माझ्या मामाचा गाव मोठा Nagesh S Shewalkar द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या मामाचा गाव मोठा







★ ★★★★★★माझ्या  मामाचा गाव मोठा. ★ ★★★★★★★★★
       


                  
        ' मामाच्या गावाला जाऊया, खूप खूप मजा करूया...' अशा ओळी गात गात शिरीष घरात शिरला. त्याचा एकंदरीत आवेश बघता तो खूप खुश असल्याचे त्याच्या आईने ओळखले. तो आनंदी असतानाच त्याला काही तरी खाऊ घालावे या हेतूने  शिरीष काही बोलण्यापूर्वीच त्याची आई म्हणाली,
"शिरूबेटा, जा लवकर हात पाय धुऊन ये. मी दूध बिस्कीट घेऊन येते." अनिच्छेने शिरीष न्हाणीघरात पोहोचला. कसे तरी हात पाय धुऊन, कपडे बदलून दिवाणखान्यात आला. तोपर्यंत त्याची आई दूध बिस्कीट घेऊन आली होती. दोघेही सोफ्यावर बसले.शिरीषने दुधाचा प्याला हातात घेतला. त्यात बिस्किट बुडवून एक दोन घास खाऊन होताच शिरीषने विचारले,
"आई, आपल्या मामाचे गाव कुठे आहे ग?"
" मामाचे गाव? तिकडे खूप लांब आहे. का बर?" आईने विचारले.
"आपला मामा तर इथे पुण्यात राहतोय मग गावी कोण राहते?"
"मामा एकटाच आहे ना, म्हणून तिथे कुणी राहत नाही."
"मग मामाच्या घरी कोण राहते ?" शिरीषने विचारले.
"कुणीच नाही. एक किरायादार राहतो. बाकी खोल्या कुलूप बंद असतात. अधूनमधून मामा दोन तीन दिवस जाऊन राहतो. पण शिरीष भाऊ आज काय विशेष? मामाची, मामाच्या गावाची चौकशी करताय ? छान गाणे म्हणत घरात आलास?" आईने विचारले.
"आई, आज की नाही आमच्या शाळेत एक आजीबाई आल्या होत्या. त्या की नाही, एका मराठी शाळेत शिक्षिका होत्या म्हणे.त्यांनी ना आम्हाला दोन तीन गोष्टी आणि चार पाच छान छान गाणी शिकवली." शिरीष म्हणाला.
"अरे, व्वा। छानच की. काय काय सांगितले?"
"आई, त्यातले की नाही एक गाणे मला खूप आवडले. आई झुकुझकु गाडी म्हणजे आपली ट्रेनच ना ग?" शिरीषने विचारले.
"अगदी बरोबर. त्या आजींनी झुकुझुकु गाडीचे गाणे सांगितले का?"
"होय. ए आई, दोन दिवसांनी दिवाळीची सुटी लागणार आहे तर आपण मामाच्या गावाला जाऊ या ना." शिरीष लाडिक आवाजात म्हणाला.
"मामाच्या गावाला?" आईने आश्चर्याने विचारले.
"होय. त्या आजीबाईंनी आणि आमच्या मिसने पण सांगितले की, या दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाऊन या म्हणून."
"अरे, पण..."
"आई, नाही म्हणू नकोस ना ग. प्लिज.. आई, प्लिज... प्लिज..." शिरीष गयावया करीत म्हणाला.
"बरे. आता बाबा आले म्हणजे आपण विचारू या...." आई म्हणाली तशी आनंदाने उडी मारून शिरीष म्हणाला,
" ये बात! मामाच्या गावाला जायचे...झुकुझुकु आगीनगाडी , पळती झाडे पाहू या.मामाच्या गावाला जाऊ या..."
"अच्छा! म्हणजे आजीबाईंनी हे गाणे शिकवले काय?"शिरीषच्या आईने विचारले.
