामित्र असल्यामुळे ते त्याच्या बाजूने विचार करत होते, हेसुद्धा स्वाभाविक होते.

***

रात्री शिंदे काकांची नात अपर्णा वॆशालीला भेटायला आली. घरात टीव्ही होता, पण त्यापेक्षा अंगणात बसून, झुळझुळणारा वारा अंगावर घेत, चंद्र- चांदणे पहात, हवेच्या तालावर बदलणारी झाडांच्या सावल्यांची नक्षी निरखत, मैत्रिणीबरोबर गुजगोष्टी करणे वैशालीने अधिक पसंत केले. खूप वेळ त्या दोघी अंगणात बसल्या होत्या. निघताना अपर्णाने विचारले,

" तू उद्या सकाळी माझ्याबरोबर दूध आणायला टेकडी पलीकडच्या शेलारांकडे येशील का? संजय मामा ट्रिपला गेल्यापासून आमच्याबरोबरच आजीसाठी दूध सुद्धा मीच घेऊन येते. पण आता

तू आहेस तर आपण दोघी मिळून जाऊ. सकाळी हिरव्यागार झाडांमधून, आणि दवाने भिजलेल्या गवतावरून चालण्याची मजा काही वेगळीच असते. तुला खूप आवडेल."

खरं म्हणजे, दूध आणायला सकाळी उठून एवढ्या लांब जायचं वैशालीच्या जिवावर आलं होतं. मुंबईत दरवाज्यात आणलेलं दुध घेण्यासाठी उठायलासुद्धा कुणी तयार नसे. ते काम कायम आई करत असे. आणि इथे एवढ्या लांब जायचं? पण अपर्णाचं मन तिला मोडवेना.

" किती वाजता जायचं?" तिने विचारलं.

"ठरावीक वेळ नाही; चांगलं उजाडलं की जाऊया!" अपर्णा म्हणाली.

अपर्णा म्हणाली, ते खरंच होतं. शेलारांचं घर तसं लांब होतं, पण निसर्गाने वैशालीच्या मनावर इतकी मोहिनी घातली की, चालण्याचा त्रास ती विसरून गेली. पक्षांचं संगीत ऐकत, गर्द झाडीतून डोकावणारी कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत एवढं अंतर कधी पार झालं हे जाणवलंसुद्धा नाही. टेकडीच्या चढ-उतारावर मात्र ती धापा टाकत होती. एक-दोन वेळा तिला बसावंही लागलं. मुंबईची पाहुणी बघून शेलार आजोबा म्हणाले,

" तू एवढ्या लांब येत जाऊ नको. मी कोणाला

तरी दू्ध घेऊन घरी पाठवत जाईन. घरी आजी एकटी असेल नं ? कशी आहे आता?"

"आजी बरी आहे आता! वासंती मावशी सकाळी येतात . त्या आहेत तिच्याबरोबर! मीच

रोज सकाळी येत जाईन. " वैशाली घाईघाईत म्हणाली. या निमित्ताने सूर्योदयाच्या वेळी निसर्गाच्या सानिध्यात येण्याची संधी ती थोडीच सोडणार होती?

घरी परत जाताना तिच्या मनाला नाही; पण शरीराला थकवा आला होता. " हुश्श! दमले आता! इकडे कुठे कोल्ड ड्रिंक मिळेल का ग?"

तिने अपर्णाला विचारलं.

"हो! रस्त्याच्या कडेला एक चहाची टपरी आहे. तिथे कोल्ड - ड्रिंक मिळतं, पण गावातले लोक क्वचितच घेतात. त्याचा जास्त खप येणा-या जाणा-या वाहनांमधून प्रवास करणा-या लोकांमुळे होतो. इथल्या लोकांना ताक, कोकम सरबत, या दिवसांमधे कैरीचं पन्हं आणि अगदीच काही नसेल , तर गुळाचा खडा आणि पाणी यांचीच जास्त सवय आहे. थोडा वेळ आमच्या घरी चल. आईने कालच कैरीचं पन्हं केलय. बघ तुला आवडतं का?" अपर्णाने तिला आपल्या घरी घेऊन जायची संधी सोडली नाही.

पन्हं पिताना वैशालीच्या मनात आलं,

" निसर्गाने मुक्त. हस्ताने दिलेल्या फळा-फुलांनी समृद्ध असणा-या भारतीयांना केमिकल्सपासून तयार केलेली कोल्ड - ड्रिंक्स प्यायची संवय लावणा-या जाहिरातींचं कॊतुक करावं? की जाहिरातींना भुलणा-या लोकांची कींव करावी?

