शाओमी : अॅप्पल ऑफ चायना

Xiaomi (शाओमी) : अॅप्पल ऑफ चायना

श्याओमी म्हणजे बाजरी, किंवा तांदळा सारखे धान्य आहे जे जगातील विविध भागांमध्ये आहाराचा मुख्य भाग आहे. हा मंडारीन भाषेतील शब्द आहे. बुद्धिस्ट संकल्पनेनुसार 'Xia' हा भाग म्हणजे तांदळाचा एक दाणा जो पर्वतासमान आहे. हा शब्द एका छोट्याशा नुकत्याच सुरू होणाऱ्या कंपनीसाठी चपखल बसतो कारण उत्तम दर्जाचे उत्पादन करण्यास सतत प्रयत्नशील अशी ही कंपनी ग्राहकांची नाविन्याची अपेक्षा पूर्ण करताना सध्या दिसून येत आहे जसे तांदळाचा एक दाणा देखील भुकेल्याची भूक भागवू शकतो. तसेच शाओमी नव्या संकल्पना बाजारात आणित आहे. आज शाओमी या मोबाईल कंपनीने फारच कमी कालावधीत अत्युच्च जागतिक यश प्राप्त केले आहे हे आपण सारेच जाणतो. ही चायनीज कंपनी 'अॅप्पल ऑफ चायना' या नावाने प्रचलित आहे. चायनीज कंपनी असूनदेखील भारतात या कंपनीने चांगलेच जाळे पसरविले आहे. आपल्या येथील तरुण व होतकरू पिढीला नोकरी मिळवून देण्यास ही कंपनी सक्रिय आहे. नवीन विचारांचे स्वागत व तरुणाईच्या मतांचा येथे गांभीर्याने विचार केला जातो. म्हणूनच शाओमीच्या मोबाईल्स मध्ये नितनवे फीचर्स पहायला मिळतात. तेही कमी दरात. गिऱ्हाईकांच्या गरजा एखाद्या देशातील जास्तीत जास्त जनतेचे राहणीमान, त्यांच्या अपेक्षा याचा अभ्यास करून नव्या टेक्नॉलॉजीचा आधार घेत शाओमी आपले प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध करून देत आहे. या कंपनीच्या यशस्वी वाटचालीविषयी सांगताना एक नाव आवर्जून घ्यायला हवे ते म्हणजे लेई जून यांचे. लेई जून हे एक असे नाव आहे जे आपणास तसे फारसे ठाऊक नाहीय. पण आज ते जगातील सर्वात प्रसिद्ध तंत्रज्ञ उद्योजक (tech entrepreneur) आहेत. खरेतर, त्यांनी अनेक कंपन्या वाढवण्यास मदत केली आहे. त्यांच्या प्रयत्नांना मान्यता न देता शाओमीच्या यशस्वीततेची गाथा लिहिणे चुकीचे ठरेल. 1999, 2000 आणि 2002 मध्ये त्यांनी टॉप 10 च्या आयटी आकडेवारीमध्ये भर घातली. सेंट्रल चायना टेलिव्हिजनने त्यांना 2012 च्या टॉप 10 बिझनेस लीडर्सपैकी एक म्हणून निवडले. फॉर्च्युन ब्रँडने आशियातील सर्वात शक्तिशाली व्यावसायिक असे लेई जून यांना संबोधले. जून हे शाओमी इन्कॉर्पोरेशनचे संस्थापक आहेत, जे पृथ्वीवरील चौथ्या क्रमांकाचा स्मार्टफोन मेकर म्हणून ओळखले जातात. त्यांची मालमत्ता साधारण 84 अब्ज डॉलर आहे. ते केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शाओमीचे अध्यक्षच नव्हे तर त्याही पलीकडे अशी त्यांची कंपनीच्या बाबतीत भूमिका आहे. त्यांना "चीनचे स्टीव्ह जॉब्स" म्हणून देखील ओळखले जाते. आज त्यांची कंपनी शाओमी 45 बिलियन डॉलर्स एवढी आहे. केवळ दहा वर्षांच्या कालावधीत या कंपनीने ग्राहकांची विश्वासार्हता संपूर्ण जगभरातून मिळविली आहे तेही उच्च दर्जा व उच्च पॉवर स्मार्टफोन्ससाठी. एवढ्या कमी कालावधीत जागतिक स्तरावर सर्वात विश्वासार्ह ब्रॅन्ड बनणे तसे सोपे नाही. परंतु कंपनीला यशस्वी करण्याचे नेतृत्व लिन बिन व लेई जून यांच्या अथक प्रयत्नाने शक्य झाले असे म्हणणे येथे उचित ठरेल.

