निर्भया -- ५
जेव्हा महेश म्हणाला, की माझे दोन जिवलग मित्र आहेत, तेव्हा हेच ते विकृत त्रिकुट असावं, याविषयी दीपाची जवळजवळ खात्री पटू लागली. जर हे तिघे तेच आहेत हे नक्की झालं असतं, तर ती पोलीसांकडे जाऊन खबर देणार होती.
***
पुढच्याच आठवड्यात महेशने दीपाला फोन केला, " मी उद्या फार्म हाउसवर पार्टीसाठी नागेश आणि हरजीतला बोलावलंय. तुला उद्या आठवड्याची सुट्टी असते. येऊ शकशील तू? "
"हो! नक्की येईन मी!" दीपा याच दिवसाची वाट बघत होती.
त्यादिवशी ती अर्जंट ड्यूटीवर बोलावलंय असं आईला सांगून घरून निघाली. निघताना मिरचीची पूड बरोबर घ्यायला ती विसरली नाही. ती स्वतःच्या स्कूटरने फार्महाऊसवर पोहोचली. महेश तिची वाट पहात होता. काही वेळातच दुसरे दोघेही आले. बंगल्याबाहेर लाॅनवर टेबल आणि खुर्च्या ठेऊन महेशने पार्टीची व्यवस्था केली होती. "हा हरजीत आणि हा नागेश. दोघेही माझे जिवलग मित्र आहेत; अगदी शाळेपासून मित्र आहोत आम्ही! आणि ही दीपा - माझी मैत्रिण. मी तुम्हाला हिच्याविषयी सांगितलं आहे." महेशने ओळख करून दिली. ते दोघेही महेशसारखेच श्रीमंत घरातले वाया गेलेले तरूण दिसत होते.
"गुरुनाथ सरांसारखा सर्वसामान्यांसाठी झटणारा मोठा भाऊ असूनही महेश वाईट मार्गाला लागलाय, या गोष्टीचं श्रेय त्याच्या या मित्रपरिवराकडेच जातं." ती मनात म्हणाली.
हे तेच दोघे होते जे त्या रात्री त्याच्या बरोबर होते, असा संशय त्यांना पहिल्याबरोबर तिला आला पण तरीही ती हे पोलिसांना ठामपणे सांगू शकली नसती. तिला ते दोषी असल्याचा आणखी पुरावा हवा होता. ते दोघे महेशपेक्षा स्मार्ट वाटले. "हिला नक्कीच कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं!" ते दोघेही एकाच वेळी म्हणाले.
"मी इथेच मालाडमध्ये रहाते. कुठेतरी पाहिलं असेल! " तिने उत्तर दिलं. जरी ती मनात थोडी घाबरली होती, तरी तिने चेहऱ्यावर भीती दाखवली नाही. महेशने बरोबर आणलेले समोसे पॅटीस त्यांच्यासमोर ठेवले.
"चला गरम आहेत तोपर्यंत खाऊन घेऊया." तो म्हणाला.
ते दोघे गप्पा मारता- मारता समोसे खात होते; पण त्यांची कुतूहलाची नजर तिच्याकडे होती. मनातल्या मनात बहुधा ते तिला कुठे पाहिलं हे आठवत असावेत.
"आपण एकत्र जमलो आहोत, तर व्हिस्की पाहिजे. त्याशिवाय मजा येणार नाही.गरम समोसे आणि थंडगार व्हिस्की -- पार्टीला आणखी काय पाहिजे ?" महेश म्हणाला, आणि त्याने जवळची व्हिस्कीची बाटली काढली.
"मी ग्लास आणते." दीपा म्हणाली. आणि आत गेली. पण कीचनमध्ये न जाता ती दाराअाडून त्यांचं बोलणं ऎकू लागली.
" तू खरंच नशीबवान आहेस महेश! काय मस्त पोरगी पटवलीयस रे महेश! आज सुंदर पावसाळी हवा आहे आणि सोबतीला ही अप्सरा ! त्या दिवशीसारखेच तिघेही ....." हरजीतच्या डोळ्यात लालसा दिसत होती. पण त्याला मधेच थांबवत महेश म्हणाला,
"असा विचार सुद्धा करू नकोस. त्या न्यू इयर प्रकरणाला सहा महिनेही उलटले नाहीत. नशीबाने जास्त गाजावजा झाला नाही. त्या मुलीविषयी फक्त दुस-या दिवशी वर्तमानपत्रात--' एक मुलगी जखमी अवस्थेत मलबार हीलवर मिळाली.तिला जवळच्या हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलंय '-- एवढंच छापून आलं. नंतर ती जिवंत आहे की मेली हे सुद्धा कळलं नाही. जर जास्त चौकशी केली असती, तर कोणालातरी माझाच संशय आला असता. पोलीस तर पळतीवर असणारच. आणि कदाचित् अजूनही त्यांचा तपास चालूच. असेल." तो पुढे म्हणाला,
" इतक्यात नवीन लचांड नको. काही दिवस वाट बघा. दीपाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या प्रेमात पडलीय ती! योग्य वेळ पाहून पावलं उचलूया. परत कधीतरी तिला इथे घेऊन येऊ. त्या मलबार-हिलवालीसारखं हिला नंतर जिवंत ठेवता येणार नाही; कारण ही आपल्याला ओळखते. इथे-- फार्म हाऊसमघेच कुठेतरी तिची विल्हेवाट लावावी लागेल. आपल्याला फार काळजीपूर्वक पावलं उचलावी लागतील. सध्या तरी तिला आपल्याविषयी संशय यणार नाही; असे वागा." हरजीतला त्याचं म्हणणं पटलं नाही.
