एक पत्र - अटल व्यक्तीमत्वास  Nagesh S Shewalkar द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

एक पत्र - अटल व्यक्तीमत्वास 





------------------- एक पत्र 'अटल' व्यक्तीमत्वास ! ----------
     आदरणीय अटलजी,
     साष्टांग नमस्कार !
     तुम्हाला पत्र लिहिताना 'काय लिहू ? कसे लिहू? कशी सुरुवात करू?' अशी अवस्था झाली आहे. शब्द इकडे तिकडे झाले असतील परंतु तुम्ही अशीच भाषणाची सुरुवात करीत असत. तसेच काही प्रश्न मनालाच विचारून मी लिहितो आहे. मला आठवते, तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात करताना अनेक वेळा  'क्या बोलू? कैसे बोलू? कहाँ से शुरूआत करू?' अशा आशयाचे प्रश्न विचारून करीत असत.
     अटलजी, खरे सांगू का, मलाच काय परंतु भारतातील कोट्यवधी जनतेला तुम्ही आमच्यामधून कायमचे निघून गेला आहात असे वाटतच नाही. घरातील एखादी व्यक्ती सोडून गेली यावर  जसा विश्वास बसत नाही तशीच अवस्था आम्हा भारतीयांची झाली आहे. तुमची ती स्फूर्तीदायी, चैतन्यमय, उत्साहवर्धक, आत्मविश्वासाने तेजाळलेली, डोक्यावरील केसांची विशिष्ट रचना, आवाजातील गोडवा, मधुरता असलेली प्रसंगी कठोर झालेली, आक्रमकता धारण केलेली मूर्ती डोळ्यासमोर आहे, ह्रदयात कायम वसलेली आहे. 
     तुमचे नाव जरी ओठी आले तरी तुमच्या जीवनातील अनेक प्रसंग जिवंतपणे समोर येतात. आजही आठवते, तेरा दिवसांचे सरकार विसर्जित करताना तुम्ही केलेले ते ह्रदयस्पर्शी भाषण. विश्वास दर्शक ठरावावर झालेल्या चर्चेत विरोधकांनी केलेल्या टीकेला आपण तेवढ्याच ठामपणे उत्तर दिले. शेवटी तुमच्या चिरपरिचित अंदाजाने तुम्ही लोकसभा अध्यक्षांकडे बघून म्हणालात,    'आदरणीय अध्यक्ष महोदय, मैं अपना त्यागपत्र देने राष्ट्रपती भवन जा रहा हूँ....' असे आत्मविश्वासाने, निर्धाराने सांगून , दुसऱ्याच क्षणी तुम्ही ज्या तडफेने, डौलाने संसदेच्या बाहेर पडलात तो क्षण आठवला की, आजही नकळतपणे डोळ्याच्या कडा पाणवतात. आपली ती शब्दफेक करण्याची हातोटी, हातांंच्या पंजाना, बोटाला विशिष्ट प्रकारे फिरवण्याची कला, कधी नाजूकपणे तर कधी आक्रमकतेने मानेला मिळणारे झटके, डोळ्यातील आत्मविश्वास, तेजःपुंज चेहरा सारे सारे काही ह्रदयात साठवून ठेवले आहे. साधारणपणे संसदेचे रिकामे सभागृह हा सर्वांंचा अनुभव परंतु तुम्ही त्यालाही तुम्ही अपवाद ! अटलजी सभागृहात बोलणार आहेत, अशी कुणकुण संसद परिसरात लागली की, विरोधी पक्षातील खासदारांसह स्वपक्षीय खासदारांची पावले सभागृहाकडे वळायची आणि काही क्षणात सभागृहातील सारी आसने भरून जायची, अगदी प्रेक्षागृहही खचाखच भरून जायचे. त्याहीपेक्षा आम्हाला तुमचा अभिमान वाटणारी गोष्ट अशी की, नेहरूजी पंतप्रधान असताना तुम्ही सभागृहात तरुणपणी प्रवेश केला होता. