निर्भया- part 3. Amita a. Salvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

निर्भया- part 3.

निर्भया - ३

आईने स्पष्ट शब्दात समजावल्यावर दीपा लग्नाला तयार झाली. जानेवारी महिन्यात लग्न करण्याचं नक्की झालं. महिन्याभरात दोघांचा साखरपुडा झाला. तिला भेटल्याशिवाय राकेशचा एकही दिवस जात नव्हता. पुढचे काही महिने पंख लावल्यासारखे उडून गेले. राकेश मात्र दिवस खूप संथ जात असल्याची तक्रार सतत करत होता. दीपाला त्याचा उतावळेपणा बघून हसू येत असे.

लग्नाला थोडेच दिवस उरले होते. तो ३१ डिसेंबरचा दिवस होता. त्यादिवशी नवीन वर्ष सेलिब्रेट करण्याचे राकेशने ठरविलं.

" पुढच्या वर्षी या दिवशी आपण पती - पत्नी असू. लग्नापूर्वीची शेवटची नववर्षाची संध्याकाळ मला एन्जाॅय करायची आहे. तुला माझ्या गाडीतून आज लांब फिरवून आणणार आहे. तो दीपाला म्हणाला.

"रात्री बाहेर जेवूनच घरी येऊ." तो निर्मलाला म्हणाला. खरं तर दोघांनी रात्री - बेरात्री बाहेर फिरावं, हे आईला पसंत नव्हतं, पण "थोड्याच दिवसात त्यांचं लग्न होणार आहे." असा विचार करून, लवकर घरी परतण्याच्या अटीवर तिने परवानगी दिली.

"राकेश! मी आताच ड्युटी संपवून घरी आलेय. खूप दमलेय. मला बाहेर यायला नाही जमणार." दीपानेसुद्धा त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्याच्या हट्टापुढे तिचंही काही चाललं नाही.

***

राकेश 'लाँग ड्राइव्ह' च्या नावाखाली तिला गिरगाव चौपाटीवर घेऊन गेला.

चौपाटीवर खूप गर्दी झाली होती.अनेक तरुणांचे ग्रुप नवीन वर्षाच्या स्वगतासाठी तिथे जमले होते. तारस्वरातली गाणी, गप्पा आणि विनोदांना ऊत आला होता. दीपा प्रथमच अशी नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर आली होती. तिथला उत्साह आणि जल्लोष यात ती इतकी हरवून गेली होती ; की राकेशच्या बोलण्याकडेही तिचे लक्ष नव्हते. हे लक्षात आल्यावर तो दीपाला म्हणाला, "आपण मलबार हिलवर जाऊ तिथे गर्दी कमी असेल. इथे एवढी गडबड आहे की, बोलणंही ऎकू येत नाही." खरं तर चौपाटीवरचं उत्साहाचं वातावरण दीपाला खूप आवडलं होतं .

दीपा ड्यूटीवरून थकून आली होती. पण या उत्साही वातावरणामुळे प्रफुल्लित झाली.

" आपण इथेच बसूया. नाहीतरी आईने लवकर घरी परतायची ताकीद दिलीय. रात्र वाढू लागलीय. इथेच थोडा वेळ थांबून निघूया आपण." ती राकेशला म्हणाली.

पण तिच्याकडे लक्ष न देता तो गाडीकडे निघाला. त्याच्या मागून निघण्याशिवाय दीपाकडे दुसरा पर्याय नव्हता.त्याच्या गाडीतून काही वेळात ती दोघं मलबार हिलवर पोचली. तिथली थंड हवा आणि रात्रीचा शांत निसर्ग याची मोहिनी दीपावरही पडली. रातराणीचा धुंद सुगंध आणि गारवा ...... तेथून उठूच नये असे तिला वाटत होतं. पण रात्र वाढत होती. काही वेळाने निर्मनुष्य जागेत तिला थोडी भिती वाटू लागली. ती राकेशला म्हणाली, "आता आपण निघूया. आईने लवकर यायची ताकीद दिलीय." पण राकेश रोमँटिक मूडमध्ये होता. त्याला दीपाबरोबर अजून काही वेळ घालवायचा होता. त्याने तिचा हात धरून तिला खाली बसवलं.

"इतक्या रोमँटिक वातावरणात तू घड्याळाकडे काय बघत बसलीयस? हे क्षण एन्जाॅय कर." त्याच्या बोलण्यात दीपाला प्रेमापेक्षा अधिकार जास्त जाणवला.

दीपा खूप घाबरली होती. "आज याच्याबरोबर येऊन आपण चूक केली. घरी आई चिंतेत असेल. आणि याचं मन मोडलं तर हा रागावेल. याचा स्वतःचं म्हणणं खरं करण्याचा स्वभाव पूर्वी कधी लक्षात आला नव्हता. खूपच हट्टी स्वभावाचा आहे हा! आणि दुस-याच्या मनाचा विचार करायची सवय दिसत नाही. " भ्यालेल्या मनात येणा-या विचारांनी दीपा अस्वस्थ झाली होती.