"तुला माहिती आहे हे गाणे? ए आई, एकदा म्हण ना ग आई..प्लिज..." शिरीष म्हणाला आणि त्याचा आनंद, उत्साह पाहून त्याच्या आईनेही सुरेल आवाजात ते गीत गायिले. ते ऐकून शिरीषचा आनंद जणू गगनाला भिडला. तो तोंडावर हात ठेवून 'झुकुझुकु' असा आवाज काढत दिवाणखान्यात इकडून तिकडे धावत सुटला. त्याचा तो आनंद पाहून त्याच्या आईलाही वेगळेच समाधान वाटले.
       सायंकाळी शिरीषचे बाबा कंपनीतून घरी आले. शिरीष त्यांचीच वाट बघत दारातच उभा होता. बाबा आल्याबरोबर त्यांच्या हाताला धरून त्यांना ओढत ओढत आत घेऊन आला. त्याच्या बाबाला काही ही बोलायची संधी न देता सोफ्यावर बसवून म्हणाला,
"बाबा, आज की नाही, आमच्या शाळेत एक आजीबाई आल्या होत्या..." असे सांगत पुन्हा सारे ऐकवून म्हणाला,
"बाबा, दिवाळीच्या सुट्टीत आपण मामाच्या गावाला जायचे म्हणजे जायचे..." शिरीष हट्टाने तसे म्हणत असताना तिथे त्याची आई आलेली पाहून त्याच्या बाबांनी विचारले,
"अग, हा काय म्हणतोय, सोपे आहे का जाणे? शिवाय तिथे कुणी राहत नाही...."
"पण आपला मामा तर अधूनमधून जातोच ना, तसेच आपणही जाऊया. नाही तरी आपण नेहमी पिकनिकला जातोच ना, तसेच मामाच्या गावाला जाऊया...." शिरीष बोलत असताना त्याचे बाबा काही बोलू पाहत असताना त्यांना थांबायला सांगून शिरीषची आई म्हणाली,
"अहो, त्याची इच्छा आहे तर जाऊया की. आपणही यापूर्वी कधी त्या गावी गेलो होतो ते आठवतही नाही. मी दादाला विचारते. बघूया." 
तितक्यात शिरीषने आईचा भ्रमणध्वनी आणून दिला. त्याच्या त्या क्रुतीचा अर्थ लक्षात घेऊन त्याच्या आईने लगेच त्याच्या मामाला फोन लावला आणि सारे काही सांगितले. त्यांची चर्चा होऊन आईने भ्रमणध्वनी बंद केला न केला की जवळ उभा असलेल्या शिरीषने विचारले,
"आई, काय म्हणाला ग मामा? जाऊ म्हणाला का?कधी जायचे म्हणाला?"
"अरे, थांब तर. मामा म्हणाला की, गावी राहणाऱ्या आमच्या चुलतभावाला म्हणजे तुझ्या दुसऱ्या मामाला विचारून ठरवू म्हणाला...."
"आता आणखी काय ठरवायचे? कधी लावतो म्हणाला फोन? आज-आत्ता-ताबडतोब लावायला सांगितले ना तू?" शिरीषने विचारले.
      काही वेळाने शिरीष आई बाबांसोबत जेवायला बसला. परंतु त्याचे लक्ष जेवणात नव्हते. जेवताना तो म्हणाला,
"बाबा, आपण मामाच्या गावी जाताना आपल्या कारने जायचे नाही."
"मग? कशाने जायचे? मामाच्या कारने जायचे का?"
"बिलकुल नाही. आपण रेल्वेने... झुकझुक गाडीतून जायचे?"
"एवढ्या दूर?" बाबांनी आश्चर्याने विचारले. असेच बोलत बोलत जेवणे पार पडली. जेवण झाल्यानंतर थोड्याच वेळात शिरीषच्या मामांचा फोन आला. शिरीषच्या आईने फोन उचलताच मामा म्हणाला,
"हेमांगी, मी गावी असलेल्या वसंतदादांना बोललो, त्यांचे म्हणणे असे आहे की, आपण सर्वांनी दिवाळीलाच गावी यावे. तसे त्यांनी आग्रहाचे आमंत्रण दिले आहे."