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना नेहरूजी कामानिमित्त सभागृह सोडण्याच्या विचारात असताना किंंवा सभागृह सोडत असताना जर अटलजी, तुम्ही बोलायला उभे राहिलात तर तुमचे ज्वलंत, अभ्यासपूर्ण, शेरोशायरीने परिपूर्ण, नानाविध कोट्या, चपखल उदाहरणांची सडेतोड फेक असणारे भाषण ऐकायला नेहरूजी सभागृहात थांंबत. तरुण वयात तुम्ही घेतलेली भरारी पाहून तुम्ही विरोधक असूनही पंतप्रधान नेहरूंनी एका परदेशी शिष्टमंडळाला तुमची गौरवपूर्ण ओळख करून देताना सांगितले की, 'ये लडका एक दिन हिंदुस्थान का प्रधानमंत्री बनेगा.'  हे ऐकून, वाचून आमचा उर अत्यानंदाने, अभिमानाने भरून येतो. अशी काय जादू होती, अशी कोणती मोहिनी होती की, जी नेहरूंप्रमाणे सर्वांनाच खिळवून ठेवत असे. घणाघाती वार,प्रहार, सडतोड उत्तर, विनोदाची पेरणी यासोबतच भाषेवरील प्रभूत्व, विविध सामाजिक प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करताना बोलताना काही क्षण थांबण्याची तुमची  खास पद्धत (पॉज),  क्षणातच व्यक्त होण्याचा अफलातून अंदाज इत्यादी अनेक वैशिष्ट्यांमुळे तुमचे विचार ऐकणारा मंत्रमुग्ध  होत असे. भान विसरून ऐकत असे.
     अटलजी, तुम्ही पहिल्यांदा पंतप्रधान झालात. हिंदुत्ववादी सरकार आले अशीच चर्चा त्यावेळी होती. परंतु अटलजी, तुमचे सरकार सर्वांंना सर्व समावेशक सरकार होते हे विरोधी पक्षांंसह सर्वांंनाच माहिती होते. त्यामुळे तुमच्या सरकारला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला होता परंतु तरीही दुर्दैवाने आवश्यक संख्याबळ तुम्ही मिळवू शकला नाहीत. त्यावेळी तुमचे एक वाक्य तुम्हाप्रती मनामनात असलेला आदर शतपटीने वाढवणारे ठरले. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तुम्ही म्हणालात, मला सत्तेची हाव आहे, मला खुर्ची सोडवत नाही असे आरोप करण्यात आले. मी चाळीस वर्षे झाली या सभागृहाचा सदस्य आहे. कधीच सत्तेची हाव धरली नाही. या महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करायची संधी होती. पण चार दिवस आधीच आम्ही विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जातोय. सत्तेची लालसा असती तर अजून चार दिवस खुर्चीवर बसू शकलो असतो..... याच दरम्यान तुमचे एक वक्तव्य ऐकण्यात, वाचण्यात आले आणि त्यावरून एक स्पष्ट झाले की, सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही कोणतीही असांसदीय क्रुती केली नाही. तुम्ही ठामपणे म्हणालात की, बाजारात मते उपलब्ध होती, पण ती विकत घेणे ही संसदीय लोकशाही नाही.
      अटलजी, नेता म्हटलं की, कार्यकर्ते आले, सभा ठरलेल्याच आणि आपल्या आवडत्या नेत्याचा जयजयकार ही आलाच. स्वतःच्या नावाचा, आसमंत दुमदुमून टाकणारा जयघोष कुणाला नको असतो. तुम्हाला ही हा अनुभव ठिकठिकाणी येत असे. तुम्ही जिथे जाल तिथे कार्यकर्त्यांची, सामान्य नागरिकांची झुंबड उडत असे. 'देश का नेता कैसा हो, अटलजी जैसा हो।' अशा गगनभेदी घोषणांंनी परिसर दुमदुमून जात असे. एका सभेच्या ठिकाणी अशा होणाऱ्या घोषणा थांबवून तुम्ही म्हणालात की, 'देश का नेता कैसा हो ये मत सोचो, देश महान कैसे बने इसपर विचार करो।' स्वतःपेक्षा देशाला प्राधान्य देणारे  तुमच्यासारखे तुम्हीच.
