२. महाबळेश्वर- द लॅंड ऑफ स्ट्रॉबेरीज..

२. महाबळेश्वर- द लॅंड ऑफ स्ट्रॉबेरीज..

महाराष्ट्रातील थंड हवेच आवडत ठिकाण म्हणजे महाबळेश्वर जे स्ट्रॉबेरीज साठी प्रसिद्ध आहे. पुणे आणि मुंबई पासून जवळ असल्यामुळे खूपच प्रसिद्ध आहे. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी ही जागा आहे. महाराष्ट्रातील काश्मीर असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सातारा‍ जिल्ह्यात महाबळेश्वर सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे. आणि निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरचा लौकिक आहे. महाबळेश्वर महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील गाव आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे.

 

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर आहे. भारतातील जी हिरवळीने सजलेली कांही मोजकीच ठिकाणे आहेत त्यातीलच हे एक. ब्रिटिश राजवटीतील मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी होती. येथील महाबळेश्वराचे देऊळ हे यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. अफझलखानच्या तंबूचे सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.

 

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर, रासबेरी, जांभळाचा मध व लाल मुळे, गाजरे हे सुद्धा खास प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.

 

पर्यटकासाठी येथे जुन्या महाबळेश्वर पासून ७ किमी अंतरावर खूप प्रेक्षणीय ठिकाणे आहेत शिवाय ५ मंदिरे आहेत की जी पूर्वीच्या काळातील भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवितात. येथे नैसर्गिकरित्या तयार झालेली दर्शनीय ठिकाणे आहेत. ब्रिटिश राजवटीत कांही ब्रिटिश येथे विश्रांतीसाठी येत त्यावेळी त्यांनी कांही ठिकाणांना नावे दिलेली आहेत. पाच नदीचे उगम स्थान म्हणून महाबळेश्वर ओळखले जाते. आणि निसर्ग पाहायला महाबळेश्वर सारख ठिकाण नाही. मुंबई आणि पुण्यापासून जवळच असलेल महाबळेश्वर पर्यटकांची पसंती असलेली ठिकाण आहे.

 

महाबळेश्वर मधले काही प्रसिद्ध पॉइंट्स-

महाबेश्वर मध्ये फिरण्यासाठी बऱ्याच जागा आहेत. अप्रतिम निसर्ग आणि निसर्गसंपदेने नटलेल महाबळेश्वर नेहमीच पर्यटकांना खुणावत असत. येथील प्रेक्षणीय ठिकाणांना ‘पॉईंट’ म्हणतात. बहुतांशी ‘पॉईंट’ हे डोंगराच्या टोकालाच आहेत.

 

श्रीक्षेत्र महाबळेश्वर
महाबळेश्वर हे नाव भगवान महादेव (महाबली) यांच्या नावापासूनच प्राप्त झालेले आहे. जुन्या महाबळेश्वर मध्ये महादेवाचे मंदिर आहे, यालाच क्षेत्र महाबळेश्वर असेही म्हणतात. महाबळेश्वर पासून ५ किमी अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर आहे.

 

पंचगंगा मंदिर

कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री, वेण्णा सरस्वती, आणि भागीरथी या ७ नद्यांचे उगमस्थान आहे की जे पाहिलेच पाहिजे. थंड हवा, अप्रतिम निसर्ग ही महाबळेश्वरची खासियत!! यापैकी पहिल्या पांच नद्यांचा ओहोळ सतत बाराही महिने वाहत असतो. सरस्वतीचा ओहोळ मात्र प्रत्येक ६० वर्षानी दर्शन देतो. आता तो २०३४ साली दर्शन देईल. भागीरथीचा ओहोळ प्रत्येक १२ वर्षानी दर्शन देतो. हे मंदिर ४५०० वर्षापूर्वीचे आहे. इथून बाहेर पडल्यानंतर कृष्णा नदी स्वतंत्र वाहाते. इथे कृष्णाबाई हे स्वतंत्र मंदिर आहे.

 

कृष्णाबाई मंदिर

पंचगंगा मंदिराचे पाठीमागे अगदी जवळच कृष्णाबाई मंदिर आहे की जेथे कृष्णा नदीची पूजा केली जाते. या मंदिरात शिव लिंग आणि कृष्णाची मूर्ती आहे. लहानसा ओहोळ गोमुखातून वाहतो आणि तो पाण्याच्या कुंडात पडतो. पूर्ण मंदिराचे छतासह दगडी बांधकाम हे विशेष वैशिष्ट्य आहे. पण या मंदीराजवळ दलदल झालेली आहे आणि येथे पर्यटक फार कमी येतात त्यामुळे हे मंदिर फार प्रसिद्ध नाही. पण या ठिकाणाहून अतिशय सुंदर असा कृष्णा नदीचा देखावा पाहता येतो.