"ठिक आहे. दादा, मी यांच्याशी बोलून सांगते तुला." असे बोलून आई फोन बंद करत असतानाच शिरीषने विचारले,
"आई, काय म्हणाला मामा? कधी जायचे म्हणाला?"
"सांगते..." असे म्हणत शिरीषच्या आईने त्याला आणि त्याच्या बाबांना झालेले सारे संभाषण ऐकवले. ते ऐकून टाळ्या पिटत पिटत आनंदाने नाचणाऱ्या शिरीषला पाहून बाबा म्हणाले,
"अग, पण दिवाळीत जायचे म्हणजे?"
"अहो, मग काय झाले? तो माझा चुलतभाऊ असला तरी मला दादासारखाच आहे." शिरीषची आई म्हणाली.
"ठिक आहे. ठरवू या."
"बाबा, आता काहीही ठरवायचे नाही. आता ठरलय. आपण मामाच्या गावी जाणार आहोत. इट्स फायनल ! आणि हो कारने नाही तर रेल्वेने जाणार आहोत...."
"अरे, सुट्ट्यांची गर्दी असणार. आरक्षण तर मिळायला हवे ना?" शिरीषच्या बाबांनी विचारले.
"अहो, दादाचा एक मित्र रेल्वे खात्यात आहे. तो करील सारी व्यवस्था." शिरीषचीआई म्हणाली.
"ठिक आहे मग. माझी काही हरकत नाही. जाऊया..." असे म्हणत शिरीषकडे पाहून हसत म्हणाले,"खुश का आता?"
"येस बाबा, थँक्स। आई, तुला पण थँक्स।" असे म्हणत शिरीष आनंदाने आईजवळ जाऊन तिच्या कुशीत शिरला....
             ठरलेल्या दिवशी म्हणजे आरक्षण मिळाल्याप्रमाणे शिरीष, त्याचे आई-बाबा, मामा-मामी आणि शिरीषचा त्याच्याच वयाचा आकाश नावाचा एक मामेभाऊ सारेजण दिवाळी साजरी करण्यासाठी गावी निघाले. सकाळी दहा वाजता त्यांच्या रेल्वेने पुणे रेल्वे स्थानक सोडले. शिरीष आणि आकाशने समोरासमोरच्या खिडकीजवळच्या जागा पटकावल्या. थोड्या वेळाने रेल्वेने पुणे शहर सोडले. शेती, जंगल, झाडी, गुरेढोरे बघत असताना शिरीषला अचानक काही तरी आठवले. तो म्हणाला,
"आकाश, ती बघ, पळणारी झाडे. कशी शिवाशिवी खेळत आहेत...".असे म्हणत पुढे म्हणाला,"मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया..."आईकडे बघत म्हणाला,
"आई, मामाच्या गावाला जाऊया गाणे म्हण ना ग..."
" ए आत्या म्हण ना ..." आकाश ही म्हणाला आणि शिरीषच्या आईने मामाच्या गावाला जाऊया हे गीत म्हणायला सुरुवात केली. आकाशच्या आईला ही ते गीत पाठ होते. तिनेही साथ द्यायला सुरुवात केली. शिरीषलाही गाणे पाठ झालेच होते. तोही म्हणू लागला. ते पाहून  शिरीषचे बाबा आणि मामाही म्हणू लागले. सर्वांचा आवाज ऐकून डब्यातले इतर लोकही ते ऐकू लागले. गाणे संपताच डब्यातल्या इतर प्रवाशांनी टाळ्या वाजवल्या. काही लोकांनी 'वन्स मोअर' चा ठेका धरला.  पुन्हा एकदा मामाच्या गावाला जाऊया हे गीत  गायला सुरुवात झाली. यावेळी डब्यातील काही लोकांनी टाळ्यांचा ठेका धरला तर काही लोकांनी गीत गायला सुरुवात केली.... 