    अटलजी, तुम्हाला एकाच गोष्टीची भीती होती की, आपली बदनामी होऊ नये. अनेक संकटांचा, राजनैतिक वादळांचा तुम्ही मोठ्या धैर्याने, धाडसाने, हिंमतीने यशस्वी सामना केलाय हे भारतीय जनतेला चांगले ठाऊक आहे. तुमच्या पुढाकाराने अगदी गुप्तपणे पोखरण येथे अणुचाचणीची तयारी होत असताना त्या गोष्टीची पाकिस्तानी पंतप्रधानानी थेट अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांकडे तक्रार केली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी ताबडतोब तुम्हाला फोन केला आणि म्हणाले की, तुम्ही अणुचाचणीची तयारी करत असल्याने पाकिस्तान नाराज आहे. त्यांचे म्हणणे आहे की, तेही सज्ज असून त्यांच्याकडेही अणुबॉम्ब आहे. त्यावर अटलजी, तुम्ही अत्यंत धाडसाने, ठामपणे आणि तितक्याच नम्रतेने उत्तर दिले की, मला त्यांची ताकद माहिती आहे. ही तयारी करताना मी अर्धा भारत गमावला जाईल असे समजून आहे, परंतु उद्या सकाळपर्यंत पाकिस्तान जगाच्या नकाशावर नसेल.... व्वा! अटलजी, व्वा!  मान गए। अमेरिकन किंवा इतर कोणत्याही देशाच्या दबावाखाली भारत येणार नाही, झुकणार नाही हे आपण दाखवून दिले. पोखरण चाचणीनंतर भारतावर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आले परंतु तुम्ही डगमगला नाहीत, धीर सोडला नाही. दुसराही एक प्रसंग आठवतो. पाकिस्तान वेगळा झाल्यापासून सातत्याने काश्मीर आणि भारताच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसत असल्याचे साऱ्या जगाला ठाऊक आहे. अनेक वेळा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तोंडघशी पडूनही पाकची कारस्थानं थांबत नाहीत. उलट भारताने थोडा जरी विरोध केला, पाकचे दुष्क्रुत्य हाणून पाडले की, पाकचा जळफळाट होतो. कारगिल क्षेत्रात पाकच्या कारवायांना भारताने सडेतोड उत्तर दिले. युद्ध पेटले. परंतु भारतीय सैन्यापुढे आपला टिकाव लागत नाही, स्वतःची हार समोर दिसताच पंतप्रधान नवाज यांनी अमेरिकन राष्ट्रपती बुश यांना फोन करून भारताला माघार घ्यायला लावा अशी विनंती केली. बुश यांनी तात्काळ तुम्हाला फोन केला आणि सल्ला देताना जणू हुकूम दिल्याप्रमाणे सांगितले की, पाकिस्तानला शिक्षा मिळाली आहे. युद्ध थांबवा. पण बुश यांनी ही ओळखले नव्हते की ते स्वतःच्या निर्णयावर  'अटल' राहणाऱ्या भारतीय पंतप्रधानासोबत बोलत आहेत. तुम्ही क्षणाचाही विलंब न करता दमदारपणे, निर्धाराने बुश यांना सुनावले की, जोपर्यंत कारगिलमधून शेवटचा पाकिस्तानी सैनिक परत जात नाही तोपर्यंत युद्ध चालूच राहिल....
अटलजी, भारतीय जनतेच्या मनात कारगिल जिंकल्याचा आनंद तर होताच परंतु त्याहीपेक्षा जास्त आनंद आणि कौतुक या गोष्टीचे होते की, आमच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला कणखरपणे सुनावले, त्यांच्या दबावापुढे झुकले नाहीत. 