लेई जून यांचा जन्म 16 डिसेंबर 1969 रोजी शांताओ, हुबेई, चायना येथे झाला. कैक यशस्वी व्यक्तींचे उज्वल भविष्य जसे संघर्षमयी बालपणापासूनच सुरू झालेले असते तशीच लेई जून यांची सुरुवात बालपणातील तडजोडीतून झाली. शाळेत जाण्याआधी मध्य चायनातील तणावग्रस्त वुहान येथील एका गजबजलेल्या औद्योगिक क्षेत्राजवळील वसाहतीत जून यांचे बालपण गेले. आता एक टेक तज्ज्ञ म्हणून नावारूपाला आलेले लेई जून यांनी त्यावेळी म्येयांग मिडल स्कूलमध्ये जाण्यास सुरुवात केली, जेथे ते 1987 मध्ये पदवी शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाले. मिडल स्कुल सुटल्यानंतरच्या थोड्याच काळात जून यांनी एक कम्प्युटर सायन्स स्टुडंट म्हणून वुहान युनिव्हर्सिटीत पदार्पण केले. केवळ दोन वर्षांत 1991 साली याच युनिव्हर्सिटीतुन बी.ए. पूर्ण केले व कम्प्युटर सायन्समध्ये त्यांनी बॅचलर्स डिग्री मिळवली. विशेषतः त्याकाळात लेई जून यांनी आपला बराच वेळ अॅप्पल कंपनीचे जनक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांची पुस्तके वाचण्यात घालविला. या आशेवर की एक ना एक दिवस आपण देखील त्यांच्या सारखे यश प्राप्त करू शकू. खरेतर कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांनी आपली पहिली कंपनी सुरू केली होती. परंतु, याच काळात ते स्वतःला पटवून देत राहिले की, जागतिक स्तरावरील व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान आणि समज आपल्याला महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानेच मिळणार आहे. वुहान युनिव्हर्सिटीतुन पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर लेई जून यांचे एकच ध्येय होते की, आपण जे शिक्षण घेतले आहे त्याला साजेशी नोकरी मिळवणे. त्यानुसार लेई यांनी चीनमधील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या किंगसॉफ्ट येथे 1992 सालामध्ये इंजिनिअर म्हणून प्रथमतः काम करायला सुरुवात केली. नंतर 1998 मध्ये याच कंपनीचे ते सीईओ झाले. किंगसॉफ्ट मध्ये काम करीत असताना 'नोकिया' तसेच 'मोटोरोला' सारख्या दिग्गज फोन मेकिंग कंपन्यांसाठी त्यांनी काम केले हा अनुभव त्यांना स्वतःच्या स्मार्टफोन कंपनीसाठी उपयोगी सिद्ध झाला. किंगसॉफ्ट मध्ये सात वर्षें काम केल्यानंतर लेई जून कंपनीचे अध्यक्ष व सीईओ झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि किंगसॉफ्टचे अध्यक्ष म्हणून कारकीर्दीत असताना लेई जून यांनी 2000 सालाच्या सुमारास आपल्या मार्गावरून थोडेसे हटके अशी एका ऑनलाइन बुकस्टोअरची सुरुवात केली. स्टोअरची मागणी ही प्रचंड होती. त्यामुळे त्याला लगेचच यश मिळाले. 2004 साली वेब दुनियेतील असंख्य चाहत्यांचा वर्ग या बुक स्टोअरला लाभला. याच दरम्यान अॅमॅझोनने या वेब स्टोअरमध्ये आपली रुची व्यक्त केली आणि 100 कोटी डॉलर्समध्ये जॉयो डॉट कॉम (joyo. com) विकत घेतली. जून केवळ किंगसॉफ्ट मध्ये कर्मचारी आणि सीईओ नव्हते तर ते गुंतवणूकदार देखील होते. त्यांनी Vancl.com, YY, and UCWeb सारख्या कित्येक कंपन्यांच्या यशस्वीततेसाठी गुंतवणूक केली आहे. किंगसॉफ्ट, YY.com आणि UCWeb Inc. या कंपन्यांचे ते चेअरमन आहेत. सत्तरहून अधिक अशा आपल्या पोर्टफोलिओ कंपन्यांसाठी त्यांनी निधी दिला आहे. 20 डिसेंबर 2007 साली त्यांनी किंगसॉफ्ट या कंपनीला आरोग्याच्या काही कारणांवरून सीईओ आणि प्रेसिडेंट (अध्यक्ष) या दोन्ही पदांचा राजीनामा दिला. व त्याऐवजी वाईस चेअरमन म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी घेणे बंद केले. खरेतर किंगसॉफ्ट मध्ये काम करताना मनासारखे समाधान मिळत नव्हते. राजीनाम्यानंतर ईकॉमर्स, सोशल नेटवर्किंग, मोबाईल इंडस्ट्रीज या सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे हेच त्यांचे ध्येय बनले.

