३. केरळ- गॉड्स ओन कंट्री.

३. केरळ- गॉड्स ओन कंट्री.

केरळ देव भूमी म्हणून ओळखली जाते. निसर्गाची किमया इथे पाहायला मिळते. सृष्टी सौंदर्य त्याचबरोबर निसर्ग संपदेने नटलेले केरळ पर्यटकांच आवडतं ठिकाण आहे. केरळ हा एक उष्णकटिबंधीय प्रदेश आहे ज्याला प्रसन्न आणि समशीतोष्ण हवामानाचे वरदान मिळाले आहे, ज्याची एक संपूर्ण सीमा किनारी भागाची आहे आणि उत्तरेकडून येणाऱ्या शुष्क वाऱ्यांपासून पश्चिमी घाट संरक्षण करतो. पाऊस (जून-सप्टेंबर आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर) आणि उन्हाळा (फेब्रुवारी-मे) हे ऋतू येथे मुख्य आहेत आणि हिवाळा हा 28-32 अंश सेल्सियस या सामान्य तापमानात थोडी घट होणे एवढ्यापुरताच मर्यादित आहे.

केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे.

पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळ भारतातील सर्वाधिक शिक्षित लोकांचे राज्य आहे. केरळातील अंदाजित 50 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. नगदी रकमेची पिके या राज्याचे प्रमुख वैशिष्ट्य समजले जाते. नारळ, रबर, काळी मिरी, वेलदोडे, आले, सुंठ, कोको, काजू, पोफळी (पाम), कॉफी व चहा या पिकांचे प्रमुख उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते.

* केरळ मधली प्रेक्षणीय ठिकाणे-

 

१. अलप्पुझा-

पूर्वेचे व्हेनिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलप्पुझाला केरळच्या सागरी इतिहासात नेहमीच महत्वाचे स्थान आहे. आज, ते नौका शर्यत, बॅकवॉटर, समुद्र किनारे, सागरी उत्पादने आणि कॉयर उद्योग यांसाठी प्रसिद्ध आहे. अलप्पुझा समुद्र किनारा हे एक लोकप्रिय सहलीचे ठिकाण आहे. इथल्या समुद्रात गेलेला खांब 137 पेक्षा अधिक वर्ष जुना आहे. विजया बीच पार्कमधील मनोरंजनाच्या सुविधा समुद्र किनार्याच्या आकर्षणात भर घालतात. इथे जवळच एक जुने लाईटहाऊसही आहे जे पर्यटकांना आकर्षित करते.

हल्लीच्या हाऊस बोट एका चांगल्या हॉटेलसारख्या सर्व सुविधांनी युक्त असतात, ज्यात सुसज्ज शयनकक्ष, आधुनिक शौचालय, आरामदायक बैठकीची खोली, स्वयंपाकघर आणि गळाने मासे पकडण्यासाठी सोयी आहेत आणि हाऊस बोट मध्ये रहात असताना तुम्ही बॅकवॉटर जीवनाच्या दृश्यांचा कोणत्याही अडथळ्याविना आनंद लुटू शकता. 

२. मुन्नार-

मुन्नार हे देशातल्या आणि परदेशातील पर्यटकांसाठी एक मुख्य आकर्षण आहे. केरळच्याच्या प्रसिद्धित मुन्नारचे मोठे योगदान आहे. तीन पर्वत रांगा- मुथिरपुझा, नल्लथन्नी आणि कुंडल ह्यांच्या संगमावर वसलेले आहे आणि समुद्रसपाटीपासून त्याची उंची अंदाजे 1600 मी आहे. मुन्नारचे हिल स्टेशन कधीकाळी दक्षिण भारताच्या पूर्वकालीन ब्रिटिश प्रशासनाचे उन्हाळी रिसॉर्ट होते. 

या हिल स्टेशनची ओळख आहे इथल्या विस्तिर्ण भू भागात पसरलेली चहाची शेती, वसाहती बंगले, छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान. ट्रेकिंग आणि माउंटेन बाइकिंगसाठीही हे एक आदर्श स्थळ आहे. मुन्नारच्या आजूबाजूला काही अन्य पर्याय आहेत जे मुन्नारच्या मोहक हिल स्टेशन बरोबर आनंद द्विगुणीत करतात.