     अटलजी, तुमच्या जीवनात अनेक योगायोग, चमत्कार झाले असतील परंतु एका घटनेचे वर्णन करण्याचा मोह मला आवरत नाही. १९४५ या वर्षी तुम्ही कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी कानपूर येथील विद्यालयात प्रवेश घेतला त्यावेळी एक वेगळीच घटना घडली. तुमच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे वय पन्नाशीच्या पुढे होते. त्या विद्यार्थ्याने तीस वर्षे शिक्षकाची नोकरी करून निव्रुत्ती घेतली होती. तरीही तो पुढील शिक्षणासाठी इच्छा बाळगून होता. त्या विद्यार्थ्यास पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्या विद्यार्थ्याचे नाव होते - पंडित क्रुष्ण बिहारीलाल बाजपेयी! अर्थात तुमचे पिताश्री ! होता की नाही एक अपूर्व योगायोग! 
     तुम्ही राजकारणात आल्यानंतर जनतेची मन लावून सेवा नि कामे करीत असताना १९६० यावर्षी खासदार म्हणून निवडून आलात. भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात प्रवेश केला. तेव्हा जवाहरलाल नेहरु हे पंतप्रधान होते. एकेदिवशी पंतप्रधान नेहरू सभागृहात म्हणाले, 'मी आत्ताच एका पंचतारांकित हॉटेलचे उद्घाटन करून आलो आहे. या गोष्टीचा मला फार आनंद होतो आहे.'...  नेहरूजींंचे ते वक्तव्य ऐकून एक तरुण खासदार ताडकन उभा राहिला. आणि म्हणाला 'पंतप्रधानांनी एखाद्या रुग्णालयाचे उद्घाटन करण्याऐवजी एका हॉटेलचे  उद्घाटन केले हा माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखी दिवस आहे.' प्रत्यक्ष पंतप्रधान नेहरू यांना असे खडे बोल ऐकवणारे दुसरे तिसरे कुणी नसून अटलजी तुम्ही होतात. तरीही नेहरूंनी तुमच्याबद्दल राग धरला नाही. उलट त्यांना तुमचे, तुमच्या धाडसाचे कौतुक वाटले.
     अटलजी, तुमचा स्वभाव तसा विनोदी! विनोदाच्या माध्यमातून कुणाची कशी जिरवावी, कुणाला कसे वास्तवाचे भान द्यावे हे तुमच्याकडून अनेकांनी शिकले. एक मजेदार प्रसंग तुम्ही एका सभेत खास तुमच्या शैलीत रंगवून सांगितला होता. तुम्ही लाहोर भेटीवर असताना एका महिला पत्रकाराने विचारले की, आपण अजूनही अविवाहित आहात. मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे. पण माझी अशी एक अट आहे की, आपण मला 'मुंह दिखाई' म्हणून काश्मीर भेट द्यावा. अटलजी, आपण त्या महिलेला असे काही उत्तर दिले की, ती पत्रकार खजील झाली. तुमचे देशप्रेम त्या विनोदातूनही प्रकट झाले. आपण त्या महिलेला उत्तर दिले की, मला तुमचा प्रस्ताव मंजूर आहे. पण माझीही एक अट आहे की, मला हुंडा (दहेज) म्हणून पूर्ण पाकिस्तान पाहिजे.
आपल्या विनोदी स्वभावाचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. इंदिराजी पंतप्रधान असतानाची गोष्ट. त्यावेळी कच्छ करार झाला होता परंतु तो करार तुम्हाला आवडला नाही. इंदिराजींच्यासोबत तुमचे त्यामुळे मतभेद झाले होते. तुम्ही इंदिराजींना असे सुचविले की, माझे म्हणणे बरोबर आहे की, तुमची बाजू योग्य आहे हे आपण रामलीला मैदानावर जाऊन लोकांचा कल जाणून घेऊया. त्यावर इंदिराजी म्हणाल्या, आप की हिंदी इतनी अच्छी है की, 'आप की बाते सुनकर लोग आप के पक्ष मे मत देंगे।' प्रखर विनोदी बुद्धी लाभलेले, हजरजबाबी असलेले अटलजी, तुम्ही उत्तर दिले की, ' मँडम, आप खुद इतनी अच्छी है की, आप को देखके ही लोग मत देंगे। '  इंदिरा गांधी असोत की इतर कुणी पंतप्रधान वा मंत्री असो, तुम्ही टीका करताना मागेपुढे पाहिले नाही. प्रसंगी कुणाचे कौतुक करताना कधी शब्द हातचे राखले नाहीत. इंदिराजींना 'दुर्गा' ही पदवी  ही तुम्हीच दिली होती.