***

दुपारी जेवून वैशाली अंगणात बसली होती. शिंदे काकी उन्हात फिरणाऱ्या कोंबड्यांना खुराड्यात सोडत होत्या. पण त्यातली एक कोंबडी काही केल्या त्यांच्या हाताला लागत नव्हती. तिच्या मागून धावणेही त्यांना जमत नव्हते. वैशाली त्यांना मदत करायला सरसावली. कोंबडीला पकडायला तिच्या मागून धावू लागली. बराच वेळ पकडापकडी खेळायला लावून मगच ती कोंबडी वैशालीच्या हाती लागली.

"अगदी काव आणलाय हिनं! माझ्यासाठी ही रोजची कसरत झालीय." शिंदे काकू वैतागून म्हणाल्या.

" उद्यापासून तुम्हाला मी मदत करेन." वैशाली म्हणाली. हा पकडापकडीचा खेळ

तिने खूप एन्जॉय केला होता.

संध्याकाळी अपर्णा आली." मी काही सामान आणायला किसनच्या दुकानात जातेय. तू पण चल माझ्याबरोबर! थोडं चालणं होईल, आमचं गावही पाहशील, आणि तुला काही आणायचं असेल, तर तेही घेऊन येऊ." ती वैशालीला म्हणाली.

" आजीला सोडून मी कशी बाहेर येऊ? आज तरी नको. नंतर पाहू कधीतरी! आजीला थोडं बरं वाटू दे!" वैशाली म्हणाली.

" तू माझी काळजी करू नको. मी तशी बरी आहे आता! स्वयंपाक घरात आणि फ्रिज मध्ये काय आहे-नाही ते बघ आणि घेऊन ये." आजी लगेच म्हणाली. वैशालीने आपल्यासाठी घरात बसून राहावं हे तिला कसं आवडेल? ती पुढे म्हणाली,

" जाताना मला बाहेरच्या पलंगावर नेऊन बसव. म्हणजे मला काही लागलं तर मी शेजारी हाक मारीन थोड्या वेळाने जेवण बनवायला वासंतीही येईल. काळजी करू नकोस. सावकाश परत ये."

वैशालीने चहा बनवून आजीला आग्रहाने चहा- बिस्कीटे खायला लावली, तिला ऒषध देऊन ती अपर्णा बरोबर बाहेर पडली.

" गावात वाण्याचं एकच दुकान आहे. तेही गावच्या दुसऱ्या टोकाला. तिकडे जाऊन परत

येतो तेव्हा आपण सगळं गाव फिरून येतो. " अपर्णाने माहिती पुरवली.

" बापरे! सकाळी दूध आणतानाच धाप लागली होती. आणि आता परत? हे माहीत असतं तर आलेच नसते मी!" वैशाली मनात म्हणाली. पण तिने चेहऱ्यावर मात्र भीती दिसू दिली नाही.

" तू इतक्या लांब जाताता सायकल का नेत नाहीस ? " तिने अपर्णाला विचारले.

" हा खूप डोंगराळ भाग आहे. चढ - उतार खूप आहेत. जिथे सरळ रस्ता असेल, तिथे मी सायकल घेऊन जाते . इकडे जाताना ते शक्य नाही. आणि आपण आडवाटेने गेलो, तर दुकान फार लांब नाहीय. घाबरू नको."

दुकान तसं दूर होतं, पण अपर्णाने गप्पांमधे तिला असं काही गुंतवलं, की रस्ता कधी संपला, हे वैशालीला कळलंच नाही. दोघींनी दगड मारून झाडावरच्या कै-या पाडल्या. वाटेतल्या लहानशा तळ्याच्या काठावर थोडा वेळ बसल्या. जाळीतली करवंदे तोडून खाल्ली. या सगळ्या अपुर्वाईमधे वैशाली चालण्याचा त्रास विसरून गेली.

***

पुढच्या आठवड्यात हा दिनक्रम असाच राहिला. चार दिवस गेल्यावर वैशालीच्या लक्षात आले; चालताना धाप लागणे बंद झाले होते; चालण्याचा वेगही वाढला होता. इथल्या डोंगराळ भागांतील पायवाटांवर चढण्या-उतरण्याचा आता त्रास होत नव्हता. वैशालीला बघूनच आजीचा अर्धा आजार पळून गेला होता. ती चार दिवसातच घरातल्या घरात हिंडू-फिरू लागली. तिची प्रकृती उत्तम आहे ; असं डॉक्टर म्हणाले तेव्हा वैशालीला हायसं वाटलं. आईने दिलेली एक मोठी जबाबदारी तिने उत्तम रीतीने पार पाडली होती.