-इरविकुलम राष्ट्रीय उद्यान-
मुन्नार आणि त्याजवळील भागातील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान होय. हे उद्यान मुन्नारपासून साधारण 15 किमी दूर अंतरावर असून लुप्तप्राय होत चाललेला प्राणी –“नीलगिरी ताहर” म्हणजेच "हिमालयन गोट" साठी हे ओळखले जाते. 97 चौ.किमी अतंरापर्यंत पसरलेले हे उद्यान दुर्मिळ जातीची फुलपाखरे, वन्यजीव आणि पक्षांच्या अनेक दुर्लभ जातींचे आश्रयास्थान आहे.

-चहा संग्रहालय-
चहाच्या मळयांची उत्पत्ति आणि विकासाच्या दृष्टीने मुन्नारला आपली अशी एक स्वतंत्र परंपरा आहे. प्रदर्शनीय ठेवण्यासाठी मुन्नारमध्ये टाटा टी द्वारा काही वर्षांपूर्वी एका संग्रहालयाची स्थापना केली गेली. या चहा संग्रहालयामध्ये दुर्लभ कलाकृती, चित्रे आणि यंत्रे ठेवली गेली आहेत ज्यांना स्वतःची अशी वेगळी कहाणी आहे.

३. टेकाडी, इडुक्की-

टेकाडी हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. तिथली एलीफंट राईड प्रसिद्ध आहे. अखंड पर्वतरांगा आणि सुगंधी मसाल्यांनी युक्त असे मळे हे सुद्धा टेकाडीच खास आखार्षण आहे. त्याचबरोबर, टेकाडीचे पेरियार वन हे भारतातील एक उत्तम असे वन्य जीव अभयारण्य मानले जाते. तिथे बरेचसे प्राणी दर्शन देतात. सर्वत्र मनोरम बगीचे/मळे आणि पर्वतरांगांनी वेढलेली शहरे वसलेली आहेत. जिथे ट्रेकिंग तसेच पर्वतारोहणासाठी उत्तम संधी आहेत.

४. कोवलम-

कोवलम एक तीन अर्धचंद्राकार समुद्र किनारे असलेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा समुद्र किनारा आहे. हे पर्यटकांचे, विशेषत: युरोपीय पर्यटकांचे 1930 पासूनच आवडते पर्यटन स्थळ आहे. इथे एका विशाल खडकाळ भूशिराने समुद्रात आंघोळ करण्यासाठी शांत पाण्याचे एक सुंदर खाडी निर्माण केली आहे. ह्या समुद्र किनाऱ्यावर सुट्ट्यांचा आनंद लुटण्याचे अनेक पर्याय आहेत. इथे धूपस्नान, पोहणे, वनस्पतींवर आधारित शरीराचे मालिश, विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आणि कॅटामारॅन क्रूझिंग हे त्यापैकी काही आहेत. बीच कॉम्प्लेक्समध्ये बजेट कॉटेज, आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट, संमेलन सुविधा, शॉपिंग झोन, स्विमिंग पूल्स, योग आणि आयुर्वेदिक मसाज केंद्र आहेत. म्हणजेच रिलॅक्स होण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

थिरुवनंतपुरम शहरातली प्रेक्षणीय स्थळे आहेत- नेपियर म्युझियम, श्री चित्रा आर्ट गॅलरी, पद्मनाभस्वामी मंदीर, पोन्मुडी हिल स्टेशन इत्यादी. राज्य सरकारी हस्तकला एम्पोरियम (एसएमएसएम) इन्स्टिट्युट दुर्मिळ कलाकृती आणि अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी योग्य ठिकाण आहे. 

५. फोर्ट कोची-

फोर्ट कोचीचे ऐतिहासिक शहर व्यवस्थित पहायचे असेल, तर चालत फिरणे याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. चिंतामुक्त व्हा, मोठा श्वास घ्या आणि सुती कपडे, मऊ जोडे आणि हो स्ट्रॉ हॅट घालून बाहेर पडा. इतिहासात बुडलेल्या ह्या द्वीपाच्या प्रत्येक भागात तुम्हाला काही ना काही आकर्षक नक्कीच सापडेल. हे त्याचे स्वत:चे विश्व आहे, गतकालीन युगाचे नमुने जपणारं आणि त्या दिवसांचा त्याला आजही अभिमान वाटतो. जर तुम्ही भूतकाळाचा गंध ओळखू शकत असाल, तर ह्या रस्त्यांवरून चालायला तुम्हाला मजा येईल हे अगदी नक्की. इथे बरीच प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे निवांत हिंडायचं असेल आणि जुन्या काळात रमायचं असेल तर तुम्हाला कोची नक्कीच आवडेल.