मंकी पॉइंट

या ठिकाणाला हे नाव दिलेले आहे त्याला कारण असे की नैसर्गिक रित्या येथे तीन दगड आहेत ते मंकी सारखे समोरासमोर बसलेले आहेत असे वाटते आणि गांधीजींच्या शब्दांची आठवण करून देतात. तेथील खोल दरीत डोकावले की ३ हुशार मंकी समोरासमोर बसलेले आहेत असे चित्र नजरेला दिसते. निसर्गाची किमया येथे पाहायला मिळते. आर्थर सीट पॉइंटला जाण्याच्या मार्गावर हा पॉइंट आहे.

 

आर्थर सीट पॉइंट

समुद्र सपाटीपासून १,३४० मीटर उंचीवर असलेला हा महाबळेश्वरमधील एक पॉइंट आहे. सर आर्थर यांच्या नावामुळे या जागेला हे नाव मिळाले. महाबळेश्वर मधील हे प्रसिद्ध ठिकाण आहे. हे एक सुंदर आणि प्रेक्षणीय ठिकाण आहे. तिथे खूप खोल दरी पाहायला मिळते.

 

वेण्णा लेक (वेण्णा तलाव)

महाबळेश्वर हे विश्रांतीचे ठिकाण व सहलीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. वेण्णा लेक हे पर्यटकांसाठी महाबळेश्वर मधील प्रमुख आकर्षक ठिकाण आहे. हे लेक सर्व बाजूंनी हिरव्यागार झाडांनी वेढलेले आहे. महाबळेश्वर मध्ये सामान्य ते ३ स्टार हॉटेल्स कमी बजेट मध्ये उपलब्ध आहेत आणि तेथून तुम्ही लेकचा देखावा नजरेत सामाऊ शकता.

 

केइंटटस् पॉइंट

महाबळेश्वरचे पूर्व बाजूस हा पॉइंट आहे. येथून तुम्ही बलकवडी आणि धोम धरणांचा देखावा पाहू शकता. या पॉइंटची ऊंची साधारण १२८० मीटर आहे.

 

नीडल होल पॉइंट / एलीफंट पॉइंट

काटे पॉइंट जवळच हा निडल पॉइंट आहे. नैसर्गिक रित्या खडकाला सुईसारखे भोक आहे ते सहजतेने दिसते म्हणून त्याला नीडल होल नाव दिलेले आहे. ह्या पॉइंट वर खडक हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो म्हणून त्याची एलीफंट पॉइंट म्हणून ही प्रसिद्धी आहे.

 

विल्सन पॉइंट

सर लेस्ली विल्सन हे सन १९२३ ते १९२६ मध्ये मुंबईचे राज्यपाल होते तेव्हा या पॉइंटला त्यांचे नाव दिले आहे. महाबळेश्वर मधील महत्वाचा व उंच पॉईंट म्हणजे विल्सन पॉईंट! या पॉईंटवर तीन बुरुज आहेत. पहिल्या बुरुजाच्या दक्षिणेकडे पोलोग्राऊंड, मकरंदगड आणि कोयना खोर्‍याचा आसमंत दिसतो. दुसर्‍या बुरुजावर सकाळी  आल्यास सुर्योदयाचे अप्रतिम दर्शन घडते. तसेच पूर्वेला पाचगणी दिसते. तिसर्‍या बुरुजावरुन उत्तरेकडील क्षेत्र महाबळेश्वर एल्फिस्टन पॉईंट, कॅनॉट पॉईंट, खालचे रांजणवाडी गाव आणि वेण्ण नदीचे खोरे दिसते. महाबळेश्वर मधील हा एकच पॉइंट असा आहे की, येथून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्तही पाहू शकता. महाबळेश्वरची सुंदरता आणि आकर्षकता तुम्ही येथून न्याहाळू शकता. महाबळेश्वर मेढा मार्गाच्या पाठीमागील बाजूस हा विल्सन पॉइंट महाबळेश्वर शहरापासून १.५ की.मी. अंतरावर आहे.

 

प्रतापगड

प्रतापगड किल्ला हा महाबळेश्वर जवळ आहे. हा शिवाजी महाराजानी बांधला आहे. शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सरदार अफझलखानला ठार मारले होते म्हणून हा प्रतापगड किल्ला भारताचे इतिहासात प्रसिद्ध आहे. गडाच्या मध्यावर भवानी मातेचे दगडी मंदीर आहे. देवीची काळया पाषाणाची मुर्ती आहे. गडावर शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मंदिर व शिवछत्रपतींचा भव्य अश्वारुढ पुतळा असून गडाच्या पायथ्याशी अफजलखानाची कबर आहे.