6 एप्रिल 2010 सालात लेई जून यांनी आपल्या स्वप्नातील कंपनीची स्थापना केली, जीचं नाव होतं 'Xiaomi Inc.' पुढील टप्पा निधी गोळा करण्याचा होता. जो हाँग काँग अब्जाधीश चॅन, ज्याने मॉर्निंगसाइड व्हेंचर्सचा पाठिंबा असलेल्या हँग फूंग प्रॉपर्टीजवर नियंत्रण ठेवले होते, ते लेई जून यांचे नियमित गुंतवणूकदार होते. म्हणूनच लेईवर त्यांनी विश्वास कायम ठेवला. चॅनखेरीज, लेईला क्युमिंग, सेयुआन, आयडीजी कॅपिटल पार्टनर, इत्यादी उद्यम कंपन्यांचा पाठिंबा लाभला. आणि लिओ डे, हाँग फेंग, झोउ ग्वांग्गिंग, चुआन वांग, ली वानकियांग आणि कॉँग-कॅट वाँग या आठ सहकारींसह शाओमीची अधिकृतपणे 6 एप्रिल 2010 रोजी स्थापना झाली. पुढील तीन महिन्यांमध्ये अथक परिश्रमानंतर शाओमीने 'एमआययूआय' (MIUI) नावाची पहिली अँड्रॉइड-आधारित फर्मवेअर सुरू केली. सोप्या भाषेत सांगायचे तर, एक फर्मवेयर म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे जे अॅप्लिकेशन आणि ऑपरेटिंग सिस्टमच्या सिंक्रोनाइझेशनमध्ये सेलफोनची कार्ये नियंत्रित करते. हे Samsung फोनवर 'टचविझ' सारखे होते. त्यानंतर लवकरच, एक वर्षानंतर ऑगस्ट 2011 मध्ये, कंपनीने त्यांच्या पहिल्या स्मार्टफोनची घोषणा केली - 'शाओमी Mi1' हे स्मार्टफोन MIUI फर्मवेयर वापरून बनविले होते. आणि याच क्रमानुसार (series) पुढील आवृत्ती शाओमी Mi2 स्मार्टफोन होता. Mi2 हे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन S4 प्रो द्वारे समर्थित होते आणि हा फोन त्या पुढील वर्षी जाहीर करण्यात आला. आतापर्यंत, लेईने केवळ 1 अब्ज डॉलर्स किमतीच्या कंपन्यांना साथ दिली होती, आणि हा आकडा लक्षात घेता, त्याने विचार केला की शाओमी कंपनी जास्तीतजास्त 10 अब्ज डॉलर्सची असावी. पण लवकरच त्याचे हे मत चुकीचे ठरले. डीएसटीचे रशियन इन्व्हेस्टर युरी मिलनर यांनी जाहीरपणे सांगितले की, शाओमीमध्ये सहजपणे 100 अब्ज डॉलर्सची कंपनी बनण्याची क्षमता आहे. ही बाब लेई जून साठी धक्कादायक होती, यावरून त्याला हे देखील कळले की आपल्या हातून काहीतरी प्रचंड घडणार आहे. म्हणूनच, हे लक्षात ठेवून त्यांनी त्यानुसार पुढे जाण्याचा निर्णय घेतला! पहिल्या आवृत्तीच्या प्रचंड यशस्वीततेसह, MI2 स्मार्टफोन्स आणखी मोठ्या श्रेणीत विकले गेले, आणि वायरलेस फोन व्हेंडर मोबीसीटी च्या मदतीने कंपनीने वेस्टर्न मार्केटमध्येही प्रवेश केला - ज्यामध्ये अमेरिका, युरोप, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारखे देश होते. त्याच वर्षी 2013 मध्ये, कंपनीने आणखी एक मोठा बदल करून गुगलच्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी उत्पादन व्यवस्थापनाच्या उपाध्यक्ष पदासाठी ह्युगो बार्रा यांना नियुक्त केले. शाओमीने आपल्या उत्पादनांचा मेनलँड चायनाच्या बाहेरील देशांशी व्यवसायाची मुळे पसरविण्याचे कार्य या नव्या वाईस प्रेसिडेंटवर सोपविण्यासाठी त्यांना बोर्ड मेम्बर म्हणून शाओमीच्या परिवारात सामील केले. बाहेरच्या बाजारपेठेमध्ये कंपनीच्या सर्व उत्पादनांचे आणि ऑपरेशनचे व्यवस्थापन करण्यासाठी ते शाओमीच्या ग्लोबल डिव्हिजनचे प्रभारी झाले. कंपनी झपाट्याने विकसित होऊ लागली. नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केले गेले. त्यानंतर त्यांच्या फोन्सची नवीन आणि सुधारित 3 री आवृत्ती - MI3 फोनचे लॉन्च केले गेले. आणि नंतर, कंपनीने असेही घोषित केले की बीजिंगमधील आपल्या पहिल्या सर्व्हिस सेंटरची तयारी सुरू आहे. अशा प्रचंड विकासाने चीनमध्ये कमी काळात शाओमी लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी ठरली. लवकरच कंपनी त्या ठिकाणी पोहोचली होती जिथे जगभरात 30 दशलक्षपेक्षा जास्त MIUI वापरकर्ते होते! याव्यतिरिक्त, त्यांनी त्या वर्षी स्वतः 18.7 दशलक्षपेक्षा जास्त स्मार्टफोन्स विकले. त्यांची पोहोच आणि मागणी अशी होती की कंपनीने 2014 च्या पहिल्या सहामाहीत 26 दशलक्ष स्मार्टफोन्स विकले होते तेही केवळ 4 वर्षांच्या कालावधीत, 2014 च्या दुसऱया तिमाहीमध्ये शाओमी कंपनी आपल्या नवोपक्रमाने सॅमसंगवर मात करीत चीनचा अग्रगण्य स्मार्टफोन विक्रेता ब्रँड बनला होता. 9.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह लेई जून आता चीनमध्ये 8 वे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