 

* केरळ मध्ये घेता येणारे अनुभव-  

१. आयुर्वेद- केरळ, आयुर्वेदाची भूमी
केरळमधील सम हवामान, नैसर्गिक वनांची दाटी  (जी वनौषधी आणि औषधी वनस्पतींच्या समृद्धीने परिपूर्ण आहे), आणि थंड पावसाळा (जून ते जुलै आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर) हा आयुर्वेदाच्या रोगनिवारक आणि पुनर्जीवन देणाऱ्या उपचार पॅकेजेससाठी सर्वोत्तम आहे. केरळ हे भारतातील एकमेव राज्य आहे जे या वैद्यकशास्त्रीय शाखेचा प्रचार प्रसार निष्ठेने करते. केरळ मध्ये तुम्ही वेगवेगळ्या थेरपीजचा अनुभव घेता येईल.

२. हाऊस बोट-

केरळमध्ये करा हाऊस बोटमधून सफर! आज हाऊस बोट म्हणजे एक प्रचंड मोठ्या, हळू फिरणाऱ्या, आलिशान बोटी आहेत ज्या आरामदायी प्रवासापुरत्या वापरल्या जातात केट्टुवल्लम पासून हाऊस बोट बनवताना, केवळ नैसर्गिक पदार्थ वापरण्याची काळजी घेतली गेली. बांबू मॅट्स, काठ्या, लाकूड, सुपारीची झाडे यांचा उपयोग छतासाठी, जमिनीसाठी काथ्यांच्या चटया, लाकडी फळ्या आणि नारळाच्या झाडाचे लाकूड आणि काथे पलंगासाठी वापरले जातात. उजेडासाठी सोलर पॅनेलचा वापर केला जातो. 

आज, हाऊस बोटमध्ये उत्तम हॉटेलसारख्या सर्व सुखसोयी असतात ज्यात फर्निश्ड बेडरूम, आधुनिक टॉयलेट, आरामदायक दिवाणखाने, स्वयंपाकघर आणि पाहण्यासाठी बाल्कनीसुद्धा. लाकडी किंवा पामची कोरलेली छते सावली देऊन अखंड दृश्य दाखवतात. बहुतेक बोटी स्थानिक नाविक चालवतात तर काही 40 एचपी इंजिनने चालतात. बोट-ट्रेन ज्यात दोन किंवा अधिक बोटी एकत्र बांधल्या जातात त्यांचाही उपयोग अनेक पर्यटक करतात.  हाऊस बोटमधली सर्वात जादुई गोष्ट म्हणजे तरंगतानाच अशा ग्रामीण केरळचे दर्शन घेणे जे कधी अनुभवता येणार नाही.

३. बॅकवॉटर-

बॅकवॉटरचा आनंद हे केरळ चे विशेष आकर्षण आहे. पर्यटक खास बॅकवॉटरचा अनुभव घेण्याकरता केरळ मध्ये येतात. बऱ्याच ठिकाणी बॅकवॉटर पाहता येते यातलं प्रमुख अलप्पुझा आहे. बोटीतून प्रवास करतांना चौफेर असलेल्या पाण्यात आपण हरवूनच जातो. सगळीकडे उंचच्या उंच नारळाची झाडे पाहतांना मन प्रसन्न होत.

४. कथकली आणि इतर कला-

केरळ मध्ये गेलात आणि कथकली नृत्याचा आनंद घेतला नाही तर तुमची  सहल अर्धवट राहील. कथकली नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर, मार्शल आर्ट्सचे शोज सुद्धा तुम्हाला पाहता येतील. काहीतरी वेगळ अनुभव तुम्हाला नक्कीच घेता येईल.

रोजच्या ताणामधून ब्रेक हवा असेल, मन आणि शरीर रिलॅक्स करायचं असेल आणि निसर्गात रमून मन प्रसन्न करायचं असेल तर केरळ एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. इथे भेट दिल्यावर तुम्ही ताजेतवाने होणार हे अगदी नक्की!!

 

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

Vitthal 2 महिना पूर्वी

Bhavik Modi 4 महिना पूर्वी

Shahaji 4 महिना पूर्वी

Anita Chandurkar 4 महिना पूर्वी

PRASHANT PHAPALE 9 महिना पूर्वी

शेअर करा