एके दिवशी तिची आजी तिला म्हणाली, " मालूचा फोन आला होता. तुझी डान्सची स्पर्धा आहे म्हणत होती. तुझी प्रॅक्टिस राहून गेली असेल नं? आता माझी प्रकृती उत्तम आहे. पुढच्या आठवड्यात संजयसुद्धा येईल. तुला मुंबईला जायचं असेल. तर शिंदेंना तुला बसमध्ये बसवून द्यायला सांगते. खूप गुणाची आहेस पोरी! माझ्यासाठी एवढ्या लांबून धावत आलीस. मला पण खूप लळा लागलाय तुझा! पण माझ्यामुळे तुझ्या हातून एवढी मोठी संधी जायला नको."

" तुझी स्पर्धा झाली, की मात्र परत ये हं! तेव्हा तुझे मामा-मामीसुद्धा असतील. आतासारखा त्रास होणार नाही." नातीला होणारे कष्ट आजीच्या नजरेतून सुटले नव्हते.

"नाही आजी! मामा येईपर्यंत मी इथेच रहाणार आहे. तुला एकटीला बरी सोडेन मी!" वैशालीनं ठामपणे आपला निर्णय सांगितला.

इथलं साधं सरळ आयुष्य, इथला निसर्ग आणि इथली माणसं वैशालीला आवडायला लागली होती. मुंबईत आईबाबा कामावर गेले आणि संकेत शाळेत गेला, की ती फ्लॅटमध्ये दिवसभर एकटीलाच रहावं लागणार. होतं. त्यापेक्षा इथे मोकळ्या वातावरणात ती रमून गेली होती. स्पर्धा जिंकण्याचा विचार तिने मनातून काढून टाकला होता; त्यामुळे वजनाचे काटे तिला आता स्वप्नात येऊन वाकुल्या दाखवत नव्हते. मन शांत झालं होतं.

***

पुढच्या आठवड्यात अपर्णाच्या शाळेतल्या मैत्रिणींचा वनभोजनाचा कार्यक्रम ठरला होता. ती वैशालीलाही बरोबर घेऊन गेली. सगळ्या मैत्रिणी घरून आणलेले पदार्थ एकत्र करून जेवल्या, पकडापकडी, लंगडी, लगो-या,आंधळी कोशिंबीर खेळल्या, गाण्यांच्या भेंड्या लावल्या. ह्या सर्व खेळांविषयी वैशालीने फक्त ऐकले होते. तिने ते खूप एन्जॉय केले. हा अनुभव दिल्याबद्दल घरी जाताना तिने अपर्णाचे मनापासून आभार मानले.

मामा आल्यावर तर भाचीच्या कौतुकाला सीमा नव्हती. तो तिला बागेत घेऊन गेला. वेगवेगळ्या झाडांवर केलेले प्रयोग दाखवले. तंबूमध्ये दाखवलं जाणारं एक नाटकही तिने मामा - मामीबरोबर बघितलं.

***

वैशालीला कोकणात येऊन आता तिसरा आठवडा चालू झाला होता. एक दिवस मालिनीचा तिला फोन आला. " तुझ्या प्रिंसिपॉलनी तुला भेटायला बोलावलंय. तुझ्या एका मैत्रिणीबरोबर त्यांनी निरोप पाठवला आणि घरी फोनही केला. म्हणजे महत्वाचं काही असणार. आता संजयही परत आलाय! तू मुंबईला आलीस तर बरं होईल." या अल्टिमेटम् नंतर, मुंबईला परतण्याशिवाय वैशालीकडे दुसरा पर्याय नव्हता.

मामा त्याच्या गाडीने तिला मुंबईला सोडणार होता. पण वैशाली म्हणाली, "तू आताच एवढ्या लांबून आलायस. अपर्णाची एक मैत्रिण तिच्या काकांकडे मुंबईला चाललीय, तिच्या सोबतीने जाईन मी! येताना एकटीच तर आले मी! स्टँडवर बाबा येतीलच कार घेऊन. तू अजिबात काळजी करू नकोस. "

मामाने रेवतीसोबत तिला लक्झरीत बसवून दिले. दुस-या दिवशी ती घरी पोहोचली. तिच्याकडे बघून मालिनी आश्चर्याने म्हणाली, "अग वैशू किती बारीक झालीस तू? तिकडे नीट जेवत होतीस नं?"

"इथल्यापेक्षा जास्त जेवत होते आई! आंबे फणस सगळ्याची रेलचेल होती. मी खूप दिवसांनी दिसतेय म्हणून तुला असं वाटत असेल." वैशाली तिला थांबवत म्हणाली.