2014 च्या मध्यरात्रीच्या सुमारास शाओमीने भारताच्या मोठ्या बाजारपेठेत प्रवेश केला. केवळ भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स साइटवर फ्लिपकार्टची साथ घेत आपले फोन्स भारतीय बाजारपेठेत आणले. भारतामध्ये त्यांचा प्रभाव असा होता, की ते पहिल्या 24 सेकंदातच विकले गेले. त्यांनी एकूण 40,000 स्मार्टफोन विकले. त्या वेळी, कंपनीने भारतामध्ये वेगाने विस्तार करण्याचा निर्णय घेतला आणि अखेरीस ऍमेझॉन डॉट कॉम आणि स्नॅपडील यासारख्या इतर ई-कॉमर्स साईटसोबत भागीदारी केली. आणि वर्षाच्या अखेरीस, $ 1.1 अब्ज फंडिंग सोबत शाओमी $ 46 बिलियन पेक्षा अधिक मूल्यांकनासह जगातील सर्वात मूल्यवान तंत्रज्ञान म्हणून सुरू झाले. (शाओमी इन्कॉर्पोरेशन) एक अशी टेक्नॉलॉजी कंपनी जी स्मार्टफोन्स, मोबाईल अॅप्स, टॅबलेट कम्प्यूटर्स, लॅपटॉप्स, एअर व वॉटर प्युरीफायर आणि इतर गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात आणू लागली. शाओमीचे स्वतःचे MIUI असे सॉफ्टवेअर आहे. शाओमीने आपला पहिला स्मार्टफोन ऑगस्ट 2011 मध्ये बाजारात आणला. कंपनीचे चीनमधील मार्केट शेअर्स दिवसेंदिवस वधारू लागले अगदी 2014 येईपर्यंत शाओमी चीन मधील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी म्हणून नावारूपाला आली. शाओमीचे कैक स्मार्टफोन्स आहेत जसे की, Mi Series, Mi Note Series, Mi Max Series, Mi Mix Series आणि Red Mi Series. मोस्ट इनोव्हेटिव्ह कंपनी म्हणून 2014 साली तिसरा क्रमांक तसेच एमआयटी टेक्नॉलॉजीच्या मतानुसार 2015 सालातील पन्नास स्मार्टफोन कंपन्यांमध्ये शाओमीने दुसरा क्रमांक पटकावला. फार कमी कालावधीत यशाच्या अत्युच्च शिखरावर शाओमीने जगभरात आपले नाव प्रस्थापित केले आहे. शाओमीची तुलना अॅप्पलशी साधर्म्य साधल्याने होत असली तरीही ती अॅमॅझोन व गुगल मधील काही घटक लक्षात घेता त्यांच्या तोडीशी मिळतीजुळती नक्कीच आहे. लेई जून यांनी शाओमीला भारतात आणले आणि येथील व्यावसायिक पातळीवर याचा निष्कर्ष पहाता भारताला नक्कीच फायदा झाला. भारतीय व्यवसाय क्षेत्रातील लोकप्रिय व प्रसिद्ध असणाऱ्या रतन टाटा यांनी शाओमी मध्ये केलेल्या गुंतवणुकीविषयी बोलताना लेई जून यांनी प्रेस समोर आपले वक्तव्य अशा शब्दांत मांडले की, "श्री. टाटा जगातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांच्यामार्फत केलेली गुंतवणूक ही आतापर्यंत भारतात केलेल्या योजनांची एक खात्री आहे, आम्ही अधिक उत्पादने भारतामध्ये आणण्याच्या दृष्टीने पाहत आहोत. आम्ही अनेक गुंतवणूकदारां विषयी माहिती मिळविली, त्यांची रुची कशात आहे कशात नाही. अनेक सह-गुंतवणूकदारांना समान संधी उपलब्ध करून देऊन आम्ही अशा गुंतवणूकदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली. त्यामुळे शाओमी मध्ये गुंतवणूक करताना सर्वांनाच सोपे झाले."