 

लिंगमाला धबधबा

महाबळेश्वर जवळ हा धबधबा आहे. साधारण पणे ६०० फुट उंचीवरून हे पाणी वेण्णा तलावात पडते. खडकाचे योजनापूर्वक विभाजन करून हा धबधबा बनविलेला आहे. सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे. तसेच हा पॉईंट पांचगणी रस्त्याला वेण्णा लेक पासून अत्यंत जवळ आहे.

  

बॉम्बे पॉईंट

जुन्या मुंबई रस्त्याजवळ हा पॉईंट असल्याने याला बॉम्बे पॉईंट हे नाव पडले. पर्यटकांच्या सर्वात आवडत्या पॉईंट्स पैकी हा एक पॉईंट आहे. अस्ताला जाणा-या सूर्याचे दर्शन हे या पॉईंटचे खास आकर्षण आहे. त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदर या पॉईंट जवळ भरपूर गर्दी होते. येथे सूर्य मावळताना त्याचा आकार लंबगोल, घागरीसारखा, चौकोनी, पतंगाकृती असा वेगवेगळा होत असतो. ते पण आल्हाददायक असत. यालाच सनसेट पॉईंट म्हणतात.

 

तापोळा

यालाच महाराष्ट्राचे मिनीकाश्मीर म्हणतात. हे प्रसिध्द आहे ते येथील नौकाविहारासाची सोय आहे. स्पीड बोटिंग इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत. बाजूला असलेली घनदाट झाडी व उंच डोंगर व त्यामध्ये असणारा विस्तीर्ण असा शिवसागर जलाशयाच्या फुगवटयाची शेवटची बाजू होय. या जलाशयाच्या काठावर डोंगर पायथ्याशी अनेक छोटी-छोटी खेडी वसलेली आहेत. त्यामध्ये तापोळयाबरोबर बामणोली, खरसुंडी, पावशेवाडी इ. गावांचा समावेश आहे. या गावांना लाँचेस शिवाय दळणवळणाचा दुसरा मार्ग नाही. तापोळयाला जाण्यासाठी दुतर्फा झाडी असलेला एक पदरी पक्का डांबरी रस्ता आहे. तीव्र उताराचा वळणावळणाचा रस्ता उतरताना गर्द झाडांनी भरलेले डोंगर पाहून मन प्रसन्न होत.

 

पाचगणी

सह्याद्रीच्या माथ्यावर टेबललँड प्रमाणेच पाच टेकडया आहेत. या भागालाच पाच गडांची भूमी पांचगडी व त्याचा भ्रंश होऊन पाचगणी असे नांव पडले आहे. येथे येणार्‍या पर्यटकांना टेबललँडचे विशेष आकर्षण आहे. तिथून पॅराग्लायडिंग ची मजा अनुभवता येते. थंड कोरड्या व उत्साहवर्धक हवामानामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते त्यामुळे पाचगणीला आरोग्य धाम असे म्हणण्यात येते.

 

पाच डोंगरावर वसलेले गाव म्हणून पाचगणी. थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर लौकिकास आले आहे. प्रेक्षणीय विविध पाईंटस, भिलार टेबललँड, किडीज पार्क आहेत. शिवाय मॉरल रिआर्मामेंट सेंटर आहे. येथे देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मॅप्रो फ्रुट प्रॉडक्टस ही जाम फॅक्टरी ८ एकर परिसरात आहे. तिथले जॅम, सरबते इत्यादी आणि विविध प्रकाराची आईसक्रीम्स प्रसिद्ध आहेत.

 

महाबळेश्वर बाजारपेठ-

महाबळेश्वर बाजारपेठ फार प्रसिद्ध आहे. महाबळेश्वरच ते अजून एक आकर्षण आहे. येथे लोकरीचे कपडे,स्वेटर,चामड्याचे बेल्ट,पर्से इ. विविध प्रकारात् मिळतात. तिथल्या गोधड्या सुद्धा प्रसिद्ध आहेत. बाजारपेठ हे महाबळेश्वरच खास आकर्षण आहे.

 

२- ३ दिवसाचा ब्रेक हवा असेल तर महाबळेश्वर एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. इथे येऊन गेल्यावर मन प्रसन्न तर होतेच पण त्याचबरोबर नवीन उर्जा मिळते!!

 

 

 

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Paresh 4 महिना पूर्वी

Bhavik Modi 4 महिना पूर्वी

Shahaji 4 महिना पूर्वी

Anita Chandurkar 4 महिना पूर्वी

Ranjana Patil 4 महिना पूर्वी