     नेहरूजी असो, इंदिराजी असो, राजीवजी असो, नरसिंहराव पंतप्रधान पदी असो प्रत्येकाला तुमच्या टीकेचे घाव सहन करावे लागले परंतु या सर्वांचा मोठेपणा असा की, तुमचे बोल कधीच कुणी मनाला लावून घेतले नाहीत. राग धरला नाही. उलट तुम्ही विरोधी पक्षात असूनही तत्कालीन पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेमध्ये भारताची बाजू कणखरपणे, जोरदारपणे आणि अभ्यासपूर्ण रितीने मांडण्यासाठी अटलजी, तुम्हाला पाठवले होते. हा होता तुमच्याबद्दलचा आदर, तुमच्या ज्ञानावर, अभ्यासावर, वाक्चातुर्यावर आणि देशावर असलेल्या तुमच्या प्रेमावरचा विश्वास ! अटलजी, तुम्हीही ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या वेळी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची बाजू भक्कमपणे मांडून देशाची मान ताठ तर केलीतच परंतु सोबतच शेजाऱ्याला  मान खाली घालायला भाग पाडले.
     सुरुवातीला तेरा दिवस, दुसऱ्या वेळी तेरा महिने सत्तेत आल्यानंतर दुर्दैवाने पाठिंबा देणाऱ्या मित्रांनी तोंड फिरवल्याने तुम्हाला सत्ता सोडावी लागली. तिसऱ्या वेळी तुम्ही पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झालात त्यावेळी तुमच्या समर्थकांना आणि भारतीयांना असे वाटले की, आता चढत्या क्रमानुसार म्हणजे तेरा दिवस, तेरा महिने याप्रमाणे तुम्ही तेरा वर्षे पंतप्रधान असणार आहात. परंतु, अटलजी, दुर्दैवाने तसे घडले नसले तरीही सुदैवाने तुम्ही पाच वर्षे पंतप्रधानपदी राहिलात हे आम्हा भारतीयांचे भाग्य !
     अटलजी, तुमच्या निस्वार्थ कारकीर्दिचा आढावा घेणे खरे तर केवळ अशक्य आहे. तुम्ही असंख्य कामे केली आहेत. आजीवन देशसेवा केली आहे. जनसेवा एक व्रत म्हणून स्विकारली परंतु स्वार्थ कधी तुमच्या मनाला शिवला नाही. तुम्ही मनात आणले असते तर पंतप्रधानपदी असताना स्वतःला 'भारतरत्न' हा सर्वोच्च भारतीय पुरस्कार तुम्हाला मिळू शकला असता. तुमच्या अनेक सहकाऱ्यांच्या मनात तो विचार होता. परंतु तुम्ही विनम्रपणे नकार दिला. ती सहजसाध्य असणारी गोष्ट टाळली. तुमच्या कविमनाच्या संवेदनशील व्यक्तीत्वाला ती बाब रुचली नसावी. हाच तुमचा मोठेपणा!
     अटलजी, खरेच तुमच्याबद्दल काय लिहावे? असा प्रश्न पुन्हा विचारून थांबतो. तुम्हाला अत्यंत दुःखी अंतःकरणाने भावपूर्ण अक्षरांजली अर्पण करतो........
॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥
                                                                         नागेश सू. शेवाळकर
                                                                         ११०, वर्धमान वाटिका फेज ०१,
                                                                         क्रांतिविरनगर लेन ०२,
                                                                         संचेती शाळेजवळ, थेरगाव पुणे ४११०३३
                                                                         ९४२३१३९०७१.
################################################