स्मार्टफोन्स वापरणाऱ्या बऱ्याच तरुण मंडळींना आपला परफेक्ट स्मार्टफोन कसा असावा याची कल्पना असते. पण त्यापैकी कैकजण तसे करू शकत नाहीत कारण मोबाईल फोन बनविणे काही सोपे काम नाही. त्यामुळेच अशा ग्राहकांकडून कंपनी फीडबॅक घेते जेथे ग्राहक शाओमीच्या पुढील मॉडेल मध्ये प्रकर्षाने कोणते फीचर्स कोणती वैशिष्ट्ये असावीत याबाबत घेतलेला ग्राहकांचा अभिप्राय येणाऱ्या नव्या स्मार्टफोन च्या मॉडेलमध्ये कोणते बदल करावे लागतील याचा सखोल अभ्यास केवळ ग्राहकांनी सुचविल्यानुसार कंपनी करत आली आहे. जर आपल्या नव्या मॉडेल मध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन बदल घडविला गेला तर ते आनंदाने आपल्या आप्तस्वकीयांना आपल्या मित्रमंडळींना सांगतात व अशाच पद्धतीने कंपनीने आज ग्राहकांची ना केवळ मने जिंकली आहेत तर त्यांचा विश्वासही प्राप्त करण्यात यश संपादन केले आहे. शाओमीने हे जाणले आहे की, आपण योग्य दिशेने ग्राहकांना हवे ते देत गेलो तर केवळ ऑनलाईनच्या माध्यमातून बऱ्याच स्मार्टफोन्सची विक्री आपण करू शकतो आणि तेही मोठ्या प्रमाणावर घडू शकते. आज 130 दशलक्ष चायनीज नागरिक शाओमी फोन्स वापरतात. तिथली लोकसंख्या पाहता 10℅ लोक शाओमी वापरत आहेत. यापैकी जवळपास सारेच तरुण आहेत. त्यामुळे साधारण 20 ते 25% लोकसंख्येवर शाओमीने आपला प्रभाव टाकला आहे. ते टीव्ही पाहतात, संगीत ऐकतात, पुस्तके, बातम्या वाचतात शाओमी या सर्व गरजा आपल्या फोनद्वारे ग्राहकांना प्रदान करते. असे असले तरी यागोष्टी काही शाओमीला प्रचंड सामग्री चॅनेल बनवित नाही? शाओमीचे वापरकर्ते दिवसातून 115 वेळा फोन वापरतात आणि ते त्यांच्या फोनवर चार साडे चार तास व्यतीत करतात. कल्पना करा की, केवढेमोठे शक्तिशाली प्रसारक मंच शाओमीजवळ आहे. आणि यात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. शाओमी नाविन्यावर आपला पूर्ण भर देत आहे. वेगवेगळ्या परिस्थितीसाठी वेगवेगळ्या ग्राहकांसाठी नितनव्या फोन्सची रचना शाओमी करीत आहे. कारण प्रत्येकाची आपली अशी स्वतंत्र गरज असते. शाओमीकडून सतत अपेक्षा वाढत आहेत आणि त्यावर कंपनी स्वतःला सक्षम करीत हा पुरावाही देत आहे. गेल्या काही वर्षांत एक लहान चिनी स्टार्ट-अप स्मार्टफोन कंपनी म्हणून उदयास आलेली शाओमीचा 'अॅप्पल कॉपीकॅट' असा गवगवा झाला असला तरी आज चायनातील सर्वात मोठा इंटरनेट प्लॅटफॉर्म तसेच हार्डवेअर उत्पादक म्हणून शाओमीचे नाव जागतिक पातळीवर घेतले जाते. कंपनी दिवसेंदिवस यशाच्या साऱ्या मर्यादा ओलांडून पुढे जात असली तरीही अजून किमान पाच वर्षे तरी शाओमी आय पी ओ (Initial Public Offer) साठी विचार करणार नाहीय असे लेई जून यांनी प्रसार माध्यमांना स्पष्टपणे सांगितले आहे. आता हे आय पी ओ (IPO) म्हणजे काय? ते आधी पाहू... IPO म्हणजेच Initial public offering सोप्या मराठी भाषेत सांगायचे झाल्यास एक असा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव एक अशी प्रक्रिया आहे जीच्याद्वारे एक खाजगी कंपनी आपल्या शेअर्सची विक्री सामान्य जनतेला सार्वजनिक पद्धतीने करू शकते. ही एक नवी किंवा जुनी कंपनी देखील असू शकते. जी एका एक्स्चेंज मध्ये सुचिबद्ध होण्याचा निर्णय करते आणि याद्वारे ती कंपनी सार्वजनिक होऊन जाते. ईथे कोणत्याही कंपनीचे सार्वजनिक किंवा पब्लिकली होण्याचा अर्थ आहे की, आता या कंपनीचे शेअर्स सामान्य जनतेसाठी खुले केले जाऊ शकतात आणि लोक ते शेअर्स शेअर बाजारात खरेदी किंवा विक्री करू शकतात. अशा या IPO प्रक्रियेसाठी शाओमी अजून तयार नाही याचे कारण कंपनीचे कर्ताधरता लेई जून अजून पाच सार्वजनिक कंपन्यांच्या भागधारकांना नियंत्रणात ठेवतात. आणि सार्वजनिक होण्याचे फायदे - तोटे ते समजून घेत आहेत. त्यामुळे शाओमीला सार्वजनिक होण्यासाठी अजून किमान पाच वर्षे तरी द्यावी लागतील. तसेच अशा उच्च बिंदूपर्यंत पोहचल्यानंतर लेई आयपीओ लाँच करण्यासाठी खूपच हिचकत होते कारण त्यांना विश्वास होता की, नक्कीच आयपीओ हे शाओमी कंपनीला 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवेल,आणि प्रत्येकजण समृद्ध होईल, त्यांचे शेअर्स विकेल आणि भरपूर पैसे कमावेल, पण आयपीओ लाँच केल्याने कंपनी व्यवस्थापन करणे तितकेच अवघड बनते. ते कोण करेल? म्हणूनच ते तसे करण्यास 5 वर्षे प्रतीक्षा करू इच्छित होते. या विचारांच्या जोडीला त्यांनी आणखी एक ध्येय जोडले होते. पुढील पाच ते दहा वर्षांत कंपनीने स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये जागतिक पातळीवर आघाडी बनविण्याचा निर्णय घेतला. जे कंपनीच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून हितावह असेल. जागतिक अर्थव्यवस्था ढासळली नसती तर शाओमीने या आधीच यशाचे शिखर गाठले असते. केवळ 33% वर समाधान मानावे लागले नसते. पण असे असले तरीही कंपनीचा उदय होऊन केवळ पाचच वर्षे झाली आहेत हे विसरून कसे चालेल? या अल्पावधीतच स्मार्टफोन्स बनविण्यासाठी शाओमीने चौथ्या क्रमांकावर येऊन जागतिक सन्मान प्राप्त केला आहे. सध्या, 13.3 अब्ज डॉलर्सच्या अंदाजानुसार, लेई जून 45 बिलियन डॉलर मूल्यांकनाच्या कंपनीचे सीईओ आणि चेअरमन म्हणून काम करत आहेत आणि अनेक जागतिक बदल व परिवर्तनीय कंपन्या बनविल्यानंतर लेई जून यांना चीनचे 'स्टीव्ह जॉब्स' म्हणून संबोधले जाते. तसेच चीनमध्ये शाओमीच्या सह- स्थापनेत लेई जून यांना सोबत झाली ती लिन बिन यांची. जे गूगल मध्ये 2006 ते 2010 सालापर्यंत क्रिएशन ऑफ द गुगल चायना मोबाईल सर्च इंजिन तसेच त्याच्या मॅनेजमेंटची जबाबदारी सांभाळत होते. आज सॅमसंग आणि अॅप्पलच्या तुलनेत तेवढ्याच उत्तम तंत्र प्रणालीचा वापर करून शाओमी फोन्सनी जगातील सर्व ग्राहकांची पहिली पसंती मिळविली आहे. तेही स्वस्त किंमतीत दर्जेदार फोन्स देण्याच्या शाओमीच्या धोरणामुळे.