     अचानक शिरीषने विचारले, " बाबा, आपल्याला हवा दिसत नाही ना, मग हवेत रेषा कशा काढता येतील?"
"हवेत रेषा? कशाला?"
"असे काय हो करता बाबा, आपण  आता म्हणलेल्या गाण्यात आहे ना की , 'झुकुझुकु आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी..' हे कसे ? " शिरीषने विचारले
"कसे आहे बघ, आता आपण ज्या गाडीत बसलो आहोत ना, ती गाडी आणि आता जवळपास सर्वच रेल्वेगाड्या ह्या विजेवर म्हणजे इलेक्ट्रिकवर चालत आहेत म्हणून त्या धूर सोडत नाहीत. परंतु फार वर्षांपूर्वी म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळी चालणाऱ्या सगळ्या आगगाड्या कोळशावर चालत होत्या. त्यामुळे कोळसा जळताना होणारा धूर हा हवेत सोडल्या जात असे. हवा तर दिसायची नाही परंतु सोडलेला धूर असा मस्त रेषा काढल्या प्रमाणे दिसत असे. तुम्ही होळीला रंग खेळताना जशा रंगाच्या धारा दिसतात ना तसे." शिरीषच्या बाबांनी समजावून सांगितले. ते ऐकून आकाशने विचारले,
"मामा, कोळसा म्हणजे काय हो?"
"आकाश, आपले कपडे इस्त्री करताना तू पाहिलेस का?" आकाशच्या बाबांनी विचारले.
"हो, बाबा. दोन दिवसांपूर्वी तुमचे आणि माझे कपडे घेऊन मी गेलो होतो. त्यावेळी त्या काकांना इस्त्री करताना मी पाहिले."
"बरोबर. ज्या भांड्याने ते काका इस्त्री करत होते ना त्यामध्ये ...."
"हो बाबा. त्या भांड्यात त्या काकांनी काळे काळे काही तरी टाकले होते." आकाशने सांगितले. 
"अरे, तेच काळे काळे कोळसे होते.लाकूड जळून जे काळे काळे शिल्लक राहते ना त्याला कोळसा म्हणतात." शिरीषचे बाबा म्हणाले.
"बाबा, मलाही कोळसा बघायचा आहे. अशा कोळशाच्या मदतीने रेल्वे चालायची?"
 "होय. सूर्यप्रकाशातून जशी उष्णता निर्माण होते ना, तशीच शक्ती कोळशाच्या वाफेतून मिळते आणि त्या शक्तिच्या जोरावर एवढी मोठी रेल्वे पळत असते." शिरीषच्या बाबांनी सांगितले.
        आकाश आणि शिरीष पळणारी झाडे बघत असताना शिरीषला काही तरी आठवले. त्याने आईला विचारले,
" आई, मामाची बायको सुगरण म्हणजे काय ग?" 
"सुगरण म्हणजे... अ..अं...हं...खूप काम करणारी...खूप छान स्वयंपाक करणारी..." शिरीषचीआई समजावून सांगत असताना अचानक शिरीष आकाशच्या आईकडे बोट करून म्हणाला,
"म्हणजे आपल्या या मामीसारखी?"
"अग बाई, शिरीष तुला जाणीव आहे की..." आकाशची आई म्हणाली आणि तिने आकाशच्या बाबांकडे पाहिले. तशी सारी मोठी माणसे हसू लागली. आकाश आणि शिरीष दोघेही पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागले.
       काही वेळाने शिरीषने विचारले,"मामा, तुझा गाव मोठा आहे ना?"
"अं अं तसा मोठा म्हणजे आपल्या पुण्यासारखा मोठा नाही. पण फार छोटा ही नाही. "
"पण तिथे सोन्याचांदीच्या पेठा तर आहेत ना? "
"आहेत की."