तरीही आई असं का म्हणताय, हे पाहण्यासाठी वैशाली आरशासमोर जाऊन उभी राहिली. आणि तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. "ही मीच आहे का?" तिने स्वतःला विचारलं. जिमला जाऊन जे साध्य झालं नव्हतं ते कोकणातल्या भूमीने करून दाखवलं होतं. "तरीच गेले काही दिवस मला ड्रेस ढगळ होत होते. कामाच्या गडबडीमुळे माझ्या लक्षात आलं नाही. आता मला स्पर्धेत जिंकण्यापासून कोणी रोखू शकणार नाही." ती स्वतःशी म्हणाली.

दुसऱ्या दिवशी ती प्रिंसिपॉलना भेटायला गेली. जाताना तिची मैत्रीण प्रिया म्हणाली," किती गोड दिसतेस ! तू बारीक तर झालीयस, पण गाल गुलाबी - गोबरे झालेत. चेहराही तेजस्वी दिसतोय. तू नक्की कोकणात आजीकडे गेली होतीस, की काश्मीरला जाऊन आलीस?"

प्रियाने उत्तरादाखल तिच्या पाठीत हसत हसत एक धपाटा मारला.

प्रिन्सिपलनी डान्सचा स्पर्धेचा फॉर्म भरायला तिला बोलावलं होतं. त्यांनाही बोलल्याशिवाय रहावलं नाही.

" तू माझं म्हणणं खूपच मनावर घेतलेलं दिसतंय. छान दिसतेयस. उत्तम परफॉर्मन्स दे, आणि कॉलेजचं नाव मोठं कर.रिझल्ट नंतर तुझं कॉलेज बहुतेक बदलेल, पण तोपर्यंत तू आमचीच विद्यार्थिनी आहेस. तुला कमर्शियल आर्ट करायचं आहे , त्यासाठीही माझ्या शुभेच्छा." त्यांना नमस्कार करून वैशाली बाहेर पडली. रिझल्टचा विचार ती एवढ्यात करणार नव्हती.

स्वप्नांना पंख फुटले होते. प्रॅक्टिसला अजून आठ दिवस होते. "मी नक्कीच करून दाखवेन!" ती मनाशी म्हणाली. ती घरी गेली तेव्हा बाबांनी सगळ्यांसाठी केक आणि आईस्क्रीम आणलं होतं. ते पाहिलं, आणि तिच्या नजरेसमोर पूर्वीची वजनदार वैशाली उभी राहिली.

" मला हे सर्व नको आहे. मी लस्सी करून पिते. स्पर्धेसाठी मला स्वतःला फिट ठेवावं लागेल." ती म्हणाली, आणि सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिले. केक आणि आइसक्रीम दोन्ही तिच्या किती आवडीचे होते हे सगळ्यांनाच माहीत होतं.

***

डान्सची स्पर्धा उत्तम पार पडली. आणि वैशाली पहिल्या बक्षिसाची मानकरी ठरली. सगळ्यांनीच तिची खूप तारीफ केली. दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपॉल मॅडमचा फोन आला. त्या म्हणाल्या,

" कालच्या कार्यक्रमात ज्या प्रमुख पाहुण्यांना बक्षिस वितरणासाठी बोलावलं होतं ते, ' एन्. श्रीनिवास'जी सिनेइंडस्ट्रीतील मोठे निर्माते आहेत, हे तुला माहीत असेलच. त्यांना त्यांच्या पुढील सिनेमासाठी , नृत्यपारंगत असणारी, निरागस दिसणारी , थोडी बालिश वाटणारी नवीन हीरॉइन हवी आहे. माझे दूरचे नातेवाईक लागतात ते! त्यांनी काल रात्री मला फोन करून तुझ्याविषयी माहिती विचारून घेतली. तू त्यांना त्या मुलीच्या भूमिकेसाठी अगदी योग्य वाटतेयस. सिनेमाचं शूटिंग लगेच चालू होणार आहे. फार चांगला माणूस आहे तो ! तुझ्या कॉलेजच्या वेळाही शक्य तितक्या सांभाळून घेतील. पण ही ऑफर स्वीकारायची की नाही हे तू ठरव! मला आज संध्याकाळपर्यंत फोन करून सांग, म्हणजे त्यांना तुमच्या घरी घेऊन येईन."

" मॅडम! खूप आभारी आहे मी तुमची! मी ही ऑफर स्वीकारली आहे असं समजा. संध्याकाळी आई - बाबा आले , की त्यांच्या कानावर हे घालते. आणि नंतर तुम्हाला मी फोन करते. उद्या रविवार आहे . आई-बाबा घरी आहेत. उद्या आपण नक्की करू."

मॅडमचे परत एकदा आभार मानून वैशालीने फोन खाली ठेवला, आणि मनोमन कोकणच्या भूमीला नमस्कार केला. त्या भूमीने आणि तिथल्या जीवनशैलीने तिला तिचं ध्येय मिळवून दिलं होतं.

***

अमिता साळवी.