ज्या वुहान युनिव्हर्सिटी मधून लेई जून यांनी कम्प्युटर सायन्सची पदवी प्राप्त केली त्याच युनिव्हर्सिटीत आज ते बोर्ड मेम्बर आहेत. शाओमीची स्थापन केल्यानंतर केवळ तीन वर्षांत चीनमधील चौथ्या क्रमांकाची सर्वमान्य ब्रँड म्हणून शाओमी चा असा एक चाहता वर्ग तयार झाला. लोकप्रिय अँड्रॉइड कस्टम रॉम विकसित करून लेई जून यांनी सॉफ्टवेअर मार्केट वर यशस्वीरित्या वर्चस्व गाजविले आहे. शिवाय आपले फोन्स विकण्याकरिता कंपनी एक अद्वितीय धोरण वापरते जे बाजारात विक्रीच्या प्रवृत्तीच्या मानाने अगदी विरोधाभासाचे ठरते. फोनच्या गुणवत्ता आणि कामगिरीशी तडजोड न करता फोन्सचा विक्री दर जवळपास त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग इतकाच असतो. आणि या अरुंद मार्गाने नफा मिळविण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ मॉडेल विकणाऱ्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांव्यतिरिक्त, कंपनी 18 महिन्यांपर्यंत त्यांचे मॉडेल विकते. त्या व्यतिरिक्त, त्यांचे फोन संबंधित परिधीय साधने,(accessories), स्मार्ट होम गॅझेट, अॅप्स, ऑनलाइन व्हिडिओ, थीम्स इत्यादीमुळेही त्यांच्या व्यवसायात वाढ होतेच. ग्राहकांच्या खर्चात आणखी कमी करण्यासाठी, शाओमी आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी केवळ ऑनलाइन माध्यम वापरते त्यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसारखी एकाच भौतिक स्टोअरच्या मालकीवर कंपनी अवलंबून रहात नाही. एवढेच नाही तर, त्याच्या स्टॉकवर कठोर नियंत्रण ठेवण्याकरिता, शाओमी मर्यादित उपलब्धतेच्या 'फ्लॅश सेल' विक्रीची ऑफर देते ज्यामुळे पुरवठा मर्यादित असल्याने मागणी पूर्ण होत नाही आणि बाजारभाव नेहमीच उच्च पातळीवर ठेवला जातो. आता दुसरीकडे शाओमीने जुन्या पारंपारिक मार्केटिंग किंवा जाहिरात तंत्रज्ञानाचे स्थान देखील काढून टाकले आहे आणि मुख्यत्वे सोशल नेटवर्किंग सेवांवर आपल्या स्वतःच्या ग्राहकांसोबतच आपल्या उत्पादनांची जाहिरात माऊथ टु माऊथ पब्लिसिटीवर जास्त ध्यान केंद्रित करीत आहे. त्यांच्या उत्सुक आणि निष्ठावंत ग्राहकांच्या फीडबॅकचा आधार घेत त्यांच्या मागण्यांची देखरेख करण्यासाठी कंपनीचे उत्पादक व्यवस्थापक कंपनीच्या युजर फोरमवर भरपूर वेळ घालवतात. ग्राहकांनी सुचविलेल्या सूचना आणि त्यांच्या अभिप्रायावर लक्षपूर्वक अभ्यास करीत फोनच्या मॉडेल मधील बदल सुनिश्चित केला जातो आणि ती माहिती मिळाल्यावर एकदाच ती इंजिनीयर्सकडे हस्तांतरित केली जाते. नंतर विशेषत: एक आठवड्याच्या अवधीत केवळ संकल्पने पासून शिपिंग उत्पादनां पर्यंत सारी चक्रे फिरू लागतात. ज्यानंतर ते दर आठवड्याला फोनच्या नवीन बॅच पाठविल्या जातात. शाओमी या प्रक्रियेला (“Design as you Build“)"आपण तयार केल्याप्रमाणे डिझाइन" असे संबोधतात. या साऱ्या प्रक्रियेकडे अभ्यासपूर्वक पाहिले असता असे ध्यानात येते की, शाओमी अॅप्पलची टॅकटिक अॅमॅझोनच्या स्ट्रॅटेजीनुसार वापरत आहे.