"बाबा, सोन्याचांदीच्या पेठा म्हणजे काय हो?" आकाशने विचारले.
"अरे, एकाच ठिकाणी सोन्याची चांदीची अनेक दुकानेअसतात त्याला पेठ म्हणतात."
"म्हणजे आपल्या मंडईत भाजीची खूप दुकाने असतात त्याप्रमाणे?" आकाशने विचारले.
"अगदी बरोबर." आकाशचे बाबा म्हणाले. पाठोपाठ आकाशची आई म्हणाली,
"काय ही पोरं शंकाखोर झालीत हो. त्या गाण्याचा शब्द न शब्द ते समजून घेत आहेत." " "अग मग बिघडले कुठे?" आकाशचे बाबा म्हणाले.
"आई, तालेवार म्हणजे काय ग?" शिरीषने विचारले. 
"तालेवार म्हणजे खूप श्रीमंत. भरपूर पैसा असलेले."
"आणि रेशीम म्हणजे?" शिरीषने विचारले.
" म्हणजे आपण घालतो ना तशा कापडाचा एक प्रकार. फार महाग असतो बरे."
"हजार वार म्हणजे?" शिरीषने पुन्हा विचारले.
"शिरीष, तू तर सारी कविताच जशाला तशी पाठ केलेली दिसते." शिरीषची मामी म्हणाली.
"तर मग काय ? त्या दिवशी त्या आजीबाईंनी शाळेत शिकवली आणि याने पाठच केली."शिरीषची आई म्हणाली.
"बरेच झाले की, त्याच्या निमित्ताने आपल्याला ते गाणे पुन्हा ऐकायला आणि गायला मिळाले की." शिरीषची मामी म्हणाली.
"नुसती ऐकायला किंवा गायला मिळाले नाही तर रेल्वेत बसून प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली." शिरीषचा मामा म्हणाला.
"हो ना आपणही लहानपणी हे गाणे शंभर वेळ ऐकले असेल, रांग करून एकमेकांच्या कमरेवर हात ठेवून रेल्वेसारखा आवाज काढत, तशीच शिट्टी मारत पळालो असू परंतु प्रत्यक्ष रेल्वेत बसून त्या गाण्याचा आनंद लुटताना खूप मजा येते आहे." शिरीषचे बाबा म्हणाले.
"बाबा, बाबा, एक सांगा ना, हे हजार वार म्हणजे काय हो?"
"हजार वार ....वार म्हणजे जुन्या काळातील कापड मोजायचे एक साधन. आता आपण कसे एक मिटर , दोन मिटर, पाच - दहा मिटर असे कापड मोजतो ना त्याप्रमाणे !" शिरीषच्या बाबांनी सांगितले....
        सायंकाळी पाचच्या सुमारास शिरीष आणि सारेजण त्याच्या मामाच्या गावी असलेल्या रेल्वे स्थानकावर उतरले. गावी राहणारा शिरीषचा वसंतमामा त्यांना घ्यायला रेल्वे स्थानकावर आला होता. सारेजण सामान घेऊन बाहेर आले . वसंतमामा अँटोरिक्षा ठरवत असताना शिरीषचे लक्ष एका वाहनाकडे गेले. त्याने विचारले,
"बाबा, ते काय आहे हो?"
"ती घोडागाडी आहे. ते बघ त्यात ती माणसे बसली आहेत"
"आपणही त्या घोडागाडीत बसून मामाच्या घरी जाऊया का?"
"असे म्हणतोस? ठिक आहे.." असे म्हणून त्यांनी वसंतमामांना शिरीषची इच्छा सांगितली आणि सारेजण दोन टांग्यांमध्ये बसून घराकडे निघाले. रस्त्याने जातानाही शिरीषची प्रश्नावली सुरू होती. जातांना एका इमारतीकडे पाहून शिरीषची आई म्हणाली,
"इथे आमची शाळा होती. अरे, शाळाच आहे. किती बदलली आहे. केवढी सुंदर आणि भव्य इमारत झाली आहे ना?"