राकेश स्वतःच्याच धुंदीत होता. दीपाचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही, हे सुद्धा त्याच्या लक्षात येत नव्हतं. त्याची शेरो - शायरी आणि रोमँटिक बोलण्याचा दीपाला आता कंटाळा आला होता. भयाण एकांतातून कधी एकदा बाहेर पडतोय असं तिला झालं होतं. काही वेळ गेला, आणि एक गाडी समोरच्या रस्त्यावरून संथपणे पुढे गेली, थोडी पुढे जाऊन उभी राहिली. रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात दीपाने गाडीचा ०१०१ हा नंबर पाहिला. तिच्या मनात आलं; आजच्या दिवसाला साजेसाच. हा नंबर आहे. पण त्या गाडीतून दणकट देहयष्टीचे तीन तरुण खाली उतरलेले पाहताच ती दचकली. बहुतेक त्या दोघांना पाहूनच त्यांनी गाडी थांबवली होती. ते जवळ येऊ लागले ; हे पाहताच दीपा घाबरुन गेली. ते जवळ येऊन उगाच राकेशबरोबर बाचाबाची करू लागले. त्याच्याशी त्यांनी भांडण उकरून काढलं. दोघेजण त्याला धरून मारत बाजूला घेऊन गेले, आणि तिसऱ्याने दीपावर झडप घातली. एकामागून एक त्या तीनही नरपशूंच्या अमानुष अत्याचाराला दीपा बळी पडली. बेशुद्ध होता- होता ते परत कारमध्ये बसून निघून गेले एवढंच तिने पाहिलं.

त्यानंतर बरेच दिवस ती हॉस्पिटलमध्ये होती. राकेशला त्या लोकांनी बरंच मारलं होतं. त्याचीही शुद्ध हरपली होती. मलबार - हिलवर फेरफटका मारायला आलेल्या तरुणांच्या एका टोळक्याने बेशुद्धावस्थेत पडलेल्या दीपाला आणि राकेशला पाहिलं आणि जवळच्या बंगल्यातून फोन करून अँब्यूलन्स बोलावून घेतली. दोघांनाही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं. राकेशच्या जखमा गंभीर नव्हत्या. तो काही वेळातच शुद्धीवर आला. त्याला दुस-या दिवशीच डिस्चार्ज मिळाला.

दीपाची प्रकृती मात्र गंभीर होती. ती मृत्यूशी झुंज देत होती. ती 'अपोलो हाॅस्पिटल'ची नर्स आहे; हे कळल्यावर तिला तिकडे हलवण्यात आलं. तिथल्या स्टाफने तिची मनापासून शुश्रुषा केली. काही दिवसांनी ती शुद्धीवर आली. काही दिवसांनी शरीराच्या जखमा बऱ्या झाल्या पण मानसिक धक्क्यातून सावरणं कठीण होतं. मनावर झालेल्या आघातावर फुंकर घालण्याचं ज्याचं काम होतं, त्या राकेशने तिला भेटायचं बंद केलं होतं. या काळात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तिची आई!

" जे काही घडले, त्यात तुझी काहीही चूक नाही. कोणीही काहीही म्हणाले, तरी स्वतःला दोष देऊ नकोस. निराश होऊ नको." निर्मलाताई दीपाच्या केसांवर हात फिरवत तिला समजावत होत्या.

"पण आई! आजूबाजूला सगळेजण जेव्हा विचित्र नजरेने माझ्याकडे बघतात, तेव्हा मला कुठेतरी तोंड लपवून बसावंसं वाटतं. कधी कधी मी ह्यातून जगले नसते तर बरं झालं असतं आई!" दीपा हुंदके देत म्हणाली.

" तू जगाचा विचार नको करू! लोक काही दिवसातच सर्व काही विसरून जातील. फार काळ कोणाविषयी विचार करत बसण्याएवढी फुरसत या धकाधकीच्या आयुष्यात आहे कोणाला? तू लवकर बरी हो. काही दिवसांतच सर्व काही सुरळीत होईल. नितीनचं हे महत्वाचं वर्ष आहे. या वर्षीच्या मार्कांवर त्याचं मेडिकलचं अॅडमिशन अवलंबून आहे, पण तुझ्या काळजीने तो खचून गेलाय. अभ्यासातही लक्ष लागत नाही त्याचं! तू बरी होऊन घरी आल्याशिवाय त्याचं अभ्यासात लक्ष लागणार नाही!" निदान भावासाठी तरी दीपा स्वतःला कणखर बनवेल याची निर्मलाताईंना खात्री असल्यामुळे त्यांनी नितीनची तिला आठवण करून दिली.

"आई! राकेश कसा आहे? त्याला जास्त लागलंय का?" दीपाने राकेशची चौकशी केली.

" त्याच्या जखमा फार मोठ्या नव्हत्या. त्याला दुस-या दिवशीच डिस्चार्ज मिळाला." निर्मलाताईंनी उत्तर दिलं.

"मला तो मला एकदाही भेटायला आला नाही." दीपाने मनातला सल बोलून दाखवला.

"त्याच्यामुळे तुझ्यावर हा प्रसंग ओढवला या विचारांचा त्याला त्रास होत असेल. तू काही बोलशील, म्हणून यायला घाबरत असेल. तू सध्या फक्त स्वतःच्या प्रकृतीचा विचार कर. लवकर बरी हो! मला माझी पूर्वीची - मला प्रत्येक परिस्थितीत आधार देणारी दीपा परत हवीय." निर्मलाताईंचं बोलणं ऐकून, आपली आई किती एकटी पडलीय हे दीपाला जाणवलं. त्या पुढे म्हणाल्या,

"तू फार विचार नको करू! फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. माझ्यासाठी तू सगळ्यात जास्त मौल्यवान अाहेस हे कधीही विसरू नको. निराश होऊ नकोस. काळ सर्व दुःखांवरील अौषध आहे. जसा जसा काळ पुढे जाईल तसा तसा तुला काही ना काही मार्ग मिळत जाईल. फक्त हे काही दिवस तू स्वतःला जप." निर्मलाताईंच्या बोलण्यातला आशावाद दीपाला जगण्याचं बळ देऊन गेला.

***

contd.... part 4