केवळ 5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रारंभापासून, शाओमी आता जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्मार्टफोन निश्चितच बनला आहे, जो आता स्मार्टफोन, मोबाइल अॅप्स आणि संबंधित ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन, विकसीत करतो आणि विकतो. त्यांच्या काही उत्पादनांमध्ये Mi series, Redmi Series, MIUI (operating system), MiWiFi (network router), MiTV (Smart TV line), MiBox (set-top box), MiCloud (cloud storage service), MiTalk (messaging service), MiPower Bank (external battery), Mi Band (fitness monitor & sleep tracker), आणि बरेच स्मार्ट होम उत्पादने आहेत. 8,000 हून अधिक कर्मचारी आणि $ 12 अब्ज (2014) किमतीच्या कमाईसह शाओमी मुख्यत्वे मेनलँड चायना, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये उपस्थित आहे आणि भारत, इंडोनेशिया, फिलीपींस तसेच ब्राझील सारख्या इतर देशांकडे आक्रमकपणे विस्तारत आहे. 24 तासांत एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकल्या गेलेल्या बहुतांश मोबाईल फोनसाठी शाओमीने जागतिक विक्रम मोडीत काढला आहे कारण, अप्रकाशित भारतीय बाजारपेठेत त्यांचा विस्तार देखील अतिशय वेगळा बनला आहे. शाओमीने आपला पाचवा वाढदिवस 6 एप्रिल 2015 साली 'मी फॅन फेस्टिव्हल' च्या अंतर्गत साजरा केला ज्यावेळी भरगोस ऑफर्स आणि डिस्काउंट सोबत शाओमी चे स्मार्टफोन्स केवळ ऑनलाईन पद्धतीने Mi. com या ग्राहकांसाठी असलेल्या वेबसाईटवरून विकले गेले. निव्वळ 24 तासांत 2,112,010 ईतक्या हँडसेट्सची विक्री थेट कंपनीद्वारे एकमेव ऑनलाईन पद्धतीने झाली आणि जागतिक विक्रम केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव शाओमीने नोंदवले.

स्मार्टफोन्सच्या विश्वात हे तर सर्वांनाच ठाऊक आहे की जेव्हा अॅप्पलने आपले आयफोन केवळ AT&T सह बाजारात उपलब्ध करून दिला होता, तेव्हा त्यांनी सर्व विक्रीकर्त्यांना हुजरेगिरी स्वीकारून, अॅप्पल द्वारा घालून दिलेल्या नियमांनुसार जायचे होते. याच समान धोरणानुसार जाऊन, शाओमी देखील त्यांचे स्टॉक व्यवस्थापित करण्यासाठी फ्लॅश विक्रीचा वापर करते, त्यांचे उत्पादन आणि कंपनीचे एक वर्चस्व तयार करते आणि त्यांची मागणी वाढवते. स्पष्टपणे हे देखील दर्शविते की शाओमी देखील बाजारपेठेत टोला देऊ इच्छित आहे. आता दुसऱ्या बाजूला अॅमॅझोन आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आपला बहुतेक नफा वापरतो. त्याचप्रमाणे, शाओमी सुद्धा मिळवलेल्या पैशांचे बहुतेक अधिग्रहण करते आणि गुंतवणूकीवर भर देते. परंतु विस्तृत क्षेत्राच्या उद्दीष्टाच्या उद्देशाने प्रमुख क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये शाओमी गुंतवणूक करते. तर अॅमॅझोन सतत त्याच्या स्वत: च्या बाजारपेठेमध्ये पुनः गुंतवणूक करते जे मोठ्या प्रमाणात वाढत जाते..शाओमी देखील काहीसे समान कार्य करते. आतापर्यंत शाओमीने 20 स्टार्ट-अप कंपन्यांत गुंतवणूक केली आहे आणि 100 हजार कोटींमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. यातील काही गोष्टींचा समावेश आहे Jimubox (2015), Ninebot (2015), Lizhi (2015), 21viaNet (2014), iQiyi (2014), Xunlei (2014), Misfit Wearables (2014) इत्यादिंचा समावेश आहे. कंपनीच्या फंडिंग बद्दल सांगता अंदाजे $45 अब्जच्या मूल्यांकनासह शाओमीने एकूण 11.55 अब्ज डॉलर्सच्या सहापट रकमेत 11 गुंतवणुकदारांची उभारणी केली ज्यात आपल्या भारतातील रतन टाटा, मॉर्निंगसाइड ग्रुप, डीएसटी ग्लोबल, आयडीजी कॅपिटल पार्टनर्स, क्वॉलकॉम वेंचर्स, टेमेसेक होल्डिंग्स आणि काही इतरांचा समावेश आहे.