" आई, म्हणजे तू इथल्या शाळेत शिकलीस का? तू मामाच्या गावी राहत होतीस?"
"हो. अरे, मामाचे गाव म्हणजे माझे ही गाव ना. मी आणि मामा बहीण-भाऊ आहोत ना, म्हणून आमचे गावही एकच ना.." आई समजावून सांगत असताना टांगा मामाच्या घरासमोर थांबला. सारे खाली उतरले. वसंतमामाची बायको वासंती मामीने सर्वांच्या पायावर पाणी टाकून , हातातल्या पोळीच्या तुकड्याने ओवाळून सर्वांना सन्मानाने आत घेतले. तो प्रचंड मोठा वाडा, अंगणात लावलेली झाडे पाहत पाहत सारे आत आले. दिवाणखाना आणि इतर खोल्याही प्रशस्त होत्या, आकर्षक सजवलेल्या होत्या. शिरीष, आकाश आणि त्यांच्याच वयाचा वसंतमामांचा मुलगा समीर तिघे बाहेर खेळू लागले.खेळत असताना शिरीषचे लक्ष घराच्या छताकडे गेले. तिथे शहरात असतात तसे छत नसल्याचे पाहून शिरीषला आश्चर्य वाटले. तो समीरला काही विचारणार तितक्यात त्यांना जेवायला आत बोलावले . सारे आत येताच शिरीष सरळ त्याच्या बाबांजवळ जाऊन हळू आवाजात म्हणाला,
"बाबा, मामाच्या घरावर टेरेस नाही का हो ?.काही तरी रेड कलरचे वेगळे दिसते आहे." 
त्याची शंका वसंतमामांनी ऐकली. मोठ्या प्रेमाने शिरीषला जवळ घेऊन म्हणाले, 
" बाळा, त्याला कौलारू म्हणतात. ती मातीपासून तयार केलेली असतात. विशेष म्हणजे या कौलारुंमुळे उन्हाळ्यात बिलकुल गर्मी होत नाही. सारे कसे थंड थंड कुल कुल वाटते..."
"बाबा, मग आपणही असेच आपले घर कौलारू करून घेऊया ना. उन्हाळ्यात किती गर्मी होते ना आपल्याला..."
"अरे, वा ! छान विचार आहेत तुझे. पण कसे आहे, शिरीषबाळा, तुमच्या फ्लॅटच्यावर अजून खूप सारे मजले आहेत ना, त्यामुळे तिथे कौलारू वापरता येत नाही. एक मात्र करता येईल दरवर्षी तुला उन्हाळ्याच्या  सुट्ट्या लागल्या की , सरळ येथे येत जा. तुला गर्मीचा त्रासही होणार नाही आणि मस्तपैकी रोज आंबे आणि आंब्याचा रस खायला मिळेल." वासंती मामी म्हणाली आणि ते ऐकून शिरीष आनंदाने उड्या मारू लागला. 
सायंकाळच्या जेवणात केळाच्या कालवणाचा बेत पाहून शिरीषची आई म्हणाली,
"शिरीष, याला म्हणतात शिकरण!" ते ऐकून शिरीष लगेच गाऊ लागला,
"मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण..." ते ऐकून सर्व जण हसतहसत शिरीषच्या हुशारीचे कौतुक करू लागले. जेवणे होताच  सारे दिवाणखान्यात गप्पा मारत बसले असताना आकाशच्या बाबांनी टिव्ही लावला. त्यावर एका जुन्या चित्रपटातील गाणे लागले होते. त्यातील एक द्रुश्यं येताच शेजारी खेळणाऱ्या मुलांना ते म्हणाले,
"शिरीष, बघ, तुला धुरांच्या रेषा हवेत सोडणारी आगीनगाडी पाहायची होती ना, ती बघ...."