" आणि तू तिच्या प्रेमात पडलास तर? इतक्या सुंदर मुलीच्या बाबतीत ही शक्यता नाकारता येणार नाही." हरजीतचा मित्रापेक्षा दीपाच्या सौंदर्यावर जास्त विश्वास होता असं दिसत होतं.
"तू हे बोलतोयस? आजपर्यंत किती मुलींना माझ्या मागे लावलं मी? पण तारुण्याचा आस्वाद घेऊन झाल्यावर प्रत्येकीला वाटेला लावलं. प्रेम हा शब्द माझ्यासाठी नाही. जवानी आहे तोपर्यंत मजा करायची एवढंच मला कळतं. आणि त्या मुली तरी काय माझ्यावर प्रेम करतात? सोडून दे यार ! त्यासुद्धा माझ्या गुरुनाथ दादाची श्रीमंती बघूनच मला जाळ्यात पकडायला बघतात,आणि शेवटी पस्तावतात. आजपर्यंत अशा अनेकजणी माझ्या मागे लागल्या, तशीच ही एक!" महेशने त्याला तावातावाने उत्तर दिलं.
"पण ही त्या मुलींसारखी वाटत नाही. चांगल्या कुटुंबातली वाटतेय." दीपाच्या सौदर्याने प्रभावित झालेला नागेश म्हणाला.
"ही पण त्यातलीच! नाहीतर माझ्या जाळ्यात इतक्या सहजासहजी कशी अडकली असती? तिला माझ्या मागे लावायला जराही परिश्रम करावे लागले नाहीत मला! खरं सांगायचं तर ; मी प्रयत्न करण्याआधी तीच माझ्या मागे लागली." महेश गर्वाने म्हणाला. त्याची नजर बोलताना दाराकडे होती, पण दीपा फक्त त्यांचं बोलणं ऐकता येईल, पण त्यांना दिसणार नाही, अशा रीतीने आडोशाला उभी होती.
तो सगळ्या मुलीना एकाच मापाने तोलत होता. आता दीपाला कळलं, तिने स्वतः त्याच्याशी मैत्री वाढविण्यात पुढाकार घेतला, या गोष्टीचा त्याला संशय का आला नव्हता!
दाराआडून हे सर्व ऐकणारी दीपा मात्र घामाने भिजून गेली होती. दाट जंगलात आपल्याला पशुंनी वेढलंय असं तिला वाटत होतं. त्यांच्या नकळत तिथून बाहेर पडणंही सोपं नव्हतं कारण ते फार्महाउस मजबूत भिंतींनी चारी बाजूंनी बंदिस्त होतं. आजूबाजूला घरं जवळ नव्हती. दीपा भितीने थरथरत होती.
ते नराधम हेच होते, हे त्यांच्या बोलण्यावरून नक्की झालं होतं. आणि ते तिघेही निर्ढावलेले गुन्हेगार होते हेसुद्धा दीपाला कळून चुकलं होतं. आता पोलिसांना या त्रिकुटाबद्दल सांगायला काहीच हरकत नव्हती. केस परत सुरू करून इतर सर्व पुरावे त्यांनी मिळवले असते.या सराईत गुन्हेगारांना शिक्षा होणं आवश्यक होतं. अन्यथा भविष्यकाळात अनेक मुलींना त्यांनी आयुष्यातून उठवलं असतं.
"लवकरात लवकर इथून बाहेर पडायला हवं." दीपा स्वतःला बजावत होती, कारण एकदा व्हिस्की पोटात गेली की त्यांच्यातील जनावर जागं व्हायला वेळ लागणार नव्हता. ३१ जानेवारीचे सैतान तिला आठवले आणि तिचे पाय लटपटू लागले. घेरी येतेय-- हातापायातली शक्ती कमी होतेय असं वाटायला लागलं. स्वतःवर मुष्किलीने ताबा मिळवत ती किचनमध्ये जाऊन ग्लास घेऊन आली,
" बराच वेळ लागला तुला! व्हिस्की थंड राहिली नाही आता." तिच्याकडे संशयाने पहात हरजीत म्हणाला.
"ग्लास स्वच्छ करून आणावे लागले, म्हणून थोडा वेळ लागला." दीपाने लगेच उत्तर दिलं. आपण घाबरलो आहोत हे चेह-यावर दिसू न देण्याचा आटोकाट प्रयत्न ती करत होती. हसत उत्तर देत होती.
"तूही ये! आम्हाला कंपनी दे!" नागेश म्हणाला. "नाही मी ड्रिन्क घेत नाही " दीपाने स्पष्ट नकार दिला त्या तिघांनी जास्त वेळ न घालवता व्हिस्की प्यायला सुरुवात केली.
"व्हिस्की गरम झालीय! बरोबर बर्फ हवं होतं." हरजीत म्हणाला.
"ती काळजी मी घेतलीय! येताना बर्फ घेऊन आलोय. महेश म्हणाला, आणि त्याने त्याच्या ट्रॅव्हल बॅगमधून आईस- बाॅक्स काढून टेबलावर ठेवला.त्यातलं बर्फ त्यांच्या ग्लासात घातलं. "उन्हाळ्यात थंड ड्रिंक प्यायला मजा येते! म्हणून आठवणीने बर्फ आणलं." महेश म्हणाला. त्याने तिन्ही ग्लासांमधे थोडं थोडं बर्फाचं पाणी ओतलं. गप्पा मारत ते समोसे आणि व्हिस्कीचा आस्वाद घेऊ लागले. दीपाला मात्र आता तिथे आल्याचा पश्चात्ताप होत होता.
***
contd.... PART - VI