केवळ चीनमधील औद्योगिक क्षेत्रात शाओमी बदल घडवत नसून जगात इतरत्र 70 हुन अधिक देशांत शाओमीने विविध उद्योगधंद्यात प्रवेश केला आहे. शाओमी आज स्मार्टफोन बाजारात सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या भावात फोन्स विक्री करणारी भारतातील नंबर एक कंपनी आहे, तसेच 15 देशांतील टॉप 5 स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक आहे. शाओमीची व्यवसाय मॉडेल म्हणून जलदगतीने वाढ होत आहे. आणि तसे ही कंपनी सिध्द करून देखील दाखवत आहे. भारतात नुकतेच बंगळुरू येथे कंपनीचे संपूर्ण नवीन मुख्यालय प्रस्थापित झाले आहे. जबॉंग (Jabong.com) चे को-फाउंडर म्हणून प्रख्यात असलेले व्यवसायी मानू कुमार जैन हे भारतातील शाओमी मुख्यालयाचे जानेवारी, 2017 साली ग्लोबल वाईस प्रेसिडेंट व कंट्री मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. आज भारतात 300 कर्मचारी शाओमी करिता काम करीत आहेत. भारतात शाओमी फोन्स लॉन्च करताना लेई जून यांनी मीडिया समोर आपले विचार प्रकट करताना महत्वाची बाब शेअर केली ती म्हणजे, नवनिर्मिती करताना गुणवत्ताही तितकीच महत्वाची असते. चीनच्या तुलनेत भारतात गुणवत्तेचे नियम थोडे शिस्तीचे व उच्च दर्जाचे असायला हवेत कारण वातावरणातील बदल व भारताची एकूण भौगोलिक तसेच आर्थिक परिस्थिती चीनपेक्षा भिन्न आहे. लेई जून यांनी भारताचा दौरा केला तेंव्हा त्यांना असे आढळून आले की, चीनच्या तुलनेत भारतात बनणाऱ्या यूएसबी केबल्स फारच हलक्या दर्जाच्या होत्या. चीनमध्ये शाओमीच्या यूएसबी केबल्स उच्च दर्ज्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्यात कोणत्याही प्रकारची उणीव किंवा बिघाड नसतो. 10,000 किंमतीच्या आतील फोन्ससाठी 3 mm च्या गोल्ड कोटीन असलेल्या यूएसबी चार्जिंग केबल चीनमध्ये वापरल्या जातात ज्यामुळे चार्जिंग करिता जेंव्हा इलेक्ट्रिक पोर्टमध्ये प्लगिंग ईन किंवा आउट करताना कोणतीही हानी यूएसबी केबलला किंवा फोनला होत नाही. परंतु भारतात उच्च आर्द्रता व तापमानामुळे हे गोल्ड प्लेटिंगचे आवरण लवकर खराब होते. परंतु चीनमध्ये ते जसेच्या तसे राहते. या बाबी लक्षात घेता भारतात यावर प्रयोग करणे सुरू झाले. केबल्सची जाडी वाढविण्यात आली. आज शाओमीच्या फोन्स सोबत येणाऱ्या यूएसबी केबल्स 30mm च्या जाडजूड गोल्ड प्लेटिंग आवरणासहित उपलब्ध आहेत. आयफोन वगळता बहुतेक सारेच विक्रेते याच जाडीची यूएसबी केबल ठेवणे आवश्यक समजतात. पण चीनमधील 3mm जाडी असलेल्या केबल्सच्या तुलनेत अजूनही 30mm च्या या केबल्सची कामगिरी खराब होती. अशावेळी शाओमीच्या गुणवत्ता परीक्षण टीमच्या ध्यानात आले की आयफोन च्या केबल्स भारतात चांगली कामगिरी बजावत आहेत ते त्यांच्या निराळ्या मटेरियलचा व दुर्मिळ सामग्रीचा वापर करीत आहेत. पण जर शाओमीने अशा सामग्रीचा वापर केला तर फोन्सची किंमत दुप्पटीने वाढेल अशावेळी सर्व सामान्य जनतेला परवडणाऱ्या किंमतीसाठी जी शाओमीची ओळख जनमानसांत आहे ती पूर्णपणे पुसली जाईल. त्यासाठी अजूनही कंपनीचे महत्प्रयास चालू आहेत. केवळ एवढ्यावरच येऊन हे आव्हान संपत नाही तर भारतात सातत्याने वीज समस्या होतात. त्यामुळे शाओमीच्या व्होल्टेज सिस्टीम मध्ये दबाव असणे आवश्यक आहे. ड्रॉप टेस्ट सुधारण्यासाठी रेडमी 5 तसेच रेडमी नोट 5 फोन्स सोबत फ्री प्रोटेक्टिव्ह केस देखील दिल्या जात आहेत. शाओमी करिता भारत ही सर्वांत महत्त्वाची बाजारपेठ आहे.

2018 सालाच्या सुरुवातीस Q2 मध्ये स्वतःला लॉन्च करीत शाओमी जगभरातील चौथ्या क्रमांकाची स्मार्टफोन कंपनी म्हणून झळकू लागली आहे. चायना, इंडिया, मलेशिया, सिंगापूर तसेच इंडोनेशिया, फिलिपीन्स व साऊथ आफ्रिका सारख्या देशांत शाओमी कार्यरत आहे. सुमारे 16000 कर्मचारी या कंपनीसाठी काम करतात. लेई जून जे या कंपनीचे कर्तेधरते आहेत ते चीनमधील 2017 सालच्या श्रीमंतांच्या गुणवत्तेत 24 व्या क्रमांकाचे अधिपती होते. गुंतवणूक दारांच्या मदतीने 110 करोड गुंतवून सुरू झालेल्या या कंपनीचे आजचे मूल्यांकन 4600 करोडहुन अधिक आहे.

. दीप्ती मेथे

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Ganesh Munde

Ganesh Munde 6 महिना पूर्वी

Ingale Akash

Ingale Akash 1 वर्ष पूर्वी

Shivanand Baste

Shivanand Baste 1 वर्ष पूर्वी

Shrirang Wagh

Shrirang Wagh 1 वर्ष पूर्वी

From Turkey

From Turkey 1 वर्ष पूर्वी

i think this is start up stories competition content.