खेळणे थांबवून मुलांनी टिव्हीकडे पाहिले. त्यावर एका सिनेमातील रेल्वेत चाललेले गाणे दाखवत होते.जोरात पळणारी रेल्वे धूर सोडताना पाहून शिरीष गाणे म्हणू लागला,
' झुकुझुकु आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी...' 
         दुसऱ्या दिवशी सारे मिळून गावातील काही विशेष स्थळं पाहायला गेली . शिरीषची आई आणि दोन्ही मामा त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगत असताना बच्चे कंपनी नाना प्रश्न विचारत होते. मोठी माणसे ही न कंटाळता त्यांच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देत होती. उलट आपल्या मुलांची उत्सुकता, नवीन माहिती जाणून घ्यायचा जिज्ञासूपणा पाहून त्यांना आनंद होत होता.
       दोन दिवसांनी सुरु झालेल्या दिवाळीचा आनंद काही निराळाच होता. अगदी सकाळी आंघोळीसाठी तयार केलेले उटणे, फटाक्यांची आतषबाजी, फराळाची मजा आणि फुलांनी सजवलेले घर आणि अंगणाची केलेली सजावट सारेच काही मनोहर, रमणीय, आकर्षक असे होते. शिरीषचे बाबा, आकाशचे बाबा एकूण एक गोष्टी स्वतःच्या भ्रमणध्वनीवर टिपून ठेवत होते. जेवायचा थाट अवर्णनीय असाच होता.  भाऊबीजेच्या दिवशी सकाळची गोष्ट. शिरीषची आई शिरीषच्या बाबाला बाजूला बोलावून म्हणाली, 
"अहो, वसंतदादाने आपल्याला सर्वांना चांगले भारीचे कपडे आणले आहेत. मी वासंती वहिनीस चांगली साडी आणली आहे. पण गडबडीत दादाला काहीच आणले नाही. बाजारात जाऊन आणा ना कपडे..." शिरीषचे बाबा काही बोलण्यापूर्वीच तिथे आलेला शिरीष म्हणाला,
"आई- बाबा, एक सांगू का, आगीनगाडी या गाण्यातला मामा कोट आणि विजार वापरतो ना तशीच आणता काय? पण मला एक सांगा, कोट मला माहिती आहे पण ही विजार म्हणजे काय हो?"
"शिरीष, विजार म्हणजे एक प्रकारची पँट. अग, पण शिरीषची आयडिया भारी आहे हं. आणायला हरकत नाही."
"ठिक आहे . घेऊन या." शिरीषची आई म्हणाली.
         दिवाळी झाली. सारेजण एक आगळावेगळा ठेवा आणि एक सुरेख अनुभव घेऊन निघाले. त्यावेळी वासंतीमामी म्हणाल्या,
"शिरीष तुझ्यामुळे आमची यावर्षीची दिवाळी कायम लक्षात राहिल अशीच झाली बरे. आता उन्हाळ्यात सुट्टी लागल्याबरोबर ये. छान छान आंबे आणि रस खावूया आपण."
"हो मामी. नक्की येईन...." शिरीष म्हणाला आणि सर्वांनी मिळून टँक्सीने परतीचा प्रवास सुरू केला.
       दिवाळीची सुट्टी संपली. शाळा सुरू झाली. 'दिवाळीची सुट्टी कशी घालवली ?' या विषयावर शिरीषने लिहिलेल्या निबंधास पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. विशेष म्हणजे हे पारितोषिक शिरीषला ज्या आजीने 'झुकुझुकु आगीनगाडी' हे गीत शिकवले होते त्याच आजीबाईंच्या हस्ते देण्यात आले....
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

                                     नागेश सू. शेवाळकर,
                                                     ११०, वर्धमान वाटिका, फेज ०१
                                                     क्रांतिवीरनगर, लेन ०२,संचेती शाळेजवळ
                                     थेरगाव, पुणे. ४११०३३
                                      ९४२३१३९०७१